- Log in to post comments
नमस्कार मंडळी, वेचा वाचून पुस्तक ओळखण्याचा खेळ तर आपण खेळतच आहोत. म्हणून काहीतरी नवं म्हणून मी हा वेगळा प्रकार चालू करतेय. माझ्याकडे एका लेखकाचा कथासंग्रह आहे. तो बराचसा जुना आहे, पण तो संकेत ठरू शकतो म्हणून लेखनकाळ मुद्दाम देत नाही. त्यातल्या काही कथांमधली वाक्ये इथे देत आहे. ती वाचून आपणांस लेखक ओळखायचा आहे. थोडेसे बुद्धीला खाद्य म्हणून सगळेच परिच्छेद लेखकाच्या खास शैलीतले दिले नाहीत.
पहिलेच कोडे अर्थातच खूप सोपे आहे. तेव्हा लेखक ओळखा. आणि पुस्तक ओळखल्यास तर आणखीच धमाल येईल.
कालपासून आतापर्यंत काही उत्तरे आली नाहीत म्हणून पहिला संकेत देत आहे.
संकेत १: यांचे आजोळ सांगली, त्यामुळे जन्म तिथलाच. पण नंतर शिक्षकीपेशामुळे काही वर्षे कोकणातल्या एका खेड्यात वास्तव्य. मराठी साहित्याचा इतिहास या व्यक्तीच्या उल्लेखाविना अपूर्ण आहे. त्यांचे एकही पुस्तक न वाचलेला मराठी वाचक विरळाच म्हणावा लागेल.
संकेत २: यांची लेखनसंपदा फार मोठी आहे. यांनी सोळा कादंबर्या, सहा नाटके, अडीचशेच्यावर कथा, पन्नास रूपककथा, शंभर निबंध आणि दोनशेच्यावर समीक्षणे लिहिली आहेत.
संकेत ३: भारत सरकारने यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलं होतं, आणि त्यांच्या स्मृत्यर्थ पोस्टल स्टँपही काढला होता.
संकेत ४: एका साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद यांनी भूषवले होते.
या संकेतांवरूनही न ओळखल्यास पुढचे दोन शेवटचे संकेत उद्या दुपारपर्यंत देईन.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
खरोखरीच छान चित्र होते ते. काळ्याकुट्ट मेघांतून जणू काही अंधाराचा पाऊस पडत होता. पण त्या काळमेघांतूनच चिमुकली चंद्रकोर हसत हसत डोकावून पाहत होती. 'आशेचेच चित्र असले पाहिजे हे!' असे वातून मी खाली दृष्टी वळवली; प॑ण माझी निराशा झाली. त्या चित्राखाली 'आत्मा' ही अक्षरे छापण्याची मुद्रकाला लहर आली होती.
***************
छे:! हे बरोबर नाही जमत. कोल्हटकरांची कोमल कला, गडकर्यांचे गोड गुंजन, देवलांची दयाशील दृष्टी आणि खाडिलकरांची - काय सुंदर वाक्य साधते आहे? पण हे खाडिलकर आडवे आले ना इथे! खाडिलकरांची ओजस्वी शैली हे कसेसेच लागते; त्यापेक्षा शालीन शैली पुरवले. हे गडकरी, देवल , कोल्हटकर सर्व मवाळ म्हणून यांना अनुप्रासाच्या साच्यात कसे हां हां म्हणता बसवता आले. पण हे खाडिलकर पडले जहाल. काय घालावे खाडिलकरांच्या पुढे? खडिलकरांची खुमासदार खुलावट! बस्स, वाक्य पण वाक्य झाले आहे.
**************
'जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे! बाबा, मुलींच्या फोटोंना नाक मुरडणं सोपं आहे; पण आता गळ्यात माल पडणार कुठून? तुला तर कालिदास, शूद्रक, कोल्हटकर , गडकरी यांच्या सर्व नायिका शिजवून त्याचा एक अष्टमांश , नाही तर एक षोडशांश केलेला असा काढा पाहिजे. त्या काढ्याला तशाच निकाढ्याची जरूर असणारच. शकुंतलेची इच्छा बाळगायला आपण दुष्यंत असावं लागतं आधी, बरं!'
****************
पण पाटीतली ही जादू, दिवसामागून दिवस जाऊ लागले, तशी ओसरू लागली. लाकडावर काढलेल्या चित्रातले डाळिंब खरे वाटून त्याच्यावर पोपट सारखी चोच मारू लागला, की त्याची चोच दुखू लागते. भिकाजीपंतांच्या वकिलीचा आईला असाच अनुभव येऊ लागला. कचेरीत जाताना जेवढा त्यांचा कोट हलका लागे, तितकाच तो आल्यावरही लागे.
अभिप्राय
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Wed, 29 Sep 2010 - 06:42
कळत नाही ब्वॉ...
