ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ८

वेदश्री

मजकूर

मी साळूला विचारले,"हे बघ साळू, तुझ्या माहितीतली सगळ्यांत जुनी लढाई कोणती?"

"राम-रावणांची किंवा कौरव-पांडवांची असेल. त्यांतल्या त्यात राम-रावणांची अगोदरची असेल; कारण कौरव-पांडवांच्या युद्धात कृष्ण हजर होता आणि कृष्णावतार रामावताराच्या नंतर झाला." साळू एखाद्या विद्वानाचा आव आणून म्हणाली.

"दॅट्स ए गुड गर्ल! राम आणि रावण यांचं युद्ध सीतेच्या योगानं लागलं. रावणानं सीतेला पळवून नेलं. तिला परत आणण्यासाठी रावणाशी युद्ध करणं रामाला भाग पडलं. रामाला रावणाची लंका जिंकायची नव्हती, किंवा रावणाच्या मनात रामाची अयोध्या घ्यायची नव्हती. रामाच्या काळात लोकसंख्येच्या मानानं जमीन भरपूर होती, म्हणून जमिनीच्या मालकीकरता हा तंटा उपस्थित झाला नव्हता. एका स्त्रीच्या स्वामित्वासाठी हे युद्ध सुरू झालं." मी म्हणालो.

"उगीच काहीच्या काही कल्पना पोरीच्या डोक्यात भरवून देऊ नको. त्या वेळी जमिनी मुबलक होत्या नि बायकांचा तुटवडा पडला होता असं का तुझं म्हणणं आहे? रावणाच्या अंतःपुरात शेकडो स्त्रिया होत्या, एका सीतेची उणीव त्याला भासली असेल असं मला शक्य वाटत नाही." घैसासमामा मध्येच म्हणाले.

मी भयंकर रागावलो आणि म्हणालो,"मामा, मघाशीच मी तुम्हाला बजावलं की माझ्या बोलण्यात तोंड घालू नका म्हणून. आता पुन्हा बोलाल तर हे जाड पुस्तक तुमच्या डोक्यावर येऊन आदळल्याशिवाय राहणार नाही. ग्रीस देशातील ट्रायची लढाई अशीच हेलन नावाच्या सुंदर तरूण स्त्रीकरिता झाली होती. आपल्या इकडे चितोडच्या पद्मिनीसाठी घनघोर युद्ध झालं होतं. सारांश, स्त्रिया जरी संख्येने कमी नसल्या तरी त्यांत सुंदर स्त्रियांची संख्या फारच कमी असते आणि त्यांचा ताबा मिळवण्याकरिता पुरूष आपापसात झगडतात."

आमचे मामा सुधारक असल्याने नेहमी स्त्रियांची कड घेतात. ते म्हणाले,"स्त्रियांत सुंदर स्त्री क्वचितच असते म्हणजे पुरूष तेवढे मदनाचे पुतळे अन् बायका सगळ्या कुब्जा असं तुझं म्हणणं आहे की काय?" मामांनी आक्षेप घेतला आणि आमच्या बोलण्यात तोंड घातल्याबद्दल त्यांच्या डोक्यावर ज्ञानकोशाची प्रत आदळून मी आपली प्रतिज्ञा पुरी केली. कर्णार्जुन युद्धातल्या शरविनिमयाप्रमाणे मामांनी ज्ञानकोशाचा 'तपून ते धमन्या' विभाग माझ्या अंगावर उलटा फेकला.

मामाने पुस्तक फेकून मारले म्हणून भाच्याला रागावण्याचा अधिकार पोचत नाही, या कारणाने तिकडे दुर्लक्ष करून मी साळूला म्हणालो," साळू, आपण आपलं काम करू या. रामरावणाचं युद्ध स्त्रीकरिता झालं असलं तरी त्यानंतरचं कौरवपांडवांचं युद्ध स्त्रीकरिता झालं नसून जमिनीकरिता झालं असं दिसतं; कारण कृष्णाबरोबर युधिष्ठिराने प्रतिपक्षाला काय निरोप दिला ते सांगशील काय साळू?"

"होऽऽऽ! आम्हांला निदान पाच गाव तरी द्या, म्हणजे आम्ही सुखानं आपला निर्वाह करू, पण दुर्योधन म्हणाला, पाच गाव तर राहू द्या, पण सुईच्या अग्रावर राहील इतकी मातीसुद्धा आम्ही तुला देणार नाही. हे उत्तर मिळताच कौरव-पांडवांच्या लढाईला तोंड लागलं." साळूने प्रौढासारखे उत्तर दिले.

