ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ५४

वल्ली

मजकूर

पुस्तकः वाघरू/त्या तिथे रूखातळी
कादंबरी: त्या तिथे रूखातळी
लेखक: गो. नी. दांडेकर

इंद्रराजजींचे अभिनंदन. त्यांनी प्रयत्नांती उत्तर अचूक ओळखले आहे. सागर यांनीही उत्तर ओळखलेच.

वेचा:
"या गडाचा जो कुणी स्वामी असेल, त्याची अनुमति घेऊनच ती कोरलेलीं. लेणीं तयार झालीं दोन हजार वर्षांपुर्वी. म्हणजे त्याच्या आधीं पांचशें वर्षं तरी गड नांदता असायला हवा. इथून पश्चिमेस महाड. म्हणजे महाहाट, खूप मोठी बाजारपेठ. बाणकोटपाशी सावित्री नदी समुद्राला मिळते, ते बाणकोट बहुत प्राचीन. तिथून नाना परीचा समृद्ध माल नावांमधून महाडपर्यंत यायचा. कमीतकमी पांच हजार वर्षंतरी हा वाहातघाणा सुरु आहे. ग्रीसमधून, अलेक्झांड्रियांतून व्यापारी तारवांमधून मद्द्यं, तांबं, कथील, शिसं, पोवळीं, पुष्कराज, बिलोरी कांच, सुरमा, असं काय काय आणीत. पश्चिम किनार्‍यावर कित्येक बंदरं, भृगुकच्छ, शूर्पारक, श्रीस्थानक, कलियन, चेउल, बाणकोट, दाल्भ्यपुरी. या बंदरांमधून हा माल उतरायचा. मग लमाणांचे तांडे आपल्या बैलांच्या पाठींवर माल चढवायचे. घाटवाटा चढूं लागायचे. त्या लमाणांच्या तांड्यांच्या प्रमुखांना म्हणायचं सार्थवाह. त्या सार्थवाहांनी हीं लेणीं खणवलीं. हे तांडे या सह्याद्रीतल्या घाटवाटा चढून वर यायचे, अन चहूं दिशा पांगायचे. वरतीं मोठमोठी नगरं. जुण्णनगर. निधिवास. प्रतिष्ठान. नासिक. तगर. या नगरांपर्यंत तो माल जायचा. त्या तांड्यांची एक घाटवाट भीवगडाच्या शेजारून असली पाहिजे-"

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संकेत देण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. वाक्यावाक्यातच अनेकानेक संकेत आहेतच. तरी गरज पडल्यास देईनच पण ही वेळ येणार नाही याची खात्री आहे.
लेखकाचे नाव तर बहुत जणांना स्पष्ट झालेच असेल. ही कादंबरी असून प्रवासवर्णन किंवा आत्मचरित्र नाही. ठळक केलेल्या शब्दावरून कदाचित माग काढू शकाल.
बहुत काळ अनुपलब्ध असलेली ही कादंबरी नुकतीच मिळू लागलेली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अभिप्राय

सागर

सागर · Wed, 10 Nov 2010 - 07:43

डोक्याला ताण द्यायची गरज आहे ;)

वल्ली

वल्ली · Wed, 10 Nov 2010 - 07:47 · उत्तर

उत्तर प्रथमदर्शनी सोपे वाटले तरी इतके ते नसावे.

निवांत पोपट

निवांत पोपट · Wed, 10 Nov 2010 - 10:22

गो.नि.दांडेकरांचे असावे. रणझुंजार किंवा असेच काहीतरी शिवकालीन,कोकणच्या पार्श्वभूमीवर, मूरूड् जंजिरा किल्याच्या लढाई संदर्भात.

वल्ली

वल्ली · गुरुवार, 11 Nov 2010 - 04:16

कादंबरीकडे स्पष्टपणे बोट दाखवणारा संकेत दिला आहे.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · गुरुवार, 11 Nov 2010 - 05:02

आत्ता ओळखली आहे..... व्य.नि. पाहा.

इन्द्रा

सागर

सागर · गुरुवार, 11 Nov 2010 - 09:37

वल्ली यांनी म्हटल्याप्रमाणे वेच्यातच अनेक संकेत आहेत. पण ठळक केलेल्या शब्दावरुन (वाचलेले असेल तर) लगेच क्लिक होते. ;) खूप खूप आधी वाचले होते त्यामुळे वेळ लागला खरा. पण ठळक केलेल्या शब्दावरुन लगेच आठवले. तरी या लेखकाच्या दोन पुस्तकांच्या कथानकाची डोक्यात भेसळ झालेली त्यामुळे दोन्ही नावे दिली होती वल्ली यांना ... ओळखता आले हेच खूप आहे :)

वल्ली

वल्ली · Sat, 13 Nov 2010 - 04:20

हे पुस्तक म्हणजे एक जोड कादंबरी आहे. 'वाघरू' ही राजगडाच्या पार्श्वभूमीवर चितारलेली तर 'त्या तिथे रूखातळी' ही भीवगडाच्या पार्श्वभूमीवरील राहाळात असलेल्या प्रचंड आम्ररूक्षाच्या - आमरूखाच्या सभोवती फिरते. शेकडो वर्षांच्या त्या आमरूखाच्या भोवती काय कल्प कल्प घडते ते गोनिदांनी सुरेख चितारले आहे. माझ्यामते तरी ही गोनिदांची ही पडघवलीनंतरची सर्वोत्तम कादंबरी असावी.

चर्चा प्रकार