- Log in to post comments
हे पुस्तक किती प्रसिद्ध आहे कल्पना नाही. मला ग्रंथालयात दिसताच दोन कारणाने घ्यावेसे वाटले. ती दोन कारणे म्हणजेच पुस्तक ओळखायचे संकेत आहेत:
१. हे पुस्तक भाषांतरीत नाही. ह्या पुस्तक पुण्यातील एका सद्य लेखिकेने लिहिले आहे.
ह्या संकेतावरून श्रावण मोडक यांनी अचुक उत्तर पाठवले आहे. त्यांचे अभिनंदन
२. इतरांसाठी दुसरा संकेतः लेखिकेला समाजकार्याला वारसा घरातूनच मिळाला आहे. तिच्या आधीच्या तीन पिढ्याही समाजसेवेसाठी प्रख्यात आहेत
उत्तरे व्यनी तून कळवावीत
===========
डॉ.युरींच्या चित्रातली रचना याच पद्धतीची होती. पण त्यातले डबे आडवे नाहीत तर उभे ठेवले होते. ते पाहून आम्ही आमची साधी एक तोंडाची चूल घेतली. त्यावर विटा-मातीच्या भिंती बांधून काढल्या. एका बाजूला पूर्ण भरीव भिंत न करता फक्त एक चौकट केली. वरची बाजूही बंद करून त्यात मध्यभागी एक सिमेंटचा पाईप धुरांडं म्हणून बसवला. मग एका डब्यात पाचट भरलं अणि त्याला भोक असलेलं झाकण बसवलं. मग झाकणाची बाजु चुलीकडे असा हा डबा उलटा चुलीवर ठेवला. डबा आत घालण्यासाठी उघडी ठेवलेली चौकट, पत्रा लाऊन बंद केली. मग खाली चुलीत पाचट भरून ते जाळलं. धुरांड्यामुळे चुलीतील गरम हवा डब्याच्या सर्व बाजूनी वर खेचली गेली. डबा सर्व बाजूनी सारखा तापायला यामुळे मदत मिळाली. डब्यातून बाहेर पडणारा ज्वलनशील वायू थेट चुलीतल्या आगीत खेचला गेला. त्यामुळे हा वायूही पूर्णपणे जळून डबा तापवायला लागणारी काही उष्णता या वायूपासून मिळाली. डब्यातून वायू बाहेर यायचा बंद झालेलं दिसलं, की डब्यात कोळसा तयार झाला, असा सोपा ठोकताळ बसवणंही शक्य झालं. या पद्धतीने आम्ही कोळसा बनविण्यासाठी दर किलोग्रॅम कोळशामागे खाली चुलीत जाळाव्या लागणार्या पाचटाचं प्रमाण बरंच कमी करण्यात यश मिळवलं.
एकीकडे प्रयोग चालू असतानाच, पाचटापासून बनलेल्या कोळशाच्या पुडीपासून केकच्या आकाराच्या भोकाभोकांच्या इंधनविटा बनवण्यासाठी महाजनांनी हातानंच वापरायचा एक साचा बनवला होता. मात्र इंधनविटांचा स्वयंपाकघरासाठी फारसा उपयोग नाही हे आमच्या लक्षात आलं. जेव्हा उब मिळवण्यासाठी कोळसा जाळायचा असतो, तेव्हा साधारण दोन तास जळेल इतक्या आकाराची वीट अंगेठीत पेटवून ठेवली की झालं. पण स्वयंपाकासाठी रोज तितकंच इंधन लागेल असं नाही. शिवाय काही वेळा धग जास्त हवी असते तर काहि वेळा कमी. त्यामुळे आम्ही दंडगोलाकार आकाराचा कांडी कोळसा बनवता येईल असा दुसरा, हातानंच चालवायचा साचा बनवला. साधारण १ किलो कोळशाची पुड व १०० ग्रॅ. पिठाची खळ एकत्र करून जरूरीपुरतं पाणी घालून कणकेसारखं मिश्रण करायचं आणि साच्यातून दाब देऊन दंडगोलाकार कांड्या बनवायच्या. त्या उन्हात वाळवल्या की कोळसा तयार झाला.
========
अभिप्राय
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · गुरुवार, 23 Sep 2010 - 07:19
या पुढे वेचा ओळखता आला तरच प्रतिसाद द्यावा असा विचार करतोय. एक पण धड ओळखता येत नाही :-)
रोचीन
रोचीन · गुरुवार, 23 Sep 2010 - 07:50
संकेत आवश्यक आहे!!!
सागर
सागर · गुरुवार, 23 Sep 2010 - 15:47 · उत्तर
संकेत आवश्यक आहे. वेच्यावरुन कळाले नाही.
वैज्ञानिक वाटते आहे. पण बहुतेक वाचलेले नाहिये. संकेत मिळाल्यावर पुन्हा प्रयत्न करेन
वल्ली
वल्ली · Fri, 24 Sep 2010 - 05:09 · उत्तर
सहमत आहे. संकेत हवाच.
