ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ७२

वल्ली

मजकूर

वेचा:

कशीबशी वाट संपते...आम्ही हॉस्टेलवर परत येतो-
हॉस्टेलची इमारत किल्ल्यासारखी...मधल्या काळात कुणाची तरी गढीच होती म्हणे ती. उंच निमुळती इमारत...काळ्याशार दगडांनी बांधलेली...समोर हिरवळ...मागे समुद्र. लाटांचा आवाज या शांत प्रहरी ऐकू येतो आहे. समुद्र आज खवळल्यासारखा वाटतो आहे -
एकदाचे आम्ही हॉस्टेलजवळ पोहोचतो. हिरवळीवरूनच हॉस्टेलकडे नजर टाकतो.
तो काळाकभिन्न किल्ला शांत झोपला आहे. फक्त एकाच खिडकीत उजेड -
खिडकीत एक उंच आकृती आमच्याकडे पाहत स्थिर उभी...चादर पांघरलेली, पांढुरक्या चेहर्‍याची.
क्षणभर आमच्या काळजाचा ठोका चुकतो.
मिलिंद मला बिलगतो.
'घाबरतोस काय वेड्या?' मी त्याला म्हणतो ---'तो नामदेव आहे!'

नामदेव काटकुळा, उंच आणि गोरटेला आहे. जराशी थंडी पडली किंवा पावसामुळे हवेत गारवा आला तरी तो अंगावर चादर पांघरून घेतो --बाकी आमची वाट पाहत त्याला इतकावेळ जागत राहण्याचे कारण काय? दुसरा कोणी असता तर केव्हाच गाढ झोपी गेला असता.
मी मिलिंदला म्हणतो, 'तुला भीती वाटत असेल, तर तू माझ्याच खोलीत कां नाही झोपत?'
मिलिंद तयार झालासा वाटतो; पण मग म्हणतो, 'नको. मी आमच्याच खोलीत झोपेन. नामदेव वाट पहात जागा राहिला आहे...'

संकेत १. हा गूढकथासंग्रह असून येथे पुस्तकाबरोबरच कथेचे नावसुद्धा अपेक्षित आहे.
संकेत २. या प्रकारचे साहित्य मराठीत तसे दुय्यमच(समीक्षकांच्या दृष्टीकोनातून) समजले जाते.
संकेत ३. या कथेचे लेखक चतुरस्त्र समजले जातात. कथा, कादंबरी, नाटके यांजबरोबर लहान मुलांसाठीही यांनी विपुल लेखन केले आहे. तरीही वेच्यातील कथेच्या प्रकारात त्यांचा हातखंडा समजला जातो.
संकेत ४. ठळक केलेल्या वाक्यामध्येच कथेचे नाव तेही एकाच शब्दाचे खुबीने लपलेले आहे.
शेवटचा संकेतः कथेचे नाव आणि कथेचा आशयही ब्रॅम स्टोकरने निर्माण केलेल्या एका जगप्रसिद्ध काल्पनिक पात्रावर आधारीत आहे. मराठीत त्या पात्राला पंढरीनाथ सावंतांनी अनुवादित करून आणले होते. अर्थात वेच्यातील कथा आणि मूळ पात्राची कथा सर्वस्वी भिन्न.
एक विनंती: उत्तर कृपया गूगलून पाहू नये. कारण ते लगेचच मिळेल. :)

सागरचे अभिनंदन. वेच्याचा पहिला विजेता. :)

वेच्याचे उत्तर जाहीर करत आहे.

पुस्तकः संभ्रमाच्या लाटा
लेखक: रत्नाकर मतकरी
कथा: ड्रॅक्युला
वेच्याचे पुस्तकातील स्थानः पान नं. १०२

अभिप्राय

सागर

सागर · गुरुवार, 17 Feb 2011 - 16:08

वाचले नाहीये त्यामुळे विकेट उडाली पहिल्याच वाचनात.
पुस्तक शोधण्याचा प्रयत्न करणारच आहे.
माझे कथासंग्रहाचे वाचन जीए आणि सुशि सोडले तर जवळजवळ नाहीच
त्यामुळे ओळखणे अवघडच आहे. पण क्लू लागला की विरोप करतो

वल्ली

वल्ली · गुरुवार, 17 Feb 2011 - 16:22 · उत्तर

उद्या सकाळी दुसरा संकेत देईनच. तोवर प्रयत्न चालू ठेव. :) लेखकाची शैली ओळखणे इतके अवघड जाउ नये.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Fri, 18 Feb 2011 - 05:34

शैलीवरून लेखक तर ओळखता आला असे वाटते....संग्रहही सापडेल, पण आता नेमकी ती कथा शोधायची म्हणजे शेरलॉक होम्सचे ते जगप्रसिद्ध भिंग आणावे लागेल असे वाटते....पण प्रयत्न करतो.

