- Log in to post comments
विष्णु जेव्हा घरी आला, तेव्हा त्याचं घर अंधारात पुरतं बुडून गेलं होतं. क्षणभर त्याला काहीच समजलं नाही.
त्यानं ओटीवरून माजघरात प्रवेश केला.
माजघरातल्या एका कोपर्यात आपली आई बसलेली आहे, हे त्याला त्या अंधारातही जाणवलं.
तिच्याजवळ जाऊन विष्णु म्हणाला,
'आई, अंधार पडलाय्, दिवा नाही का लावायचा?'
सरस्वतीनं एकदम दचकून त्याच्याकडे पाहिलं. अंधारात विष्णु तिला धडपणानं दिसलाही नाही.
भानावर येऊन ती म्हणाली,
'तूच लाव दिवा! मला, किनई, आताशा काही सुधरत नाही. तुम्ही दोघंही सतत घराबाहेरच असता. त्यामुळं मी एकटीच अशी वेड्यासारखी बसून राहते... तुम्ही कधी याल, याची वाट बघत!'
यावर विष्णु काहीच बोलला नाही. घडलेला प्रकार तिच्या कानी घालण्याचा धीर त्याला झाला नाही.
सरस्वती विष्णुसमोर आपलं मन मोकळं करत होती. म्हणत होती,'विष्णु, तू आलास, तेव्हा मी तुमचाच विचार करत होते. तुमच्या काळजीनं माझा जीव गुदमरून जातो. शकदालांना कारागृहात घातल्यापासून माझ्या मनात नाही नाही ते विचार येत राहतात. तुम्हीही त्यांच्याच मार्गानं चालला आहात. त्यामुळं आपल्या घरावरही संकटाचं सावट पसरल्याचा सारखा भास होतो.'
मधेच भानावर येऊन ती म्हणाली,
'अरे विष्णु, तूही दिवा लावायला विसरलास की! जा, आधी देवासमोर दिवा लावून ये!'
विष्णूनं हातपाय धुतले आणि देवापुढं दिवा लावला.
क्षणभर तो देवासमोर डोळे मिटून बसला.जणू आईला घडलेला वृत्तान्त सांगण्यासाठी तो देवाजवळ धैर्य मागत होता.
तेवढ्यात त्याला आईची हाक ऐकू आली,
देवघरातून तो माजघरात गेला आणि तिथंही त्यानं दिवा लावला.
दिव्याच्या उजेडात तिला विष्णूच्या कपाळावरची खोक दिसली. तिनं घाबरून विचारलं, 'अरे विष्णु, तुझ्या कपाळावरची ही खोक कसली पडली? काय लागलं तुला? पडलास का? बोलत का नाहीस? सांग ना.... सांग!'
विष्णु तरीही गप्पच होता.
आईच्या मनात अशुभाची पाल चुकचुकली. मोठ्यानं ओरडूनच ती विष्णूला म्हणाली, 'अरे सांग ना! का असा गप्प बसलास?.... तुझे तात कुठं आहेत?'
विष्णूनं अत्यंत आर्ततेनं आईकडे बघितलं; आणि आर्त स्वरात तो म्हणाला,'आई, धनानंदानं तातांना कारागृहात टाकलंय्!'
विष्णूनं सांगितलेली बातमी प्रथम तिला खरीच वाटली नाही.
ती विष्णूला म्हणाली,
'अरे, सांगतोस काय तू हे?'
मग मात्र ती सुन्न झाली.
विष्णु एकदम तिच्याजवळ गेला आणि आईच्या कुशीत त्यानं आपलं तोंड लपवलं. दोघेही धुमसून रडायला लागले.
कोण कुणाला धीर देणार होतं? रडण्याशिवाय त्यांना अन्य कोणतं गत्यंतर होतं?
अभिप्राय
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 13 Jul 2010 - 19:41
उतारा कुठला हे माहित नाहि..
मात्र या निमित्ताने धनानंद कोण ही उत्सुकता चाळवली गेली आणि धनानंद या नावाच्या राजाच्या दोन कथा जालावर वाचायला मिळाल्या
१. मिसळपाववरील सागरने लिहिलेली कथा
२. मटामधे जगज्जेत्याची अखेर मधे
वेदश्री
वेदश्री · Wed, 14 Jul 2010 - 09:50 · उत्तर
अरे वा! ऋ, खोदकामातपण हुशार आहेस की तू तर! :) दुसरी लिंक कथा दाखवत नाहीये.
अदिती
अदिती · Wed, 14 Jul 2010 - 04:37
कुठलं हे सांगता येणार नाही. पण ही गोष्ट चाणक्याची वाटते आहे.
बरोबर का?
वेदश्री
वेदश्री · Wed, 14 Jul 2010 - 09:53 · उत्तर
गोष्ट चाणक्याची आहे हे तर ओळखणे सोपेच झाल्यासारखे वाटतेय वरच्या लिंक्स बघून (खोदकाम केले जाईल हे लक्षात आले नव्हते.. :( ).. तसे नसेल तरीही तू डायरेक्ट पुस्तक ओळखले पाहिजे होतेस! ओळख पटकन...
वल्ली
वल्ली · Wed, 14 Jul 2010 - 10:10
चाणक्य---भा. द. खेर या पुस्तकातील आहे का?
वेदश्री
वेदश्री · Wed, 14 Jul 2010 - 10:32 · उत्तर
बरोब्बर!
स्वगतः यावेळचे कोडे अत्यंतच फुसके होते म्हणायचे.. काल टाकले नाही तर आज दुपारी फडशा? छ्या! :(
वेदश्री
वेदश्री · Wed, 14 Jul 2010 - 14:31
उत्तर ओळखले गेलेले असल्याने घोषित करून टाकले आहे. पुढचे कोडे ऋ टाकणार म्हणालाय.. त्याला शुभेच्छा!
स्वगतः आता १२व्या ओळखाचे उत्तर आले नाहीतर १२चा भाव लागेल का काय मला..? :)