ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ४५

सागर

मजकूर

*** आधीच एक स्पष्ट करु इच्छितो की हे पुस्तक कमी जणांनी वाचले असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे दुसरा वेचा या वेच्याबरोबर कोणी दिला तर ते चांगलेच ठरेल. कारण हा वेचा उत्तर मिळेपर्यंत किंवा किमान २-३ दिवस ठेवण्याचा विचार आहे.
***

श्रामो, इंद्रराज, दिगम्भा यांसारख्या दिग्गज वाचकांकडून उत्तराची अपेक्षा आहेच. पण या विषयात रस असणार्‍याला नक्की हे पुस्तक ओळखता यावे.

संकेतः या विषयावर पुस्तके मुळातच खूप कमी आहेत. पण वाचले असेल तर नक्की ओळखता येईल. तेव्हा जास्त संकेताची आवश्यकता पडणार नाही. हा एकच संकेत कदाचित पुरेसा ठरेल :)

पहिला संकेतः या पुस्तकातील क्लायमॅक्स बद्दल ऋग्वेदात काही ठिकाणी उल्लेख आलेले आहेत.

दुसरा संकेतः रामायण आणि महाभारतकालचे युद्ध आपण सर्वजण महासंग्राम म्हणून ओळखतो. पण हे युद्ध भारतीय इतिहासातील त्याही आधीचे पहिले खरेखुरे मोठे युद्ध म्हणता येईल. आता लक्षात यायला हरकत नाही :)

दिगम्भा यांनी गूगलबाबाच्या मदतीने ओळखले आहे
रामायण महाभारतापेक्षाही प्राचीन असे हे दाशराज्ञ युद्ध म्हणून ओळखले जाते. यातील मुख्य नायक आहेत ते अतिथिग्व दिवोदास आणि आर्यपुत्र सुदास. या पितापुत्रांनी चायमान या आक्रमकाला मोठा धडा शिकवला आणि या सप्तसिंधूस्थित आर्यभूमि भारताचे रक्षण केले. ऋग्वेदातही याचे उल्लेख आलेले आहेत. मुळात विश्वामित्र आणि वसिष्ठ या दोन राजपुरोहितांमधील कलहामुळे या युद्धास तोंड फुटले होते. पण दुर्दैवाने या महान घटनेची हवी तितकी प्रसिद्धी झालेली नाही. केवळ अभ्यासू वाचकालाच दाशराज्ञ युद्ध माहिती असेल. रामायण - महाभारत यासारखे ये युद्ध घराघरात माहिती नाही झाले. पण वैदिक कालीन युद्ध म्हणून दाशराज्ञ युद्धाची महती थोर आहेच यात शंका नाही :)

या ब्लॉग वर या युद्धाची संक्षिप्त पण चांगली माहिती मला मिळाली. जिज्ञासूंनी ती अवश्य वाचावी.

वेच्याचे उत्तरः
पुस्तकाचे नाव : दाशराज्ञ युद्ध
लेखक : अशोक व्हटकर
वेच्याचे पुस्तकातील स्थान : पान क्रमांक ८२-८३

वेचा:
============================
'मला धोका आहे? सिंह राशीकडून?' चायमान घाबरुन ओरडला, 'ताबडतोब सिंह राशीच्या देवतेच्या शांतीसाठी यज्ञ करा. राजपुरोहित भारद्वाज, हे गुरुदेव, मला वाचवा! त्वरित यज्ञ करा.' घाबरलेल्या सम्राटाने देवाच्या कोपाच्या भीतीने थयथयाट चालू केला.

भारद्वाजाने झटपट आपल्या हातातील दंड भूमिवर ठेवून एक गोल आकृती दंड स्वतःभोवती फिरवून आखली. 'पहा' तो ओरडला. त्याने वेगाने आपल्या आसनाजवळ जाऊन तिथले दोन दंड आणले. एक हातात धरुन त्याने काही मंत्र पुटपुटत तो दंड खाली टाकला. त्याबरोबर तो लांब आकाराचा दंड वळवळू लागला आणि त्या काठीचा पाहता पाहता सर्प झाला.

