ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ६९

सागर

मजकूर

हे पुस्तक ज्यांनी वाचले त्यांच्या मनात बसले. त्यामुळे संकेत एवढ्यात देत नाहिये. गरज पडली तर देईन

संकेत १ ला:हे पुस्तक म्हणजे एक संग्रह आहे. मग तो लेखसंग्रह आहे का कथासंग्रह हे ज्याचे त्याने ठरवावे :)
संकेत दुसरा : या पुस्तकाच्या लेखिका खूप नावाजलेल्या आहेत
संकेत ३रा आणि शेवटचा : वेच्यात सुरुवातीला आणि शेवटी एकेक ओळ वाढवली आहे. ठळकवलेली पण आहे :)

बहुतेक सर्वांनी पर्व आणि युगान्त वर थेट निर्देश केला होता पण हे पुस्तक वेगळे आहे. शोध घेणार्‍यांची दिशा मात्र योग्य आहे ( आणि यशोधराला या वेच्याच्या स्पर्धेत प्रवेश नाही...हा अजून एक संकेत ;) )
यशोधराला धन्यवाद. तिने हे सुंदर पुस्तक मला भेट म्हणून दिलेले आहे म्हणून तिला या वेच्याच्या स्पर्धेत प्रवेश नव्हता ;)

उत्तर उद्या जाहीर करेन :)

वेच्याचे उत्तरः इरावतीबाईंच्या युगान्त पुढे कोणाची मजल गेली नाही सबब या वेच्याला विजेता नाही.
पुस्तकाचे नाव : भोवरा
लेखिका : इरावती कर्वे
प्रकरण : ७ वे
लेखाचे नाव : द्वारका
वेच्याचे पुस्तकातील स्थान : पान क्रमांक ८१

वेचा:
---------------------
जैनांची कथा महाभारत कथेहून निराळी आहे ती अशी: द्वारकेचा नाश मद्यपि यादवांमुळे द्वैपायन करील, असे नेमिनाथांचे भविष्य ऐकून कृष्ण-बलरामांनी यादवांच्या हाती लागू नये म्हणून सर्व मद्य द्वारकेबाहेरच्या एका रानातील गुहेत ठेवले होते. शिकारीवर गेलेल्या राजपुत्रांच्या हाती ते लागले. अनेक वर्षांची ती मुरलेली उत्कृष्ट दारु पिऊन झिंगलेल्या कुमारांनी द्वैपायन ऋषीला लाथाबुक्क्यांनी मारले व त्याने हा अपमान मनात धरुन, एक दिवस संधी साधून द्वारकेला आग लावून दिली व सर्व दरवाजे रोखून धरले. कृष्ण-बलरामांना कोणालाही वाचवता येईना. निदान वसुदेव-देवकीला तरी वाचवावे म्हणून त्यांनी त्यांना रथात घातले पण जनावरे पुढे पाऊल टाकीनात, तेव्हा स्वतः दोघांनी तो रथ ओढीत नेला तो आस निखळला. दाराशी यमाप्रमाणे द्वैपायन होता. त्याने परत निक्षून सांगितले की, तुम्ही दोघे जा, मी इतरांना जाऊ देणार नाही. वसुदेवानेही काकुळतीने सांगितले, तुम्ही जा; निदान तुम्ही तरी जिवंत आहात असे समजून आम्ही सुखाने मरु. शहर धाडधाड जळत होते. धूर आकाशापर्यंत भिडला होता, रस्त्यारस्त्यांतून बायका, मुले व पुरुष 'कृष्णा, आम्हाला सोडीव, रामा, आम्हांला सोडीव', असा आक्रोश करीत होते.
कृष्ण तेथेच मरावे असा निश्चय करीत होता, पण वसुदेवाच्या आज्ञेमुळे भ्रातृवत्सल बलरामाने त्याला ओढीत बाहेर नेले. श्रमाने क्लांत होऊन झाडाखाली निजलेल्या कृष्णाला त्याच्याच एका बांधवाने हरिण समजून मारले; व स्वतःची नगरी जळत असलेली पाहात, दैवाला शिव्याशाप देत कृष्ण परलोकवासी होऊन नरकात गेला. अशी ही कथा आहे.

