- Log in to post comments
उत्तर जाहीर करतो आहे.
या कोड्याचे निर्विवाद आणि एकमेव विजेते आहेत ऋषिकेष. ऋ तुझे अभिनंदन.
वल्लीने प्रयत्नाअंती लेखक ओळखला पण पुस्तक मात्र नाही ओळखता आले.
कोड्याचे उत्तरः
पुस्तकाचे नावः स्वराज्याची स्थापना
लेखकः नाथमाधव
आवृत्ती : पुनर्मुद्रण २००५ मधील
वेच्याचे पुस्तकातील स्थानः पान क्र. ११९ आणि १२० (प्रकरणः किल्ल्याचा भेद)
संकेताची गरज कदाचित पडेन,
सर्वर डाऊन झाल्यामुळे संकेत पुसटले ;) पुन्हा देतोय
संकेत १: सदर पुस्तकाच्या लेखकाच्या नावाने एक पुरस्कार दिला जातो व हा पुरस्कार एका प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीला मिळाला आहे.
संकेत २: वेच्यात एक ओळ वाढवलेली आहे. त्यावरुन अंदाज यावा
संकेत ३: हे पुस्तक ऐतिहासिक आहे आणि या पुस्तकाचे अलिकडेच पुनर्मुद्रण होऊन उपलब्ध आहे. तसेच या लेखकाची बाकीची पुस्तकेही उपलब्ध आहेत.
संकेत ४: (शेवटचा संकेत) या लेखकाची ही ऐतिहासिक पुस्तक मालिका, पुस्तकांच्या नावामुळेही आणि दर्जामुळेही त्या काळात बरीच गाजली होती आणि आजही ग्रंथालयांतून या पुस्तक मालिकेला मागणी असतेच. आता सहज ओळखता यावे :)
या वेच्याचे विजेते आहेत ऋषिकेश :)
ऋ ने आधी लेखक मग पुस्तक बरोब्बर ओळखले तेही पहिल्याच प्रयत्नात.
अभिनंदन :)
वेचा:
--------------------------------------
किंचित काळोख होण्याच्या सुमारास ते दोघे मित्र एका लहानशा टेकाडाजवळ आले. वाघ्याने झटकन त्या टेकाडाला प्रदक्षिणा घातली; परंतु त्याला पाहिजे होते ते तिकडे दिसले नाही. वाघ्या बाजूच्या झाडीत जेव्हा शोध करु लागला तेव्हा तो काय शोधीत असावा हे पाहण्याकरिता धनाजी पुढे झाला. तो जवळच त्याला पेटलेल्या दारुचा वास येऊ लागला. म्हणून तो आजूबाजूला पाहू लागला. ते टेकाड काळ्या कठीण दगडाचे असून एका ठिकाणी तुटलेले होते आणि तेथे बरीच मोठी खाच पडून आजूबाजूला दगडाच्या बारीक ठिकर्या पसरलेल्या त्याच्या दृष्टीस पडल्या. आपण थोड्या वेळापूर्वी दारुच्या स्फोटाचा जो आवाज ऐकला, तो स्फोट येथेच झाला असावा, असा आता त्याने तर्क केला. वाघ्या कोठे गेला हे पाहण्याकरिता तो झाडीत शिरला; परंतु वाघ्या कोठेच दिसेना. झाडीत काळोख असल्यामुळे आपल्या जखमी पायाला काटे खुपतील म्हणून आत शिरण्याचे त्याला धैर्य होईना. त्याने 'वाघ्या-वाघ्या!' अशा दोन-चारदा हाका मारल्या. बराच वेळ झाला, काळोखही जास्त पडू लागला असे पाहून झाडीच्या बाजूने धनाजी पुढे निघाला. तेथून थोड्या अंतरावर एक झोपडी दिसत होती. तो विचारमग्न स्थितीत हळूहळू झोपडीकडे चालला असता वाघ्या त्या झोपडीतून बाहेर पडलेला त्याच्या दृष्टीस पडला. धनाजी त्याला हाक मारणार तोच वाघ्याच्या मागून एक मनुष्यही झोपडीबाहेर आला. काळोखामुळे तो मनुष्य कोण आहेहे धनाजीला चटकन ओळखता आले नाही; परंतु झोपडीतून बाहेर येणार्या मनुष्याची दृष्टी धनाजीच्या दृष्टीपेक्षा अत्यंत तीव्र होती. त्याने 'धनाजी!' म्हणून हाक मारताच आवाजावरुन ती व्यक्ती कोण आहे हे धनाजीने तत्काळ ओळखले.
