ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ३५

श्रावण मोडक

मजकूर

संकेत १ - हवाच आहे? अर्थातच, रानाविषयीचं पुस्तक आहे. लेखकाचं रेखाटन कौशल्य अत्यंत प्रभावी आहे. त्याची रेखाटने पुस्तकात आहेत.

एकदा उन्हाळ्यात मी याच जंगलात होतो. त्या वेळी तापमान वाढलेलं होतं. जिवाची तगमग वाढवणारी उष्णता जंगलात फिरताना वैताग आणायची.
एका दिवशी मी भल्या पहाटेच माझ्या नेहमीच्या जंगलफेरीला जाऊन आलो. परतलो तर एक वनरक्षक माझीच वाट पाहत थांबला होता. इथं काही विशेष घडलं की मला अशा कर्मचार्‍यांक़डून लगेच सूचना मिळतात. वन्यजिवांचा अभ्यासक म्हणून त्यांच्याजवळची माहिती मला देताना त्यांना भारी आनंद होतो.
लगबगीनं तो वनरक्षक माझ्याकडे आला.
"काय? काही विशेष?" मी उत्सुकतेनं त्याला विचारलं.
"हो साहेब! तुमच्याकरता एक खास बातमी आहे," तो हसत म्हणाला.
"काय? काही वेगळं दिसलं का?" माझी उत्सुकता प्रचंड ताणली गेली होती.
"साहेब! आज सकाळी मी नेहमीप्रमाणे तलावाला राउंड मारण्यासाठी गेलो होतो. पलीकडे जाताना एका ठिकाणी मला मोठी मगर जबडा आ वासून पडलेली दिसली. जवळच एक जांभळीचं मोठं झाड उलथून पडलं होतं. मी त्याच झाडाचा आडोसा घेत मगरीकडं जाऊ लागलो. बराच जवळ पोचलो आणि खिशातील ही लहान दुर्बीण काढून तिचं निरीक्षण करायला सुरवात केली. मी माझी चाहूल लागू नये, या करता खूप सावधगिरी बाळगली होती. तरीही कसं कोण जाणे, तिला माझ्या अस्तित्वाचा सुगावा लागलाच. ती लगेच पोटावर सरपटत निघाली आणि धबकन पाण्यात उडी घेतली," वनरक्षक श्वास घ्यायला थांबला.
माझी उत्सुकता या कथेने भारी ताणली गेली होती.
"मग पुढं काय झालं?" मी विचारलं.

अभिप्राय

रोचीन

रोचीन · Mon, 20 Sep 2010 - 06:28

लेखक व्यंकटेश माड्गुळकर????

रोचीन

रोचीन · Mon, 20 Sep 2010 - 06:50

नागझिरा वा जंगलातील दिवस या पैकि एक असावे. नागझिरा ची शक्यता जास्त वाटते.

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Mon, 20 Sep 2010 - 07:49 · उत्तर

नाही. लेखकही व्यंकटेश माडगूळकर नाहीत.

रोचीन

रोचीन · Mon, 20 Sep 2010 - 08:00

मग दुसरा संकेत आवश्यक आहे!!अनुवादित आहे का??
मारुती चितमपल्ली???

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Mon, 20 Sep 2010 - 08:49 · उत्तर

पुस्तक अनुवादित नाही. त्यात असलेले वर्णन विदर्भातील जंगलांचेच आहे. लेखक मारुती चितमपल्ली नाहीत.

अदिती

अदिती · Mon, 20 Sep 2010 - 08:53

लेखनशैली पुरंदर्‍यांची वाटते आहे. पुस्तकाचे नाव मात्र आठवत नाही.
रेखाचित्रे आहेत म्हणजे रानवेड्याची शोधयात्रा / कृष्णमेघ कुंटे नक्कीच नाही.
विचार करते आहे. वेचा मात्र रंजक आहे. जमल्यास कोडे सुटल्यावर या वेच्याचा उत्तरार्धही इथे लिहाल का? मगरीचं पुढे काय झालं ते तरी कळेल ;)

--अदिती

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Mon, 20 Sep 2010 - 10:17 · उत्तर

नाही. पुरंदरे नाहीत.
उत्तरार्ध, जाम टंकाळा येईल इतका भाग आहे तो. प्रयत्न करेन. पण पुस्तक मुळातून वाचण्याजोगे आहे.

सागर

सागर · Mon, 20 Sep 2010 - 09:58

मराठीत एक तर निसर्गावर लेखन करणारे लेखक मोजकेच आहेत. त्यातही रेखाटने करणारे लेखक तर अगदी कमी. माडगूळकर नाहीत... चितमपल्ली नाहीत... शैली नवीन आहे त्यामुळे गोनीदांचा तर प्रश्नच नाही.

मग उरतं कोण? :)

श्रामोला उत्तर कळवले आहे. त्यातील सुरेख रेखाटनांमुळे पुस्तक लक्षात राहिले होते. वाचलेले नाहिये त्यामुळे माझे उत्तर बरोबर नसेन तर माझा पास ... :)

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Mon, 20 Sep 2010 - 10:15 · उत्तर

नाही. शैली नवीनच आहे.

