ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ७४

सागर

मजकूर

संकेत : गरज पडल्यास उद्या देईन. :)

संकेताची गरज शक्यतो पडणार नाही असा अंदाज होताच. पण वेचा ओला असतानाच चित्रा यांनी विक्रमी वेळेत पुस्तक नेमके ओळखले आहे. चित्राजी अभिनंदन :)

या पुस्तकाच्या निमित्ताने दिग्गज वाचक श्रावण मोडक यांची वेचा कोड्यात बर्‍याच दिवसांनी उपस्थिती जाणवली त्याबद्दल खूप आनंद झाला.
चित्रा यांच्यानंतर श्रामोने हे पुस्तक ओळखले.
त्यानंतर वल्ली याने आणि अर्थातच दिग्गज वाचक इंद्रराज पवार यांनी ही ओळखले.

या पुस्तकाबद्दल वेगळा संकेत द्यायला लागेल असे मलाही वाटले नव्हते.
तसे रणांगण न वाचलेल्यांचा आणि सुहास शिरवळकर यांची योगायोग ही कथा वाचणार्‍यांची हॅर्टा या नावामुळे चांगलीच फसगत झाली असती असा हा वेचा होता... कारण हॅर्टा आणि कथानायक यांची प्रेमकथा एका जहाजावरच सुहास शिरवळकरांनी फुलवलेली आहे. खरे तर ती विस्मयकथा आहे :)

असो उत्तर जाहीर करतो आहे

पुस्तकाचे नाव : रणांगण ( या कादंबरीची ही १४वी आवृत्ती)
लेखक : विश्राम बेडेकर ( यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या आत्मचरित्रासाठी)
वेच्याचे पुस्तकातील स्थान : पान क्रमांक : ४३

म.टा.ने गौरवलेल्या अंतर्नाद मासिकात सर्वोत्कृष्ट पुस्तकांच्या यादीत हे आहे. हा पहा दुवा

वेचा :
---------------------

रात्री हॅर्टाशी मैत्री झाली. त्या अनुभवाने मन जागे होईल असे संध्याकाळी कुणी म्हटले असते तर मला खरे वाटले नसते. मी त्याला वेडा, अननुभवी म्हणून सोडून दिले असते! पण प्रत्यय निराळा आला. मागे काही झालेच नाही अशा आवेगाने शरीर पुन्हा जिवंत झाले. मन चैतन्याने भारले गेले. कात टाकल्यावर नाग तरुण होतो, की तारुण्याची नवीन उसळी आल्यावर तो कात टाकतो हे मला माहित नाही. पण काल हॅर्टाच्या मिठीत न्हाऊन निघालेलं हे शरीर; त्यावरचे किल्मिष झडून गेल्यासारखे वाटते आहे. तिचाही बेभानपणा असीम होता. आमच्या मागे ते जोडपे उभे होते. मी तिकडे सहज नजर वळवली.
त्याबरोबर माझी हनुवटी धरुन तिने माझे तोंड फिरविले.
मी विचारले, "का?"
तेव्हा स्निग्ध स्वरात ती म्हणाली. "तू तिकडे बघू नकोस. बिचारी सुखात दंग आहेत. पाहिलंस तर चोरट्यासारखं होईल त्यांना."
मी मुद्दाम म्हटले, "दंग आहेत म्हणजे काय? "
तिने माझे खांदे धरुन मला फिरवले. आपणही समोर वळली. आम्ही दोघेही बघू लागलो. कठडा कार्डबोर्डासारखा चित्रातला दिसत होता. पलीकडे अथांग निळेपणा. त्या तरुणाने पोरीला जवळ घेतले होते. त्याच्या मिठीत तिचे भान हरपले. ...
...
वरती कप्तानाच्या केबिनमध्ये लहानशी घंटा वाजली. क्षणमात्र सर्चलाईटचा प्रकाश डेकवर पडला. ...
---------------------

अभिप्राय

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Tue, 22 Feb 2011 - 14:19

कोणत्याही संकेताची गरज नाहीच.............

सागर

सागर · Tue, 22 Feb 2011 - 15:03 · उत्तर

चित्रा,

तुम्ही चांगल्याच दर्दी वाचक आहात हे या निमित्ताने लक्षात आले.

