- Log in to post comments
१. ही कादंबरी आहे.
२. या कादंबरीचा एका चित्रपटाशी संबंध आहे.
३. लेखक पत्रकार आहेत.
आता यापुढे संकेत देण्यात अर्थ नसल्याने उत्तर जाहीर करतोय. बाकी तपशील खाली आहेतच.
---
पहाटे पाच. मुंबई आता हलके हलके आळसावत झोपेतून जागी होऊ लागली आहे. लोकल्स धावू लागल्या आहेत. डबल-डेकर्सही रस्त्यावरून भयाण आवाज करीत फिरू लागल्या आहेत. सगळी मुंबई अजून जागी झाली नाही. पण हलके हलके जाग येते आहे. लोकल्सची स्टेशनं मात्र पूर्ण जागी झाली आहेत. तिथे आता माणसांची गर्दीही दिसू लागली आहे. वर्तमानपत्रांचे गठ्ठे घेतलेली मुलं, दूधवाले, भाजीवाले, फेरीवाले, रात्रपाळ्यांचे कामगार आणि रात्री फर्स्ट क्लासमध्ये बसायची भीती वाटणारे काही ऑफिसर्स यांची आता लोकलमध्ये धमाल आहे. शहर जागं झालं नसेल. पण दूरच्या उपनगरातली घरं केव्हाच जागी झाली आहेत. नोकर्या करणार्या बायांची अंगधुणी, सैपाक चालू आहेत. पुरूषांच्या दाढ्या, ज्यांच्या ड्यूटीज लवकर आहेत त्यांना भराभर सारं आटोपून तासा दीड तासात, दोन तासात आपली नेमकी गाडी पकडावी लागेल म्हणून त्यांची धावपळ चालू आहे. दुधाच्या गाड्यांचे आवाज येताहेत. लोक बाटल्या घेऊन उठताहेत. मुंबई जागी होते आहे. काळोखाची शाल हळूहळू अलगद बाजूला सारते आहे. पण गिरण्यांच्या, कारखान्यांच्या, बोटींच्या, बसेसच्या चिमण्यांमधून निघालेल्या धुरकट धुक्यात मात्र मुंबई अजून लपेटलेली दिसते आहे. कफ परेड, मरीन ड्राईव्ह, बीच कँडी, शिवाजी पार्क, बँड स्टॅंड, जुहू वगैरे ठिकाणी समुद्राकाठच्या पहाटेची खरी शीतलता आता जागवते आहे. समुद्रावरून गोड मंद वार्याच्या झुळका येताहेत, शरीराला बेहोष कंप आणणार्या, छातीत तुफान उधळविणार्या, रुपेरी स्वप्नांची गाणी गाणार्या, डोके गरगरविणार्या मुलायम वार्याच्या नाजूक, हलक्या पिसासारख्या स्पर्शून जाणार्या झुळका - पण गिरगाव, कुंभारवाडा, नागपाडा, भायखळा, परळ, लालबाग, दादर, कुर्ला, विक्रोळी, अंधेरी आणि अशा इतर दाट वस्त्यांमध्ये मुंबईची तीच धुरकट, मरगळलेली, कोमेजलेली पहाट फुटते आहे. झोपडपट्ट्यातल्या बाया आणि पुरूष वेगवेगळ्या ठिकाणी हाती पाण्यानं भरलेली डबडी घेऊन बसताहेत, रेल्वे रुळांच्या बाजूला मोकळ्या मैदानामध्ये, एकमेकांकडे पाठ करून उभ्या असलेल्या इमारतींच्या मधल्या जागेत, हौसिंग बोर्डाच्या कॉलनीच्या मोकळ्या जागांमध्ये त्यांचे विधी चालू आहेत. लोक पूर्ण उठायच्या आत त्यांना विधी संपवायचे आहेत. आणि आता तर हळूहळू सगळीकडेच जाग येऊ लागली आहे. मुंबई जागी होते आहे.
अभिप्राय
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Tue, 5 Oct 2010 - 15:26
अरुण साधू? की मधुमंगेश कर्णिक?
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 5 Oct 2010 - 16:05
मला तर मुंबईच्या सकाळचं वर्णन वाचलं की "न्हालेल्या जणू गर्भवतीसम" वाले मर्ढेकरच आठवतात.. :)
वाचल्यासारखं वाटतंय पण अंदाज येत नाही.. पुढच्या संकेतापर्यंत पास!
सागर
सागर · Tue, 5 Oct 2010 - 16:11
सुहास शिरवळकरांनी त्यांच्या कित्येक कादंबर्यांतून मुंबई ही अशीच फिरवून आणलेली आहे. त्यामुळे माझ्या डोक्यात मुंबईच्या या माहितीची खिचडी अगोदरच पकलेली आहे ;)
साधारण अंदाज आहे माझा. पण संकेताची गरज वाटते आहे. बहुतेक वाचलेले आहे. पण मुंबईने शेकडो कादंबर्यांना आत्मा दिलेला आहे तेव्हा यावेळी संकेताची गरज वाटते आहे रे श्रामो :)
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Wed, 6 Oct 2010 - 13:59
दुसऱ्या संकेतावरून अदितीने पुस्तक ओळखले आहे.