'जादू!' भित्रा चायमान ओरडला, काठीचा नाग झाला...जादू!'
'पहा दुसरी जादू!' भारद्वाज आवाज चढवून बोलला. त्याने पहाता पहाता दुसरा दंड एखाद्या भल्यामोठ्या कागदाची सुरळी उघडावी आणि मोठा पट दाखवावा त्याप्रमाणे त्याने त्या दंडातून एक कापडी पटच चायमानापुढे उलगडला. 'पहा, माझ्या म्हणण्याची सत्यता पहा... ह्यावर कशाचे चिन्ह आहे?' त्याने पट-कपडा सर्वांसमोर दाखवत विचारले.
'तो सिंह आहे. हे गुरुदेवा... माझ्या पुरोहिता... विलक्षण जादू! पण...' चायमान भयाने किंचाळला, 'हा काय प्रकार आहे? सिंह राशीच्या देवाने माझ्यावर क्रोध का करावा? त्याला प्रसन्न करण्यासाठी काहीही करीन. त्याला नरबळी हवेत का?
हा माझा सर्प झालेला दंड ह्या राजधानीचे आणि माझ्या मंत्रसामर्थ्याचे रक्षण करतो. हाच सर्प तुझाही रक्षक आहे. चायमान! हा जोपर्यंत निर्मय आहे तोवर तू निर्भय आहेस. पण पहा!' चायमानची भयाने बडबड चाललेली असताना अधिक उंच स्वरात भारद्वाज बोलत होता. भारद्वाजाने त्या वर्तुळात वळवळणार्‍या सर्पाच्या अंगावर ते पटवस्त्र टाकताच तो सर्प एकदम भिऊन सैरावैरा धावू लागला. अंगाला झटके देत फुत्कार टकीत तो त्या वस्त्रा आडून बाहेर आला.
=============================

अभिप्राय

ऋषिकेश

ऋषिकेश · गुरुवार, 21 Oct 2010 - 05:28

पास!
सिंह रास वगैरे वाचून पकाकाका कदाचित उत्तर देऊ शकतीलसे वाटले ;)

वल्ली

वल्ली · गुरुवार, 21 Oct 2010 - 05:50

नारायण धारपांचे कुठले तरी एखादे पुस्तक असू शकेल असे वाटतेय.

३_१४ अदिती

३_१४ अदिती · गुरुवार, 21 Oct 2010 - 06:47

फायफाय ('सायफाय'चं विडंबन आहे हे!) गोष्ट दिसते ... पास!

सागर

सागर · गुरुवार, 21 Oct 2010 - 08:01

हे पुस्तक किती प्रसिद्ध आहे हे माहिती नाही. पण पहिले ४ प्रतिसाद पाहून माझा अंदाज बरोबर होता याची खात्री पटते आहे :)

नारायण धारप नाहीत

वल्ली

वल्ली · गुरुवार, 21 Oct 2010 - 10:18

>>पहिला संकेतः या पुस्तकातील क्लायमॅक्स बद्दल ऋग्वेदात काही ठिकाणी उल्लेख आलेले आहेत

नक्की काय? या पुस्तकातील क्लायमॅक्स बद्दल ऋग्वेदात काही ठिकाणी उल्लेख आलेले आहेत का ऋग्वेदातील/ ऋग्वेदाबद्दल काही उल्लेख ह्या पुस्तकाच्या क्लायमॅक्समध्ये आलेले आहेत. :)

सागर

सागर · गुरुवार, 21 Oct 2010 - 10:22 · उत्तर

हा हा हा... ते ही खरेच

शब्द बदलून पुन्हा लिहितो...

