- Log in to post comments
या धाग्यावरील लेखकाच्या मानधनाची चर्चा इथे हलवली आहे.
मदतनीस
"नार्या, आज तोंड शिवल्यागत तुजं नुस्तं 'हूं'च चाललंय मघापास्नं. म्याडबेन्यागत मीच भका लागलोय. बेट्या, घडाघडा बोल तर की, का त्येलाबी पैसे बसत्यात?"
"काय बोलायचं बाबूमा?"
"रांडच्या, आसा भागुबाईगत इवळू नकोस. नोकरी का सोडलास ही सांग बघू?"
"सोडलो म्हंजे पगार पुरवडंना. ही असली म्हागाई. साठ रुपड्यानं काय कात हुणार? आनि दुसर्या ड्रायव्हरांगत पेट्रोल इक, टायर्या इक, स्पेअर पार्ट इक, मेस्री लोकांची खोटी बिलं दावून पैसे दाब, आसं करून साठाचा एकशेसाठ पगार पाडणारा मी तरी ड्रायव्हर नव्हं! आपुन लागलं तर मागून घिऊ. खरं चोरी करून प्वॉट जाळणार न्हाई."
"मग बालीष्टराची एक नोकरी हाय, करतोस?"
"काय बाबूमा, थट्टा करतोस गरिबाची."
"आता जास्त पगाराची नि चांगली नोकरी म्हंजे बालीष्टराचीच हुडकाय पायजे."
"थट्टंचं बोलणं सोड. तुज्याकडे तशी चांगली नोकरी आढळात असली तर सांग."
"तशी हाय नोकरी एक, खरं बालीष्टराची मतोर न्हाई बाबा!"
"पुन्हा थट्टा गरिबाची..."
"थट्टा न्हाई-खरंच नोकरी हाय एक ट्रकवर. करणार?"
"करतो की."
"खरं नोकरी ड्रायव्हरची मतोर न्हाई हं. किन्नरची हाय. चालंल न्हवं?"
"न चालाय काय झालं? आनि ट्रकवर एकदम ड्रायव्हर व्हाय कुठल्या सुक्काळीच्याजवळ हेवी लायसन हाय. माजं आपलं सादं टोरिग लायसन हाय. हेवी लायसन मिळूपतोर किन्नरकीच कराय पायजे बाबूमा."
"बरं, सांचं ये तर... मालकाशी गाठ घालून देतो. खरं एक लक्षात ठेव. मागनं मी शेटजीच्यात जाऊन चौकशी करणार हं-का त्येनं नोकरी सोडला म्हणून. काही लफडं असलं तर आत्ताच सांग."
"तसं कायबी लफडं न्हाई घे गा!"
"ते न्हाई म्हणत मी, आधी ईच्यारल्यालं बरं आसतंय. मागनं काय हुतंय म्हाईत हाय, गाठ घालून दिल्याला माणूस बरा निघाला तर बरं, न्हाईतर उद्या मालक बोंबडी मारत आलाच.. काय हो मेस्री, कसला क्लीन्नर गाठ घालून दिला तुम्ही! अहो, त्यानं असं... असं केलं. आनि आपली बोंबबाज्या बाराखडी त्यो सांगत बसणार! त्यापेक्षा आताच सगळं पस्ट झाल्यालं बरं. व्हय का न्हवं?"
"व्हय, तुजंबी बरोबर हाय."
"मग चौकशी करू न्हवं शेटजीच्यात?"
"बेशक कर, कर न्हाई त्येला डर कसली?"
एवढ्यात कोणीसा ड्रायव्हर बाबूचा शोध घेत हॉटेलात आला. म्हणाला,"काय मेस्री, हितं येऊन बसला व्हय गप्पा हाणीत. आनि तितं काम कोण करायची? सांजला मालकाचा तंबाखू भरायचा हाय. न्हाय तर परमीट कानसल हुतंय. त्येची मुदत सांजपतोर हाय! चला, चला!"
