ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - १०

वेदश्री

मजकूर

"काहीतरीच काय बरळतो आहेस सोनवणे?" मी ओरडलो,"अरे, तो इतका सात्विक आणि सज्जन माणूस, तो तिथ?"

मला पाहताच गुरूजींनी मान खाली घातली अन् ते गुपचूप उभे राहिले. मी म्हटलं," छान गुरूजी! ही रामप्रहरी चांगली शिकवणी चालली आहे!" पण मलाही संकोचल्यासारखं झालं. मी इकडेतिकडे पाहिल्यासारखं करून बाहेर पडलो. फौजदार सोनवणेने मला हसतहसत ही हकिकत सांगून माझा निरोप घेतला. मला मात्र हसू आलं नाही; कारण माझ्या मनाला फार जबर धक्का बसला होता. माझा कांबळे गुरूजींशी व्यक्तिशः परिचय होता आणि माझी त्यांच्याबद्दलची आदराची भावना होती. ते इतिहासाचे शिक्षक होते आणि शिकवता शिकवताच त्यांच्या हृदयातील ज्वलंत देशाभिमानाची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याला होई. मराठी स्वराज्य अस्ताला गेलं; शनिवारवाड्यातील भगवा झेंडा ब्रिटिशांनी खाली उतरविला; हा प्रसंग किंवा अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्ययुद्धातील रोमांचकारी घटना सांगताना त्यांना विलक्षण स्फूर्ती येई. दरिद्री शिक्षक यापेक्षा दुसरी कोणती देशसेवा करणार? अन् हा शिक्षक एका वेश्यागृहात? मला ही कल्पनाच सहन होईना. माझ्या आदर्शाचं असं अध:पतन व्हावं याचाही मला संताप आला होता; म्हणून मी दुसर्‍या दिवशी संध्याकाळी कांबळे गुरूजींच्या दोन खोल्यांच्या घरी गेलो. गुरूजी खिन्न चेहरा करून एका स्टुलावर बसून होते. घरातलं थोडंसं असलेलं सामान, भांडीकुंडी आवरून ठेवल्यासारखी दिसत होती. मी आत जाऊन 'नमस्ते गुरूजी'असं म्हणून त्यांना अभिवादन केलं.

"ये प्रधान, आज आलास हे बरं केलंस. उद्या मी गावी जाणार आहे."

"आणि शाळा? अजून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना कितीतरी अवकाश आहे."

"संपली माझी इथली मास्तरकी, तुला तर सगळं कळलंच असेल. लपवायचं कारण नाही."

"पण गुरूजी, माझा विश्वास बसत नाही. तुम्ही अन् कलावती...!"

