ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ३६

श्रावण मोडक

मजकूर
  • हे पुस्तक प्रसिद्ध आहे. पुस्तक कोणते ते लगेच काही वाचकांच्या ध्यानी येईल. त्यांनी व्यनितून उत्तरे द्यावीत.
  • प्रसिद्ध पुस्तक असूनही उतारा देतोय, कारण हे पुस्तक आणि अशी पुस्तके अधिकाधिक वाचली जावीत हा त्यामागचा हेतू आहे. हेतूच्या संदर्भात योग्य वेचा दिला गेला का, हे प्रतिसादांतून कळेलच. तसा रस निर्माण झाला तर खूप आवडेल.
  • दहा सदस्यांचे प्रतिसाद आले की उत्तर (आणि नेमके उत्तर देणार्‍यांची नावे) जाहीर करेन.

संकेत १: या उतार्‍यातच तीन संकेत आहेत. त्यामुळे ते आत्ता येथे वेगळे देत नाही.
---
त्या काळात कोणाच्या घरात दिवा सापडणे मुश्कील होते. कंदील तर नव्हतेच. क्वचित एखाद्याकडे डबड्याची चिमणी दिसे. नाही तर बाटलीत वात घालून पेटवलेली चिमणी असे. बहुतेक वारली त्यांचे सारे व्यवहार शेकोटीच्या किंवा चुलीतल्या जाळाच्या उजेडात करत. थंडीच्या दिवसांत तीच शेकोटी चांगली पेटवून त्या शेकोटीच्या भोवती उबेत झोपत. खोपटीत कधी कशासाठी उजेडाची आवश्यकता भासलीच, तर एक पेटते लाकूड घेऊन त्या जाळाच्या उजेडाने काय बघायचे ते बघत. जळाऊ लाकडांचा तोटा नव्हता. ती जंगलातून आणीत.
मी रात्री एकाएकी जागी झाले. पाहाते तर विठूची आई माझ्या बाजेच्याच बाजूला पडली होती. तिच्या अंगावरच्या लुगड्याला पदर नव्हता. माझ्या लक्षात आले की, मी पाहिलेल्या बर्‍याच वारली बायकांच्या लुगड्यांना पदर नसत. चौकशी केली तेव्हा काही बायकांनी सांगितले की, त्यांची लुगडी चार वारांची होती. दुसर्‍या काही जणी म्हणाल्या, त्यांची पाच वारांची होती. मला काहीच समजेना. मराठी लुगडे म्हटले म्हणजे नऊ वार, हीच समज माझ्या डोक्यात पक्की बसली होती. एका संध्याकाळी खत्तलवाड गावच्या बाजारात फिरत असताना मी एका दुकानदाराला विचारले, "ही लुगड्याची काय भानगड आहे?" तेव्हा त्याने सांगितले, "काठपदराचे नऊवार लुगडे घेणे बहुतेक वारल्यांना परवडत नाही. दोन्ही बाजूंना काठ असलेल्या लुगडीवजा कापडांचे तागे आम्ही मागवतो. ज्याला जितके वार लुगडे हवे, तितके वार त्या ताग्यांतून फाडून देतो. त्यांना परवडेल त्या मानाने घेतात." ह्या स्पष्टीकरणाची विठूच्या आईला पाहिल्यावर मला आठवण झाली.
मी डहाणू स्टेशनातल्या आगगाडीच्या आवाजाने जागी झाले होते. एका बाजूला घनदाट झाडीचे डोंगर दिसत होते. दुरून आगगाडीचा आवाज ऐकू येत होता. सारे वारली अंगणात अस्ताव्यस्त पडले होते. ती उघडीवाघडी अस्ताव्यस्त पडलेली मुलेमाणसे पाहिली की मनात येई, काय ही परिस्थिती! माणसाने माणसाला कोणत्या अधोगतीला पोहचवले आहे! सगळीकडे निःस्तब्ध शांतता पसरली होती. मला लौकर झोप येईना. ह्या सार्‍या प्रसंगातून काय निष्पन्न होणार? कोणकोणत्या संकटातून जावे लागणार? ह्या गरीब निष्पाप लोकांची परिस्थिती सुधारणार का? हे व असले इतर बरेच प्रश्न मला नेहमीच बेचैन करीत. एकीकडे निरनिराळ्या अनुभवांनी समृद्ध होणार्‍या माझ्या जीवनाचीही मला मजा वाटे.

अभिप्राय

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Wed, 22 Sep 2010 - 17:40

पुस्तक वाचले नाहीए पण या शैलीतला एक धडा होता शाळेत. त्यात आदिवासी पाड्यात त्या समाजसेविकेने अंगणवाडी कशी चालवली याचे वर्णन होते. ती मुले या शहरी लोकांजवळ येत नव्हती, तेव्हा त्यांनी बंद दाराबाहेर मणी आणि सुईदोरे ठेवले, आणि त्या मुलांनी छानशा माळा बनवल्या व हळूहळू त्यांची मैत्री झाली असे काहीसे वर्णन होते तिथे. आणखी एक वेगळा संदर्भ होता तिथे. लेखिकेसाठी हे आदिवासी चहा बनवणार होते, बराच वेळ झाला तरी दूध आणायला गेलेले लोक परतले नाहीत. तेव्हा ते लोक बकरी गवसायला गेले आहेत असे सांगण्यात आले. म्हणजे बकरी शोधायची आणि तिचे दूध काढायचे.

जर हे पुस्तक याच प्रसंगांचे असेल, तर मला वाचायला नक्कीच आवडेल.

सागर

सागर · गुरुवार, 23 Sep 2010 - 15:49

श्रामो,

तुझ्या वेच्याने अगोदरच खूप घुमवले आहे सर्वांना. तेव्हा आता उत्तर देऊन टाक मित्रा :)

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Fri, 24 Sep 2010 - 13:45

गोदावरी परुळेकर, जेंव्हा माणूस जागा होतो..., मौज प्रकाशन.
सागर, रोचीन, दिगम्भा यांनी उत्तराचा अंदाज बरोबर मांडला.

चर्चा प्रकार