ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ३३

अदिती

मजकूर

रोचिन आणि सागरने ओळखल्याप्रमाणे पुस्तक आहे 'आपुलकी'

संकेत देण्याची गरज निर्माण झालेली आहे. या कोड्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा संकेत म्हणजे लेखक महाराष्ट्राचे 'लाडके' आहेत. लेखनाच्या शैलीवरून लोक लेखकाचे नाव अगदी सहज ओळखतील असे वाटले होते. असो. बुधवारी संध्याकाळी उत्तर जाहीर करीन.

मराठी नाट्यप्रेमी कुटुंबाच्या संदर्भात बोलायचे झाले तर नाट्यसंमेलनासारख्या उत्सवाच्या प्रसंगी ज्यांचे अटळपणाने स्मरण होते त्यांत नारायणराव बालगंधर्वांना अग्रपूजेचा मान द्यायला हवा. नारायणराव ही झाली काहीशी औपचारिक उपाधी. त्यांच्या प्रेक्षकांचा ’तो’ बालगंधर्व होता, ’ते’ बालगंधर्व नव्हे. त्यांच्या निकटवर्तीयांचे ते ’नाना’ होते.त्यांच्या रक्ताच्या नातलगांनी त्यांना ’नाना’ म्हटले त्याच भावनेने त्यांच्याशी जवळीक साधण्याचे भाग्य ज्यांना लाभले त्यांनीही त्यांना ’नाना’च म्हटले.

बालगंधर्वांच्या काळातले नाटक आणि आजचे नाटक यांत खूप फरक पडला. तसा पडणे अपरिहार्य आहे. फरक हा सामाजिक गतीचा नियमच आहे.बालगंधर्व जसा अभिनय करत तसा आज कुणी करत नाही. करूही नये. एवढेच काय पण बालगंधर्वांच्या ऐन उमेदीच्या काळात त्यांनी केलेल्या ’स्वयंवरा’चा चित्रपट असता तर आज तो सुखाने पाहवला असता असे खात्री देऊन सांगता येत नाही. पण ज्यांच्या मनावर एके काळी त्यांच्या अभिनयाचे संस्कार उमटलेले आहेत, त्यांना मात्र ते स्मरण आजही आनंदाची हुरहूर लावून जाते. त्या आनंदाची चिकित्सा करू नये. इंग्रजीत ज्याला ’नोस्टाल्जिया’ म्हणजे ’स्मरणसौख्य’म्हणतात तसेही ते असेल. पण एका बाबतीत मात्र ते केवळ स्मरणसौख्य नव्हते, असे म्हणायला हवे. ते म्हणजे त्यांचे गाणे. सुदैवाने बालगंधर्वांच्या ध्वनिमुद्रिका आजही आपल्याला ऐकायला मिळतात. सूरलयीची ज्यांना उत्तम जाण आहे अशा आजच्या पिढीतल्या गायक-गायिकांनाही नारायणरावांचे गाणे ऐकताना भारावून गेल्यासारखे होते. सुरांची एखादी लहानशी लड असते, लयीची एखादी बालसुलभ वृत्तीने होऊन गेल्यासारखी वाटणारी, पण प्रत्यक्ष आपल्या गळ्यातून काढायला गेल्यावर मात्र अडमडायला लावणारी लीला असते. लयीचा विलक्षण अंदाज घेऊन पण वरपांगी सहजगत्या केलेली शब्दांची फेक असते. समेला सुखद हुलकावणी दिलेली असते. मूळ पदातील एखाद्या यतिभंगाला सुरांच्या सुंदर दुलईखाली झाकलेले असते-अशी अनेक आनंदनिधाने. बालगंधर्वांची कलेतल्या चिरंतनाशी गाठ बांधलेली दिसते ती इथे. संगीतातला हा खेळ जुना होत नाही.