बाकीच्यांना संधी कायम.
वल्ली
वल्ली · गुरुवार, 7 Oct 2010 - 05:05
व्यनि केला आहे
श्रावण मोडक
श्रावण मोडक · गुरुवार, 7 Oct 2010 - 14:27
वल्ली आणि दिगम्भा यांनी पुस्तक ओळखले आहे.
आता तिसरा संकेत दिला आहे.
ऋषिकेश
ऋषिकेश · गुरुवार, 7 Oct 2010 - 19:39
छ्या!उलट संकेताने अजून गोंधळलो
माझी अंतीम शरणागती
मस्त कलंदर
मस्त कलंदर · गुरुवार, 7 Oct 2010 - 19:52 · उत्तर
मी अकलेचे तारे तोडले नाहीत!!!
सागर
सागर · गुरुवार, 7 Oct 2010 - 19:57 · उत्तर
मी विरोपाने तारे तोडले आहेत ;)
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Fri, 8 Oct 2010 - 13:15
वोक्के!!!! वळिखलं!
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Fri, 8 Oct 2010 - 14:21 · उत्तर
कोणतं? कळव. म्हणजे मग उत्तरच सांगून तुलाच खो देतो.
सागर
सागर · Sat, 9 Oct 2010 - 18:12
हे पुस्तक नाही वाचले त्यामुळे मला याचे उत्तर न आल्याचे मला आश्चर्य नाही. आधी भाऊ पाध्येंचे वाटले होते कारण मुंबईवर सखोल पणे लेखन करणार्या मोजक्या लेखकांपैकी ते एक होते. अर्थात पुस्तकांऐवजी त्यांचे मुबलक लेखन वृत्तपत्रांतून - मासिकांतून व्हायचे.असो.
श्रामो या पुस्तकाबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे विषय काय? कादंबरी किती गाजली आहे. त्यातील सौंदर्यस्थळे कोणती वगैरे... जमले तर नक्की लिही.
अर्थात तुझ्या वेच्यातील पुस्तके मस्तच असतात त्यामुळे सवयीने हे ही पुस्तक मी वाचायचे आहे या यादीत टाकले आहे :)
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Sat, 9 Oct 2010 - 19:53 · उत्तर
फार काही लिहित नाही. पण 'सिंहासन' या चित्रपटाची पटकथा 'सिंहासन' आणि 'मुंबई दिनांक' या दोन कादंबऱ्यांवर आधारलेली आहे. मुंबई दिनांकचा विषय राजकारण, मुंबईचं जीवन, तिथले प्रश्न आणि काठावरून महाराष्ट्र असाही आहे. हे असं सांगणार नाही. सिंहासनची घरची प्रत मिळेनाशी झालीये. ती मिळाली की त्यावर लिहिणार आहे. तेव्हाच कदाचित मुंबई दिनांकवरही लिहीन. दरम्यान, तू ती वाचून घे आणि लिहीदेखील.
मेघना, कुठं आहेस? खोSSS
सागर
सागर · Sat, 9 Oct 2010 - 20:08 · उत्तर
श्रामो,
सिंहासन पाहिला आहे त्यामुळे थोडीशी कल्पना आली आहे. त्यामुळे ही दोन्ही पुस्तके मिळवून वाचतो आता. :)
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Mon, 11 Oct 2010 - 05:31
मी गेस केलेले असताना सुद्धा मला जाहिर विजेता घोषित ने केलेल्या मोडकांचा निषेध
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Mon, 11 Oct 2010 - 09:53 · उत्तर
अर्रे... तू गेस केलं होतंस? बरं. तूही विजेता. बक्षीस मागायचं नाही मात्र. ;)
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Mon, 11 Oct 2010 - 10:06 · उत्तर
घ्या आता आम्ही टाकलेल्या खरडी तुम्ही उडवता आणि..
असो बक्षिस मागणार नाहीच
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 11 Oct 2010 - 07:59
+१
एकदा "ऐक मुंबई तुझी कहाणी" वाटलं होतं .. पण त्याचा बाज आणि द्वितीय पुरूषी एकवचनातली काहि व वर्नमानकाळातली काहि अश्या पद्धतीची वाक्ये इथे दिसली नाहित.. बरं झालं गेस नाही केला :)
सागर
सागर · Mon, 11 Oct 2010 - 09:37 · उत्तर
हो ना ऋ,
वाचले नसताना गेस्टीक्युलेशन करण्याने गोंधळच होतो ;)