वल्ली
वल्ली · Wed, 29 Sep 2010 - 06:44
मस्त कलंदर, तुझे अभिनंदन एक नवीन प्रकार सुरु केल्याबद्दल. पण कोडे सोपे आहे असे म्हणतेस ते मात्र पटत नाही. बुद्धीला चांगलेच खाद्य मिळाले आहे. 'पु. ल. देशपांडे' असावेसे वाटत आहे. पण हे अर्थातच अंधारात तीर मारण्यासारखेच आहे.
अदिती
अदिती · Wed, 29 Sep 2010 - 07:28
मक,
इतके दिवस आपण सगळे कुटिलपणे एकमेकांना छळत होतोच. आता हा नवा प्रकार पण त्याची कॉरोलरी म्हणायची का? ;)
कल्पना भन्नाट आहे. फार आवडली.त्याबद्दल वेदश्रीचे अभिनंदन!
लेखक जुना आहे, गडकरी, कोल्हटकर, देवल, खाडिलकरांचे उल्लेख आहेत आंणि ही वाक्ये कथासंग्रहातली आहेत हे संकेतच आहेत असे म्हणायला हवे ;) माझा अंदाज व्य नि ने कळवते आहे.
--अदिती
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Wed, 29 Sep 2010 - 08:56 · उत्तर
अगदी, अगदी. ;) बाडिस.
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 29 Sep 2010 - 09:56
छान सुरुवात.. तुझे व वेदश्रीचे अभिनंदन
ह्या कोड्याची उत्तरे बहुदा मला कधीच ओळखता येणार नाहित :(
असो .. पहिला अंदाज व्यनी केला आहे
रोचीन
रोचीन · Wed, 29 Sep 2010 - 10:04
देखील व्यनी केला आहे!! :)
अदिती
अदिती · Wed, 29 Sep 2010 - 10:22
उत्तर बरोबर ओळखले आहे.
मकने मला लेखकाची माझ्याकडची काही वाक्ये इथे द्यायला सांगितली आहेत. ते मात्र जरा अवघड आहे.
पुस्तक शोधावे लागेल. सापडल्यावर देईन.
--अदिती
रोचीन
रोचीन · Wed, 29 Sep 2010 - 10:26
संकेत आवश्यक आहेत!!!! :(
सुषमा
सुषमा · Wed, 29 Sep 2010 - 13:37
नाही बुवा सांगता येत मला .
क्लू पाहिजे .
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Wed, 29 Sep 2010 - 16:04
उत्तर आतापर्यंत ऋ आणि अदितीने ओळखले आहे. वर परिच्छेदात गडकरी, कोल्हटकर आणि आदि मंडळी आहेत, म्हणजे ते तर नक्कीच नाहीत. कुणाकुणाला ते चिवि वाटले. पण माझ्या वाचनात त्यांनी इतके जडजव्याळ विशेषतः पहिल्या परिच्छेदासारखे लिहिलेले नाही(चू भू दे घे). तसेच तोच परिच्छेद वाचताना पुलंचे चिमटेही जाणवत नाहीत.म्हणजे ही बरीच लेखकमंडळी कटाप झाली. आणि "बस्स, वाक्य पण वाक्य झाले आहे." हे वाक्य तर एके काळची खास पद्धत असल्यासारखे निदान मला तरी वाटते. आणि अशा छापाची वाक्येही त्या काळातल्या काही विशिष्ट लेखकांच्याच लेखनीतून येत असत.
मी संकेत म्हणून आणखी एक छोटासा परिच्छेद देत आहे:
***********
"अंक आणि लिपी! अहाहा! किती सुरस, साभिप्राय संयोग आहे हा! समसमा संयोग की जाहला अथवा रत्नं समागच्छतु कांचनेन, या उक्ती या ठिकाणी अगदी सार्थ वाट्तात. अंक आणि लिपी! अंक म्हणजे गणित आणि लिपी म्हणजे भाषा! भाषा आणि गणित यांचा छत्तिसाचा आकडा असतो, असे म्हणतात! पण या अंकलिपीच्या तपोवनात आपले नैसर्गिक वैर सोडून ऋषीच्या तपोवनात एकत्र फिरणार्या व्याघ्रहरिणींप्रमाणे अंक आणि लिपी एकमेकांच्या गळ्यात गळा घालून विहार करत आहेत! अंक म्हणजे गणित आणि गणित म्हणजे मूर्तिमंत रूक्षता, अशी लोकांची समजूत आहे. पण अंक कधी रूक्ष असू शकेल काय? वत्साला वत्सलतेने वल्हवणारा... "
************
(मी हे वाचून टंकत असल्यानेच केवळ डोक्यावरचे केस शाबूत राहिले बहुतेक :) ) असो. श्रामो आणि अदिती, या दुष्टपणाबद्दल सहमत आहे. जे लोक उत्तर ओळखतील, तेही त्यांच्याकडे जर या लेखकाची गुगल न करण्याजोगी काही वाक्ये देऊन या दुष्ट्पणात सहभागी होऊ शकतात.
