- Log in to post comments
त्यादिशी दोस्त जादाच फस्ट्रेट झाला व्हता. म्या भेटताच मला म्हन्ला,'लायब्ररीमंदी चालतोस का? लई दिस झाले.'
म्या जरा पॉज घितला. मंग म्हन्लं,'आजच्याला नगं राव. स्सालं सकाळच्याला डोस्कं धरतं, हँगओव्हर झालं की मंग सारा दिस फुकटछाप जातो. उद्याच्याला कामंबी लई हायेत.'
त्या म्हन्ला,'यवडा कामून भाव खावून र्हायलास? जादा टाइम न्हाई बसायचं. रॉयलस्टॅगच्या दोनेक स्टोर्या वाचू, जादा न्हाई. तुला 'हॉट' वाचायचं नसंन सं तू कोल्डमंदी वाच. ऑस्ट्रेलियाचा फोस्टर बराय म्हने, टाईमपास.'
म्या म्हन्लं,'दोस्ता, आज लई फॉरेन ऑथर्सचे नावं घिवून र्हायलास? सांप्रतला देशी ऑथर्स आठवत न्हाई का कोनी दमदार?'
तसं त्या म्हन्ला,'स्टेटस्चा क्वश्चनै. आता पैले दिस र्हायले न्हाईत. आन् देशी ऑथर्स कवाकवा लय इमोशनल लेव्हलला नेतेत. आपन त्येंच्यात यवडं इन्व्हॉल्व्ह व्हतो की मंग आपन आपले र्हात न्हाई. इंडियाच्या डेव्हलपमेंटसाठी आपलं कायबी डिव्होशन न्हाई आसं अन्नेसेसरी आपल्याला वाटू लागतं आन् आपल्या डोळ्याला आपसूक पानी येतं. त्येच्यापेक्षा आपले फॉरेन ऑथर्स कवाबी बरे आस्तेत. त्येंच्या स्टोर्याबी लाइट आसतेत आन् जादा इमोशनल व्हन्याचा टाइमबी येत न्हाई.'
म्या म्हन्लं,'दोस्ता, इंग्लिश ऑर्थर्सचा सांप्रतला काई भरोसा र्हायला न्हाई. लिटरेचरचं ग्लोबलायझेशन झालं हाये. नॉव्हेलचे नावं फकस्त इंग्लीश र्हातेत, पन कन्टेन्ट सारे इथल्लेच आस्तेत. कंप्लिट थीम आपल्याकडचीच र्हाती. 'वरनं इंग्लीश आतनं इंडिया' आसं आस्तंय ते. कवाकवा आपल्या घराच्या साईडलाच डिस्टीलरी र्हाती आन् आपन फॉरेनची म्हनून फुकाच कुद्या मारत र्हातो.'
संकेत १. विनोदी कथासंग्रह २००७ साली प्रकाशित.
संकेत २. लेखक टोपणनावाने लिहितो.
संकेत ३. पुस्तकाचे शीर्षक इंग्लीशमध्ये आहे.
संकेत ४. पुस्तकाला दत्ता भगत यांची प्रस्तावना आहे.
अभिप्राय
सागर
सागर · Wed, 6 Apr 2011 - 14:58
कविताजी
वेच्यावरुन लक्षात आले की मी एका चांगल्या पुस्तकाच्या वाचनाला मुकलो आहे.
४ संकेत असूनही मी हे पुस्तक ओळखू शकलेलो नाही तेव्हा माझा पास
पण उत्सुकता लागली आहे हे पुस्तक कोणते आहे ते जाणून घेण्याची :)
वल्ली
वल्ली · गुरुवार, 7 Apr 2011 - 04:52 · उत्तर
इतके संकेत असूनही पुस्तक ओळखू शकलेलो नाही.
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Wed, 6 Apr 2011 - 17:31
कविता,
भरपूर संकेत मिळालेत. आता कोणते ते ओळखायला किती वेळ लागतोय बघू या....
देवेन्द्र प्रभुणे
देवेन्द्र प्रभुणे · गुरुवार, 7 Apr 2011 - 17:22
ताई,
आता उत्सुकता न ताणता पुस्तकाचे नाव जाहीर करा!
लगेच घेण्यासाठी फिल्डींग लावतो.
लय भारी,वेचा!
