ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - १७

सागर

मजकूर

नेहमी श्रावण आपल्यासाठी एवढे सुंदर वेचे छान छान पुस्तकांतून शोधून देतो. आज मला थोडा वेळ मिळतो आहे म्हनून मी देतो आहे एवढेच. नेहमी देता येईल याची मलाच खात्री नाही :D
========================================================================
आदीतीनी बरोब्बर ओळखले आहे या कोड्याचे उत्तर
हा वेचा रणजित देसाईंच्या 'पावनखिंड' यातील आहे. पान क्रमांक ७२

अभिनंदन आदिती. खूपच हुशार आहेस तू. वेदश्रीचेही अभिनंदन कारण तिने चरित्रनायकाचे नाव बरोबर ओळखले होते जे एका वेच्यावरुन शोधणे खरोखर अवघडच होते. तुम्ही दोघींचे मनापासून अभिनंदन :)

प्रयत्न करुन प्रतिसाद देणार्‍यांचेही मनापासून धन्यवाद :)
========================================================================
'सलूख करावा!' मोरोपंत म्हणाले.
'सलूख ! मग आजवर येवढी धडपड केली, ती कशासाठी? आमच्या शब्दाखातर ज्यांनी जीव वेचले, त्याला कोण जबाबदार?' राजे निश्चयाने म्हणाले, 'नाही. खानास मारल्याविना राज्य साधणार नाही. एक त्यांनी तरी राहावं; नाहीतर आम्ही !'

'एकदम एवढ्या निकराला जाण्यापेक्षा...' जेधे म्हणाले.
त्यांना वाक्य पुरं करु न देता राजे म्हणाले,
'जेधेकाका, आपण वयानं, मानानं मोठे ! आम्ही निकराला जात नाही. गेले आहेत अफझलखान. चढे घोड्यानिशी आम्हांस पकडून नेणार आहेत. ती त्यांची प्रतिज्ञा आहे.
' वाट बघ, म्हणाव !' बाजी म्हणाले.
'वाट बघतच तो वाईला बसला आहे बाजी, यापुढे अनेक संकटं आम्हांवर येणार आहेत. ती एकापेक्षा एक अशी वरचढ असणार. त्यांना सामोरं जायला आपलं बळ वाढवायला हवं. खान आपल्या पावलांनी आला आहे. खानानं आणलेल्या तोफा, हत्ती, घोडदळ, बाडबिछायत आणि संपत्ती हे सर्व मिळायला हवं. तसं झालं, तर एका रात्रीत आपले मावळचे बारा गडकोट मातब्बर बनतील. हा डाव हरुन चालणार नाही.'

राजांच्या त्या विश्वासपूर्ण बोलण्यानं सार्‍यांच्या मनांत उत्साह संचारला होता.
नेताजी म्हणाले - 'आज्ञा झाली तर खानाच्या छावणीवर चालून जाऊ'
'मुळीच नाही. कोणत्याही उपायानं खान वाई सोडून जावळीत उतरायला हवा.'
'उतरेल?' कोणीतरी विचारलं.
'बघू!' म्हणत राजे उठले.
सार्‍यांनी मुजरे केले आणि निरोप घेतला....
========================================================================

संकेत १: लेखकाची मूळ कलाकृती आहे. अनुवाद नाही. (ऐतिहासिक आहे हे वेच्यावरुन कळतेच तेव्हा तो संकेत देण्याची गरज नाही)

संकेत २: कादंबरीच्या मलपृष्ठावरचा (थोडा) मजकूर:
कोणाच्या स्वार्थापायी?
आणि तेही एका माणसच्या जिवापायी?
कोणाच्या सत्तेनं आम्ही या माणसांना गुंतवलं
कोणत्या अधिकारानं?
जीवनात अखेरचं मोल असतं ते स्वतःच्या जीवाचं! ....

पुस्तकाचे आणि लेखकाचे नाव याच ठिकाणी दिलेत तरी चालेल.
वेगवेगळी उत्तरे पहायला मिळतील यानिमित्ताने. :)

अभिप्राय

बहुगुणी

बहुगुणी · Tue, 3 Aug 2010 - 22:39

श्री. रणजित देसाई यांची 'श्रीमान योगी' ही कादंबरी आहे असं वाटतं....

