- Log in to post comments
या वेळेस वेचा दोन भागात आहे.
पहिला परिच्छेद पुस्तकाच्या अगदी आरंभी आहे. त्यातून एक संकेत मिळतो. दुसरा संकेत पुढच्या मजकुरात दडलेला आहे. हा पुढचा मजकूर पुस्तकाच्या जवळपास मध्यानंतरचा भाग आहे. त्यात एक संकेत आहे. हा संकेत म्हणजे या दोन्ही मजकुरांच्या दरम्यान एक छोटासा प्रवास झाला आहे. पण हे पुस्तक प्रवासवर्णन म्हणता येणार नाही.
दुसरा संकेत दिला आहे. दुसऱ्या परिच्छेदात तीन शब्द ठळक केले आहेत. या तीन शब्दांतून व्यक्त होणारा एक शब्द या पुस्तकाशी थेट संबंधित आहे. यापुढचा संकेत उद्या देईन.
हा वेचा कृष्णमेघ कुंटे यांच्या 'एका रानवेड्याची शोधयात्रा' या पुस्तकातील आहे.
---
अॅड्रिअन बोशिअर हा (अशा) धडाक्याचं आयुष्य जगलेल्या पण प्रसिद्ध न पावलेल्यांपैकी एक. निरंजन घाटे यांनी अनुवादित केलेलं बोशीअरवरचं 'निसर्गपुत्र' हे पुस्तक खास वाचण्यासारखं आहे. हा फिरस्ता त्याच्या गत आयुष्याकडे, पांढरपेशा समाजाकडे पाठ फिरवून आफ्रिकेत हरवून गेला. तिथल्या आदिवासींमध्ये राहिला, प्राण्यांमध्ये रमला, निसर्गाशी समरस झाला. तो लोकांमधूनच नव्हे तर या जगातूनही देहानं कधीच निसटला, पण आजही तो तिथंच आफ्रिकेत रेंगाळत फिरत असणार आहे. ज्यांच्या मनातून निसर्गाबद्दल ओढ, आपुलकी भरून राहिली आहे, जे 'शहाणपण' शिकले आहेत, ज्याच्या शरीरात विलक्षण विचारांचं साक्षात चैतन्य वाहत असतं, अशी पुष्कळ मंडळी आपल्यापासून भौगोलीकदृष्ट्या दूर नाहीत. बोशीअर त्यांपैकी त्यातल्या त्यात प्रकाशात आलेला, पण तरीही दुर्लक्षितच राहिलेला एक माणूस. असे अनेक जण आपल्या भरतखंडातच नाही, तर अमेरिका-युरोपसारख्या अतिरेकी व्यावसायिक वृत्तीनं ग्रासलेल्या आणि सार्या रानोमाळांची बाग करून टाकलेल्या भूभागातही समाजपराङ्मुख वृत्तीनं राहत आहेत. आपल्याला त्यांची माहिती नाही हे आपलं दुर्दैव आणि आपण त्यांच्यापासून मानसिक-वैचारिक दृष्ट्या फार दूर आहोत हा आपला करंटेपणा आहे
---
तो पाऊस मी आयुष्यात विसरणार नाही. आभाळ काळवंडून आल्यावर एक वेगळाच आवाज लांबून जवळ सरकायला लागला. जंगलावर पावसाची धार धरल्याचा आवाज होता तो! हां हां म्हणेपर्यंत मी उभा होतो तिथंही टपोरे थेंब पडायला लागले. जोडीला धमाकेदार वारा.
सी-३ चा बंधारा जेव्हा बांधला तेव्हा बांबूची काही बेटं पाण्याखाली गेली होती. हळूहळू ते बांबू कुजले पण काही अजूनही तग धरून उभे आहेत. त्या दिवशी पावसाचा मारा इतका होता की त्या वादळात माझ्या समोरचे, शेजारचे काही बांबू कडकडाट करत माझ्या नजरेसमोर कोसळले. प्रत्येक वेळी ढग कडाडले की बांबूची बेटं थोडी वाकायची. पावसात निसर्ग किती रौद्र होऊ शकतो याचं मी प्रलयंकारी उदाहरणच बङत होतो.