सागर

सागर · Mon, 20 Sep 2010 - 10:25 · उत्तर

रेखाटनाच्या स्तुतीवरुन मला आधी सुरेशचंद्र वारघडे यांचे क्रौंचकाव्य वाटले होते.
वाचले नाहिये... त्यामुळे माझा पास

रोचीन

रोचीन · Mon, 20 Sep 2010 - 10:34

मारुती चितमपल्ली वा व्यंकटेश माड्गुळकर यांचे नाही तर मी ते वाचलेले नाही. पण आदिति म्हणते तसं ते किरण देशपांड्यांचं सखा नागझिरा किंवा अतुल धामनकरांच ताडोबावरचं पुस्तक असु शकतं.
निसर्ग आणि प्राणी यांविषयीच माझं वाचन फारच तोकडं आहे. पण कुतुहलापोटि का होईना, या वेच्याच्या निमित्ताने शोध घेतला गेला आणि ज्ञानात थोडी भर पड्ली याबद्दल श्रा. मोंचे आभार!! :)

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 21 Sep 2010 - 15:28

रुद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता?

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Tue, 21 Sep 2010 - 17:37

जाना दो. गेसवर्क खूप झालंय. आता हा नाही, तो नाही, तो नाही, तोही नाही, हाही नाही करत आपण शेवटी या पुस्तकापर्यंत पोचूच. तेव्हा मीच जाहीर करतो. रोचीन यांनी उत्तराच्या जवळपास उडी मारली. पण ती उडी एकूण परिघावरच होती.
हे पुस्तक श्रीविद्या प्रकाशनाचं आहे. पुस्तक केवळ ताडोबाविषयीचं नाही. त्यात जाता-येता इतर जंगलांचेही उल्लेख येतातच. रेखाटनं अतुलनीच केली आहेत.
गोटीबंद संपादन झालं नाही की काय होतं चांगल्या मजकुराचं याचे काही दाखले या पुस्तकात मिळतात. त्याकडे दुर्लक्ष करूनच मी दोनदा वाचलं आहे.

रोचीन

रोचीन · Wed, 22 Sep 2010 - 06:00

:) मी आधीच जाहिर केल होतं कि मी वाचलेलं नाही त्या मुळे परिघापर्यंत उडी मारता आली हेही खुपच आहे !! पण वर म्हटल्याप्रमाणे त्यनिमित्ताने ज्ञानात भर पडली हेहि नसे थोडके!!!आता धामणकरांची सर्व पुस्तके वाचायला हवीत!:)

सागर

सागर · Wed, 22 Sep 2010 - 07:44

अत्भुत वेचा होता यात शंका नाही.
पुढे काय होते ते पण थोडक्यात दिलेस तर मजा येईल वाचायला.
वेचा सुरेख आहे त्यामुळे पुस्तक नक्की वाचणार मी.
वाचायचे आहे मधे जोडले आहे :)

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Wed, 22 Sep 2010 - 19:00

पुढे जे घडतं ते अगदी जंगलातलं जीवन असतं. त्या मगरीचं घरटं लेखकाच्या सहकाऱ्याला दिसलं असतं. लेखक आणि त्याचा सहकारी तिथं निरिक्षण करीत असतो. मगरीची काही अंडी असतात तिथं. त्यातून पिल्लं बाहेर येण्याचाच तो कालावधी असतो. त्यापैकी असंच एक पिल्लू अंड्यातून बाहेर आलं असतं. मगर त्या पिलाला पाण्यात सोडते, त्याचा अनुभव लेखक घेतो. पुढे काही काळाने तिचे दुसरे पिलू अंडं फोडून बाहेर येते, पण ते एका सर्पगरुडाचं भक्ष्य ठरतं. त्यानंतर या निरिक्षणाचं कथन थांबतं.

सागर

सागर · Wed, 22 Sep 2010 - 19:50 · उत्तर

अरे वा चांगलेच उत्कंठावर्धक दिसते आहे पुस्तक. पुस्तक वाचणारच होतो. पण उत्कंठेमुळे आता जास्त लवकर वाचेन :)

वेदश्री

वेदश्री · गुरुवार, 23 Sep 2010 - 06:44

गेला आठवडा इंटरनेटपासून दूर रहावे लागल्याने वेचा वेळेत वाचता आला नाही. अर्थात वाचला असतातरी उत्तर आले नसतेच पण इतका सुंदर वेचा वेळेत वाचल्याचा आनंद तर मिळाला असता.. पण असो. वेचा सुरेख आहे अगदी. अशी मनापासून भरभरून बोलणारी माणसं भेटली की एक आगळाच आनंद शरीरातून सळसळल्याचा भास होतो. प्रत्यक्ष अनुभवातून तर आनंद मिळतोच पण असे त्याचा आनंद देणारे वाचनदेखील आल्हाददायक वाटते. पुस्तक वाचलेले नाही पण उत्सुकता नक्कीच निर्माण झाली आहे पुस्तक वाचायची.

चर्चा प्रकार