ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ४८

सागर

मजकूर

हा वेचा देताना दिगम्भा यांनी जैत रे जैत वेच्यावेळी दिलेले निकष पाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे :)

आपण पुस्तक वाचतो व नंतर विसरूनही जातो, निदान बारीकसारीक तपशील तरी. तरीसुद्धा -
१. वेचा वाचल्यावर ज्याने ते पुस्तक वाचले आहे त्याला क्षणार्धात आठवण/बोध झाला पाहिजे
२. वेचा असा हवा की त्यात त्या कलाकृतीचे मर्म पकडले गेले पाहिजे
३. वेचा असा हवा की त्याच्या एकमेवाद्वितीय उतराकडे अप्रत्यक्ष का होईना त्याने निर्देश केला पाहिजे
४. ज्याने पुस्तक वाचलेले नाही त्यालासुद्धा त्यावरून विचारांती अंदाज बांधणे शक्य झाले पाहिजे
५. आणि इतके असूनही उत्तर सोपे व कोणीही ओळखावे असे असता कामा नये.]

संकेत पहिला : ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे
संकेत दुसरा: प्रस्तुत लेखक त्यांच्या काळी चतुरस्त्र लेखन करीत असले तरी ऐतिहासिक कादंबर्‍या लिहिण्यात यांचा हातखंडा होता. (लेखक आहेत हरि नारायण आपटे)
संकेत तिसरा: वेचा अद्ययावत केला आहे. वाढवलेला शब्द ठळक केला आहे. त्यावरुन आता लक्षात यावे
शेवटचा संकेत : वर लेखकाचे नाव दिले आहे. आणि पुढील कथासारामुळे कादंबरी कळण्यास अडचण नसावी.:)

प्रस्तुत वेच्यात या कादंबरीतील महत्त्वाचा प्रसंग आलेला आहे. विजयनगर साम्राज्याचा र्‍हास संपूर्णपणे या कथानकाभोवती गुंफला आहे. एका मुसलमान स्त्री पायी रामराजाच्या पदरी असलेल्या दोन मुसलमान सरदारांची फितुरी विजयनगरच्या साम्राज्याचा र्‍हास होण्यास कारणीभूत ठरली अशी ही कथा आहे.

*** वेच्याचे उत्तर सर्वप्रथम श्रामो (श्रावण मोडक) आणि नंतर इंद्रराज यांनी ओळखले आहे .. दोघांचेही अभिनंदन :) ***

वेचा:
============================

रणमस्तखान आपल्या मातुश्रींच्या समक्ष प्रतिज्ञा करुन निघाला तो आपल्या जागी आला. त्याला एक प्रकारे फारच चेव आल्यासारखे झाले होते. त्या चेवाच्या भरात त्याच्या मनास असे वाटले की, आता आपण रामराजाकडे याच पावली जाऊन झालेली हकीकत सांगावी आणि यासंबंधाचा ताबडतोब बंदोबस्त झालाच पाहिजे असे बजावावे. म्हणजे तो आपली माणसे पाठवून त्या मुलीला लवकर इकडे आणवून सोडून देईल. आपण जरबीने दोन शब्द सांगितले असता काय होणार नाही? तरुण वय, अंगात जबर धमक, आणि विजापूरच्या बादशहाचे वकील- तेव्हा जे म्हणू त्याप्रमाणे रामराजाने केलेच पाहिजे आणि तो करीलही असा भरवसा आणि आपण आल्याबरोबर मुसलमानी राज्यातल्या एका स्त्रीला संकटातून सोडवून तिच्या अब्रूचे रक्षण केले असे यश मिळण्याचा प्रसंग ! इतक्या गोष्टी जमल्यावर आणखी काय पाहिजे? आणि त्यात आईची आज्ञा व तीवरुन आपण तिच्यापुढे केलेली प्रतिज्ञा. त्याने लागलीच आपल्या एका हुजर्‍यास बोलावून त्यास कलमदान व कागद आणण्यास सांगितले. ती सामग्री येताच स्वारीने भरभर त्या कागदावर चार ओळी लिहिल्या व त्याच हुजर्‍यास हुकूम केला की, "आताच्या आता विजयनगरास जाऊन हे पत्र पोहोचते करुन त्याचा जबाब घेऊन ये" पुन्हा त्याला काय वाटले, त्याने त्याला माघारी बोलावून सांगितले, "तुझा घोडा धड नसेल तर माझा एखादा घोडा घेऊन जा. पण थैली आता रामराजास जाऊन पोहोचली पाहिजे.
==============================