आणि मग बाबूचं व नारायणचं बोलणं तेवढ्यावरच कटलं होतं.
निरोप घेताना बाबूनं आवर्जून सांगत येण्याबद्दल पुन्हा एकदा सांगितलं होतं, नि त्यावर नारायणनंही मान डोलावली होती.
संकेत १: ही एक लोकप्रिय ठरलेली ग्रामीण कादंबरी आहे.
संकेत २: ही कादंबरी आधी 'मेनका' मध्ये क्रमशः प्रसिद्ध झाली आणि मग लगेच पुस्तकरूपाने पहिली आवृत्ती १९६८ मध्ये निघाली होती. खास वाचकांच्या आग्रहास्तव ही कादंबरी ८८ साली 'जत्रा'मधून पुन्हा एकदा क्रमशः प्रसिद्ध केली गेली होती.
संकेत ३: या कादंबरीने निश्चितच राज्यपुरस्कार पटकावला असता असे काही तत्कालीन साहित्यिकांनी म्हटले होते परंतु लेखकाला अथवा मूळ प्रकाशकालाही राज्यपुरस्कार स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपली पुस्तके केव्हा आणि कुठे पाठवायची असतात हे माहिती नव्हते.
कोडे बरोबर उकलवणारा पहिला वाचकः श्रावण मोडक
कोडे बरोबर उकलवणारा दुसरा वाचकः इंद्रराज पवार
अभिप्राय
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 19 Oct 2010 - 19:22
पुस्तक वाचलेले नाहि हे नक्की.. शैलीही ओळखु येत नाहिये.. त्यामुळे संकेत मिळेपर्यंत पास
वल्ली
वल्ली · Wed, 20 Oct 2010 - 05:20 · उत्तर
संकेत हवाच.
दिगम्भा
दिगम्भा · Wed, 20 Oct 2010 - 07:35
अथपासून इतिपर्यंत हा आमच्या खास कोल्लापुरी भाषेतील आविष्कार आहे.
बाबूमा;
रांडच्या, आसा भागुबाईगत इवळू नकोस;
बोल तर की;
नोकरी का सोडलास;
(मराठीतील नेहमीच्या भावे प्रयोगाऐवजी कन्नड पद्धतीचा कर्तरी भूतकाळ - तो आंघुळ केला वगैरे)
खरं;
("खरं" या शब्दाचा अचूक उच्चार व वापर खरं तर एक स्वतंत्र स्फुट लिहिण्याच्या योग्यतेचा आहे.पण या वेच्यातला त्याचा दोन्हीवेळचा वापर हेही त्याचे चांगले उदाहरण आहे.)
किन्नर;
शेटजीच्यात जाऊन;
सांचं;
आढळात;
अचूक टंकन केल्याबद्दल वेदश्रीचे अभिनंदन.
पण ३ संकेत देऊनदेखील उत्तर समजले नाही हे मात्र मान्य करावे लागेल (शंकर पाटील असावेत काय?)
- दिगम्भा
वेदश्री
वेदश्री · Wed, 20 Oct 2010 - 07:51 · उत्तर
शंकर पाटील नाहीत. निपाणीच्या लेखकाने अस्सल कोल्लापुरीत लिवलीय कादंबरी! :) अत्यंत ओघवती, अस्सल, चित्रदर्शी आणि म्हणूनच तपशिलात लिहिलेले जीवनानुभव जास्त धगधगीत ठरवणारी ही कादंबरी एका रात्रीत वाचून काढली मी! संवादांवर तर लट्टूच झालेय मी फुल्टू.
अशी कोडी लिहायला जशास-तसे टंकनच तर महत्त्वाचे. ते जमल्याची पावती दिल्याबद्दल धन्यवाद, दिगम्भा.
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Wed, 20 Oct 2010 - 10:29 · उत्तर
दिगम्भांनी लेखक ओळखला असेलच. पुस्तकही ते ओळखू शकतात नक्की.
