- Log in to post comments
आपल्याकडे टक लावून पाहणार्या बाळाच्या दृष्टींत आईला सूर्य, चंद्र आणि नक्षत्रे यांचे संमेलन दिसतें; त्याच्या अकारण हास्यांत वसंत, निर्झर व उषा यांच्या हास्यांचा त्रिवेणीसंगम झाला आहे असा तिला भास होतो; त्याची झांकलेली मूठ तिला त्रिभुवनाच्या मोलाची वाटत असते.
.. पौर्णिमेप्रमाणे अमावस्येच्या रात्रीची शोभाही प्रेक्षणीय असते. भरती असो नाहीतर ओहटी असो, किनार्यावर नाचत नाचत येणार्या लहरींची लीला मनमोहकच वाटते. चित्र व काव्य यांचेही तसेच आहे. भावनेची उत्कटता व विचारांची सूचकता यांच्या उभ्याआडव्या धाग्यांनीच कलेचे वस्त्र विणले जाते. परंतु समुद्रांतील मोत्यें पाणबुड्यालाच मिळतात; मासे मारणार्या लोकांना त्यांचा लाभ होत नाही.
.. वृद्ध माणसांचे हृदय समुद्रासारखे आहे यांत संशय नाही. संकुचित विचारांचा फेस आणि रूढ कल्पनांच्या लाटा हा त्यांचा वरवर दिसणारा भाग झाला. त्याच्या तळाशी वात्सल्यासारखी अनेक अमोलिक रत्ने असून आजारासारख्या प्रसंगाने मंथन केले की ती बाहेर पडूं लागतात.
.. आपले जीवित हे दोर्यांत ओवलेल्या फुलांप्रमाणं नाही तर आकर्षणाच्या बळावर कक्षेत फिरणार्या ग्रहांप्रमाणं आहे. हारात फुले एकमेकांना चिकटून बसतात; पण आकाशांतल्या ग्रहांमध्ये शेकडों योजनें अंतर असते.
.. पाठीमागं वाघ लागला तरी मनुष्य जेवढी धावपळ करणार नाही तेवढी त्याला पुढे लागलेल्या पोटासाठी करावी लागते.
अभिप्राय
मस्त कलंदर
मस्त कलंदर · गुरुवार, 3 Jun 2010 - 18:35
पुस्तक नाही ओळखता आले.. पण लेखक वि. स खांडेकर असावेत असे वाटतेय!!!! :)
वेदश्री
वेदश्री · Wed, 23 Jun 2010 - 16:56 · उत्तर
:) अजून दोन वेचे देतेय..
.. भोग व त्याग हे मानवी जीवनाचे दोन डोळे आहेत. त्यांची दृष्टी भिन्न आहे असे वाटले तरी हा भिन्नत्वाचा नुसता आभास आहे. दिवस आणि रात्र यांच्या मधुर संगमाचा परिपाक उषा किंवा संध्या यांच्या रुपानें होतो. भोग आणि त्याग यांचा सुंदर संयोग म्हणजेच आदर्श मानवी जीवन.
.. मानवी जीवनातील अत्युच्च आनंद त्यागांत आहे. आकाश निर्जल मेघांची फाटकी वस्त्रे स्वतःसाठी ठेवते, पण मेघांच्या भांडारापैकी कापसाचा धागान् धागा पृथ्वीला अर्पण करते.
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 4 Jun 2010 - 08:48
बापरे! दोन्ही वेचे वाचून मनातल्या अथांग समुद्रात सुक्ष्मातीसुक्ष्म कणांनी बनलेल्या लाटानी हा हा म्हणता विक्राळ रूप धारण केले आणि हृदयाच्या भिंतींना थपडा देऊन घायाळ केले (म्हंजे वाचून छातीत कळ आली ;) )
वेदश्री
वेदश्री · Fri, 4 Jun 2010 - 21:20 · उत्तर
वेचे अर्धवटच निवडले गेले बहुतेक माझ्याकडून त्यामुळे योग्य संदर्भ लागला नसावा.. किंवा पुस्तकाच्या आवडीच्या निकषांमधलाही फरक असू शकतो. पुढच्यावेळेस वेचे निवडताना जास्त काळजी घ्यायचा प्रयत्न करेन. प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
इथे दिलेल्या दोन्ही वेच्यांसकट हे पुस्तक माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकातले एक आहे... खासकरून लेखकाने कथेतल्या नायकाचीच नाही तर कथेतल्या सर्वच व्यक्तीरेखा ज्या सहजतेने फुलवल्या आहेत कुठलाही धागा गळपटू न देता अथवा अनुत्तरीत न ठेवता त्यामुळे. त्याच्या आयुष्यात आलेल्या दोन तरुणींमधून (कुमारिका की बालविधवा, सुंदर की नाकीडोळी ठीकठाक, बडबडी की अबोल वगैरे) तो कोणाला आपली नायिका निवडेल याबद्दल धडधड प्रचंड वाढली होती माझ्या मनात अगदी पहिल्यांदा जेव्हा मी हे पुस्तक वाचले तेव्हा.. असो!
वेदश्री
वेदश्री · Sat, 12 Jun 2010 - 13:36
उत्तर दिले आहे!
यशोधरा
यशोधरा · Sat, 12 Jun 2010 - 14:04
आज पाहिले हे. पुस्तकाचे नाव काही ओळखता आलेले नाही, पण भाषा खांडेकरी आहे हे जाणवले लगेच.
मी त्यांचे अमृतवेल, ययाती आणि आत्मचरित्र एवढेच वाचले आहे. सुरुवातीला शाळकरी वयात अमृतवेल वाचली होती, तेह्वा एकूणच भारावून वगैरे जायला झाले होते! आता पुन्हा परत सगळी वाचू शकेन, असे वाटत नाही....
ययाती आवडते मात्र.
वेदश्री
वेदश्री · Wed, 23 Jun 2010 - 17:07 · उत्तर
मुग्धवयात वाचलेले पुस्तक आहे मी हे पण आजही वाक्यन् वाक्य हरेक प्रसंगासकट हृदयावर कोरलेले आहे माझ्या. यातल्या सुधाकर आणि सुधा या दोघांचेही व्यक्तीचित्र माझ्या अत्यंत आवडत्या व्यक्तीचित्रांपैकी एक (चुकले नाहीये.. एकच आहे!) आहे. शिवाय रामायणातल्या 'कांचनमृगाचा'अगदी सुयोग्य वापर तर कलिजा खल्लास करतो माझा. माझ्या बाबांनी एका सापत्य घटस्फोटीतेशी (म्हणजेच माझ्या आईशी) लग्न केलेले असल्याने असेल पण या कादंबरीतली कथा अगदी माझी आपली वाटत आलीये मला कायमच. बर्रेच काही शिकण्यासारखे सापडले मला यात. अशीही जगावेगळी व्यक्तीचित्रं रंगवली जाऊ शकतात - तेही खांडेकरांच्या काळात त्यांच्या लेखणीतून याचा विशेष आनंद आहे मला.