अभिप्राय

वल्ली

वल्ली · Wed, 27 Oct 2010 - 05:28

हा रामराजा म्हणजेच राजाराम महाराज असावेत असे वाटतेय. पण राजाराम महाराजांच्या काळात विजापूर दरबार तर औरंगजेबाने खालसा केलेला होता. शिवाय रणमस्तखान तर मोंगल सरदार होता मग हा विजापूरचा वकील कोण?
मग रामराजा म्हणजेच आदिलशाही काळातील दक्षिणेतील कोणी राजे तर नव्हेत?

वेचा गरगरवणारा आहे हेच खरे. घटनांचा काळ कळला तर थोडाबहुत अंदाज बांधता येइल.
संकेतांची वाट पाहतोय सागर.

सागर

सागर · Wed, 27 Oct 2010 - 09:07 · उत्तर

वल्ली,

लवकरच ह्या कादंबरीच्या कालखंडावर प्रकाश टाकणारा संकेत देणार आहे :)

दिगम्भा

दिगम्भा · Wed, 27 Oct 2010 - 09:29 · उत्तर

याचा उत्तराशी काही संबंध नसावा पण (असेच टाकतो आहे) ...
काळ इ.स. १६७९ ?

सागर

सागर · Wed, 27 Oct 2010 - 09:33 · उत्तर

होय कालखंड जवळपासच आहे.

अजून एक संकेत देतो आहे. वेच्यामध्ये फक्त एक शब्द वाढवतो आहे :)

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Wed, 27 Oct 2010 - 06:53

मराठा साम्राज्याच्या इतिहासाची जितपत मला माहिती आहे (किंवा वाचन आहे) तीवरून एक गोष्ट नक्की की या रणमस्तखानाचे नाव संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाच्या कथा वाचताना आलेल्या संदर्भात वाचल्याचे स्मरते.

कादंबरी ऐतिहासिक आहे हे तर वेच्यातील मजकुरावरून समजलेच पण भाषेची धाटणी पाहता ती गो.नि.दा.; रणजित देसाई वा ब.मो. पुरंदरे यांची न वाटता ह.ना.आपटे वा नाथ माधवांची असावी असे वाटते (खात्री नाही....). इथे हडपांचेही नाव घेण्याचा मोह होतोय मला...पण मुळात त्यांचे काहीच वाचले नसल्याने त्या शैलीपासून अनभिज्ञ आहे.

(जर सागर यानी आपले हृदय विशाल करून लेखकाचे नाव सांगितले तर कदाचित कादंबरीचा अंदाज बांधता येईल.)

इन्द्रा

सागर

सागर · Wed, 27 Oct 2010 - 08:58 · उत्तर

इंद्रराज,

माझे हृदय विशालच आहे. पण लेखकाचे नाव सांगितले तर वेचा शोधण्यातली मजा जाईल ना.
अजून थोडी वाट पाहूयात. एजून एक संकेत देतो आहे वर. त्यावरुन ओळखले तर मजा येईल.

वल्ली

वल्ली · Wed, 27 Oct 2010 - 09:55

हा रामराजा म्हणजेच विजयनगरच्या वैभवशाली साम्राज्याचा सेनापती असावा. इस्लामिक आक्रमकांबरोबर (आदिलशाही, कुतुबशाही व निजामशाही) झालेल्या युद्धात हा मारला गेला त्यामुळे संख्येने मोठ्या असलेल्या विजयनगरच्या सेनेत पसरलेल्या घबराटीचे पर्यवसान पराभवात झाले व विजयनगरचे साम्राज्य लयाला गेले.

आता इथे वेच्यातील आदिलशाही व रामराजाचा काळही जुळतोय पण या विषयावरील कादंबरी कधी वाचलेली नाही.
आता सागर यांच्याकडून लेखकाविषयी एखादा संकेत अपेक्षित आहे. :)

सागर

सागर · Wed, 27 Oct 2010 - 10:08 · उत्तर

विजयनगरचे साम्राज्य लयाला जाण्यामागे अशी एक वदंता आहे की दोन मुसलमान सरदारांची एका मुसलमान स्त्री वरुन झालेली फितुरी कारणीभूत ठरली. प्रस्तुत वेचा याच घटनेकडे लक्ष वेधतो. ही घटनाच या कथनकाचा मूळ गाभा असून सर्व कथानक या घटनेभोवतीच गुंफले गेले आहे.