माझ्या एका मित्राने मला परवाच बालगंधर्वांची एक जुनी ध्वनिमुद्रिका आणून दिली. एका बाजूला ’एकच प्याला’ तील ’गुणगंभीरा’ ही भैरवी आणि दुसऱ्या बाजूला गोविंदाग्रजांची ’घास घे रे तान्ह्या बाळा’ हे गाणे. ’गुणगंभीरा’हे पद केवळ आठवणीतून मी कधीतरी गुणगुणत असे. गंभीरातल्या भी वरची सम गाठायला दीर्घ ’भी’ चा ऱ्हस्व ’भि’ करून! अनेक वर्षांनंतर नारायणरावांची ती रेकॉर्ड ऐकली. गंभीरातला ’भी’ दीर्घच ठेवून त्यांनी समेला केलेला तो स्पर्श कानी पडल्यावर मी माझे दोन्ही कान पकडले. नारायणराव समजल्याच्या अहंकाराचे वस्त्र चटकन गळून पडले. नारायणराव कधीही दाणकन समेवर येत नसत. बस गाठल्यासारखी धावपळ करून सम गाठत नसत किंवा आग्रहाने गाठून, ’कशी गाठली?’ अशा आविर्भावानेही श्रोत्यांकडे पहात नसत. (तसे बैठकीच्या वेळी पदे म्हणताना त्यांचे डोळे बहुधा मिटलेलेच असायचे.) मिटल्या आणि उघड्या डोळ्यांनी ते गाणेच पाहत. लोकांचे ऐकणे पाहत नसत. समेला मायेने स्पर्श करत. किंबहुना त्यांची सगळी लयकारीच एखाद्या तान्ह्या पोराच्या जावळावरून हात फिरवल्यासारखी असे. ’नाथ हा माझा’ वरील पहिली मुरडत मुरडत जाणारी तान संपवून ’मोही खला’ मधल्या ’मो’ वरची सम गाठताना भल्याभल्यांच्या छातीला धाप लागताना मी पाहिली आहे. ’रूपबली तो नर शार्दूल’यातल्या ’शा’ वरच बऱ्याच जणांचा श्वास संपतो; एवढेच नव्हे तर तो शार्दूलातला शा आहे याचाही विसर पडतो. नाना ’शार्दूल साचा’ पर्यंत नुसते जात एवढेच नव्हे तर ’साचा’ मधील ’सा’ वर एक स्वच्छ आवाजातली मोहक हरकतही घेत असत.

अभिप्राय

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Sun, 12 Sep 2010 - 20:46

उतारा आवडला. स्वतंत्र वेचासंग्रह केला कुणी तर त्यात या उताऱ्याला स्थान नक्की.
मी लेखक ओळखला आहे. पुस्तकांत मात्र खुंटलो आहे.

वेदश्री

वेदश्री · Mon, 13 Sep 2010 - 08:46

वाचलेले नाही त्यामुळे पास!

वेच्यातले काय काय आवडले हे सांगणे अवघडच आहे कारण एकसेएक वाक्ये आहेत अगदी. तरीही त्यातल्या त्यात निवडायचेच झाले तर -

समेला मायेने स्पर्श करत. किंबहुना त्यांची सगळी लयकारीच एखाद्या तान्ह्या पोराच्या जावळावरून हात फिरवल्यासारखी असे.

ही रचना खूपच आवडली शब्दांची. अनेक शब्दांनी वर्णन करण्यापेक्षा त्याचे एकच चित्र जास्त परिणामकारक असते म्हणतात तशातलाच काहीसा हा प्रकार! मस्तच..

वल्ली

वल्ली · Mon, 13 Sep 2010 - 11:34

माझा पास. संगीत, नाटके यांची फारशी आवड नसल्याने त्यासंबंधीत लेखन कधी वाचण्याचा योग आला नाही.

सागर

सागर · Mon, 13 Sep 2010 - 18:55

माझाही पास .... वाचलेले नाहिये :(

गुंग करणारा वेचा आदिती :)

वल्ली

वल्ली · Tue, 14 Sep 2010 - 10:12

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व म्हणजे पु. ल. देशपांडेच. पण पुस्तक कुठले ते ध्यानी येत नाही.

वल्ली

वल्ली · Tue, 14 Sep 2010 - 10:12

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व म्हणजे पु. ल. देशपांडेच. पण पुस्तक कुठले ते ध्यानी येत नाही.

वल्ली

वल्ली · Tue, 14 Sep 2010 - 10:12

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व म्हणजे पु. ल. देशपांडेच. पण पुस्तक कुठले ते ध्यानी येत नाही.