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 24 Sep 2010 - 06:13
पहिला संकेत दिला आहे. बाकीचे यथावकाश गरज पडल्यास देईनच
रोचीन
रोचीन · Fri, 24 Sep 2010 - 09:05
>>हे पुस्तक भाषांतरीत नाही. ह्या पुस्तक पुण्यातील एका सद्य लेखिकेने लिहिले आहे
यातून अनेक शक्यता निघू शकतात नाही का?? थोडं जास्त सविस्तर हवं असं नाही का वाटत??
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Fri, 24 Sep 2010 - 13:52
व्यनि केला आहे... :)
ऋषिकेश
ऋषिकेश · Sat, 25 Sep 2010 - 08:00
श्रावण मोडक यांचे उत्तर अचुक आहे!.. अजुन कोणाला उत्तर येतंय का बघुया.. मात्र ह्या कोड्याचे विजेते श्रामो आहेत :)
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Sat, 25 Sep 2010 - 08:19
मी पुस्तक वाचले नाही... आता हे ही प्रत्येक कोड्याच्या धाग्यावर लिहिताना कससंच होऊ लागले आहे.. :(
रोचीन
रोचीन · Sat, 25 Sep 2010 - 13:13
वाचलेले नाही!! :(
दुसर्या संकेतावरून हि काही लक्षात येत नाही!!
सागर
सागर · Sat, 25 Sep 2010 - 17:39
पुस्तक वाचलेले नाहिये. आणि दुसर्या संकेतावरुन काही लक्षात येत नाहिये त्यामुळे पास :(
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 27 Sep 2010 - 04:35
उत्तर दिले आहे.
श्रामोंच्या यशस्वी प्रयत्ना व्यतिरिक्त कोणी प्रयत्नच केला नाही.
थोडे पुस्तकाबद्दलः
महर्षी धोंडो केशव कर्वे यांची पणती, इरावती कर्वे यांची नात, आनंद कर्व्यांची मुलगी डॉ. प्रियदर्शनी कर्वे. यांच्या चुलीवरील प्रयोगाला अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत. त्याच चुलीच्या जडणघडणीची ही कहाणी "उर्जेच्या शोधात" या पुस्तकात आहे. लेखिका व्यावसायिक अथवा सराईत लेखिका नाही हे जरी पुस्तकात जाणवत असले तरी या कामात आलेल्या अडचणी, चुल ह्या छोट्याशा गोष्टीमागे असलेले विज्ञान, आंतराष्ट्रीय / राष्ट्रीय स्वयंसेवक संस्थाना निधी मिळवताना करावी लागणारी सव्यापसव्ये वगैरे गोष्टी व्यवस्थित मांडल्या आहेत.
उसाच्या पाचटापासून कोळसा तयार करून तो चुलीत वापरून डॉ. कर्वे यांनी क्रांतीकारी पाऊल उचलले. यामुळे काहि लक्ष टन फेकल्या अथवा जाळल्या जाणार्या पाचटाचा तर उपयोग झालाच पण एक नवा ग्रामोद्योगही निर्माण झाला.. हा चुलीचा प्रवास लेखिका उर्जेच्या शोधात मधे मांडते. पुस्तक अगदी विकत घेऊन वाचण्यासारखं नसलं तरी मिळाल्यास सोडु नये असं आहे.
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Mon, 27 Sep 2010 - 16:36 · उत्तर
माझं बक्षीस कुठाय? :)
रोचीन
रोचीन · Mon, 27 Sep 2010 - 05:58
कर्वे घराणं असेल अस वाटल होतं पण डॉ.प्रियदर्शनी कर्वे यांच्या बद्द्ल, एकूणच या चौथ्या पिढीबद्दल फारसं काही ऐकिवात नाही. जाई निम्बकरांची मुलगी सुद्धा ग्रामिण भागात काही कार्य करते असे वाचनात आले आहे. गौरी देशपांड्याच्या मुलीचं नुकतंच १ पुस्तक आलंय. बाकी जाणकारांनी प्रकाश टाकावा.
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Mon, 27 Sep 2010 - 10:57 · उत्तर
हो... मलाही या चौथ्या पिढीबद्दल काहीच माहिती नाही.. जाणकारांनी खरेच यावर लिहावे..
सागर
सागर · Mon, 27 Sep 2010 - 16:19
ऋषिकेश,
या पुस्तकाबद्दल ऐकले होते पण वाचले मात्र नव्हते. पुस्तकाचा परिचय कदाचित वाचनात आला असता तर थोडा फार अंदाज बांधता आला असता. अशा विज्ञाननिष्ठ पुस्तकांच्या शोधात मी असतोच त्यामुळे हे पुस्तक वाचायचे आहे या यादीत अॅडवले आहे :)
एका चांगल्या पुस्तकाची माहिती या निमित्ताने करुन दिल्याबद्दल धन्यवाद