ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ६७

वल्ली

मजकूर

श्री. इंद्रराज पवार यांचा वेचा जवळजवळ सुटला असल्याने हा पुढचा वेचा देत आहे.

वेचा:
................
'पण त्या असुरांना त्याचं काय होय? नांव देवाचं, अन् खळगी भरायची यांची !'
असं बुवा अक्षरशः या हिंसेवर तुटून पडले. देवरूशा तें ऐकतच होता. त्याला सगळंच समजत होतं, असं नाहीं. पण आपली स्तुति चालली नाहीं, इतकं तर त्याला कळतचं होतं.
मग तो उडीद मंत्रून कीर्तनाला जमलेल्या श्रोत्यांवर झुगारूं लागला. बुवा म्हणाले,
'बावरूं नका ! असा असा मार सोसायची तुम्हांला संवय आहे. आभाळांतून गारा कोसळूं लागल्या, तर मग काय करता? मुकाट्यानं त्यांचे तडाखे सोसतां, की नाहीं? तेवढा तर कांहीं या उडदांचा मार नाहीं !'
देवरुशा अधिकच पिसाळला. त्यानं शेंदूर माखलेले धोंडे समोर मांडले होते. त्यांच्यासमोर तो ताड ताड आपलं कपाळ आपटूं लागला. त्याचा भगतगण हादरला. किंचाळूं लागला. बुवांनी सगळ्यांना हातानं टाळी आणि मुखानं हरिनाम घ्यायला लावलं. एकच रंग उसळला. इकडे टाळ्यांचा खणखणाट. त्यांत टाळकर्‍यांचा टाळांचा घुळघुळाट. मृदुंगाची धुमाळी ! भरीला सगळे श्रोते वारंवार करीत असलेला 'पुंडलिक वरदा हारि विठ्ठल' हा गजर ! त्या सगळ्या नादापुढे ते किंचाळणं आणि आरडणं बुडून गेलं.
'जय विठ्ठल जय जय विठ्ठल;' असं कीर्तनाच्या शेवटचं भजन उरकून बुवांनी कीर्तन संपवलं. आरती झाली, पुनः एकदा 'पुंडलिक वरदा...' हा सगळं गगन कोंदून टाकणारा गजर. कुस्ती जिंकलेल्या पहिलवानासारखे बुवा मंडपांतून निघाले.
..........................

संकेत १: एका प्रसिद्ध लेखकाची तुलनेने अप्रसिद्ध कादंबरी.
संकेत २: लेखकांनी एकदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले होते.
संकेत ३: लेखकांचा किल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरील कादंबर्‍या लिहिण्यात हातखंडा आहे.
संकेत ४: ह्या कादंबरीत पशुहत्येविरूद्ध एका कीर्तनकार बुवांचा एका देवरुशाबरोबरील संघर्ष चित्रित केला आहे.
संकेत ५: लोणावळा ते कर्जत दरम्यान असलेल्या परिसराची पार्श्वभूमी या कादंबरीला लाभलेली आहे.
संकेत ६: ही एक जोड कादंबरी असून पहिली कादंबरी कोकणच्या पार्श्वभूमीवर आधारीत असून वेच्यातील ही दुसरी
कादंबरी राजमाची, ढाक परिसराशी संबंधित आहे.
संकेत ७: ढाकच्या उत्ताल कड्यातील एका गुहेत चालणार्‍या पशुहत्येविरूद्ध संघर्ष यात चित्रित केला आहे.

सर्वात पहिल्यांदा सागर व आज मणिकर्णिकाने उत्तर बरोबर ओळखले आहे. दोघांचेही अभिनंदन.

कोड्याचे उत्तर आता जाहीर करत आहे.