ऋग्वेदातील काही ठिकाणी या कथानकातील मुख्य घटनेचे तुटक तुटक उल्लेख आहेत, त्यांचा आधार घेऊनच हे पुस्तक लेखकाने लिहिले आहे. :)

माझ्या आधीच्या प्रतिसादावरुन ऋग्वेदापेक्षा माझे पुस्तक पुरातन होते असा भास होतो आहे ;)

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · गुरुवार, 21 Oct 2010 - 11:40

मी हे पुस्तक वाचलेले नाही हे त्या पात्रांच्या नावानीच समजून चुकलो होतो. तरीही माझ्या स्थानिक मित्रपरिवारात (साहित्याची आवड असणारे...) चर्चा करणारच आहे....पाहू या कुणाच्या हाती हे आले होते का.

बाकी "लाठीचा साप होणे...." हा प्रकार मी "टेन कमांडमेंटस" या चित्रपटात चार्लटन हेस्टनसमवेत असलेला त्याचा सहकारी करत असलेला पाहिली आहे....ज्याला प्रत्युत्तर म्हणून राजाचे दोन पुरोहित आपल्याकडील दंडाचे सापात रुपांतर करतात...वगैरे.

इन्द्रा

सागर

सागर · गुरुवार, 21 Oct 2010 - 12:52 · उत्तर

पुस्तक खूप सुंदर आहे असे मी म्हणणार नाही. पण वाचनीय नक्कीच आहे. आणि ज्या गाभ्यावर हे कथानक आहे त्या घटनेचे भारताच्या इतिहासात असलेले महत्त्व अद्वितीय आहे हे नक्की. आणि माझ्या माहितीत या महत्त्वाच्या गोष्टीवर आधारीत असे हे एकमेव पुस्तक आहे.

म्हणूनच हे पुस्तक वेच्याच्या रुपाने वाचकांसमोर आणावेसे मला वाटले.

मी माझ्या लहानपणी हा चित्रपट पाहिला होता तेव्हा टेन कमांडमेंट्स मधले सगळेच अत्भुत वाटले होते :)

कैवल्य

कैवल्य · गुरुवार, 21 Oct 2010 - 13:08 · उत्तर

शशी भागवतांचं कोणतं आहे का रे?
(अर्थातच हवेत बाण मारतोय. वाचलेलं नाही.)

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Fri, 22 Oct 2010 - 12:00 · उत्तर

वाचले नव्हते. त्यामुळं पासशिवाय पर्याय नव्हता. :(

सागर

सागर · Fri, 22 Oct 2010 - 12:17 · उत्तर

श्रामो असे होऊ शकतेच की एखादे चांगले पुस्तक वाचायचे राहून जाते.

ऋग्वेदकालीन घटनांवर आधारित साहित्य वाचणार्‍या वाचकांना हा विषय नवा नसणारच असे गृहीत धरुन अपेक्षा केली होती की तू वाचले असावेस हे पुस्तक :)

दाशराज्ञ युद्धाविषयी वाचकांना अधिक माहिती व्हावी हाच हेतू हा वेचा देण्यामागे होता. तेव्हा आता यात रस असणार्‍या वाचकांना यानिमित्ताने एक नवीन पुस्तक कळाले याचेच समाधान. :)

वल्ली

वल्ली · Fri, 22 Oct 2010 - 05:13

परशुराम - सहस्त्रार्जुन युद्धावर आधारीत पुस्तक आहे असे वाटतेय. कारण रामायण, महाभारत युद्धाआधी तेच सर्वात मोठे भारतीय इतिहासातील मानवीय युद्ध होते. पण त्याला युद्ध तरी कसे म्हणणार कारण एक विरुद्ध अनेक असाच सामना होता तो. बाकी युद्धे देव-दानवांच्यात झाली असे पुराणात आहे.
उत्सुकता खूप ताणलीत तुम्ही. आता सांगूनच टाका ना राव, सागरराव. ;)

चर्चा प्रकार