ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ५७

ऋषिकेश

मजकूर

५६ वे कोड्याचे उत्तर जाहिर व्हायच्या आत हे कोडे घालतो आहे. कारण एकदा आठवडा सुरू झाला की टंकायला वेळ होईल की नाही सांगता येत नाही. ह्या घाईबद्दल क्षमस्व

===========
गांधीयुगात डोळ्यापुढे आकार घेत होते ते काय हे स्वराज्य? एका अज्ञात बिहारी लोककवीने स्वराज्याच्या मिरवणूकीचे वर्णन करताना म्हटले आहे:

स्वराज्याचा कलश हत्तीवरून
मिरवत आला
कलश धरून राजेंद्रबाबू बसले होते,
पुढे घोड्यावर स्वार होते जवाहरलाल.
आणि बापू?
बापू गर्दीत आमच्याबरोबर चालत होते!

बापू तनाने आणि मनाने सामान्यांच्या बरोबर चालत होते. राज्यकर्त्यांना असे कसे चालता येईल? ते चालणे गांधींबरोबरच संपले. बापूंच्याबरोबर लोक "चालो वाटे आम्हा तुझाची आधार' म्हणत चालत होते. त्याच्यासारखेच अर्धनग्न, देहधारणेपुरते खाणारे, त्यांना कळेल अशा भाषेत बोलणारे, त्यांच्या अन्ननिवार्‍याची चिंता करणारे, महाजनांपासून बहुजनांना दूर ठेवणार्‍या विचारसरणीऐवजी सगळ्यांना एकमेकांच्या आधाराने जगायला शिकवणारे सोपे अर्थशास्त्र सांगणारे, त्यांना व्यसनमुक्त करणारे, अंधारातल्या त्यांच्या आयाबहिणींना प्रकाशाचा आनंद देणारे बापूजी हाच त्यांचा आधार होता. गांधीबाबांचे स्वराज्य येईल तेदेखील सारी माणसे जोडीने चालतील असे वातावरण घेऊन येईल, अशी त्यांची कल्पना. आज जीवनातली चांगली मुल्ये टिकवून जगणार्‍याना निराधार वाटू लागले आहे. गांधीयुगातील सगळी माणसे काही मोठी धर्मराजासारखी नव्हती. परंतू 'सत्याला वाली असतो' असली श्रद्धा टिकवणारे वातावरण होते. सार्‍या मानवी संस्कृतीची धडपड आपल्यातले प्राणीपण मर्यादित ठेवण्याची आहे. कायद्याने संयम लादले जातात. पण लादलेल्या कुठल्याही गोष्टीचे ओझे होते. पशूला आवेग आवरता येत नाही; माणसाला काहि मर्यादेपर्यंत येतो. बैल कुठेही मूत्रविसर्जन करतो. माणूस आडोसा शोधतो. आरोग्याच्या नियमांचे स्मरण करतो. स्वराज्याच्या सत्ताधीशांना स्वार्थाचा आवेग आवरता येईनासा झाला आहे. आणि 'राजा कालस्य कारणम्' ह्या न्यायाने प्रजाही तशीच होत चालली आहे. "मी आणि "माझे" यापलीकडे दृष्टी जाऊ शकतच नाही!

========

उत्तर व्यनीने कळवावे.

बरोबर उत्तर देणार्‍याने शक्य असल्यास ह्याच पुस्तकाचा अजून एक उतारा दिल्यास ह्या पुस्तकातील अत्यंत सुंदर विचार सर्वांसमोर येतील व त्यातून संकेतही मिळतील

संकेतः
त्यानंतरही गरज पडल्यास (जी पडणार नाहीच) मंगळवारी संकेत मिळतील
१. हे पुस्तक लेखकाच्या विविध विषयांवरील उत्तमोत्तम लेखांचे संकलन आहे.
२. लेखक ज्या प्रकारच्या लेखनासाठी (सामान्यतः) ओळखला जातो त्याहून वेगळ्या प्रकृतीचे लेखन ह्या पुस्तकात आहे
३. <गरज पडल्यास>

विजेता
१. श्री. इंद्रराज पवार <कोणत्याही संकेताविना पहिल्याच प्रयत्नात योग्य लेखक व दुसर्‍या प्रयत्नात योग्य पुस्तकही ओळखले आहे>

२. श्री. नंदन <कोणत्याही संकेताविना पहिल्याच प्रयत्नात योग्य लेखक व योग्य पुस्तकही ओळखले आहे>

३. ३_१४ अदिती <संकेत देताच पहिल्या प्रयत्नात योग्य पुस्तक ओळखले आहे>

४. श्री. मनिष <संकेत देताच पहिल्या प्रयत्नात योग्य लेखक व दुसर्‍या प्रयत्नात पुस्तक ओळखले आहे>