पुस्तकः लक्ष्मीसेतू / गडदेचा बहिरी (एकाच पुस्तकात २ वेगवेगळ्या कादंबर्‍या आहेत.)
वेच्याची कादंबरी: गडदेचा बहिरी
लेखकः गो. नी. दांडेकर
वेच्याचे पुस्तकातील स्थानः पान नं. ८५

अभिप्राय

सागर

सागर · Fri, 14 Jan 2011 - 07:39

हे पुस्तक वाचले नसावे असे वाटते आहे... सबब पास :(

वेचा उत्कंठावर्धक आहे हे नक्की. या धाग्यावर लक्ष ठेवून आहे

वल्ली

वल्ली · Fri, 14 Jan 2011 - 08:13 · उत्तर

प्रयत्न चालू ठेव. संकेत देईनच इतरांचे प्रतिसाद पाहून. :)

वल्ली

वल्ली · Sat, 15 Jan 2011 - 04:00

अजून काही संकेत दिलेले आहेत. एवढ्यावरून किमान लेखक तर ओळखता आलाच पाहीजे. गरज पडल्यास कादंबरीकडे थेट निर्देश करणारा संकेत देईनच. तरीही कोणी ओळखले नाही तर सोमवारी याचे उत्तर जाहीर करेन.

वल्ली

वल्ली · Sat, 15 Jan 2011 - 07:29

इंद्रराजजी, रोचीन व सागर यांनी लेखक बरोबर ओळखला आहे. त्यांचे अभिनंदन. आता फक्त कादंबरी ओळखणेच बाकी आहे.

वल्ली

वल्ली · Sat, 15 Jan 2011 - 07:47

सागर याचे अभिनंदन. प्रयत्नांती पुस्तक अचूक ओळखलेय त्याने.

सागर

सागर · Sat, 15 Jan 2011 - 07:53 · उत्तर

पुस्तक मी वाचलेले नाहिये तरी ओळखू शकलो त्याला काही कारणे आहेत ती वल्लीला सांगितली आहेतच.
संकेतामुळे लेखक सहजपणे ओळखता आला. आणि या लेखकाची निम्मी पुस्तके माझ्याकडे आहेत त्यामुळे फोकस फक्त नसलेल्या पुस्तकांवर केंद्रित करायचा होता मला त्यामुळेही थोडी मदत झाली. स्मरणशक्तीवर थोडा ताण दिला म्हणून ओळखता आले एवढेच ;)

वल्ली

वल्ली · Sat, 15 Jan 2011 - 10:00

इतरांसाठी आणखी संकेत देतो आहे.

वल्ली

वल्ली · Sun, 16 Jan 2011 - 08:56

कादंबरीकडे थेट दिशा दाखवणारा अजून एक ठळक संकेत दिला आहे. तेवढ्यानेही उत्तर नाही मिळाले तर सोमवारी स़काळी उत्तर जाहीर करेन.

वल्ली

वल्ली · Mon, 17 Jan 2011 - 04:16

वेचा थोडा अवघडच होता असे दिसत होते. :). सदस्यांनी संकेतांनुसार व्यनिद्वारे भरपूर तर्क लढवूनही उत्तर मिळणे थोडे अवघडच होते. कारण एकतर हे पुस्तक फार दुर्मिळ आहे. कुठेही मिळत नाही. शिवाय गूगलिंग करूनही हे पुस्तक मिळणे तसे अवघडच. पुस्तकविश्वच्या यादीतही हे पुस्तक अ‍ॅड नाही.
पण हे पुस्तक कदाचित काही जुन्या वाचनांलयांमध्ये मिळू शकते.
मला हे पुस्तक-लक्ष्मीसेतू/गडदेचा बहिरी तसेच या पुस्तकाबरोबरच तांबडफुटी तसेच श्री.नांची कलंदरही पुण्याच्या मॅजेस्टी़क बुक स्टॉलमध्ये जीर्ण अवस्थेत मिळाली.
गडदेचा बहिरीचा परिचय सवडीनुसार देईनच. पण पुस्तक यदाकदाचित कुठे मिळालेच तर जरूर वाचाच.

चर्चा प्रकार