- Log in to post comments
रात्रभर कमालीचा उकाडा होता. सारखे गदमदत होते. मन चिकचिकत होते आणि घामाच्या ओलीवर पंख्याचा कृत्रिम वारा घेऊन घेऊन अंग दुखत होते. उकाड्यामुळे रात्री कितीतरी वेळ झोपच लागली नाही. अशा जाग्रणानंतर दुसर्या दिवशी सकाळी उशीरा जाग येते आणि जाग आल्यावरही सकाळचा ताजेपणा, तरतरी वाटत नाही. उलट शरीर, मन थकलेले, मरगळलेले असते. पण आज जाग आली तेव्हा थकल्याचा, मरगळल्याचा मागमूसदेखील कुठे नव्हता. उलट सार्या वृत्ती अतिशय तरतरीत, प्रसन्न, उत्फुल्ल झाल्या होत्या. हा अनावर उत्साह कसला तो मला कळेना. मी झटकन अंथरूणावरून उठले. चूळ भरून, तोंड धुऊन बाहेर आले. गॅलरीशी उभी राहिले, तो सळसळत्या ओलसर वार्याचा एक झोतच्या झोत अंगावर येऊन आदळला. मी हेलपाटलेच. स्वतःला सावरीत मी आसमंतात पाहिले. खालच्या बागेवर नजर टाकली, तेव्हा माझ्या अंगात होती तीच तरतरी सर्वत्र भरलेली मला आढळली. झाडांच्या फांद्या खालीवर डोलत होत्या. पाने सळसळत होती. गच्च डवरलेल्या पिवळ्याजर्द फुलांच्या झाडांवरून भरभर पाकळ्या सुटत होत्या. खालच्या जमिनीवर त्यांचे पिवळे गालिचे पसरले होते. हवा ढगाळ होती. आभाळ गडद काळसर झाले होते. पण त्या ढगाळ हवेत एक उत्सुक भाव होता. आभाळाचा काळसर रंग लाघवी वाटत होता. सार्या वातावरणात एक सावळे लाडकेपण, लडिवाळपण काठोकाठ दाटून आले होते. मी भारल्यासारखी त्या आभाळाकडे, झाडांकडे, पानांकडे, पिवळ्या फुलांकडे बघत राहिले. इतक्यात पुन्हा वार्याचा एक जोरदार झोत झाडांपानांतून अनावरपणे धावत गेला. फांद्या खालीवर हेलकावल्या. पाने सळसळली. पिवळी फुले टपटप खाली गळली. कुठूनतरी एक अनामिक ओला सुगंध दरवळत आला. मला एकदम उलगडा झाला. मी हर्षभराने म्हटले,"अरे, ही तर पावसाची चाहूल!"
अभिप्राय
मुक्तसुनीत
मुक्तसुनीत · गुरुवार, 24 Jun 2010 - 06:12
माहिती नाही पण गेस करण्याचा प्रयत्न : ऋतुचक्र ?
वेदश्री
वेदश्री · गुरुवार, 24 Jun 2010 - 07:12 · उत्तर
ऋतुचक्र नाही. उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद, मुसु.
वेदश्री
वेदश्री · Sat, 26 Jun 2010 - 12:43
उत्तर दिले आहे.