- Log in to post comments
१. छोटेखानी कादंबरी आहे.
२. ही कादंबरी अनुवादित नाही. अस्सल मराठी आहे. मराठी मातीत रुजलेली आहे. लेखकाच्या दुसऱ्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे.
३. संकेत म्हणून काही शब्द ठळक केले आहेत. ते नीट संदर्भांच्या चौकटीत वाचले तर, ज्यांनी ही कादंबरी वाचली आहे त्यांना ती, पटकन ओळखता येईल.
४. वेच्याचा दुसरा भाग आता दिला आहे. दुसऱ्या तीन तुटक रेषांच्या खाली तो आहे. पहिला भाग कादंबरीच्या सुरवातीलाच येतो. दुसरा भाग कादंबरीच्या अखेरीला येतो. तिथं घटनाचक्र जवळपास पूर्ण होते.
उत्तर दिले आहे!
---
परवा राणू बेरडानं घायाळ करून जाळ्यात पकडलेली हरिणी एका मोठया डालीत घालून राजवाड्यात आणली. ऐन दुपारी. मी आणि देसाई काही कमाचं बोलत उभे होते. त्या हरिणीची तडफड बघवेना मला. मुकाट्यानं आत गेलो. पिस्तूल आणलं आणि झटके देणार्या, तोंड वासलेल्या त्या जनावराच्या मानेत गोळी घातली. मान मोडून पडली. तंगड्या ताठ होऊन डालीबाहेर आल्या. शांत झालं सगळं.
कधी कधी रात्री... झोप उडालेली असली आणि मन थार्यावर नसलं की त्या हरिणीचं रुप माझ्या डोळ्यांसमोर उभं राहतं. आणि तसं झालं की मेसापोटेमियाच्या लढाईत माझ्या बरोबरीनं खंदकात लढलेल्या आणि प्राणांतिक जखमेनं तडफडत असलेल्या एका लान्स कार्पोरलची आठवण मला झाल्यावाचून राहत नाही. त्याच्या वेदना वाढल्या, पण प्राण तर लवकर जाईना. कळवळून कळवळून दोनदा मला म्हणाला : राजेसाहेब, दया करा... मला संपवा. पण माझा हात धजावला नाही. त्याची शुद्ध गेली तसा मी त्याच्याकडे पाठ फिरवून उभा राहिलो. त्याला आपल्या मरणानं मरू दिला.
त्या हरिणीला... त्या दिवशी... मी तिच्यावर वेळीच दया केली असं वाटलं. पण शेजारी उभ्या असलेल्या देसायांच्या डोळ्यांत पाणी भरभरून आलेलं पाहून म्हणालो:
"देसाई, तुम्ही प्राणावरचे प्रसंग पाहिलेले नाहीत. गोळी घातली हे तुम्हाला आवडलं नाही?"
"नाही महाराज, तसं नाही. आपण केलंत ते योग्यच केलं. मीही तेच केलं असतं..."
"मग तुमच्या डोळ्यांत..."
"त्या जीवाच्या मरणाचं नाही तेवढं वाटलं..."
देसाई थांबले. त्यांनी डोळे पुसले. मी नुसतं त्यांच्याकडं पाहिलं.
"महाराज, एखाद्या क्रूर गुन्हेगाराला फाशी द्यायचं झालं तरी तुझी शेवटची इच्छा काय, असं त्याला विचारतो आपण..."
"होय. पण जनावराला काय पुसायचं?"
"पुसायचं नाही काही. चैत्राच्या उन्हात या गर्भिणीला तुमच्या माणसांनी घायाळ करून आणलं. तिला झटकन मरण दिलंत ते बरं झालं, पण त्यापूर्वी तिला पाण्याचे दोन घोट पाजले असते तर!... महाराज, प्राण जाण्यापूर्वी जीवाला चमत्कारीक शोष पडतो. आपल्यासारख्या उदार अंतःकरणालाही दयेच्या घाईत हे विस्मरण झालं त्याचं वाईट वाटलं मला. माफी असावी महाराज. माझ्या डोळ्यांनी मला दगा दिला. नाहीतर हे बोलायचं कारण नसतं पडलं मला..."
असं त्या दिवशी देसाई बोलून गेले. मी शरमिंधा झालो.
---
खूप विचार करकरून या प्रवासाचा अखेरचा मुक्काम गाठण्यासाठी अनेक वाटा एकाच वेळी चालायच्या, असं मी ठरवलं.
अन्न सोडायचं... घोट घोट पाणी प्रथम प्यायचं... चार दिवसांत तकवा गेला की नाडी कापून घ्यायची... रक्त वाहू द्यायचं आणि त्याच वेळी एका अल्मारीतली पुस्तकं पेटवून त्यांच्या धुरानं गुदमरून जायचं. जीव जगवायची धडपड ऐन क्षणाला करावीशी वाटली तरी उठणं, ओरडणं, हालचाल करणं अशक्य झालेलं असलं पाहिजे. शेवटी पाण्याचा घोटही नाही मिळाला पाहिजे.
त्या गर्भारशई हरिणीला कसं मारलं मी ऐन उन्हाळ्यात... ते आठवतंय. दिसतंय डोळ्यांसमोर.
एवढा मामला उरकायला सात दिवस पुष्कळ झाले. रंगनाथ ज्या वाटेनं गेला... वलीसाहेबांनी ज्या यातना सहन केल्या... ती वाट आणि त्या यातना मला माहित झाल्या पाहिजेत. त्या वाटेवर तक्षकाचं वारूळ फोडून त्याचा दंश मी घेतला पाहिजे.
