ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ७

वेदश्री

मजकूर

मंडळी भोजनांत दंग झाली होती. पण पंडित?

तो भुकेनें कळवळला होता, पण भुकेपेक्षां वैनीसाहेबांच्या तिखट बोलण्यामुळें त्याच्या डोक्यांत उठलेले तिडीक त्याला अधिक दु:सह वाटत होती. हातांतला पाण्याचा गडवा तेथेंच ठेवून तो मागील दारीं गेला आणि इतका वेळ आवरून धरलेल्या अश्रूंना त्यानें वाट मोकळी करून दिली.

पहिली पंगत झाली. बायकाही जेवावयास बसल्या. त्यांचीं जेवणें अर्धी झालीं असतील, तेव्हां वैनीसाहेबांना पंडितची आठवण झाली. त्यांनीं आचार्‍याला म्हटलें,

"भटजी, ते पंडितमहाराज गिळायचे आहेत ना अजून? मांडा त्यांचा ठाव तिथें उखळाजवळ."

पंडित येऊन पानावर बसला. न जेवतांच निघून जावें असें त्याच्या मनांत दहादा तरी आलें असेल, पण त्या प्रत्येक वेळीं आक्कांची ताकीद आठवून त्यानें आपलें मन आवरलें होतें.

पंडित खालीं मान घालून जेवत होता. वैनीसाहेबांच्या बोलण्याला अद्यापि खळ पडलेला नव्हता. तो एकेक घास पोटांत कोंबीत होता आणि वैनीसाहेबांचा एकेक कडूतिखट शब्द त्याच्या कानांत घुसत होता.

"काय सांगायचं तुम्हांला मास्तरीणबाई? असलीं कार्टी जन्माला येणं पाप आहे पाप. हो, पापच नव्हे तर काय? ह्यांचे पायगुण धड असते तर वर्साच्या आंत आईबापांची वाट कशाला लागली असती? काशाक्कासारखी धर्माची माउली भेटली म्हणून हे दिवस तरी बघताहेत. पण तिला तरी कुठाय् सुख? शिकेल सवरेल, मोठ्ठा होईल, म्हातारपणीं आपल्याला चांगले दिवस दाखवील, म्हणून बिचारी आशा धरून बसलीय्. आपल्याला अनुकूलता नाहीं म्हणून आमच्यासारख्या थोरांमोठ्यांपुढे तोंड वेंगाडतीय्. तिच्याकडे बघून मीं ह्याला वार दिला. नाहीं तर ह्या दगडाची काय लायकी लागून गेलीय्?"

"पण मला नव्वल वाटतं वैनीसाहेब." मास्तरीणबाईंनीही त्यांच्या सुरांत सूर मिळवला,"ह्याला नक्को काय आतां अक्कल यायला? चांगला पंध्रा वर्सांचा घोडा व्हायला आलाय् आतां हा! आपण लोकांच्या जिवावर जगतों तर अभ्यास नीट मन लावून करावा, दरसाल पास व्हावं हें ह्याला कळूं नये का? पण मेलं काहींच कसं हें नाहीं?"

"तुमचा गोंदा देखील नापासच झालाय् मास्तरीणकाकू, नि तो दुसर्‍यांदा नापास झालाय् तिसरींत!" थरथरत्या सुरांत पंडित बोलला. त्यासरशीं वैनीसाहेब उसळल्या,

"बघा बघा कशा मिरच्या झोंबताहेत मेल्याच्या नाकाला. गोविंदा नापास झाला म्हणून तूं होणार होय रे? तूं मी करायला लाज नाहीं का वाटत? मस्तवाल नाहीं तर! गोविंदा दोनदा सोडून तीनदा नापास झाला तरी त्याला पोसायला मास्तर समर्थ आहेत. तुझ्यासारखी भीक नाहीं मागावी लागत त्याला. तुला आमच्यासारखीं माणसं खादीला घालतात तें तुझ्या बापाचं रीण आम्हांला फेडायचंय् म्हणून नव्हे. तूं शिकून पास झालं पाहिजेस म्हणून. नापास होऊन लोकांच्या अन्नाला काळ होण्यापरीस शेण भरावं पोटांत...."

वैनीसाहेबांनी असें म्हणायला आणि आचार्‍याने पंडितच्या पानांत जिलब्या वाढायला एक गांठ पडली. पोटांत शेण भरावं, ह्या शब्दांनी पंडितच्या सार्‍या सहनशीलतेचा चक्काचूर झाला होता. पानांत पडलेल्या जिलब्या हातांत घेऊन तो ताडकन् उठला आणि त्या बैनीसाहेबांच्या अंगावर भिरकावून ओरडला.

"घ्या. घेऊन बसा तुमचं हे जेवण. मला तुमचं जेवण नको नि तुमचीं असलीं बोलणी नकोत. उपाशी मेलेलं बरं असलं जेवण्यापेक्षां."

संताप आणि दु:ख ह्यांनी थरथरत उपाशी पोटानें आणि खरकट्या हातानें वैनीसाहेबांच्या घराबाहेर धावला. आपला सदरा टोपी घ्यायचीही शुद्ध त्याला राहिली नव्हती.

अभिप्राय

अदिती

अदिती · Mon, 5 Jul 2010 - 05:51

हे पुस्तकाचे नाव आहे का? ना. धों. ताम्हनकरांच्या खडकावरला अंकुर या पुस्तकातील कथानकाशी या वेच्याचे साम्य आहे पण मला खात्रीने तसे म्हणता येणार नाही कारण ते पुस्तक वाचून अनेक वर्षे झाली आहेत.

--अदिती

वाचक

वाचक · Mon, 5 Jul 2010 - 06:09

हे बरोबर आहे, "ना. धो. ताम्हनकर" ह्यांचेच पुस्तक आहे आहे. हाच 'पंडित' पुढे मोठा गायक होतो असे पुसटसे आठवते. 'गोट्या' ही प्रसिद्ध सिरिअल ज्या पुस्तकावर आधारित आहे तेच हे ताम्हनकर.

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 5 Jul 2010 - 07:20

हो. नाधों चे खडकावरला अंकूरच बहुदा

वेदश्री

वेदश्री · Mon, 5 Jul 2010 - 08:25

अदि, वाचक आणि ऋ,

तुमा सर्वायचे उत्तर आक्षी बरुबर हाय. :)

चर्चा प्रकार