वेदश्री
वेदश्री · Wed, 20 Oct 2010 - 10:58 · उत्तर
उत्तर फोडशील तर याद राख. कशाला झोपलेल्या सिंहाला जागं करतोयस? ;-)
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Wed, 20 Oct 2010 - 09:27
लेखक ओळखला आहे. व्यनि केला आहे.
वेदश्री
वेदश्री · Wed, 20 Oct 2010 - 09:39 · उत्तर
तू तो छा गया रे भिडू! पहिल्या व्यनित बरोब्बर लेखक (चुकीच्या पुस्तकासोबत) आणि दुसर्या व्यनित बरोब्बर पुस्तक ओळखलंयस. लगे रहो! दोन चान्समध्ये हे पुस्तक ओळखणे खरोखरच अशक्य आहे हा माझा विश्वास चक्काचूर झालेला पाहून खूप आनंद झाला.
सागर
सागर · Wed, 20 Oct 2010 - 10:22
छान वेचा आहे. एका जुन्या पुस्तकाची नव्याने ओळख होणार असे दिसतेय.
पुस्तक १००% वाचलेले नाहिये त्यामुळे माझा पास.
उत्तराची उत्सुकतेने वाट बघत आहे :)
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 20 Oct 2010 - 10:24
संकेतावरून लेखकाचा अंदाज वर्तवला आहे.. बरोबर आहे का?
वेदश्री
वेदश्री · Wed, 20 Oct 2010 - 10:56 · उत्तर
नाही. अंदाज चुक्या. :(
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Wed, 20 Oct 2010 - 11:10
हे पुस्तक किंवा या लेखकाचे इतर काही लेखन वाचले नसेल इथं कोणीही, तर त्याने/तिने चाळणीत पाणी घालून जीव द्यावा. ;)
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 20 Oct 2010 - 11:11
अहो वेदश्री बाई..... मी आत्ताच हा धागा पाहिला....
मी ओळखली आहे ती कादंबरी.....लेखक नुसता माहित नाही तर त्याच्यासमवेत चहाची फक्कडशी बैठकही झाली आहे.
पण उत्तर कुठे पाठवायचे असते? मी इथे नवा आहे, म्हणून विचारतो....
(ज्या श्रावण मोडक यांनी कादंबरी ओळखली आहे, त्यांनाही माहित आहे माझे "त्या" लेखकाशी असलेली ओळख.)
मला अजून सदस्यांशी 'व्य.संदेश' ची सुविधा नाही.
का इथेच लिहू ?
इन्द्रा
वेदश्री
वेदश्री · Wed, 20 Oct 2010 - 11:15 · उत्तर
लिहा हो इथेच बिनधास्त.. तुमच्या इन्द्रा-स्टाईलमध्ये! :-)
स्वगतः माझ्या विश्वासाची पार चाळण करून टाकली या सगळ्या सिहांनी मिळून. नेमके आहेत किती सिंह या पुविवर? :(
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 20 Oct 2010 - 11:44
ठीक आहे...इथेच उत्तर देतो...
कादंबरी : "एकोणीसावी जात"
लेखक : आमच्या निपाणीचा साधासुधा पिठाची गिरणीत काम करणारा ~ महादेव मोरे.
कादंबरीचा बाज किती अस्सल आणि सीमाभागातील एका निमशहरी गावातील जीवनशैली दाखविणारा असल्याने प्रकाशित झाली त्यावेळी नक्कीच चर्चेचा विषय बनली होती. श्री.महादेव मोरे हा दोनचार बुके शिकलेला, बुजरा माणूस, तो वर उल्लेख केल्यारितीने निपाणीच्या एस.टी.स्टॅण्ड्वर समानधर्मीयांसमवेत अड्डा जमवून बसत असतानाच्या त्याच्या आठवणी ज्या शब्दबद्ध करण्यासाठी तिथल्याच काही मराठी लोकांनी त्याना उद्युक्त केले...त्यातून निर्माण झाली ही अस्सल कथा.