अभिप्राय
रोचीन
रोचीन · गुरुवार, 25 Nov 2010 - 06:25
नाहि, त्यामूळे संकेत आवश्यक आहे!!
सागर
सागर · गुरुवार, 25 Nov 2010 - 07:44
या विषयावर याच लेखकाने पहिल्यांदा लिहिले म्हणून लक्षात आले ;)
व्य.नि. केला आहे
श्रावण मोडक
श्रावण मोडक · गुरुवार, 25 Nov 2010 - 07:55
इंद्रराज पवार, रोचिन आणि सागर यांनी व्यक्त केलेले अंदाज चुकले आहेत. :(
हे पुस्तक वाचलेले नसेल तर उत्तराच्या जवळपास जाईल असा अंदाज करणेही मुश्कील जाऊ शकते.
वेचा निवडण्याचे कारणच मुळी तिथे आहे. या लेखकाचे सारेच काही वाचावे असे आहे. भले पुस्तक खरेदी करून वाचा किंवा वाचनालयातून आणून वाचा. पुस्तकांमध्ये केलेली मांडणी पटेलच अशी नसेलही. पण ती नाकारतानाही उठून कानफटात मारावीशीही वाटणार नाही असं आर्जवी, निखळ लेखन आहे. माणूसही तसाच होता. एक भेट झाली होती, पण ती मोरपिशी आठवण असल्यासारखी जपून ठेवली आहे.
या लेखकाच्या दुसऱ्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे हा संकेत फसवा ठरू शकतो. कारण...
पुढच्या संकेतावेळी सांगेन. ;)
सागर
सागर · गुरुवार, 25 Nov 2010 - 08:10 · उत्तर
मला रणजितदांचे बारी वाटले होते
कारण बेरड जमातीवर मराठीत पहिल्यांदा कोणी लिहिले असेल तर ते रणजितदांनी
त्यामुळे जास्त डोके खाजवले सुद्धा नाही.
श्रामो ला विरोपात लिहिल्याप्रमाणे पहिली सुरुवात "परवा राणू बेरडानं " वाचली आणि बेरड जमातीवरची रणजित देसाईंची 'बारी' आठवली. आता त्यातले काही आठवत नाही हा भाग वेगळा ;)
रणजित देसाईंना स्वामीसाठी पुरस्कार मिळाला तो १९६४ साली. पण स्वामी ही त्यांची दुसरी कादंबरी नव्हे. तिसरी होती. बारी नंतर माझा गाव आलेली होती.
मस्त विकेट उडवलीस श्रामो :)
आता मात्र डोक्याला ताण द्यावा लागेल
रोचीन
रोचीन · गुरुवार, 25 Nov 2010 - 08:19 · उत्तर
सांगा!!:)
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · गुरुवार, 25 Nov 2010 - 17:07
हुश्श्श..........ओळखली एकदाची कादंबरी आणि अर्थातच ते लेखक ! व्य.नि.तून बोलणे झाले आहेच.
पण वेचा आहे मात्र चकवा देणारा...अन् मला वाटते सागर यानी ही कादंबरी नक्कीच वाचली असणार, तेव्हा तेही आज नाही तरी उद्या ओळखतीलच.
इन्द्रा
श्रावण मोडक
श्रावण मोडक · गुरुवार, 25 Nov 2010 - 17:15 · उत्तर
अर्थातच, इंद्रांनं ओळखलं! :)
सागर
सागर · गुरुवार, 25 Nov 2010 - 19:34 · उत्तर
इंद्रराज,
वेचा काहीतरी खुणावतो आहे पण अजून तार जुळत नाहिये. पुस्तक जुने असावे असे दिसते आहे. मुख्य म्हणजे हे पुस्तक एवढे दुर्लक्षित करण्याजोगेही नाहीये असे आठवते आहे. पण स्मरणशक्ती दगा देते आहे ;) उद्या परत प्रयत्न करतो. स्मरणशक्तीवर अजून ताण द्यावा लागेल. आत्तातरी आठवत नाहीये :(
सागर
सागर · Fri, 26 Nov 2010 - 11:45 · उत्तर
श्रामो
बर्याच जणांनी उत्तर ओळखले आहे तेव्हा उत्तर देऊन टाक
मी हे पुस्तक बहुतेक वाचले आहे. पण नक्की नाही आठवत.
तेव्हा माझा पास गृहीत धरुन लवकर उत्तर दे
उत्सुकता लागली आहे की कोणते पुस्तक असेन याची. :)
सागर
सागर · Fri, 26 Nov 2010 - 13:28 · उत्तर
सरदेशमुखांची पुस्तके दुर्दैवाने वाचनात नाही आलीत.
अजून काय काय राहिले आहे वाचायचे हेच कळत नाही :(
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Fri, 26 Nov 2010 - 10:24
दिगम्भांनी अपेक्षेप्रमाणे पुस्तक व लेखक ओळखले.
निवांत पोपट यांचा अंदाज चुकला. ऋषिकेषचाही अंदाज चुकला आहे.
नंदन
नंदन · Mon, 29 Nov 2010 - 23:08
'डांगोरा एका नगरीचा' आणि शारदीय चंद्रकळा संग्रही आहेत, पण अजून वाचली नाहीत. (घेतलेली पुस्तकं वाचून व्हायच्या आधीच अजून पुस्तकं घेऊन ठेवण्याचा सोस). आता बखरीची दोन पुस्तकंही मिळवून पाहतो.