"महाराज आपण!" आश्चर्याने स्वाभाविक उद्गार धनाजीच्या मुखातून बाहेर पडले.
--------------------------------------
अभिप्राय
वल्ली
वल्ली · Tue, 18 Jan 2011 - 04:02
स़ंकेत हवाच सागर. पुस्तक वाचलेले नाही हे तर उघडच आहे. बहुतेक गुढकथा दिसतेय.
सागर
सागर · Tue, 18 Jan 2011 - 07:58
ऋ ने पहिल्याच प्रयत्नात लेखक ओळखला तेव्हा पुस्तकही तो ओळखेल असे वाटते आहे :)
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 18 Jan 2011 - 09:19 · उत्तर
वेचा पुसटसा आठवत आहे. पुस्तकाचा अंदाज व्यनीतून पाठवला आहे
सागर
सागर · Tue, 18 Jan 2011 - 11:08 · उत्तर
ऋ,
अभिनंदन
पहिल्याच प्रयत्नात उत्तर अचूक ओळखले आहेस :)
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Tue, 18 Jan 2011 - 18:04
परवाच्या वल्ली यांच्या 'देवरुशा' ने माझी चांगलीच ससेहोलपट केल्याने मी सागर यांच्या धनाजीरावांच्या मागे जाणार नाही कारण वेच्यावरून लागलीच लक्षात आले की आपण हे पुस्तक वाचलेले नाही.
ऋषिकेशचे अभिनंदन.....ग्रेट !
इन्द्रा
सागर
सागर · Tue, 18 Jan 2011 - 18:17 · उत्तर
हे लेखक असे आहेत की यांची पुस्तके न वाचलेला विरळाच असेन.
तेव्हा इंद्रराज, तुमच्यासाठी व इतर लोकांना तत्काळ काहीतरी क्लिक होईन असा संकेत देतो आहे
तो पाहून पुन्हा प्रयत्न करा ;)
वल्ली
वल्ली · Wed, 19 Jan 2011 - 04:38
अंधारात तीर मारलेला आहे. बघ उत्तर बरोबर आहे का?
सागर
सागर · Wed, 19 Jan 2011 - 07:06 · उत्तर
योग्य तीर निवडा भात्यातून मगच निशाण्यावर बसू शकेन ;)
शेवटचा संकेत देतो आहे. त्यावरुन लगेच लक्षात येईल
सागर
सागर · Wed, 19 Jan 2011 - 07:36 · उत्तर
प्रयत्ना अंती वल्लीने लेखक ओळखला आहे.
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 19 Jan 2011 - 09:58
सागरला व्यनीत लिहिले होते. आता उत्तर घोषित झाल्याने इथे लिहितो.
मला हे पुस्तक आवडलं होतंच त्याहीपेक्षा मला त्यात त्यावेळचा उभारलेला काळ.. शिवाय तेव्हाच्या प्रसिद्ध व्यक्तींनाही माणूस म्हणून दाखवलेलं फार आवडलं.. या पुस्तकात अगदी महाराजही (बर्याचदा)फिल्मी डायलॉग वगैरे न बोलता जे बोलतात ते तसं खरंच बोलले असावेत असं वाटु लागतं.
ज्यानी वाचलं नसेल त्यांनी जरूर वाचावं
मणिकर्णिका
मणिकर्णिका · गुरुवार, 20 Jan 2011 - 01:26
मी नव्हतं वाचलेलं. नाथमाधवांचं फक्त 'वीरधवल' वाचलेय- इयता १०वीत. :(
सागर
सागर · गुरुवार, 20 Jan 2011 - 07:34 · उत्तर
वीरधवल हे माझं नाथमाधवांनी लिहिलेल्या पुस्तकांत सगळ्यात आवडतं पुस्तक आहे.
जरी ते विदेशी पुस्तकावर आधारित असले तरी त्यातील भारतीय बाज अस्सल वाटतो व एक वेगळी स्वतंत्र कादंबरीच वाटते. वीरधवल वाचताना कुठेही असे वाटत नाही की आपण अनुवाद वाचतो आहोत
इयत्ता १०वीत म्हणजे आता काहीच आठवत नसणार :)
पुन्हा वीरधवल वाचले तर पुन्हा थरार, अत्भुत, विस्मय, रहस्य, आवेग, गूढ या सर्व रसांचा अनुभव मिळेल याची खात्री आहे.