सागर

सागर · Tue, 14 Sep 2010 - 10:26

वाचलेले नाहिये तरी गुगलदेवाच्या मदतीने एक निष्कर्ष काढला आहे
बघ बरोबर आहे का? :)

गणगोत मधे मैफील वगैरे आहेच पण व्यक्तींबद्दल सुंदर अनुभव चितारलेले आहेत असे ऐकूनही आहे

अदिती

अदिती · Tue, 14 Sep 2010 - 11:32

वल्ली, सागर,
लेखक बरोबर ओळखलात.
सागर, गणगोत नाहीये. पण तू उत्तराच्या जवळ आहेस असे वाटते आहे. पुलंनी अनेक गायकांबद्दल, मैफलींबद्दल अतिशय व्यासंगपूर्ण आणि खिळवून टाकणारे लिखाण केले आहे. हाही त्यातलाच एक छोटेखानी लेख आहे.

सागर

सागर · Tue, 14 Sep 2010 - 12:48 · उत्तर

अगं आदिती,

गणगोत थोडेफार परिचयाचे म्हणजे कित्येक वर्षांपूर्वी वाचलेले होते. आता काही आठवत नाही त्यातले.
गणगोतच्या अगोदर मला 'गुण गाईन आवडी' हेच वाटले होते.
पण ते नसावे असे वाटले. ते किंवा मग मैत्र
हेही नसेन तर मग 'रसिकहो' मधील हा वेचा असेल
भाषणांचे पुस्तकात रुपांतर केले असेल तर हेच असेल, पण इतरही अनेक आहेत.
पु.लं.चे प्रत्येक पुस्तक भन्नाट आहे, त्यामुळे अवघड दिसते आहे
पण खोगीरभरती मधील नक्की नाहिये. त्यातले अंधुकसे आठवत आहे अजूनही त्यामुळे हे नसावे.

अगोदरच खूप तीर मारुन झाले आहेत आता बास करतो :D
चुकून माकून तीर योग्य ठिकाणी बसला तरी श्रेय देण्या-घेण्याच्या भानगडीत न पडता सरळ नाव जाहीर कर बघू पुस्तकाचे :)

अदिती

अदिती · Tue, 14 Sep 2010 - 13:01 · उत्तर

सागर,
उत्तर तर जाहीर करायचंच आहे. पण त्यापूर्वी ते ओळखलं कोणी तर मजा येईल :)
वरचे तीरही हुकले आहेत :(

सागर

सागर · Tue, 14 Sep 2010 - 13:12 · उत्तर

हम्म... वाटलेच होते मला :D
पुस्तक वाचलेले नसेल तर मेंदूचा कसा फुटबॉल होतो ते बघायला मिळाले या निमित्ताने :)

सागर

सागर · Tue, 14 Sep 2010 - 14:24 · उत्तर

हेच असणार.

माझ्या यादीत हेच पुस्तक द्यायचे राहिले होते :)
आपुलकी

सागर

सागर · Tue, 14 Sep 2010 - 14:27 · उत्तर

कसे बसे मुक्कामाला पोहोचलो :P

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Tue, 14 Sep 2010 - 17:59

पुलं हे ओळखलं होतं. त्याला कारण होतं. पहिल्याच परिच्छेदात "नारायणराव बालगंघर्वांना" असे शब्द आहेत. पुढं पुलंनीच म्हटलं आहे तसे ते त्यांच्या काळात "तो बालगंधर्व" होते, आत्ताच्या काळात "ते बालगंधर्व" आहेत. या दोन्हीपेक्षा त्यांचा "नारायणराव बालगंधर्व" असा उल्लेख पुलंनीच करावा. मग त्या ओळखीविषयी त्यांनीच लिहावं. हे ध्यानी येत गेलंच. शिवाय मुळात पुस्तक वाचलेलं असल्यानं लेखन पुलंचं हे लक्षात आलंच. पुस्तकाच्या नावात मात्र गंडत गेलो. आपुलकी हे काही केल्या डोक्यात आलं नाही, पुलकित, पुलकित असं काही तरी घोळत राहीलं. मग प्रयत्न सोडून दिला. :)

चर्चा प्रकार