घैसासमामांच्याने स्वस्थ राहवेना. ते म्हणाले,"ती उंटाच्या पाठीवरची शेवटली काडी होती आप्पा. कौरव-पांडवांचं वितुष्ट द्रौपदीमुळेच भडकलं. दु:शासनानं तिची भर सभेत विटंबना केली तेव्हाच कौरवांच्या नाशाच्या आणाशपथा भीमार्जुनांनी घेतल्या. त्यावरून चक्क दिसतं की हे युद्ध जमिनीसाठी नव्हतं." पुनः मामांनी तोंड घातल्यामुळे मी चिडलो आणि ओरडलो,"हे बघा बालमानसशास्त्रवाले! माझं म्हणणं एकसारखं खोडून काढून तुम्ही साळूच्या मनात वडिलांविषयी अवहेलना मात्र उत्पन्न करीत आहां. साळू मला विचारायला आली आहे; तुम्हाला नाही."

"डॅम इट, तू चुकीच्या कल्पना साळूच्या मनात भरवून देतो आहेस. शिक्षणक्षेत्रातला तज्ज्ञ म्हणून माझाही अधिकार तुला मान्य केला पाहिजे. मी म्हणतो, जगात मुलं व्हायला सर्वस्वी नालायक कोणी असेल तर त्यांचे आई-बाप हेच होत; कारण शाळेत मिळणार्‍या मुलांच्या ज्ञानात माती कालवायचं पाप तेच करीत असतात. बरं साळू, दुर्योधनानं पाच गावं पांडवांना अग्रहार म्हणून दिली असती तर भारतीय युद्ध थांबलं असतं का?" मामांनी विचारले.

अभिप्राय

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 5 Jul 2010 - 09:34

नाहि हे पुस्तक वाचलेलं नाहि तरी संवद मोठे रोचक आहेत.
फार मजा आली वाचून. त्यातही "तपून ते धमन्या' विभाग माझ्या अंगावर उलटा फेकला." हे वाक्यतर फारच खुसखुशीत!

वाचक

वाचक · Tue, 6 Jul 2010 - 16:29

ह्यांच्या 'चिमणराव' मालिकेतले हे पुस्तक असावे, पुन्हा चिमणराव वगैरे.

वेदश्री

वेदश्री · Tue, 6 Jul 2010 - 16:31 · उत्तर

छ्या! मला वाटलं होतं की हे कोडं कोणालाच सुटणार नाही पण लेखक तर काढलासुद्धा की राव शोधून. :( पुस्तक सांगा आता कोणतंय ते... :)

टग्या

टग्या · Tue, 6 Jul 2010 - 16:45 · उत्तर

हे त्या लेखाचे नाव. लेखक चिं. वि. जोशी. पुस्तकाबद्दल नक्की खात्री नाही, पण बहुतेक 'वायफळांचा मळा'?

वेदश्री

वेदश्री · Tue, 6 Jul 2010 - 16:53 · उत्तर

साष्टांग प्रणिपात, टग्याराव! लेखाचे नाव बरोब्बर पण पुस्तकाचे मात्र चुकलात. चुकून चुकलात का? वायफळांचा मळा मी नाही वाचलेले.. वाचावे लागेल आता. चिंवि माझे एकदम फेवरीट. :)

टग्या

टग्या · Tue, 6 Jul 2010 - 17:36 · उत्तर

'वायफळांचा मळा' नाही??? मग 'एरंडाचे गुर्‍हाळ' असावे का?

(लेख शाळेत असतानाच्या दिवसांत वाचला होता. तोही मूळ पुस्तकातून नव्हे, तर 'हास्यचिंतामणी' नावाच्या चिं.विं.च्या विविध लेखनाच्या 'एक साठवण'-छाप संग्रहात. लेख चिमणराव-मालिकेतील कोणत्याही पुस्तकातला नाही, असे वाटते. (शंभर टक्के खात्री नाही.) चिं. वि. शेवटचे वाचल्याला आता य वर्षे लोटल्यामुळे लेख आणि पुस्तके यांचा मेळ आता नीट जमत नाही.)

