ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ३४

अदिती

मजकूर

पुस्तकाचे नाव ओळखण्यासाठी पहिला संकेत म्हणजे, पुस्तकाच्या लेखिकाबाईंना गहन शास्त्रचर्चेपासून ते अगदी ललित साहित्यापर्यंत काहीही वर्ज्य नव्हते.

संकेत क्र. २ : हे पुस्तक लिहिण्यामागची लेखिकेची प्रेरणा या वाक्यातून कळते.
"काव्यसमीक्षेचे प्रतिकूल अंग डावलून, अन्य यशोदायी धोरणांनी महाभारताचा अर्थ धोरणी तत्त्वज्ञांनी, पंडितांनी व राजकारणपटूंनी स्वतःच्या आवडीच्या जीवनक्षेत्राच्या समर्थनासाठी विविध प्रकारे लावला. त्यामुळे इतर अनेक क्षेत्रे उजळली. विचारांचे क्षितिज रुंदावले. संस्कृतीच्या कक्षा वाढल्या. परंतु त्यातले काव्यमय भाव मात्र झाकोळून गेले.”

भारतीय संस्कृती लालित्याने क्वचितच फुलते. पण ती एकदा मात्र घवघवीत फुलली. राधाकृष्णाच्या प्रीतीचा वसंत एकदाच आला आणि गेला, पण काही तरी सदा फुलते, घमघमते मागे ठेवून गेला. भारतीय पातिव्रत्याच्या कडकडीतपणाला कायमचे आव्हान देत राधेने एकनिष्ठ प्रीतीचे चांदण्याने रंगलेले पूर्ण सौंदर्य उघडे केले. प्रीतीचा लालभडक रंग राधेमुळे सौम्य निळा, रुपेरी झाला. या निळ्या प्रीतीला सामावून घेताना कृष्णाचे व्यक्तिमत्त्व आकाशाएवढे विस्तारले. उंच झाले. रात्रीप्रमाणे अतीव मृदू व गूढ झाले. राधाकृष्णांच्या प्रीतीमुळे भारतीय प्रेमकथेला नवा कोवळेपणा आला. संसारी भाराने कधी शिळा न होणारा भाव तिला आला. प्रीतीच्या परिपूर्तीला चिरतारुण्य अपेक्षित असते. ते साधण्यासाठीच या आदर्श प्रेमिकाने जणू राधेच्या विरहाने स्वतःला बांधून घेतले.

मृत्यूतल्या अमरत्त्वाप्रमाणे प्रिय सहवासाच्या कायमच्या अंतरात प्रेमाचे खरे सार्थक होते हे त्याला दाखवायचे होते का? अशा त®ऱ्हेच्या चिरविरहातच प्रेमसाफल्याचे अशरीरी रूप उत्कटपणे प्रतीत होते हे स्वानुभवाने त्याला सुचवायचे होते का? राधाकृष्ण एकत्र वास कधी करीतच नाहीत. क्षणाक्षणातच त्यांचा सहवास भरलेला आहे. हे क्षण फार बोलके आहेत. त्यांचे सगळे बोलके भाव पुराणांनी, काव्य कथांनी जतन केले. बासरीचे प्रतीक या संजीवक प्रीतीला मिळाले. पण नंतरचा तो कधी न मिटणारा विरह! तो मूक आहे. गूढ आहे. त्याला नाद-रंग-रूपांची आभरणे कधी चढणार नाहीत. त्या विरहामागे कलह, उपेक्षा, मृत्यू हेही संकेत नाहीत. आणि तरीही हा विरह त्याच्या अनामिकत्त्वामुळेच अति जिवंत झाला आहे. रामाप्रमाणे कृष्णाने पुढे कधी राधेची आठवण काढून उघड शोक केला नाही. अगदी नाजुक असा हा प्रेमाविष्कार त्याने अगदी ओळखूही येणार नाही अशा तऱ्हेने, अंतरातल्या अगदी तळाच्या भागात, त्याला व्यवहारी संकेतांचा कुठे धक्काही लागणार नाही अशा तऱ्हेने झाकून ठेवला काय?