सागर

सागर · Wed, 4 Aug 2010 - 08:39 · उत्तर

नाही हे उत्तर नाहिये :)

विरोपाद्वारे आदितीनेदेखील हेच उत्तर दिले होते. पण अजून डोके खाजवा. :)

सागर

सागर · Wed, 4 Aug 2010 - 12:12

फक्त दोघांनीच प्रयत्न केले आहेत बहुगुणी आणि आदिती यांनी.
निखिलने देखील येत नाही म्हणून खरडले होते.
बाकी कोणाचेच प्रतिसाद नाहियेत

अजून २-३ दिवस वाट पाहूयात का? की सांगू उत्तर?
मी येथे नवीन आहे म्हणून मला प्रथा माहिती नाहिये येथील ;)

बहुगुणी

बहुगुणी · Wed, 4 Aug 2010 - 14:12

राजा शिवछत्रपति?

सागर

सागर · Wed, 4 Aug 2010 - 16:12 · उत्तर

नाही हे पुस्तक नाहीये
आज कोणी योग्य उत्तर नाही दिले तर उद्या नवीन संकेत देईन :)

ऋषिकेश

ऋषिकेश · Wed, 4 Aug 2010 - 16:16

सागर,
इथे असा काहि नियम नाहि आहे.. अजून एखादा संकेत देऊन बघ नाहि आलं तर मग एखाद दोन दिवसात तुला वेळ होईल तसे उत्तर दे.

बाकी माझा पूर्ण रँडम गेस "छावा" ?

सागर

सागर · Wed, 4 Aug 2010 - 16:56

अरे ऋषि ,
नाही रे छावा पण नाही.

चालेल अजून एक संकेत देतो ('क्लू'ला संकेतच म्हणतात असे गृहीत धरले आहे ;) )

ही कादंबरी छत्रपतिंना केंद्रस्थानी ठेऊन नाही लिहिलेली. :) मला वाटते आता उत्तर देण्यास अडचण जास्त येणार नाही

वेदश्री

वेदश्री · गुरुवार, 5 Aug 2010 - 08:32

प्रभाकर भावेंचे बाजीप्रभू देशपांडे? वाचलेले नाही मी हे पण दिलेल्या संकेतांवरून हे असावे असे वाटतेय.

सागर

सागर · गुरुवार, 5 Aug 2010 - 10:13

दिनेश आणि वेदश्री,

प्रयत्न चांगला होता. पण दोन्ही उत्तरे बरोबर नाहियेत.

अजून एक मोठा संकेत देतो
वेदश्री चा अंदाज जवळपास आहे. :)

ओळखतील बहुतेक बरेच जण आता :)

अदिती

अदिती · गुरुवार, 5 Aug 2010 - 11:53

वेदश्रीचं उत्तर जवळपास बरोबर असेल तर हे पुस्तक रणजित देसाईंचं 'पावनखिंड' असण्याची खूप शक्यता आहे....

--अदिती

सागर

सागर · गुरुवार, 5 Aug 2010 - 14:37 · उत्तर

हा हा हा :)

मित्रांनो,

आदीतीनी बरोब्बर ओळखले आहे या कोड्याचे उत्तर :)
हा वेचा रणजित देसाईंच्या 'पावनखिंड' यातील आहे. पान क्रमांक ७२

अभिनंदन आदिती. खूपच हुशार आहेस तू :)

प्रयत्न करुन प्रतिसाद देणार्‍यांचेही मनापासून धन्यवाद

(पावनखिंड वाचून पावन झालेला) सागर :)

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · गुरुवार, 5 Aug 2010 - 17:29 · उत्तर

अरेरे..
नाव तोंडावर आले होते..
छे

सागर

सागर · गुरुवार, 5 Aug 2010 - 20:18 · उत्तर

म्हणुन म्हणतो मनात आले की नाव सांगून टाकावे :)

नंतर उगाच जास्त खंत वाटून राहते ;)

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Fri, 6 Aug 2010 - 22:37

असो, तरीही पुढचा वेचा मी देऊ इच्छिते. अगदी कुणी टंकला असल्यास माझी ना नाही, पण अजून कुणी काही लिहिले नसेल तर सांगा, मी संध्याकाळपर्यंत प्रकाशित करेन.

सागर

सागर · Sat, 7 Aug 2010 - 20:19 · उत्तर

मला वाटते याला कोणाचीच हरकत नसावी मस्त कलंदर. प्रकाशित करताना वेचा क्रमांक चेक करुन बिनधास्त प्रकाशित करत जा.
शेवटी नवनवीन पुस्तकांची ओळख होणे महत्त्वाचे.

चर्चा प्रकार