एक्दम कडक्!माह्यावालीच ष्टोरी सांगतुया जनु!
-देवेन्द्र प्रभुणे,यवतमाळ.
कविता महाजन
कविता महाजन · गुरुवार, 7 Apr 2011 - 19:38
अजून दोन संकेत देते :
१. लेखकाने लिहिलेली बोली मराठवाडी आहे, याचा अर्थ लेखक मराठवाड्यातला आहे.
२. लेखक पत्रकार आहे.
अजून एक वानगी :
सांप्रतला पुस्तकांच्या फिल्डमंदी आसंच कायबाय चालू आस्तय. मराठीचा प्राध्यापक सेट एक्झामसाठी अर्वाचिन वाड्मयाचा अभ्यास करतो आन् तेच्यासाठी पु.ल.देशपांडेचं 'मराठी वाड्मयाचा गाळीव इतिहास' रेफर करतो तवा आपन काय करणार? यखांदा सिनियर प्राध्यापक 'टीकास्वयंवर' ह्ये रुक्मीणीस्वयंवराचा यक पार्ट आसल्याची इंपॉर्टंट माहिती स्टुडंटला देतो तवा तरी आपन काय करू शकतो? तं आसो.
कविता महाजन
कविता महाजन · Fri, 8 Apr 2011 - 07:22
बबर्या म्हन्ला, "दोस्ता, आखरीला देवेंद्र प्रभुणे यायनी बरोब्बर उत्तर धाडलं. यवतमाळ इदर्भात आसून राहिले तरी मराठवाड्याचे जवळच हाये ना बाप्पा. यवतमाळले 'काऊन' म्हनत्यात आन् मराठवाड्यात 'कामुन' म्हनत्यात... तसं आसलं तरी क्वैश्चन तर सेमच आहे ना सांप्रतला." :-).
पुस्तकाचे नाव : बर्ट्रांड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी
लेखक : बब्रूवान रुद्रकंठावार
प्रकाशक : जनशक्ती वाचक चळवळ
'पिनाक' २४४, समर्थनगर, औरंगाबाद.
फोन : ०२४०-६९९२०५०
आनंदयात्री
आनंदयात्री · Fri, 8 Apr 2011 - 19:00 · उत्तर
तेच म्हणत होतो की मला "पुन्यांदा चबढब" का आठवतेय ते !!
टण्या
टण्या · Fri, 8 Apr 2011 - 10:16
ह्या पुस्तकाबद्दल ऐकलच नव्हतं.. वेचा वाचून उत्सुकता जामच चाळवली आहे.. कुणाला हे पुस्तक ऑनलाइन उपलब्ध आहे हे माहिती असल्यास लिंक द्याल का? सध्या भारतात नसल्याने दुकानात जाउन शोधणे अशक्य. :(
सागर
सागर · Fri, 8 Apr 2011 - 10:41 · उत्तर
अगदी असेच म्हणतो... ऑनलाईन मिळाले तर मलाही हवे आहे. पण अवघड दिसते आहे.
या पुस्तकाबद्दल कधीच ऐकले नव्हते.
कविताजी वेच्याच्या निमित्ताने एका सुरेख पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
कोनास्नी ह्ये बुक गावलं तर माला बी सांगा... :)
टण्या
टण्या · Fri, 8 Apr 2011 - 13:13 · उत्तर
सागर, हे पुस्तक बूकगंगावर उपलब्ध आहे.. http://www.bookganga.com/eBooks/Book/5178389186893274840.htm
पण ह्या साइटचा प्रोब्लेम असा आहे की क्रेडिट कार्डावर खरेदी करता येत नाही. फक्त बँक ट्रान्स्फरच चालतं..
सागर
सागर · Fri, 8 Apr 2011 - 15:16 · उत्तर
मी बुकगंगावरुन अनेकदा खरेदी केली आहे त्यामुळे पेमेंट ऑप्शन बद्दल माहिती आहे.
