- Log in to post comments
'रोहित इथं आला, तेव्हा खूपच लहान होता. असाच काकांच्या भोवतीभोवती घुटमळायचा... एकदा काका काहीतरी लिहीत होते. रोहित बाजूलाच उभा होता. काकांनी वर न पाहाताच एक वाटी त्याच्या हातात दिली आणि त्यातलं पाणी नाहीसं करून ये, म्हणून सांगितलं.
वाटी हातात धरून अलगद चालत रोहित मागच्या अंगणात गेला.
टळटळीत दुपारच्या उन्हाचे चटके अंग भाजून काढत होते.
बराच वेळ झाला, तरी रोहित परत आला नाही, म्हणून काका अंगणात गेले. रोहित हातातली वाटी उन्हात धरून तळपत्या सूर्याकडे पाहात उभा होता.
काकांनी त्याला जवळ घेतलं... मायेनं डोक्यावरून हात फिरवला.
रोहितचा वाटी धरलेला हात मात्र उन्हात तसाच ताठ होता.
वाटीतलं पाणी उन्हानं नाहीसं होईपर्यंत मी उभा राहाणार... रोहित म्हणाला आणि बाष्पीभवनाचं न शिकलेलं तत्त्व याला कुठून कळलं, याचा अचंबा करत काकांनी त्याला आणखी जवळ ओढलं'...
...रोहितची कथा सांगताना गणेश शिंदेचा आवाज अभिमानानं भारावला होता.
सगळी मुलं आता त्याच्या अवतीभवती गोळा झाली होती, आणि गणेश एकेकाची ओळख करून देत होता...
'अरुणा नावाची मुलगी १२वीत शिकतेय. गेली १५ वर्षं तिचे वडील येरवड्याच्या तुरूंगात आहेत. रेल्वेवर दरोडा टाकल्याच्या आरोपावरून... त्याच प्रकरणात आणखी एकाचं एन्काऊंटर झालं... रेल्वे रुळाजवळच्या पोलवर चढवून त्याच्यावर गोळ्या झाडून मारलं त्यांनी'...
हे सांगताना गणेशच्या डोळ्यात उमटलेली संतापाची एक बारीकशी रेष मलाही जाणवून गेली...
'हा सागर... साडेचार वर्षांचा आहे. याच्या बानं आईला सोडलं. मग जगणं कठीण झाल्यावर आईनं याला इथं आणून सोडलं'...
'ही स्मृती... साडेतीन-चार वर्षांची असताना, एका आजारपणानं हिच्या आईची दृष्टी गेली. ती आंधळी झाली, म्हणून नवर्यानं तिला वार्यावर सोडलं... मग स्मृतीला इथं आणलं'...
'ही सगळी मुलं आता आमचं कुटुंब झालंय... मी आणि रेखाताई- दोघं पूर्णवेळ इथं असतो. कुणी आजारी पडला की त्याच्या उशाशी बसून रहावं लागतं. त्याचं औषधपाणी बघावं लागतं... आम्ही बघतो'...
'या मुलांची घरं पालाची. त्यांना टीव्ही माहीत नाही. बटन खाली केलं की लाईट लागतो अन् ही मुलं चाट पडतात... टीव्हीच्या मागं जाऊन पडद्यावरली माणसं शोधायला धडपडतात... इथलं जग त्यांना नवं आहे... त्यांना पक्षी माहीत आहेत.. प्राणी माहीत आहेत. साप, घोरपड माहीत आहे. पण लाईट, टीव्ही, मोबाईल माहीत नाही... लहान मुलांना दात घासायचं माहीत नाही. मग आम्ही स्वतः त्यांचे दात घासतो... आता त्यांना या जगाची ओळख व्हायला लागलीये'...
'मी पँट घालतो, सायकल चालवतो, कॉलेजला जातो, प्रवास करतो, हे बघून त्यांचीही उमेद फुलतेय... आपल्यालाही सायकल चालवायची आहे, मोबाईल वापरायचा आहे, प्रवास करायचाय... मग शिकायला पाहिजे, हे त्यांना समजायला लागलंय'...
'अनेक मुलांना इथे आणून सोडल्यानंतर आईबाप इकडे फिरकलेलेही नाहीत.. पण आता मुलांना घरची आठवण अस्वस्थ करत नाही... काही दिवस गेले की कुणीच इथे घरच्या आठवणीनं रडत नाही. कारण घरी जे मिळालं नाही, ते सगळं इथे मिळतंय... त्यांना आपला भूतकाळ विसरायचाय... त्यांचं भविष्य घडवायचंय'...
... गणेशची नजर दूरवर कुठेतरी स्थिरावली होती.
'आमच्या समाजातल्या जवळपास प्रत्येक पुरूषावर चोरीमारीचा शिक्का मारला गेलाय... कुणीच त्यातून सुटलेला नाही. मग पोलिसांचा जाच चुकवण्यासाठी बाया पुढे येतात... लहानग्यांना पुढे करतात. मारझोड सहन करतात.. कधी मुलांचे जीव गमावतात... तरीही कुणीतरी तुरूंगात जातोच... मग घरं उद्ध्वस्त होतात. संसार विस्कटतात. तुरूंगात अडकलेल्याला सोडवण्यासाठी, वकिलाला देण्यासाठी पैसे उभे करावे लागतात. मग कर्ज आणि ते फेडण्यासाठी चोरी... पुन्हा चोरीसाठी तुरूंग, पुन्हा कर्ज, पुन्हा चोरी... आमच्या समाजाचं हे दुष्टचक्र आहे... हा विळखा अजून सुटलेला नाही. शिकलं नाही, तर तो सुटणारही नाही... इथल्या मुलांना या विळख्यातून सुटका मिळणार आहे. काकांनी आम्हाला त्यातून मुक्त केलंय'...
गणेशचा आवाज हळूहळू हळवा होत होता...
आजूबाजूची मुलं जेवणासाठी खाली उतरली होती.
चापेकरांच्या वाड्याच्या वरच्या मजल्यावरच्या त्या दालनात मी आणि गणेश, दोघंच होतो...
'पारधी समाज एका दुष्टचक्रात अडकून गेलाय... काका त्याला मुक्त करणार आहेत'...
गणेशचा आवाज घुमला, आणि चापेकरांच्या भिंतींनी हुंकार देत त्याला प्रतिसाद दिल्याचा भास मला झाला...
या वास्तूलाही अशाच दुष्टचक्रातून काकांनी - गिरीश प्रभूणेंनी- मुक्त केलं होतं.
म्हणूनच या वास्तूनं गणेशला प्रतिसाद दिला असावा, असं मला वाटलं...
अभिप्राय
वल्ली
वल्ली · Wed, 21 Jul 2010 - 10:34
पारधी
लेखकः गिरीश प्रभुणे
वेदश्री
वेदश्री · Wed, 21 Jul 2010 - 11:17 · उत्तर
नाही, हे उत्तर नाहीये पण क्या बात है.. या निमित्ताने मला गिरीश प्रभुणेंचे पुस्तक तर माहित झाले! त्यांच्याबद्दल मला असलेली माहिती म्हणजे वरील वेचा ज्या पुस्तकातील आहे त्या पुस्तकातून जितकी झाली तितकीच. आता 'पारधी' घ्यायलाच पाहिजे असे वाटतेय. :) १०क्स वल्ली!
वेदश्री
वेदश्री · Fri, 23 Jul 2010 - 16:30
उत्तर दिले आहे. :)
आता पुढचे कोडे श्रावण विचारणार आहे.