वेचा ओला असतानाच विक्रमी वेळेत पुस्तक बरोब्बर ओळखल्याबद्दल अभिनंदन

या कोड्याच्या पहिल्या विजेत्या तुम्हीच आहात :)

वल्ली

वल्ली · Tue, 22 Feb 2011 - 16:34

अगदीच सोपे कोडे घातलेस यावेळी. पुस्तक वाचलेले नसूनही सहजी ओळखता आले. संकेताची गरज नाही असे म्हणतोस पण वेच्यातच कितीतरी संकेत दिले आहेस.
हे पुस्तक अकारण गाजलेय असेही बरेच जण म्हणत असतात.

सागर

सागर · Tue, 22 Feb 2011 - 19:15 · उत्तर

हे पुस्तक अकारण गाजलेय असेही बरेच जण म्हणत असतात

अकारण गाजलेल्या पुस्तकाच्या १४ आवृत्त्या निघत नाहीत मित्रा :)
लोकांना काय बोलायचे ते बोलू देत. आपण मात्र या सुंदर साहित्यकृतीचा आनंद घ्यायचा :)

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Wed, 23 Feb 2011 - 05:44

सागर....एक सुशीप्रेमी म्हणून त्यांची 'हॅर्टा' मनी ठेवून तुम्ही वेचा निवडला असता तरी सर्वप्रथम येथील सर्व पुस्तकप्रेमींच्या नजरेसमोर विश्राम बेडेकरांची नायिका आली असती, हेही तितकेच खरे.

तुम्ही १९८६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या १५० पुस्तकांबाबतचा म.टा. यादीचा दुवा दिला आहे, पण त्यानंतरही (म्हणजे आता २५ वर्षे झाली...) ज्या ज्या संस्थेने, रेडिओ, मॅगेझिन्स, चर्चा मंडळाने अशा पद्धतीच्या 'उत्कृष्ट' पुस्तकांच्या याद्या (मग त्या दहाच्या असोत, वीसच्या वा पन्नासच्या...) प्रकाशित केल्या, त्या सर्वांमध्ये 'रणांगण' ची वर्णी लागलेली असतेच. हे देखील या कलाकृतीचे वैशिष्ट्य मानले जावे.

(अवांतर : इंग्रजी साहित्यात हा मान "अ टेल ऑफ टू सिटीज्" या चार्ल्स डिकन्सच्या कादंबरीला मिळतो...)

इन्द्रा

दिगम्भा

दिगम्भा · Wed, 23 Feb 2011 - 06:49

ज्या विषयात १०० % मार्क मिळू शकले असते त्या विषयाची परीक्षा केव्हा होऊन गेली हेच कळले नाही.
(आणि आम्ही सुशि वाचलेच नसल्याने तोही गोंधळ झाला नसता.)
असो.
- दिगम्भा

सागर

सागर · Wed, 23 Feb 2011 - 10:21 · उत्तर

हे पुस्तक फारच जबरदस्त मोहिनी घालणारे असावे

वेचा संध्याकाळी दिला आणि रात्रीपर्यंत ४ जणांनी ओळखले पण.
माझ्यामते हा आतापर्यंतचा सर्वात अल्पकाळात आणि जास्त वाचकांनी ओळखलेला वेचा असावा :)

पुढच्या ७५ व्या ( रौप्यमहोत्सवी ? का हीरकमहोत्सवी? ) वेच्याची कुणीतरी जबाबदारी घ्यावी ही विनंती :)

वल्ली

वल्ली · Wed, 23 Feb 2011 - 08:40

यावेळी अगदीच फुसके कोडे घालून आमचा वेचा शोधण्यातल्या आनंद एका झटक्यातच हिरावून घेतल्याने सागरचा णिषेध. :)
आता एक अवघड वेचा देण्याची त्याला पेनल्टी. ;)

सागर

सागर · Wed, 23 Feb 2011 - 10:22 · उत्तर

पुढचा अवघड वेचा देण्याची जबाबदारी तूच घे रे मित्रा.
पुढचा वेचा ७५ वा आणि मानाचा वेचा आहे.

मी शनिवारपासून १ आठवडा नसेन. पण मी सुटीवरुन आल्यावर मात्र माझे पुढचे वेचे तोंडचे पाणी पळवतील एवढे अवघड असतील याची खात्री देतो मंडळी :)

चर्चा प्रकार