पण तुम्ही म्हणता तसे, क्रेडीट कार्डाद्वारे पेमेंटची सोय नसल्याने खिसा भरायची वाट बघावी लागते इथून खरेदी करण्यासाठी ;)
हे पुस्तक नक्की घेणार
कविता महाजन
कविता महाजन · Fri, 8 Apr 2011 - 14:53
खूप काळानंतर मी या पुस्तकाने मनापासून हसले. निर्व्याज आणि निर्विष विनोद हे शब्द आपण नेहमी ऐकतो, पण या पुस्तकात ते सतत जाणवत राहिले. विनोदाची हमखास 'स्थळे' पुनःपुन्हा वापरण्याचा मोह भल्याभल्यांना चुकलेला नाही, पण बब्रूवान यांना ही 'साधना' जमली आहे. मराठवाडी बोलीचा आणि त्यातही 'आज'च्या इंग्लीशमिश्रीत बोलीचा इतका धमाल वापर माझ्यातरी पाहण्यात नाही. पत्रकार असल्यामुळे विषयांचे वावडे नाही. राजकारण, साहित्य, समाजकारण असे सगळेकाही इथे फार सहजपणे येते. बबर्याला चि.वि.जोशींच्या चिमणरावांची अत्याधुनिक आवृत्ती म्हणायला काहीच हरकत नाही. तो बदलत्या काळानुसार भोळाभाबडा राहिला नाहीये. चलाखही आहे. पण त्याचा दोस्त, दोस्ताची बायको वैनी, थेंबभर दारू न पिता बारमध्ये राडा करणारा दोस्ताचा 'मेव्हना', दोस्ताची आणि बबर्याची पोरं... सगळं 'कुटुंबवत्सल' प्रकरण आजच्या काळात साहित्यातही दुर्मीळ झालंय... त्यामुळे "नॉस्टेलजिक इमोशनल" परिणाम होतात. :-). ( पुढच्या पिढीत एकेकाच पोरामुळे नातीगोती शिल्लकच राहणार नाहीत, म्हणून बहीण माहेरी येताना आपल्या पोरांच्या लेंढारासह तिच्या शेजारच्या पोरांनाही घेऊन आली तरी चालेल, असं बबर्याला वाटतं. ) आर्थिक अडचणींनी कावलेला मध्यमवर्गीय बाप पोरानं शाळेच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत 'मायकल जॅक्सन' बनून पाचशे रुपयांचा चुना लावला म्हणून वैतागतो आणि पुढच्या वर्षीच्या स्पर्धेत पोराला 'गांधीजी' बनवायचं ठरवून टाकतो... हे लई भारी.
मित्रहो, बब्रूवानचे दुसरे पुस्तक मी सध्या वाचते आहे... त्यांनी लिहिलेले नाटक आजच वाचून संपवले. या पुस्तकांविषयीही सांगेन लवकरच.
खरंतर अशी खूप वेगळी पुस्तकं अनेकदा हाती येतात... ती शेअर करावीत म्हणून तर पुस्तकविश्ववर आलेय. :-).
टण्या
टण्या · Fri, 8 Apr 2011 - 15:10
कविताजी, >> खरंतर अशी खूप वेगळी पुस्तकं अनेकदा हाती येतात... ती शेअर करावीत म्हणून तर पुस्तकविश्ववर आलेय. >> आणि अश्याच येत रहा..
थोडेसे विषयांतरः मराठी पुस्तके भरभरून वाचायचा माझा स्वतःचा काळ होता पाचवी-सहावी ते इंजिनीअरींग पहिले-दुसरे वर्ष.. मग थोडे इंग्रजी हाती आले, महाराष्ट्रातून बाहेर राहिलो, मग भारतातूनच.. मध्यंतरी सुदैवाने पुन्हा एकदा वर्षंभर पश्चिम महाराष्ट्रात राहिलो.. आता पुन्हा बाहेर :( ह्या सगळ्यात झाले काय की वाचन एका वर्तुळात बंदिस्त राहिले. एकेकाळी मी लोकं पुलं-वपू आणि रंजक-स्युडो-ऐतिहासिक-पौराणिक कादंब्र्या ह्या बाहेर काही वाचत नाहीत म्हणुन वाभाडे काढायचो आणि स्वतःच्या वाचनाला स्वतःच शाबासकी द्यायचो. मात्र आता वाटते की (विशेषतः पुविवर आल्यापासून) 'अरे आपले वाचन तिथेच राहिले की. कथात जीए, भावे, माडगूळकर, पानवलकर, गाडगीळ, प्रभुदेसाई वगैरे आपल्या वडिलांच्या काळातले लेखक, कादंब्र्यात पेंडसे, रेगे, खानोलकर, बेडेकर, दलित साहित्य (हे पुन्हा ८०पुर्वीचेच), नेमाडे, पाध्ये, शेळके वगैरे वगैरेच'. गेल्या २० वर्षातल्या अनेक उत्तमोत्तम कलाकृती वाचल्याच नाहीत. बारोमास, रमेश इत्रादे-इंगळकरांचे प्रौढ साक्षरतेवरचे पुस्तक (नाव विसरलो), भिन्न, भारत सासणे/राजन खान, श्याम मनोहर वगैरे निवडक वगळता काहीच नाही. राजहंस/पद्मगंधाच्या कृपेने non-fiction थोडेफार.