आपण मराठीत 'च्यामारी...आपल्याकडं अठरापगड जाती..." असे उच्चारतो. श्री.मोरे यांच्या मते 'ट्रक ड्रायव्हर' ही एकोणीसावी जात.
इन्द्रा
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Wed, 20 Oct 2010 - 17:44 · उत्तर
निपाणी एसटीस्टँडचा अड्डा हा भारीच प्रकार होता त्या काळात. म्हणजे हे मी ऐकलं आहे. एकोणीसावी जात याविषयीचे स्पष्टीकरणही अगदी बिनचूक.
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 20 Oct 2010 - 11:49
हाफीसात चाळणी नसल्याने घरी जाऊ जीव द्यावा लागेल :(
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 20 Oct 2010 - 12:21 · उत्तर
This comment has been moved here.
नंदन
नंदन · Wed, 20 Oct 2010 - 15:07
निपाणीच्या संकेतावरून महादेव मोरे वाटले होते, पण खात्री नव्हती. एकोणिसावी जात वाचलं नाहीय, पण यादीत भर घातली आहे. बाकी इंद्रा जे कॉपीराईटबद्दल म्हणतोय ते बरोबर आहे. कुसुमाग्रजांचं सहृदय मृत्युपत्र (ज्यात त्यांनी गडी-नोकरांपासून ते आर्थिक आधार नसणार्या जवळच्या नातेवाइकांपर्यंत सगळ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न केला होता.) लोकसत्तेत प्रसिद्ध झाल्याचं आठवतं. त्यात त्यांच्या सगळ्या नाटकांची आणि कवितासंग्रहांची रॉयल्टी चार हजार होती.
किंचित अवांतर - अगदी व्यवहारदक्ष असणार्या सुनीताबाईंनाही 'आहे मनोहर तरी'च्या प्रत्येक प्रतीमागे पंधरा रूपये रॉयल्टी मिळे. पंधरा-एक वर्षांत दहा हजार प्रती विकल्या गेल्या (हा एक मोठा विक्रमच), त्याचे जमा झालेले दीड लाख रूपये त्यांनी देणगी म्हणून एका संस्थेला दिले हा भाग वेगळा. पण अगदी गाजलेल्या पुस्तकातूनही लेखकाला वार्षिक फक्त दहा हजार रूपये मिळकत होते, ही बाब लक्षात घेण्याजोगी.
सागर
सागर · Wed, 20 Oct 2010 - 15:25 · उत्तर
विदेशात केवळ लेखनाद्वारे लेखक करोडो डॉलर्स कमावू शकतो ते चित्र आपल्या देशात दिसणे अशक्यच दिसते आहे
जे.के.रोलिंग एके काळी अक्षरशः रस्त्यावर होती, आता तिची संपत्ती म्हणे ब्रिटनच्या महाराणीपेक्षा जास्त आहे.
अर्थात तिकडेही आपल्यासारखी पायमल्ली होतही असेल. पण प्रमाण नक्कीच कमी असेल.
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Wed, 20 Oct 2010 - 20:49
दिगम्भांचे निरिक्षण एकदम अचूक. ते वाचल्यानंतर माझ्या नजरेसमोर एकच नांव आले:महादेव मोरे. त्यांचे हे पुस्तक मी वाचलेले नाही. पण कित्येक वर्षे पुढारीच्या बहार पुरवणीत त्यांची लखमाला यायची. सर्व्हिस मोटारचा, गॅरेजचा, पिठाच्या गिरणीचा असे वेगवेगळे व्यवसाय त्यांच्या लेखनातून असायचे. भाषाही त्याच परिसरातली. आधी मला ती अशी का(कर्तरी प्रयोग) असा प्रश्न असायचा, नंतर इंजिनिअरिंगला इचलकरंजी-गडहिंगलज-निपाणी भागातल्या मुलींशी बोलताना कळाले, की अशीही एक बोलीभाषा आहे..
