ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ६३

सागर

मजकूर

संकेत १ : हा वेचा एका कथासंग्रहातील आहे. तुलनेने हा वेचा ओळखायला बर्‍यापैकी सोपा आहे. या पुस्तकात स्त्री व्यक्तिरेखा प्रभावीपणे चितारलेल्या आहेत.
संकेत २ : वेच्यात दोन शब्द ठळक केले आहेत. पहिला ठळक केलेला शब्द लेखकाच्या दुसर्‍या एका पुस्तकाच्या नावाकडे दिशानिर्देश करतो आणि दुसरा ठळक शब्द वेचा ज्या पुस्तकातील आहे त्याकडे दिशानिर्देश करतो.
संकेत ३: सदर पुस्तकाच्या लेखकाला त्याच्या दुसर्‍या एका पुस्तकासाठी (सत्तांतर साठी) साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
संकेत ४: वल्ली आणि इंद्रराज पवार यांनी प्रयत्नाअंती लेखक ओळखला आहे - व्यंकटेश माडगूळकर

आता ओळखा मंडळी :)

विजेता मिळाला की उत्तर जाहीर करेन.

विजेता न मिळाल्याने उत्तर जाहीर करत आहे

पुस्तकाचे नावः जांभळाचे दिवस
लेखकः व्यंकटेश माडगूळकर
कथा: बाई (ही सात नंबरची कथा)

वेचा:
------------------------------------------------
मुंबईतील अनेक चाळींप्रमाणे गिरगावात यादववाडीत नाना जातीची, नाना स्वभावांची अनेक माणसे राहतात. चाळीत शिरुन डाव्या हाताला वळले, दोन मजले चढून गेले की ओळीने काही खोल्या आहेत. या खोल्यांसमोर अरुंद अशी गॅलरी आहे. कोळशाची पोती, मोडक्या खुर्च्या, काहीबाही भरुन ठेवलेली खोकी, असले सामान हरेक खोलीसमोर आहे. फक्त सात नंबरच्या खोलीसमोर काहीही नाही. या सगळ्या खोल्यांतून माणसे खच्चून भरलेली आहेत. घामाने, गर्दीने, कामाने उबगलेली ती माणसे एकमेकांवर सारखी ओरडत असतात, चिडत असतात. एकसारखी इकडे तिकडे हलत असतात. फक्त सात नंबरची खोली शांत असते. या सर्वच खोल्यांना नीट उजेड नाही. वारा येण्यासाठी खिडक्या नाहीत. त्यामुळे सर्व खोल्यांची दारे सताड उघडी असतात. दाराशेजारची एकच एक खिडकी उघडी असते. दारावरचे झापड उघडे असते. सात नंबरच्या खोलीचे दार कधी आतून तर कधी बाहेरुन असे सदैव बंद असते! सात नंबरची खिडकी क्वचित् उघडी दिसली तरी जाडसा पडदा तिला असतो. सात नंबरच्या दारावरचे झापड सदैव बंद असते. एवढेच नव्हे तर त्याच्या काचांना काळा कागद लावलेला आहे. अगदी शेवटच्या खोलीशेजारी नळ, न्हाणीघर आहे.
त्यामुळे त्या अरुंद गॅलरीतून सारखी ये-जा चालू असते. साहजिकच माणसे जाता जाता उघड्या दाराकडे चोरटी नजर टाकतात. एक नंबरमधली यादवनानांची बायको पाठमोरी बसून मटण चिरताना दिसते. दोन नंबरमधली गुजराथ्याची बायको वाढताना आणि गुजराथी जेवताना दिसतो. पलिकडे म्हातार्‍या कच्छ्याची तरुण बायको दार उघडे टाकून साडी बदलीत असते. सहा नंबरमधले जोडपे एका पलंगावर पडून मासिक वाचताना दिसते. पण सात नंबरमध्ये कधीही काही दिसत नाही. सात नंबरमध्ये बाई राहतात. गेली सोळा वर्षे त्या या खोलीत राहात आहेत.
------------------------------------------------

अभिप्राय

सागर

सागर · Wed, 29 Dec 2010 - 09:37 · उत्तर

वल्ली यांनी लेखकाचे नाव ओळखले आहे.
आता वेचा ज्यातील आहे ते पुस्तक ओळखा :)

सागर

सागर · गुरुवार, 30 Dec 2010 - 08:34 · उत्तर

बहुतेक मी निवडलेला वेचा योग्य दिसतोय
चांगलाच दिशाभूल करतो आहे ;)

व.पु. नाहीत

वल्ली

वल्ली · गुरुवार, 30 Dec 2010 - 08:41

लेखकाचे नाव ओळखले तरी वेचा मात्र चक्रावणारा आहे हेच खरे. लेखकाच्या असंख्य पुस्तकांमधील कुठल्या पुस्तकातला आहे काहीच कळत नाही.