कारण? लायब्री हाताशी नसणे. पुस्तके विकत घेताना लायब्रीइतकी विपुलता हाती लागत नाही कारण हात आखडता ठेवूनच खरेदी होते. कारणे अनेक: शिकत असताना किंमत, मग एका जागी थारा नसल्याने पुस्तके विकत घेउन ठेवणार कुठे हा प्रश्न.
आता सुदैवाने आंतरजालावर मराठी पुस्तके खरेदी करता येत आहेत. ती माझ्या हाती नाही पण किमान मिरजेत घरी पोचत आहेत (आणि आई-बाबांची चंगळ होत आहे ते निराळेचः) ). पुविवर इंद्रा, नानावाटी, कविताताई वगैरेंच्या कृपेने व मायबोलीसारख्या सं.स्थळांवर अक्षरवार्तेसारख्या उपक्रमाने नवनवीन पुस्तकांची ओळख होते, ती घेता येतात, वेळ मिळाला की वाचता येतात ह्यातला आनंद विरळाच.
काल-परवाच एका मैत्रिणीशी चर्चा करताना म्हटलं की एक खणखणीत मराठी पुस्तक वाचयला हवे. कधीकधी इंग्रजी किती भारी असले तरी असा काही reader's block येतो की मराठीचा खुंटा हाणल्याशिवाय तो निघत नाही. तुम्हा लोकांमुळे असे खुंटे माहिती होतात त्याबद्दल मनापासून आभार!!
सागर
सागर · Fri, 8 Apr 2011 - 15:13 · उत्तर
कविताजी, >> खरंतर अशी खूप वेगळी पुस्तकं अनेकदा हाती येतात... ती शेअर करावीत म्हणून तर पुस्तकविश्ववर आलेय. >> आणि अश्याच येत रहा..
आणि
कधीकधी इंग्रजी किती भारी असले तरी असा काही reader's block येतो की मराठीचा खुंटा हाणल्याशिवाय तो निघत नाही. तुम्हा लोकांमुळे असे खुंटे माहिती होतात त्याबद्दल मनापासून आभार!!
अगदी अगदी असेच वाटते मला पण :)
कविता महाजन
कविता महाजन · Fri, 8 Apr 2011 - 18:45 · उत्तर
कधीकधी इंग्रजी किती भारी असले तरी असा काही reader's block येतो की मराठीचा खुंटा हाणल्याशिवाय तो निघत नाही.
....... हे खरं आहे टण्ण्या. माझं इंग्लीश वाचन विशेष नाही, पण हिंदी आणि उर्दू मी पुष्कळ वाचते. तेव्हा असं होतं बरेचदा. विशेषतः मधल्या काळात मराठीत चांगल्या आणि नव्या आणि वेगळ्या ललित साहित्याचा दुष्काळ सुरू झाला तेव्हा तर हे फारच जाणवत होतं.
थोडेसे विषयांतरः
याबाबतीत मी असं म्हणेन की अशा फेजेस काही ना काही कारणाने प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. कामात बीझी असण्यानं अशी फेज येणं हे खूप चांगलं कारण आहे. वाईट कारणांनी येणारी निराशा फार भयानक असते. असो. पण "लिहिण्याच्या काळात" माझं अवांतर वाचन पूर्णपणे बाजूला पडतं... हा माझाही अनुभव आहेच.
वेदश्री
वेदश्री · Tue, 12 Apr 2011 - 18:53
कविता, वेचा जाम आवडला आणि पुस्तकाबद्दलची तुझी टिप्पणीही! पुस्तक घेणारच आता मी हे.. अशीच लिहीत रहा भरभरून!