(अवांतरः मग 'कंपॉझिटरचा सूड' 'वायफळांच्या मळ्या'तला का?)

वेदश्री

वेदश्री · Tue, 6 Jul 2010 - 19:59 · उत्तर

तुम्ही उत्तर (किमान मला जे अपेक्षित होते ते) सांगितले आहे पण अप्रत्यक्षपणे! 'हास्य चिंतामणी' हे पुस्तक मला माहिती आहे आणि त्यातूनच हा उतारा मी दिला होता.

वायफळांचा मळा आणि एरंडाचे गुर्‍हाळ वाचायची खूप इच्छा होतेय आता. मलाही चिंवि वाचून बरीच वर्षे झाली होती पण परवा पुस्तकांची आवरावर करताना हे पुस्तक निघाले आणि आवरावर राहिली बाजुलाच.. पसार्‍यात बैठक मारून पुस्तक वाचून काढलं परत एकदा. बौद्धीक विवाह, युद्धाला तोंड कसे फुटते वाचून तर अक्षरशः हहडोपा झालं माझं. मजा आली. तुम्ही मात्र कमाल केलीत हां.. स्मरणशक्तीची दाद द्यावी तितकी कमीच आहे तुमच्या. :) कोड्योत्तरांच्या या आखाड्यात तुमचे जंगी आगमन आधीच झाले असले तरीही माझ्यातर्फे स्वागत!

बाय द वे, कंपॉझिटरचा सूड किमान हास्य चिंतामणीत तरी नाहीये.

टग्या

टग्या · Tue, 6 Jul 2010 - 20:39 · उत्तर

> बौद्धीक विवाह, युद्धाला तोंड कसे फुटते वाचून तर अक्षरशः हहडोपा झालं माझं.

'बौद्धिक विवाह' म्हणजे, प्रोफेसर काय-बरे-नाव-त्यांचे (विसरलो!) अगोदरचे एक लग्न असताना दुसरे (दिघ्यांच्या गुलाबबरोबर* का? नक्की आठवत नाही.) करू पाहत असतात ('बौद्धिक' कारणांसाठी - आणि पुरतेच - म्हणजे अगोदरच्या बायकोची बौद्धिक पातळी यथायथाच, त्यामुळे प्रोफेसरमजकुरांच्या 'बौद्धिक गरजा' भागत नसल्याकारणाने त्या भागवण्यापुरतेच), मग ते मोडण्याची कामगिरी चिमणराव-गुंड्याभाऊंवर येऊन पडते, मग मध्ये कोठेतरी (कायद्यातील पळवाट म्हणून) ते (जेथे नोकरी करत असतात आणि जेथे द्विभार्याप्रतिबंधक कायदा लागू असतो) त्या बडोदा संस्थानात लग्न करण्याऐवजी (बडोदा संस्थानातल्याच) रेसिडेन्सीच्या हद्दीत (कारण ब्रिटिश हिंदुस्थानात असा कायदा तोपर्यंत बहुधा आलेला नसावा.) लग्न करण्याचे ठरवतात, त्यालाही उपस्थितांपैकी कोणीतरी 'पण तुम्ही बडोदा संस्थानाच्या नोकरीत आहात, त्यावर गदा येऊ शकेल' अशी प्रतिधमकी देते, मग गुंड्याभाऊ 'एवीतेवी जर बौद्धिकच लग्न करायचे म्हणता, तर मग माझ्याशी का करत नाही' असेही आर्ग्युमेंट फेकतो, आणि शेवटी मग लग्न मोडते आणि उपस्थितांपैकीच कोणीतरी (बहुतेक प्रोफेसरमजकुरांचा मित्र) गुलाबला तेथल्यातेथे मागणे घालतो, वगैरे वगैरे, तीच गोष्ट ना? छानच आहे. (आता फारशी आठवत नसली तरी.)

> बाय द वे, कंपॉझिटरचा सूड किमान हास्य चिंतामणीत तरी नाहीये.
बरोबर. पण मुळात कोठल्या पुस्तकात आहे, तेही नीटसे आठवत नाही. बहुतेक 'मळ्या'तच पण.
==========================================================
*की प्रोफेसरमजकुरांचे आडनाव दिघे आणि गुलाब त्यांची पहिली बायको? माझा काहीतरी गोंधळ होत आहे. पण मग प्रोफेसरमजकुरांच्या (होऊ घातलेल्या) दुसर्‍या बायकोचे नाव काय?