५. रोचीन <संकेत देताच पहिल्या प्रयत्नात योग्य लेखक व दुसर्‍या प्रयत्नात योग्य पुस्तक ओळखले आहे>

सर्व विजेत्यांचे अभिनंदन

पुस्तकः
प्रख्यात लेखक व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे वैचारिक अंगाने जाणारे गंभीर लेखनही तितकेच ताकदीचे आहे याची साक्ष पटवणारे हे संकलन "एक शून्य मी"

या पुस्तकात गांधीजीच नाही तर, मराठी माणसाच्या नजरेतून मराठी माणूस, अत्रे: टाळ्या व हशा अश्या लेखांपासून लडाखचे अतिशय जिवंत प्रवासवर्णन, एक शुन्य मी हा अतिशय मनोज्ञ लेख आहेत. सर्वांनी जरूर वाचावे असे हे पुस्तक!

यात सहभागी झालेल्यांचे अनेक आभार. विजेत्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन!

अभिप्राय

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 22 Nov 2010 - 04:54

आता पर्यंत दोघांनी (निवांत पोपट व मनिष) प्रयत्न केले आहेत. ही उत्तरे चुकली आहेत. मात्र इतरांसाठी ती देतो:

अयशस्वी प्रयत्नः
१. वि.स.खांडेकर
२. 'गंगेमधे गगन वितळले' - अंबरिश मिश्रा

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 22 Nov 2010 - 05:05 · उत्तर

संकेत उद्या देतो..
माझ्या अंदाजाने हा वेचा संकेताशिवाय ओळखला जाईल. जरा विकांत संपवून सारे खेळाडू मैदानात उतरू देत. :) नाहीच जमलं तर देतो संकेत. :P

वल्ली

वल्ली · Mon, 22 Nov 2010 - 05:06

संकेत हवाच. आमचे वाचन काही एव्हढे प्रगल्भ नाही.:)

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 22 Nov 2010 - 06:27

इंद्रराज यांनी लेखक ओळखला आहे. पुस्तक मात्र चुकीचे ओळखले.
मात्र जरा वेळातच ते बरोबर पुस्तकही ओळखतील अशी खात्री आहे.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Mon, 22 Nov 2010 - 06:49

चला....पुस्तकही ओळखले.....व्य.सं. केला आहे.

इन्द्रा

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 22 Nov 2010 - 07:50 · उत्तर

अचुक उत्तर.. श्री. इंद्रराज पवार प्रथम क्रमांकाचे विजेते आहेत :)

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 22 Nov 2010 - 10:17

सागर यांनीही लेखक ओळखला आहे. पुस्तक मात्र ते ओळखु शकलेले नाहीत.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Mon, 22 Nov 2010 - 10:34 · उत्तर

"....सागर यांनीही लेखक ओळखला आहे...."

~ व्वा ! सागर यांचे वाचन खूप आहेच शिवाय त्यांचा ग्रंथसंग्रहही लक्षणीय आहे, त्यामुळे ते नक्कीच त्या लेखकाचे 'ते' पुस्तक शोधून काढतील असा माझा विश्वास आहे.

इन्द्रा

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 22 Nov 2010 - 11:48

वेचा देताना ज्यांना उत्तर पहिल्या फटक्यात येईल याची खात्री होती त्यातील "नंदन" यानेही लेखक व पुस्तक दोन्ही पहिल्या प्रयत्नातच ओळखलं आहे.
नंदनचे वाचन खूप आहेच पण त्याची संदर्भ लक्षात ठेवण्याची( आणि संदर्भ दुवे देण्याचीही) हातोटी मला नेहमीच चकित करते.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Mon, 22 Nov 2010 - 18:54 · उत्तर

ऋषिकेश प्रस्तुत "नंदन स्तुती" वाचली आणि मी आता "इनो" आणण्यासाठी मेडिकल शॉपीकडे जात आहे.

इन्द्रा

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 23 Nov 2010 - 04:09 · उत्तर

तुम्हीही ज्यांना उत्तर लगेच येईल असं वाटत होतं त्यात होताच.. म्हणून तर तुम्ही उत्तर दिल्यावर "अपेक्षेप्रमाणे" म्हटले आहे.

नंदन

नंदन · Tue, 23 Nov 2010 - 07:49 · उत्तर

अशा कोड्यांची उत्तरं येण्याबाबत आमची धाव दोन-तीन लेखकांच्या लिखाणाच्या कुंपणापर्यंत :)

दुर्दैवाने ते पुस्तक माझ्याकडे इथे नाही. त्यामुळे उतारा टंकू शकत नाही. पण त्या पुस्तकात अनेक टंकण्याजोगे उतारे आहेत हे नक्की.

