- Log in to post comments
"हे बगाऽऽ लढाई सुरू झालीया. हिटलर हे नाव ऐकलंय का? त्यो एका अंगानं चाल करून आलाय त्याला थोपवायचं काम सुरू हाय. आपलं मायबाप सरकार त्यला आडवाय लागल्यात. त्यापायी आपुन सैन्यात शिरायचं. सैन्य भरती झाली न्हाई तर हिटलर थांबायचा न्हाई. मग त्यो आलाच म्हणून समजा! आणि त्यो आला म्हंजे आपल्या टाळूवर पाय देऊन जाणार! त्यला थोपवाय पायजे. त्यला थोपवायचं तर सैन्यात शिराय पायजे. ह्या कामापायीच हे साहेब आल्यात. ते तुम्हाला आता सगळी म्हायती देतील. ती नीट कान देऊन ऐका आणि काय करता हे सांगा."
दादा येवढं बोलले आणि चावडीत आलेल्या रिक्रुट ऑफिसरनं धडाधडा एक भाषण म्हणून दाखवलं. त्यातलं काही थोडं कळलं, काही कळलं नाही. येडबडलेले लोक टकाटका तोंडाकडं बघत राहिले. आणि मग दादाच पुढं झाले. चिमणीगत तोंड करून माणसं ऐकत राहिली आणि थोडकं समजावून सांगितल्यावर पहिल्या झटला त्यांनी केरुनानाकडे बोट करून विचारलं,"केरुनाना, तुमची फासाला लटकलेली मान आम्ही सोडवली का न्हाई? सरकारनं उपकार केलं. त्याची आता परतफेड करायला नको? काय करणार बोला."
बावचळलेला केरुनाना उगच अवतीभवती बघत राहिला आणि धीर करून म्हणाला, "सरकार, मला काय धा पोरं न्हाईत. दोन पोरी आणि दोन पोरं. येवढीच लेकरं पोटाला हैत. त्यातली तुमी मागणार किती आणि मी देणार काय?"
दादा बोलले,"हे बघाऽऽ तुमच्या पोरी हैत त्या घरात ठेवून घ्या. त्या काय सरकार मागत न्हाई. पर दोन पोरातला एक पोरगा द्या की धाडून. एक ठेवून घ्या आणि एक लावून द्या."
तोंड पसरून तो म्हणाला,"आणि मग मला हो काय?"
"काय म्हंजे? अगा ती काय भाजी हाय व्हय? खुडून कोरड्यास करायचं हाय काय त्यांचं रोज?"
"तसं काय न्हाई खरं."
"मग काय तर! एक जवळ बाळगा की."
"पर त्यांचं असं हाय पाटील. दोन पोरं हैत ही गोष्ट खरी पर त्यातला थोरला पोरगा हाय त्यो आत्ता हाताखाली आलाय. तेवढाच की माझा आधार आणि धाकटा अजून हुंबर्यावर बसून मुत्तोय. मग कसं करायचं म्हंता?"
मार्ग दाखवल्यागत करून दादा म्हणाले,"मग असं करा - कुठलीबी दुसरी दोन पोरं द्या मिळवून."
"दुसरी कुठली देऊ हो?"
"उगच सोंग घेऊन बोलू नका केरूनाना. गावात मस्त भीक मागत हिंडत्यात पोरं! कुणाबी म्हाराटोराला गाठा. त्यांच्या आईबाला काय शेपाश्शे रुपय द्यावं लागलं तर द्या. ती पोरंबी रांकेला लागतील आणि तुमचंबी काम होईल. एवढी गोष्ट करायची काय अवघड हाय व्हय?"
गोष्ट अवघड का सोपी याचा विचार करीत केरूनाना उभा राहिला आणि आपल्या मनानंच निर्णय घेऊन दादा साहेबाला म्हणाले,"साहेब इचार करत बसू नगा. टाका दोन पोरं ह्या केरूनानाच्या नावावर. सरकारनं एवढा उपकार त्याच्यावर केलाय. त्याला दोन पोरांची भरती काय अवघड न्हाई." आणि मान वळवून दादा म्हणाले,"केरूनाना, बसा खाली. तुमचं काम झालं. पंधरा दिवसांत दोन पोरं आणून हजर करा म्हंजे झालं!"
मुकाट्यानं केरूनाना खाली बसला आणि आपल्या नजरेनं शोध घेतल्यागत करून दादांनी शंकर देसायाकडं बघितलं. त्याला उभा करून ते म्हणाले,"देसाई, तुमचा काय ब्योत?"
अभिप्राय
यशोधरा
यशोधरा · Sat, 26 Jun 2010 - 18:01
व्यमांच पुस्तक आहे का?
वेदश्री
वेदश्री · Sun, 27 Jun 2010 - 04:56 · उत्तर
व्यमा म्हणजे कोण? व्यंकटेश माडगूळकर का? नाही त्यांचं नाही आहे.
ऋषिकेश
ऋषिकेश · Sun, 27 Jun 2010 - 13:57
शंकर पाटील का?
वेदश्री
वेदश्री · Sun, 27 Jun 2010 - 15:16 · उत्तर
क्या बात है, ऋ! एकदम बरोब्बर!! आता सांग पुस्तक कोणते आहे ते..
ऋषिकेश
ऋषिकेश · Sun, 27 Jun 2010 - 18:41 · उत्तर
नक्की नाहि आठवत.. धिंड किंवा पाटलांची चंची का?
वेदश्री
वेदश्री · Sun, 27 Jun 2010 - 18:47 · उत्तर
और ये आया गल्लत जव्वाब! :)
वेदश्री
वेदश्री · Mon, 5 Jul 2010 - 04:06
उत्तर दिले आहे.