मोरेंची लेखनशै माहिती आहेच. त्यामुळे पुस्तक वाचणेबल असणारच याची खात्री आहे.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · गुरुवार, 21 Oct 2010 - 07:29 · उत्तर
"....दिगम्भांचे निरिक्षण एकदम अचूक...!"
~ ओये मकीबाबा....श्री.दिगम्भांचे निरिक्षण अचूक आहे हे तुला दिसलं (आणि ते आहेच...)....पण ज्यांनी ते पुस्तक ओळखले, लेखक ओळखला, घाम गाळून गाळून त्याच्याबद्दल इतकं इतकं लिहिलं, त्यांच्याबद्दल एखादी ओळ तुझ्या बोटातून इथे कशी काय उमटली नाही?
"शिंगरू मेलं हेलपाट्यांनं...." इथं
इन्द्रा
दिगम्भा
दिगम्भा · गुरुवार, 21 Oct 2010 - 09:56 · उत्तर
मला कोडे सुटले नाही, तेव्हा मी या चर्चेतून अंग काढून घेतले असे समजावे.
ज्यांनी सोडवले ते खरे श्रेयदार आहेत.
माझी "सपशेल माघार"!
- दिगम्भा
यशोधरा
यशोधरा · गुरुवार, 21 Oct 2010 - 10:13
चांगली चर्चा.
>>त्यांच्याबद्दल एखादी ओळ>> पुस्तकांबद्दल वा त्या अनुषगांनेच चर्चा चालू ठेवावी ही विनंती आहे. पुस्तकांविषयीचे संस्थळ म्हणून ह्या संस्थळाविषयी खूप आपुलकी आहे, ती कमी व्हावी, असे होऊ नये ही सरस्वतीचरणी प्रार्थना.
श्रावण मोडक
श्रावण मोडक · गुरुवार, 21 Oct 2010 - 14:10
इंद्राचे येथील इनपुट्स पाहता, याचा एक स्वतंत्र धागा का करीत नाही? संपादकांपैकी कोणीही हे सारे प्रकाशनविषयासंबंधातील प्रतिसाद उचलून एक स्वतंत्र धागा सुरू करावा. तेथे चारेक ओळींचे एक प्रास्ताविक द्यावे. तेथे हा धागा पुढे नेऊया. अनुवाद, प्रकाशन याविषयी मीही थोडे काही इथे लिहू शकतो. धागा स्वतंत्र झाला तर उत्तम.
वेदश्री
वेदश्री · गुरुवार, 21 Oct 2010 - 14:19 · उत्तर
सहमत.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · गुरुवार, 21 Oct 2010 - 14:31 · उत्तर
श्री.श्रा.मो. आणि वेदश्री यांच्याशी सहमत....
मलाही मान्य आहे. [खरंच स्वतंत्र धाग्याचे रूप देता येईल].... पण हे आता संपादक मंडळाने ठरवावे. स्वतंत्र धागा होणार नसेल तर तसे इथेच सांगितले तरी हरकत नाही....म्हणजे वरच्या काही ताज्या प्रतिसादांना अनुसरून हा धागा इथूनच पुढे नेता येईल.
इन्द्रा
सागर
सागर · गुरुवार, 21 Oct 2010 - 14:35 · उत्तर
तसेही दोन पानांवर ही चर्चा गेल्यामुळे नवीन चर्चा वाचकांना दिसत नाहीच. शोधून पहावे लागते आहे की नवीन काय अपडेट झाले आहे ते. तेव्हा नवीन चर्चा सुरु करणे जास्त योग्य राहील. संपादक मंडळी या धाग्याची चर्चा तिथे हलवू शकतील की नाही शंका आहे.
संपादक मंडळाने योग्य तो मार्ग लवकर सुचवावा ही विनंती. कारण खूप महत्त्वाची चर्चा आहे ही, इंद्रराज खूप मोलाची माहिती देत आहेत. तेव्हा तत्पर मदतीची अपेक्षा आहे