राम हा मर्यादापुरुषोत्तम, तर कृष्ण हा प्रत्येक गोष्टीत शीग ओलांडणारा झाला. प्रत्येक गोष्टीला पारंगतता त्याने आणली. अमर्याद सौंदर्य व चैतन्य तिच्यात ओतले. वाऱ्याच्या झोताप्रमाणे सोसाट्याचे जीवन तो जगला. बाळपणी खेळात त्याचे पटुत्व होते. जीव ओतून तो खेळला. चोरीलाही त्याने रमणीयत्त्व आणले. विनोदाचे अंग मनमुराद जोपासले. भारतीय तत्त्वज्ञांना विनोदाचे वावडे - किंबहुना जगातील साऱ्याच तत्त्वज्ञांना. अपवाद फक्त एका कन्फ्युशियसचा! त्याने, ज्याला विनोदाचे अंग नाही तो संत होत नाही, असे प्रतिपादन केले. कृष्णाच्या गीतेत विनोद नाही. ती कृती गंभीर आहे. पण कृष्णाच्या गतजीवनात खेळकर विनोद खूप आहे. तो नसता तर गीतेचे गांभिर्य उणावले असते.

अभिप्राय

सागर

सागर · Wed, 15 Sep 2010 - 09:33

हे पुस्तक मी नक्की वाचले आहे पण बुद्धी एवढ्यांत दगा देऊ लागली आहे. मन दुसरीकडे कुठेतरी भटकत आहे सध्या त्यामुळे वाचन आणि लेखन कशातच गोडी लागत नाहिये... :)

संकेत दे ना आदिती....
पुस्तक ऐतिहासिक नाहिये एवढे नक्की :)

हे पुस्तक मी नक्की वाचले आहे.

सागर

सागर · Fri, 17 Sep 2010 - 09:05 · उत्तर

दुर्गा भागवतच वाटते आहे
व्यासपर्व तर नव्हे?.... व्यासपर्वच... :)

रोचीन

रोचीन · Fri, 17 Sep 2010 - 11:28 · उत्तर

हे व्यासपर्वच आहे!! आताच घरी येऊन पुन्हा एकदा चाळून पाहीले.बरच घुमवलं या वेच्याने!! आधी संस्क्रुती वाटलं, मग शांताबाईंच एखादं असेल अस वाटलं !! पण खात्री करावी म्हणून व्यासपर्व उघडल्यावर लक्षात आलं!!!
हे श्रा. मों च अतिशय आवडतं पुस्तक दिसतंय!!

सागर

सागर · Fri, 17 Sep 2010 - 11:54 · उत्तर

पण लगेच ट्यूब पेटली नाही माझी एवढेच :)

रोचीन

रोचीन · Fri, 17 Sep 2010 - 12:03 · उत्तर

:) माझी तरी कुठे लगेच पेटली!!!त्यामूळे याचे श्रेय हि नको!!

सागर

सागर · Fri, 17 Sep 2010 - 12:09 · उत्तर

अगदी मोठा संकेत दिल्यावर पेटली ट्यूब याला कसली बुद्धीमत्ता म्हणायची? :D

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Fri, 17 Sep 2010 - 13:03 · उत्तर

आवडते पुस्तक आहे हे खरेच. या पुस्तकाविषयी मी याआधी लिहिलं होतं. माझ्या त्या (संभाव्य) सुहृद मालिकेत हे पुस्तक बसते. :)

ऋषिकेश

ऋषिकेश · गुरुवार, 16 Sep 2010 - 11:56 · उत्तर

बहुदा इरावती कर्वे असाव्यात असा माझाही अंदाज

रोचीन

रोचीन · Fri, 17 Sep 2010 - 08:41 · उत्तर

शांताबाई शेळके पण असू शकतात.

मस्त कलंदर

मस्त कलंदर · गुरुवार, 16 Sep 2010 - 10:53

या वेच्याकडे लक्षच नव्हतं माझं.. मी ही ओळखलं पुस्तक!!! :) माझ्याही वेचा द्यायच्या यादीत होतंच ते!!!

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Fri, 17 Sep 2010 - 09:01

भारी संकेत आहे दुसरा. आता तरी ओळखा रे!!!

चर्चा प्रकार