- Log in to post comments
नमस्कार,
दिवाळीचा उत्साह जरी ओसरला असला तरी दिवाळी अंकाचे वाचन अजुन महिनाभर तरी चालेल. यावर्षी काय काय उत्तम आहे, कोणत्या दिवाळी अंकाने यावेळेस कोणता विषय निवडलाय, अशी चर्चा "ओळख दिवाळी अंकाची: २०१०" या मालिकेने करायचा विचार आहे. आपणही आपल्या आवडत्या अंकाबद्दल या मालिकेत नवीन लेख लिहुन योगदान द्यावे हि विनंती.
सर्वप्रथम मी सुरुवात करतो माझ्या आवडत्या अंकापासुन. अक्षर.
सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्याची परंपरा असलेल्या अक्षरने यावेळेस "नक्षलवाद" हा विषय निवडला. अर्थवाही मुखपृष्ठे ही अक्षरची खासियत. नक्षलवाद हा विषय असल्याने यावेळेस मुखपृष्ठावर लाल बावटा विराजमान आहे. चित्रात हा लाल बावटा फडकुन फडकुन बर्यापैकी जुन झालेला चितारला आहे, तो बर्याच ठिकाणी फाटला आहे, तो एका हिरव्या दांडीला ओबडधोबड शिवला आहे. त्यातुन एक मोठा रक्ताचा थेंब निखळतोय आणि त्या निखळण्याने जणु एक ज्योत तयार झालीये, आणि त्याखाली शब्द आहेत,
अंधारामाजी
काळ्याहूनकाळा
आंधळा
वर्तमानकाळा
'आ'वासून
विषयाला अत्यंत समर्पक असे हे मुखपृष्ठ आहे, नेहमीप्रमाणे षांताराम पवारांचे. यानंतर अनुक्रमणिका येते, वर्गवारी सह. संपादकीय मुख्यत्वे नक्षलवादावर भाष्य करतेय, यापानावरच्या चित्रात लेखणीच्या दांडीला झेंडा फडकतोय, लेखणीतुन लाल शाई ठिबकतेय आणि झेंड्यावर दाखवलाय "रेड कॉरिडॉर". "दिवाळी साजरी करतांना, फराळाबरोबरच दिवाळी अंकाचा आस्वाद घेतांना, भोवताली होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आपली एखादी छोटीशी पणतीही तेवत ठेवूया" अश्या आवाहनाने संपादकीय संपते.
- नक्षलवादावर भाष्य करणार्या खास विभागात लेख एकाहुन एक लेख आहेत. "नक्षलवादी देशद्रोही की गरिबांचे कैवारी" या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न या विषयातले दिग्गज करत आहेत.
- पहिला लेख आहे मेधा पाटकरांचा : "हिंसा हा मार्ग नाही"
- दुसरा आहे जयंत उमराणीकरांचा : "माओवादी सर्वात मोठे शोषक"
- तिसरा अरुंधती रॉय यांचा ": "होय मी रोमँटिक आहे"
- चवथा प्रकाश बाळांचा : "मनमोहन, ममता, मेधा आणि माओवादी"
- पाचवा आहे एकनाथ साळवींचा : "आदिवासी देशद्रोही आहेत का?"
- सहावा आहे मीना मेनन यांचा : "मी नक्षलवादी"
- सातवा आणि शेवटचा बंधुराज लोणे यांचा: "नक्षकवादाचे भवितव्य"
यातील प्रत्येक लेखकाचे नाव आपण कुठे ना कुठे नक्षलवादाच्या संदर्भात आपण एकलेले आहे. या विषयातली ही जाणकार तशीच या विषयात कार्यरत अशी ही मंडळी आहेत. इतक्या उत्कृष्ट लेखसंग्रहाबद्दल 'अक्षर' आभार मानावे तेवढे थोडेच.
उर्वरित अंकही अत्यंत वाचनीय आहे. सुबोध जावडेकर, महेश एलकुंचवार, निळु दामले यांचेही अत्यंत वाचनीय असे लेख आहेत. एक दीर्घकथा, ४ कथा आणि काही कविता असे सगळे भरगच्च आणि वाचनीय साहित्य घेउन यावर्षीचा अक्षर आला आहे.
आपल्याला हा अंक आवडला ? नेमका कशासाठी ?
अभिप्राय
यशोधरा
यशोधरा · Sun, 14 Nov 2010 - 06:15
चांगला धागा.
मला वाटतं की शीर्षक ओळख दिवाळी अंकाची : २०१० एवढचं ठेवावं आणि इथेच इतर दिवाळी अंकांबद्दल, त्यातील लेखांबद्दल लिहिता येईल.
सागर
सागर · Sun, 14 Nov 2010 - 10:39
अक्षरचा अंक नेहमीप्रमाणे याही वेळी असाच बहारदार दिसतो आहे.
छान ओळख करुन दिलीस रे मित्रा :)
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Sun, 14 Nov 2010 - 17:58
खरंच सुरेख ओळख आहे.
मी अजून अंक नीट वाचलेला नाही. प्रदीप वैद्यांचा अजय-अतुलवरचा लेख वगळता. तो लेख खतरनाक सुरेख आहे.
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 16 Nov 2010 - 05:02
अरे वा वाचला पाहिजे अंक.. अजून हातात पडायचाय :(
यशोधरा
यशोधरा · Tue, 16 Nov 2010 - 06:53
अनुभवचा अंक आहे का कोणाकडे? पुण्यात?