१५-२० मिनिटं उघड्या छताखालचा पाऊस झेलून मी काकडायला लागलो. पावलं कडक झाली होती आणि पाठीचा कणा ताठ! सार्या स्नायूंवरचं नियंत्रणच गेलं होतं. हातापायांची थरथर काही केल्या थांबवता येत नव्हती. मान ताठ ठेवून आणि काकडून दुखायला लागली होती. मासेमारीची हौसही सावकाशपणे मावळायला लागली होती. मी हातात धरलेल्या गळासकट नखशिखान्त कापत होतो.
अभिप्राय
सागर
सागर · Sat, 6 Nov 2010 - 10:33
हे पुस्तक वाचले नाहिये त्यामुळे पास.
पावलं कडक झाली होती आणि पाठीचा कणा ताठ! सार्या स्नायूंवरचं नियंत्रणच गेलं होतं. हातापायांची थरथर काही केल्या थांबवता येत नव्हती.
हे वर्णन किंचित परिचयाचे वाटते आहे. पण नक्की काही आठवत नाहिये.
कदाचित शालेय जीवनात हे पुस्तक वाचले असावे.
पहिल्या वेच्यावरुन पुस्तक अनुवादीत असावे असा आभास होतो, पण मला वाटते की हे अनुवादीत नसावे.
बहुतेक गोदावरी नदीवर बांधले गेलेल्या धरणक्षेत्रातील ही कहाणी असावी. आत्मचरित्र दिसते आहे. जायकवाडी धरण प्रकल्पावर आधारीत दिसते आहे हे पुस्तक ?
आठवत नाही त्यामुळे पास
वेचा मात्र अत्भुत आहे. वेच्यामुळेच पुस्तक वाचायची उत्सुकता लागून राहिली आहे :)
निवांत पोपट
निवांत पोपट · Sun, 7 Nov 2010 - 17:29
व्य.नि.केला आहे.
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Mon, 8 Nov 2010 - 05:35 · उत्तर
कोड्याचे विजेते निवांत पोपट! अभिनंदन.
वल्ली
वल्ली · Mon, 8 Nov 2010 - 06:56
वाचलेले नाहीये त्यामुळे पास.
सागर
सागर · Wed, 10 Nov 2010 - 14:06
श्रामो, उत्सुकता लागून राहिली आहे की कोणते पुस्तक आहे हे त्याची. तेव्हा वेच्याचे उत्तर द्यावे ही विनंती :)
ज्योति कामत
ज्योति कामत · Wed, 10 Nov 2010 - 18:16 · उत्तर
उत्सुकता लागून राहिली आहे..
वल्ली
वल्ली · गुरुवार, 11 Nov 2010 - 04:18 · उत्तर
सहमत.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · गुरुवार, 11 Nov 2010 - 03:53
पुस्तक वाचलेले नाही, हे तर मी निश्चितच म्हणू शकतो. पण धाटणीवरून एक अंदाज बांधू शकतो, तो व्य.नि.द्वारा कळविला आहे.
इन्द्रा
सागर
सागर · गुरुवार, 11 Nov 2010 - 15:34
पण वेचा सुंदर आणि उत्कंठा ताणवणारा आहे त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचणार आहे.
चांगल्या पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद श्रामो :)
वल्ली
वल्ली · Fri, 12 Nov 2010 - 04:09
पुस्तक आधी चाळले होते. वाचलेले मात्र नव्हते. वेचा चक्रावणारा होता यात तर काहीच शंका नाही.
दिगम्भा
दिगम्भा · Fri, 12 Nov 2010 - 10:23
आदर्श निवड !
उत्तर कळल्यावर वेचा किती सुयोग्य होता त्याची अशीच जाणीव झाली पाहिजे.
धन्यवाद.
- दिगम्भा
नंदन
नंदन · Fri, 12 Nov 2010 - 10:38 · उत्तर
असेच म्हणतो! उत्तम निवड.