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · Tue, 6 Jul 2010 - 21:43 · उत्तर

हे बौद्धिक लग्न प्रकरण निवडक गुड्यांभाउ मधे किंवा चौथे चिमणराव मधे वाचल्या सारखे वाटते...
बाकी कंपॉझिटरचा सूड पाल्हाळ मधे आहे का???

वेदश्री

वेदश्री · Wed, 7 Jul 2010 - 06:15 · उत्तर

> प्रोफेसर काय-बरे-नाव-त्यांचे (विसरलो!)

प्रोफेसर दिघे!

>की प्रोफेसरमजकुरांचे आडनाव दिघे आणि गुलाब त्यांची पहिली बायको?

हो. अग्गदी बरोब्बर.

> पण मग प्रोफेसरमजकुरांच्या (होऊ घातलेल्या) दुसर्‍या बायकोचे नाव काय?

सुमन... त्यांची शिष्या!

> अगोदरचे एक लग्न असताना दुसरे (दिघ्यांच्या गुलाबबरोबर* का? नक्की आठवत नाही.) करू पाहत असतात ('बौद्धिक' कारणांसाठी - आणि पुरतेच - म्हणजे अगोदरच्या बायकोची बौद्धिक पातळी यथायथाच, त्यामुळे प्रोफेसरमजकुरांच्या 'बौद्धिक गरजा' भागत नसल्याकारणाने त्या भागवण्यापुरतेच),

हो. हो. बाकीच्या चूल आणि मूल बाबतीत आपण अत्यंत सुखी आहोत म्हणे.. ५ मुलं झालेली असून ६वे प्रोसेस मध्ये असते ना!

>मग गुंड्याभाऊ 'एवीतेवी जर बौद्धिकच लग्न करायचे म्हणता, तर मग माझ्याशी का करत नाही' असेही आर्ग्युमेंट फेकतो,

हा तर अगदी सॉल्लिड शॉट आहे. हसण्याची परमावधी होते.. चक्क चिंविंच्या काळात असा डायलॉग म्हणजे खल्लास!

>आणि शेवटी मग लग्न मोडते आणि उपस्थितांपैकीच कोणीतरी (बहुतेक प्रोफेसरमजकुरांचा मित्र)

नरेश. :)

>तीच गोष्ट ना?

डिट्टो तीच!

>(आता फारशी आठवत नसली तरी.)
आता अजून काय आठवायचंय??!!!!!!

बौद्धिक विवाह वाचून मला अगदी बूमरॅंगची आठवण झाली. पण हे बूमरँग नक्की कोणाचे ते आठवेना.. वपु ना हो?

टग्या

टग्या · Wed, 7 Jul 2010 - 17:30 · उत्तर

>> पण मग प्रोफेसरमजकुरांच्या (होऊ घातलेल्या) दुसर्‍या बायकोचे नाव काय?
>सुमन... त्यांची शिष्या!

धन्यवाद!

>>आणि शेवटी मग लग्न मोडते आणि उपस्थितांपैकीच कोणीतरी (बहुतेक प्रोफेसरमजकुरांचा मित्र)
>नरेश. Smile

पुन्हा धन्यवाद!

>>मग गुंड्याभाऊ 'एवीतेवी जर बौद्धिकच लग्न करायचे म्हणता, तर मग माझ्याशी का करत नाही' असेही आर्ग्युमेंट फेकतो,
>हा तर अगदी सॉल्लिड शॉट आहे. हसण्याची परमावधी होते.. चक्क चिंविंच्या काळात असा डायलॉग म्हणजे खल्लास!

हो, पण... चिं.विं.च्या काळात असा संवाद असायला काय हरकत आहे? नाहीतरी गुंड्याभाऊने हे गंभीरपणे म्हटलेले नाही. उलट 'बौद्धिक गरजांसाठी दुसरे लग्न करणे हे हास्यास्पद आहे (त्याकरिता गुंड्याभाऊशी - म्हणजे एका पुरुषाशी - लग्न करण्याइतकेच)' असाच गुंड्याभाऊचा एकंदर सूर आहे. यात कोणत्याही प्रकारे 'गे राइट्स'ची 'एंडॉर्समेंट' नाही. (उलट असलीच तर 'गे राइट्स'ची नाही तरी 'गे प्रवृत्ती'ची अप्रत्यक्ष खिल्ली म्हणता येईल.) त्यामुळे मला तरी असे विधान काळानुरूप वाटते.