सागर

सागर · गुरुवार, 30 Dec 2010 - 09:20 · उत्तर

लेखक आहेच एवढा प्रगल्भ की त्याचे खूप पुस्तके वाचनीय आहेत. त्यामुळेच वेचा ओळखणे कठीण आहे :)

सागर

सागर · Mon, 3 Jan 2011 - 09:37

या वेच्याला प्रतिसाद येत नाहियेत तेव्हा उत्तर जाहीर करु का?

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Mon, 3 Jan 2011 - 09:59

सांगा ~ मी 'धार' समजत होतो. पण नसावी, कारण तीत नायिकेचे नाव शालिनी आहे एवढेच आठवते व ही कथाही शहरी जीवनावरच आहे. सागर यानी निवडलेला वेचा गिरगाव चाळीतील वातावरणावरील जरी असला तरी यातील नायिका 'बाई' असल्याने ही कथा वेगळीच असणार.

इन्द्रा

सागर

सागर · Mon, 3 Jan 2011 - 10:03 · उत्तर

उत्तर देतो आहे वर

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Mon, 3 Jan 2011 - 12:26 · उत्तर

"बाई" ने चांगलाच चकवा दिला. पण कथेच्या धाटणीवरून ती बर्‍याच सदस्यांना व.पुं.ची वाटली यात आश्चर्य नाही.

इन्द्रा

सागर

सागर · Mon, 3 Jan 2011 - 12:46

मुंबईतील हे वर्णन थोडे वपु श्टाईल आहे खरे.
आधी मी जांभळाचे दिवस ह्याच कथेतील वेचा देणार होतो, पण म्हटले सारखे जांभूळ जांभूळ वाचून लगेच ओळखता येईल. त्यातल्या त्यात ही 'बाई' मला जास्त भावली. सुरुवातही पूर्ण घुमवणारी होती. थोडी वपु स्टाईल वाटणारी. पण कथासंग्रह अतिशय सुरेख आहे यात शंका नाही. अजून मी सगळ्या कथा नाही वाचलेल्या. पण जांभळाचे दिवस, अनवाणी आणि बाई या ३ कथा वाचल्या आहेत. सुरेखच आहेत त्या सर्व.

स्त्री व्यक्तीरेखांना केंद्रस्थानी ठेवून एवढ्या लहान कथांतून माडगूळकरांनी अतिशय प्रभावीपणे लिहिलेले आहे. नक्की वाचावे असेच हे पुस्तक आहे.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Mon, 3 Jan 2011 - 13:29 · उत्तर

"...स्त्री व्यक्तीरेखांना केंद्रस्थानी ठेवून एवढ्या लहान कथांतून माडगूळकरांनी अतिशय प्रभावीपणे लिहिलेले आहे...."

~ खरंय. तात्यांना प्रामुख्याने महाराष्ट्र ओळखतो ते 'माणदेशी माणसं" आणि "बनगरवाडी" मुळे, जिथे पुरूषप्रधान समाजव्यवस्थेचे प्रामुख्याने चित्रण आहे. पण त्यानी "स्त्री" ला केन्द्रस्थानी ठेवून लिहिलेले (जरी थोडे असले तरी) लेखनही तितकेच लक्षणीय आहे. माडगुळकरांचे "सती" हे पारितोषिक प्राप्त नाटक तर नावावरूनच एका स्त्री वर बेतलेले आहे हे उघडच आहे. (जे माणदेशातीलच एक सत्यकथा आणि ब्रिटिश सैनिकाने सती चाललेल्या तरूण विधवेला वाचवून तिच्याशी लग्न केलेल्या अशा दंतकथेचे मिश्रण आहे....केतन मेहता दिग्दर्शित आमीर खानच्या "मंगल पांडे" चित्रपटात याच दंतकथेचा वापर केला आहे).

इन्द्रा

सागर

सागर · Mon, 3 Jan 2011 - 14:34 · उत्तर

माडगूळकरांच्या लेखनाचे अनेक पैलू आहेत. पण त्यांच्यातील निसर्गप्रेमी जवळपास सर्व लेखनातून जाणवतो हे नक्की. सत्तांतर, नागझिरा ही पुस्तके याची उत्तम उदाहरणे आहेत. मुख्य म्हणजे मानवी भावना आणि त्या देखील कमीत कमी शब्दांत माडगूळकरांनी ह़ळूवारपणे त्यांच्या लेखनातून उभ्या केलेल्या आहेत. म्हणूनच हा लेखक त्याचे वेगळे अस्तित्त्व टिकवून आहे असे म्हटले तर ते चूक नसावे. :)

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · Mon, 3 Jan 2011 - 13:36

वाचलेले नव्हते, त्यामुळे गेस करत बसलो नाही

सागर

सागर · Mon, 3 Jan 2011 - 14:08 · उत्तर

सुंदर आहे माडगूळकरांचे हे पुस्तक

चर्चा प्रकार