---------------------

अभिप्राय

वल्ली

वल्ली · Sat, 29 Jan 2011 - 10:07

वेचा गरगरवणारा आहे रे मित्रा. संकेत आवश्यकच. शैली तर अजिबात ओळखीची वाटत नाही. प्रसंगही मूळ महाभारताशी न जुळणारा. तरी एक प्रयत्न केलाय. व्यनी चेकव.

सागर

सागर · Sat, 29 Jan 2011 - 10:21 · उत्तर

नाहीतर हे पुस्तक काहीजण वेच्यातील काही ओळींवरुनच ओळखतील इतके ते पुस्तक सुंदर आहे.

मृत्युन्जय

मृत्युन्जय · Sat, 29 Jan 2011 - 10:54

अवघड आहे. पण ब्यनि केला आहे. खरे बोलायचे तर पक्के नाही. अंदाज आहे. कारण पुस्तक फार वर्षापुर्वी वाचले आहे.

सागर

सागर · Sat, 29 Jan 2011 - 19:06 · उत्तर

वल्ली ने देखील प्रथमदर्शनी तोच अंदाज केला होता :)

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Sun, 30 Jan 2011 - 07:45

पुस्तकाचे नाव माहिती नाही. परंतु ह्याच्या लेखिका अरुणा ढेरे आहेत का? त्यांचा कृष्णविषयक बराच अभ्यास आहे व त्यांची पुस्तकेसुध्दा प्रसिध्द आहेत. उदा. कृष्णकिनारा.

सागर

सागर · Sun, 30 Jan 2011 - 08:20 · उत्तर

चित्रा,

अरुणा ढेरेंचे कृष्णावर लेखन आहेच. पण हे ते पुस्तक नाहीये :)

सागर

सागर · Sun, 30 Jan 2011 - 08:27

प्रयत्न छान होता या तिघांचा. पण उत्तर चुकले.
अजून थोडा प्रयत्न केला तर ओळखता येईल असे वाटते :)

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Sun, 30 Jan 2011 - 08:49

दुर्गाबाई भागवत ह्यांच्या व्यासपर्व ह्या पुस्तकातील वेचा आहे का?

सागर

सागर · Sun, 30 Jan 2011 - 09:16 · उत्तर

व्यासपर्व नाहिये चित्रा.

चित्रा उत्तरे कृपया मला व्यक्तिगत निरोपातून कळवावीत म्हणजे तुमचे उत्तर बरोबर असेन तर बाकीच्यांना कळणार नाही. मी किंवा कोडे देणारा जेव्हा उत्तर जाहीर करेन त्यावेळी तुमचे नाव जाहीर केले जाते. तेव्हा उत्तर विरोपाने कळवावे ही विनंती :)

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Sun, 30 Jan 2011 - 09:28

ही सूचना पुढच्यावेळी नक्की लक्षात ठेवेन. धन्यवाद!
`पुवि' वर नवीन असल्याने असे होत आहे.

सागर

सागर · Sun, 30 Jan 2011 - 09:54 · उत्तर

चित्रा,

पुवि वर तुम्ही नवीन आहात तुम्ही म्हणूनच सांगितले होते :)
धन्यवाद,

वल्ली

वल्ली · Fri, 4 Feb 2011 - 10:57

ओळखू शकलो नाही यात काहीच नवल नाही. अवघडच वेचा होता.

यशोधरा

यशोधरा · Mon, 7 Feb 2011 - 07:52

>आणि यशोधराला या वेच्याच्या स्पर्धेत प्रवेश नाही...हा अजून एक संकेत >>

LOL! काहीही! हा संकेत कोणाला समजणार? :D

सागर

सागर · Mon, 7 Feb 2011 - 08:18 · उत्तर

कारण माझ्या पुण्याच्या भेटीत यशोधराकडून भेट मिळालेले 'भोवरा' असा उल्लेख येथे पुवि वर पुस्तक खरेदीच्या धाग्यावर केलेला होता ;)

चर्चा प्रकार