इन्द्रा

वल्ली

वल्ली · Fri, 18 Feb 2011 - 05:42 · उत्तर

तुम्हाला ओळखता येइलच इंद्रराज.
खुद्द कथेच्या नावाचा संकेत वेच्यातच लपलाय. फक्त भिंग घेउनच शोधता येईल.:)

वल्ली

वल्ली · Fri, 18 Feb 2011 - 08:51

सागरने लेखक अचूक ओळखला आहे. आता फक्त कथा व कथासंग्रह ओळखणे इतकेच बाकी आहे. ;)

सागर

सागर · Fri, 18 Feb 2011 - 10:00 · उत्तर

वल्ली मित्रा,

आधी पुस्तक ओळखतो मग कथेचा शोध घेतो.
अंदाज विरोपवला आहे. बघ बरोबर आहे का.
पुस्तक नक्कीच नाही वाचलेले हे.
याच लेखकाचे दुसरे पुस्तक आहे ते पण अजून माझ्या वाचायच्या रांगेत आहे ;)

वल्ली

वल्ली · Fri, 18 Feb 2011 - 10:32 · उत्तर

एकदा लेखक ओळखलास की तुझ्यासारख्या दिग्गज वाचकाला पुस्तक ओळखणे अगदीच सोपे. ते तू लगेच ओळखून दाखवूनही दिलेस. आता फक्त कथा ओळखलीस की कोड्याचा पहिला विजेता तूच होशील.
कथेच्या संकेतासाठी काही शब्द ठळक करत आहे.

दिगम्भांनीही लेखक ओळखला आहे.

सागर

सागर · Fri, 18 Feb 2011 - 10:59 · उत्तर

पुस्तक ओळखले तरी कथा ओळखता येणे अवघड दिसते आहे कारण हे पुस्तक वाचलेले नाहिये
संकेतावरुन प्रयत्न करतोच आहे. पण एकंदरीत पुस्तक ओळखूनही माझे गड आला पण सिंह गेला असेच होणार असे दिसतेय ;)

सागर

सागर · Fri, 18 Feb 2011 - 12:23

एक विनंती: उत्तर कृपया गूगलून पाहू नये. कारण ते लगेचच मिळेल.

असे सांगितल्यावर कोण ऐकेल होय? हा अजून एक सोपा संकेत झाला.

पण मी न गूगलता ओळखले ते पात्र. कारण त्या पात्राची मोहिनीच जबरदस्त आहे. मी सावंतांनी अनुवाद केलेली कादंबरी वाचली आहे. एकदम भन्नाट आहे :)

वल्ली

वल्ली · Fri, 18 Feb 2011 - 12:31 · उत्तर

पण कथेत हे पात्र फक्त आशयासाठीच वापरले आहे. मूळ कादंबरी आणि या कथेचा फक्त पात्रनिवडीपुरताच संबंध.

सागर

सागर · Sun, 20 Feb 2011 - 06:55 · उत्तर

मी ओळखले ते पण खूप कोलांट्याउड्या घेऊन. मुळात मतकरींची जास्त पुस्तके वाचनात नाही आलीत. कबंध आणि खेकडाच माहिती होते.
या वेच्याने चांगलेच दमवले.

वल्लीने खूप चांगले आणि स्पष्ट संकेत दिले होते त्या आधारेच मला ओळखता आले.

हे पुस्तक वाचायच्या यादीत अ‍ॅडवले आहे
मतकरींच्या एका सुरेख पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद मित्रा :)

वल्ली

वल्ली · Sun, 20 Feb 2011 - 07:08 · उत्तर

मतकरींनी असंख्य गूढकथा लिहिलेल्या आहेत. त्यापैकी बर्‍याच जणांना काही ठळकच माहिती आहेत. उदा. खेकडा, रंगांधळा, जेवणावळ, फाशी बखळ, काकबळी इ. त्यांच्या गूढकथा अजोडच आहेत. ड्रॅक्युला ही पण त्यांची जबरदस्त कथा पण तुलनेने कमी माहित असलेली. त्यामुळे वेच्याने तसे दमवणे क्रमप्राप्तच होते. पण तरीही सागरने लेखक व पुस्तकही तसे लवकरच ओळखले फक्त कथेचा शोध घेण्यासाठी त्याला जरा जास्तच परिश्रम करावे लागले. :)

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Sun, 20 Feb 2011 - 07:43 · उत्तर

संकेतावरून लेखकाचे नाव तर ओळखले होतेच (आणि तसे श्री.वल्ली याना कळविलेदेखील...) पण 'खेकडा' आणि 'निजधाम' हे दोन संग्रह वगळता मतकरींना भेटलो ते विविध दिवाळी अंकातून.

मात्र त्यांची प्रथम ओळख झाली ती "जेवणावळ" मुळे. ही श्री.राम आणि सौ.छाय कोलारकरांच्या "सर्वोत्कृष्ट मराठी कथा' संग्रहात वाचायला मिळाली होती आणि अक्षरशः थरारून गेलो होतो....विशेषत: कथेच्या शेवटाने. बाप रे ! पुढे कित्येक दिवस ज्या ज्या वेळी कोणत्या ना कोणत्या प्रसंगाने या भागातील 'माही (जत्रा)' च्या जेवणासाठी [जे मटणाचेच असते] जाण्याचा प्रसंग आला आणि पंगतीला बसले की 'जेवणावळ' कथेची आठवण यायची...इतकी ती भारून टाकते. टिपिकल मतकरी !

इन्द्रा

वल्ली

वल्ली · Sun, 20 Feb 2011 - 10:58 · उत्तर

जेवणावळ तर जबरदस्तच आहे.
पण हेडस्टडी, मंदा पाटणकरची गोष्ट, टोक टोक पक्षी, मला विक्रम दिसतो, लपाछपी, हातमोजे, चिखल, बाकी राहिला काळोख, ड्रॅक्युला, म्हणे कोण मागे आले याही आणि अजून कित्येकही थरारून टाकतात.

चर्चा प्रकार