एवढ्या संकेतावरुन ज्याने ही कादंबरी वाचली आहे त्याला आठवण्यास हरकत नाही.

अजून एक संकेत देतो. लेखकाचे नाव या धाग्यावरील चर्चेत येऊन गेले आहे. :)

वल्ली

वल्ली · Wed, 27 Oct 2010 - 10:20 · उत्तर

म्हणजे इंद्राच्या प्रतिक्रियेतच लेखकाचे नाव आहे असे म्हणावे लागेल. गोनिदा, पुरंदरे तर नाहीतच, नाथमाधवही नसावेत. कदाचित ह. ना. आपटे असू शकतात. पण तरीही कादंबरी ओळखणे अवघडच. तर्कांच्या उतरंडीच उतराव्या लागतील. :)

सागर

सागर · Wed, 27 Oct 2010 - 10:23 · उत्तर

>>> तर्कांच्या उतरंडीच उतराव्या लागतील.

प्रयत्न करा वल्ली. वाचले नसेल तर असे होणारच. पण वाचले असेल तर आठवेल.
कारण विसरण्यासारखे पुस्तक नक्कीच नाहीये हे.

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Wed, 27 Oct 2010 - 10:17

व्य. नि. केला आहे. पहा.

सागर

सागर · Wed, 27 Oct 2010 - 10:18 · उत्तर

श्रामोने दिलेले उत्तर बरोबर आहे :)

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Wed, 27 Oct 2010 - 10:40 · उत्तर

मला बक्षीस हवं... ;)
इथे असा हट्ट करू शकणाऱ्या मेघना, दोन्ही अदिती यांचे ओळखचित्र कल्पावे. :)
याला म्हणतात भुतं अंगावर घ्यायची.

सागर

सागर · Wed, 27 Oct 2010 - 11:07 · उत्तर

पुढचा वेचा देण्याचे महत्कार्य श्रामो यांनी करावे अशी माझी त्यांना विनंती आहे
(माझी विनंती हेच बक्षीस मानून घ्यावे ;) )

अवांतरः दोन्ही आदिती आणि मेघना येथे सध्या अदृष्य अवस्थेत वावरताहेत असे दिसते आहे. वेच्यात सहभागी नाही होत त्या. :D

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Wed, 27 Oct 2010 - 11:29 · उत्तर

"....अवांतरः दोन्ही आदिती...."

~ म्हणजे ? इथं दोन अदिती आहेत? मला फक्त ठाणेकरीण मनी म्याऊ माहिती आहे. पण ती 'मी किती वाचल्ये" या पेक्षा 'किती वाचल्ये नाही...' याचीच टेप लावत असते.....शिवाय 'काला अक्षर भैस बराबर...' असे आहे तिच्याबाबतीत... त्यामुळे अदिती (पक्षी : ठाणेकर मॅडम...) वेच्यात सहभागी होण्याची शक्यता फार क्षीण आहे.

इन्द्रा

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Wed, 27 Oct 2010 - 12:13 · उत्तर

हो. इथं दोन अदिती आहेत. एक मनीमाऊ आणि एक जेरी. ठाणे काय आणि पुणे काय!
पण, 'मनीमाऊ' हे जरा अंडरस्टेटमेंट झालं. तिला भाटी म्हटलं पाहिजे.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Wed, 27 Oct 2010 - 10:29

"....जिंकलो !!!!!! ~~ विजयनगरचा संकेत झिन्दाबाद !

व्य.नि. केला आहे.

(पण... माझी ट्रेन हुकलीच, कारण श्रा.मो. ना जयाचे श्रीखंड मिळाले हे वर आत्ताच वाचले..!!)

इन्द्रा

सागर

सागर · Wed, 27 Oct 2010 - 10:34 · उत्तर

श्रामोंनी उत्तर अगदी काही मिनिटे अगोदर दिले एवढेच.
विजेते तुम्ही दोघेच आहात इंद्रराज :)

स्वतःला ओळखता येण्याचा आनंद हा खूप महत्त्वाचा असतो. :)

चर्चा प्रकार