"बस प्रधान, या खोक्यावर. सर्वांना हे मला सांगता येणार नाही. तुझ्याजवळ बोलतो. अरे, काल मी गाढ झोपेत असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मला ते भूमिगत पुढारी रामदास उठवायला आले. त्यांच्याबरोबर एक दाढीवाला तरूण होता. ते मला घाईघाईने म्हणाले,"गुरूजी, हा सुधाकर मांडके. याला पकडायला पोलीस झडत्या घेणार अशी बातमी एका पोलिसानेच आम्हाला दिली आहे. हा माझ्या नातेवाइकांच्या घरात राहत होता; पण तिथं पोलीस येणारच म्हणून मी त्याला अशा ठिकाणी हलवणार आहे की, पोलिसांना त्याचा सुगावा लागणार नाही. तिथं मी जाऊ शकत नाही. आम्ही दोघेही पकडले जाऊ. गुरूजी, तुम्ही आम्हाला वेळोवेळी मदत केली आहेच. आज हा सुधाकर पकडला गेला तर खुनाच्या खटल्यात गोवला जाईल. तेव्हा त्याला घेऊन मी सांगतो त्या घरी जा. त्या घरात कलावती राहते. ती वेश्या आहे; पण ती देशाभिमानी आहे. तिनं आम्हाला अनेक वेळा पैशाची अन् इतर मदत केली आहे. या कामी आम्हाला माणसं नाही तर प्रथम सुरक्षितता पाहावी लागते." रामदास पत्ता देऊन निघून गेले. मी आणि सुधाकर चालत चालत काजीपुर्‍यात आलो. कलावतीच्या घराचा पत्ता काढला. तिला काम सांगताच ती सुधाकरला घरात आश्रय द्यायला तयार झाली. त्यावेळी साडेसहा वाजले होते. तेवढ्यात कलावतीची मोलकरीण धावत आली अन् म्हणाली,"बाहेर पोलिसांची गाडी आली आहे. पोलीस आपल्याकडेच येत आहेत." कलावतीने मोलकरणीला तिच्या घरी जायला सांगितलं अन् आपल्या खोलीचं दार आतून कडी लावून बंद केलं. "गुरूजी, आता हे संकट टाळायला एकच उपाय आहे. तुम्ही कोट, शर्ट काढून खुंटीला लावा. साहेब, तुम्ही या पलंगाच्या कडेला गादीखाली पडून रहा. गुरूजी पांघरूण घेऊन बिछान्यावर झोपतील." एवढं करेतो दारावर धक्के बसू लागले. बाईने स्वतःचे कपडे अस्ताव्यस्त करून दार उघडलं. आत आलेल्या अधिकार्‍यानं माझ्या तोंडावरचं पांघरूण खसकन ओढून काढलं. मला पाहून तो थक्कच झाला. कारण त्यानं मला ओळखलं होतं. मी काहीच बोलू शकत नव्हतो. त्यानं थोडं इकडंतिकडं पाहिल्यासारखं केलं अन् तो गेला. सुधाकर वाचला; पण माझ्या तिथल्या उपस्थितीची बातमी गावभर झाली. शाळेच्या अधिकार्‍यांनी अनैतिक वर्तनासाठी माझा राजीनामा घेतला. उद्या मी माझ्या गावी जात आहे."

"पण सर... सर, तुम्ही सर्वस्वी निरपराध. तुम्ही केवढा त्याग केलात!"

"पण हे मी कुणाला बोलून दाखवू? मला त्या तरूण देशभक्तांचा विश्वासघात करायचा नाही."

मंडळी, गुरूजी त्यांच्या गावी गेले. तिथं त्यांनी खासगी शिकवण्या करीत अठराविश्वं दारिद्र्यात आयुष्य काढलं. आम्ही ज्यांना तुरूंगात घातलं ते राज्यकर्ते झाले. कुठल्याही कारणाने तुरूंगवास घडलेले काही स्वातंत्र्यवीर झाले. त्यांना ताम्रपट मिळाले, पेन्शन मिळाली अन् विविध सवलती मिळाल्या. आमचे बिचारे कांबळे गुरूजी, त्यांच्या नशिबी होता फक्त वनवास आणि बदनामी!"

अभिप्राय

ऋषिकेश

ऋषिकेश · Wed, 7 Jul 2010 - 20:21

वाचून काहिच लिंक लागली नाहि. सुरवात वाचून पटकन मिरासदारांची आठवण झाली मात्र नंतर लिंक लागेना.

बाकी, कोणीतरी (अशोक / रमेश / दिनेश का असच ३ अक्षरी नाव) पवार यांची कांबळे गुरूजी हे पात्र असणारी कथा पुर्वी मटाच्या पुरवणीत वाचली होती. असे कोणी "क्ष पवार" लेखक आहेत का?

वेदश्री

वेदश्री · Mon, 12 Jul 2010 - 08:45 · उत्तर

मिरासदार अथवा पवार नाहीत या पुस्तकाचे लेखक.

वेदश्री

वेदश्री · Mon, 12 Jul 2010 - 08:48

कोणालाच येईना उत्तर? शोधकथा आवडणारे कोणी नाही का काय इथे? काही का असेना.. कोडे अवघड आहे, इतके तर सिद्ध झालेय ना! ;-)

आनंदयात्री

आनंदयात्री · Sat, 17 Jul 2010 - 16:54

अबब !! खत्तरनाकच आहे स्टोरी कांबळे गुरुजींची !!

चर्चा प्रकार