वेदश्री
वेदश्री · Wed, 29 Sep 2010 - 18:11
बाज उत्तम आहे कोड्याचा. लेखककोड्याच्या कल्पनेबद्दल मला उगाचच श्रेय देऊ नये कारण माझी कल्पना वेगळीच होती आणि इम्प्रॅक्टीकलही त्यामुळे तिच्याबद्दल विचार करणे सोडून दिलेय मी. हे कोडे (नेहमीप्रमाणेच!) सुटले नाही मला पण तरीही खूप आवडले. पुकोशु (पुढील कोड्यांसाठी शुभेच्छा!).
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 29 Sep 2010 - 19:45
माझं उत्तर बरोबर आहे हे बघुन आनंद झाला + आश्चर्य वाटले आहे :)
मक ने म्हटल्याप्रमाणे ह्याच लेखकाचा माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकातील अजून एक रँडम परिच्छेद देत आहे: (एक कोणतंही पान उघडलं आणि त्यावरचा एक परिच्छेद दिला आहे.)
=========
अर्धांगवायु झालेल्या मनुष्याचे चलनवलन विजेच्या सहाय्याने सुरू व्हावे तशी माझ्या मनाची स्थिती झाली. आपल्या सुखापेक्षा, अहंकारापेक्षा किंबहुना जीवनाला अत्यंत आवश्यक असलेल्या अन्नापेक्षाही मनुष्यात अधिक मोलाची अशी भावना असु शकते याची जाणीव त्या दिवशी मला पहिल्यांदा झाली. त्या भावनेला "माझा धर्म" असे आई म्हणत होती. अशा आईच्या पोटी येऊन मी बाबांचा सुड घेणार? लपूनछपून त्यांच्यावर दगड फेकणार?
======
सागर
सागर · गुरुवार, 30 Sep 2010 - 16:51
मस्त कलंदर,
वेच्याची कन्सेप्ट खूप खूप आवडली. तुमचं त्याबद्दल अभिनंदन :)
पुढच्या लेखक वेच्याची आतुरतेने वाट पहात आहे.
हा वेचा खूप घुमवून आला मला. पण प्राथमिक ४ नावांपैकी एक होते हे ही नसे थोडके :)
आता पुढचा वेचा शोधायला नक्की मजा येईल
वल्ली
वल्ली · Fri, 1 Oct 2010 - 05:56
संकेतांमुळे अखेरीस ओळखले. लेखक -वि. स. खांडेकर :)
ओळखण्यास अवघड असे निदान माझ्यासाठी तरी होते. एकतर खांडेकरी साहित्य कुठलेही वाचलेले नाहीये (ययाती सुद्धा):( . त्यामुळे त्यांच्या शैलीशी परीचित असण्याचा प्रश्नच नव्हता. पण एवढे ठळक संकेत शेवटी मिळाल्यामुळे कसेबसे ओळखू शकलो. ;)
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Fri, 1 Oct 2010 - 15:30
उत्तरः वि. स. खांडेकर.
अदिती, ऋ, वल्ली या तिघांनीही उत्तर ओळखले. नाहीतर माझा पुढचा संकेत त्यांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्काराचा आणि त्यांच्या चोविसाक्षरी नावाचा :) असता.
असो. मी वरचे परिच्छेद त्यांनी १९२५ ते ३० या काळात शिरोडे येथे नोकरीस असताना पण १९४१ साली प्रसिद्ध झालेल्या कथा आहेत. कथासंग्रहाचे नांव आहे:सूर्यकमळे.
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 4 Oct 2010 - 07:27 · उत्तर
सूर्यकमळे वाचलेले नाही. मी वर दिलेला परिच्छेद "क्रौंचवध" मधील आहे. कौचवध हे वि.सं. चे एक वेगळे पुस्तक.. भाषेतला बोजडपणा जरी असला तरी कथेला वेगही आहे आणि विषय, मांडणी व कथावस्तू इतर अनेक कादंबर्यांपेक्षा वेगळी वाटली.. मला आवडली..
केवळ बोजडपणामुळे हा लेखक टाळलेल्यांनी ययाती किंवा तत्त्सम पुस्तकांपासून सुरवात न करता कौंचवध वाचून करावी असे सुचवतो..
रोचीन
रोचीन · Mon, 4 Oct 2010 - 05:56
काय आहे की खांडेकर ययाती सोडल्यास अजिबात वाचलेले नाहीत!! स्पष्ट बोलायचे झाले तर ते वाचवले गेले नाहित त्यामूळे...........