- Log in to post comments
खाण तशी माती त्याचप्रमाणे ठाण तशी वृत्ती बनते!
उघड्या दरवाज्याच्या मातीच्या घरात राहणार्या माणसांना आपण मातीच्या घरात राहतो आहे हे पदोपदी जाणवत असतं. आपली घरं कच्ची आहेत, मोठा पाऊस आला की ती वाहून जातील आणि मग आपल्याला निवार्याची, मदतीची गरज लागेल याची त्यांना क्षणोक्षणी जाणिव असते! त्यामुळे उतायची-मातायची त्यांच्या मनाची हिंमतच होत नाही. एकमेकांला आधार दिला तरच तग धरू हे दगडामातीच्या घरात राहणारे ओळखून असतात. 'एकमेकां साह्य करू' या सुपंथाचे ते सहजीव वारकरी होतात!
कॉंक्रीटच्या फ्लॅटमध्ये बंद दरवाजाआड राहणार्यांना भ्रम निर्माण होतो. आपण सुरक्षित आहोत, आपण आपल्या परिवाराभोवती आयुर्विम्याचं कवच उभारलं आहे, हे कवच कोणी भेदू शकणार नाही असा भलता विश्वास त्यांच्या मनात ठिय्या मांडून बसतो. दु:खाच्या प्रसंगी अश्रू पुसण्यासाठी व आनंदाच्या क्षणी मिठी घालण्यासाठी खरेखुरे हात लागतात. आयुर्विम्याच्या जाहिरातीतील जोडलेले हात उपयोगाला येत नाहीत याची त्यांना जाणीव नसते! घंटा वाजली तरच पीपहोलमधून किंवा व्ह्यूफाइंडरमधून कोण आहे ते पाहून दरवाजा उघडायची शिस्त त्यांनी लावून घेतलेली असते. त्यामुळं आपण फक्त सुखाला फ्लॅटमध्ये घेऊ व दु:खाला उंबरठ्याच्या हद्दीवर रोखू या खुळ्या कल्पनेत फ्लॅटवाले मश्गुल असतात. 'एकला चालो रे' हा त्यांच्या सुखाचा मूलमंत्र असतो!
.. म्हणे भूकंपात मातीची घरे पडतात आणि सलोह काँक्रीटचे फ्लॅट तगतात! पण मातीची कनवाळू घरं नाहीशी होत चालली आहेत आणि त्या जागी बिनहृदयाचे काँक्रीटचे फ्लॅट पाय रोवून खडे होत आहे ही वस्तुस्थिती भूकंपाहून धक्कादायक नाही काय?
अभिप्राय
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 4 Jun 2010 - 08:45
कशातला वेचा आहे माहित नाहि.. पण आहे मात्र दमदार!
वेदश्री
वेदश्री · Sat, 5 Jun 2010 - 06:22
उत्तर सांगितले आहे.
टीपः मी दर शनिवारी/रविवारी आधीच्या एका 'ओळखा पाहू'चे उत्तर देऊन नवे 'ओळखा पाहू' विचारत जाईन.