३_१४ अदिती

३_१४ अदिती · Mon, 22 Nov 2010 - 17:32

अलिकडेच वाचलं आहे असं वाटतं आहे, पण आठवत नाहीये!

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 23 Nov 2010 - 04:17

संकेत दिले आहेत.

नंदन, इंद्रराज,
विनंती आहे की याच पुस्तकातील एखादा वेचा टंकायला वेळ मिळाला तर जरूर टंकावा.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Tue, 23 Nov 2010 - 06:08

".....पुस्तकातील एखादा वेचा टंकायला वेळ मिळाला तर जरूर टंकावा....."

जरूर...! पण कुठे? इथे टंकला तर 'जादाचा संकेत दिला' असे होईल ना?

इन्द्रा

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 23 Nov 2010 - 07:43

३_१४ अदितीने पुस्तक बरोब्बर ओळखले आहे.

रोचीन व दिगम्भा यांनी लेखक ओळखला आहे मात्र पुस्तक चुकले आहे. तेही ते लवकर सांगतिलच. आता ५ विजेते मिळायला संकेतांची गरज लागेलसं वाटत नाही :)

उद्या पुस्तक जाहिर करतो

३_१४ अदिती

३_१४ अदिती · Tue, 23 Nov 2010 - 07:52 · उत्तर

३_१४ अदितीने पुस्तक बरोब्बर ओळखले आहे.

खुद के साथ बातां: चला, मी अगदीच ढ नाही तर!
जाहिर बातां: आता माझ्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत.

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Wed, 24 Nov 2010 - 08:04 · उत्तर

_ /\ _ XXXXXXXX _ /\ _
घे!

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Tue, 23 Nov 2010 - 07:56

जवळपास सर्वच सदस्यांनी लेखक तर ओळखले आहेच. श्री.ऋषिकेश यानी सुचविल्याप्रमाणे त्या पुस्तकातील त्यानी दिलेल्या वेच्या आगेमागेचा आणखीन एक वेचा देत आहे, तो असा....

".....आता तर काय सारी सृष्टीच बदलली. पिकेटिंग करण्यार्‍या बायकांनी पोलिसांच्या लाठ्यातून फुटलेल्या रक्ताला कुंकू मानून दारूबाजांना परावृत्त केले होते. व्यसनमुक्ती लाभली नाही, तरी आपण पोराबाळांना उपाशी टाकून ताडीचे मडके पोटात रिचवितोय याची लाज निर्माण होत होती. नुकतीच मी मुंबईच्या दादरच्या भरवस्तीत पाटी वाचली "सरकारमान्य ताडीमाडी विक्री केन्द्र". मी आत डोकावलो असतो तर तिथे सुताचा हार घातलेला म. गांधीचा फोटोही आढळला असता. एका बाजूला गांधी जन्मशताब्दीचा सोहळा तर दुसरीकडे ताडीमाडी विक्री केन्द्रांची उदघाटने. आपल्या सार्व़जनीक जीवनाची भयंकर परवड आहे ही. आपल्या देशाने दारुबंदी एक व्रत म्हणून स्वीकारले होते, व्रताच्या पालनासाठी प्राण पणाला लावावे लागतात. जीवनातील प्रत्येक गोष्ट तर्कावर घासता येत नाही. राष्ट्रीय निशाण हे एक फडके असते पण त्याच्या इज्जतीसाठी लोक प्राण देतात. निशाणीचे कापड बूट पुसायचे फडके म्हणून कुणी वापर करीत नाहीत. ...."

~ ही धागाकर्त्याचीच सूचना असल्याने माझ्यावर 'संकेत' भंग पॉलिसीचा आरोप येणार नाही अशी आशा आहे.

इन्द्रा

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 23 Nov 2010 - 11:54

श्री.मनिष यांनीही लेखक व पुस्तक दोन्ही अचुक ओळखले आहे.

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 23 Nov 2010 - 18:33

रोचीन यांनीही अचुक उत्तराचा व्यनी केला आहे. अभिनंदन रोचीन!

आता ५ विजेते झाल्यामुळे इथेच थांबतो व पुस्तक घोषित करतो. सहभागी होणार्‍या सर्वांचे आभार

सागर

सागर · Tue, 23 Nov 2010 - 19:33

ऋ,

तुझ्या या वेच्यामुळे पु.लं.च्या एका सुरेख पुस्तकाची ओळख झाली. माझ्या वाचनातून हे पुस्तक सुटले. वाचलेले नव्हते त्यामुळे पुस्तक ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. आता मिळवून नक्की वाचेन. :)

चर्चा प्रकार