उलट असे विधान हे गुंड्याभाऊच्या 'कॅरेक्टरा'स साजेसेच आहे. त्या दुसर्‍या गोष्टीत (नाव विसरलो!) नाही, गुंड्याभाऊ गाडी चालवायला शिकत असताना एकदा वेगमर्यादा ओलांडल्याबद्दल त्याला कोर्टात जायला लागते, तर तो आपल्यावरचा चाळीसच्या (चूभूद्याघ्या) वेगाने जाण्याचा आरोप अमान्य करतो? का, तर म्हणे 'मी चाळीसच्या (चूभूद्याघ्या) वेगाने जात नव्हतो. मी साठच्या (पुन्हा चूभूद्याघ्या) वेगाने जात होतो.'

मात्र 'बौद्धिक विवाहा'तच जेव्हा अखेरीस नरेश (धन्यवाद) सुमनला (धन्यवाद) मागणे घालतो (आणि ती हो म्हणते!), तेव्हा नरेशचा एक उपस्थित मित्र त्याला 'लकी डॉग' म्हणून संबोधतो, त्याला नरेश 'मला लकी डॉग म्हणालास त्याबद्दल हरकत नाही, पण त्यावरून माझ्या सुमनला काही म्हणालास तर ते चालणार नाही हां!' अशा स्वरूपाचे जे काही उत्तर देतो, ते त्या काळचे शिष्टाचार लक्षात घेता (निदान छापण्याकरिता तरी) थोडे धाडसी वाटले. (निदान मला तरी. कदाचित तसे नसेलसुद्धा.)

असो.

> बौद्धिक विवाह वाचून मला अगदी बूमरॅंगची आठवण झाली. पण हे बूमरँग नक्की कोणाचे ते आठवेना.. वपु ना हो?

कल्पना नाही. 'बूमरँग' वाचलेली नाही, आणि वपुही फारसे वाचलेले नाहीत. क्षमस्व.

वेदश्री

वेदश्री · Wed, 7 Jul 2010 - 17:50 · उत्तर

>हो, पण... चिं.विं.च्या काळात असा संवाद असायला काय हरकत आहे?

हरकत काहीच नाही. अपार कौतुक वाटले मलातर.

>(उलट असलीच तर 'गे राइट्स'ची नाही तरी 'गे प्रवृत्ती'ची अप्रत्यक्ष खिल्ली म्हणता येईल.)

असाच काहिसा अर्थ मला अभिप्रेत होता.

>'बूमरँग' वाचलेली नाही,

वपुंची आहे की नाही ही कथा याबद्दल खातरजमा अजूनतरी करता आलेली नाही मला पण ही कथा मात्र 'मस्ट रीड' आहे. बायकोला घरातल्या कामांमधून सवड काढून नवर्‍याबरोबर बाहेर फिरायला जायला वेळ नाही म्हणून खास तेवढ्या कारणासाठी दुसरे लग्न करण्याचा प्रस्ताव या कथेचा कथानायक बायकोसमोर ठेवतो. तीही अगदी गांभिर्याने त्याचे सर्व म्हणणे ऐकून घेऊन त्यावर साधकबाधक चर्चा करताकरता 'तुम्ही फक्त बाहेरची कामे करता. मला घरात साथ देईल असे कोणीच नाही. दुसरा नवरा आला तर मला घरात मदत करू शकेल तो. त्यामुळे तुम्हाला दुसर्‍या बायकोची गरज असण्यापेक्षा मलाच दुसर्‍या नवर्‍याची गरज आहे." असा पवित्रा इतका चपखल घेते की त्यात खोडायला कुठलाच मुद्दा नवरोबांना मिळत नाही आणि मग स्वतः फेकलेले शस्त्र बूमरँग होऊन आपल्यावरच उलटताना पाहून 'मित्र बोलावतोय वाटतं!' असं म्हणत गॅलरीकडे पळतो आणि बायको नेहमीप्रमाणे पुढच्या स्वयंपाकाच्या तयारीसाठी स्वैपाकघरात जाते!

टग्या

टग्या · Tue, 6 Jul 2010 - 20:50 · उत्तर

बाय द वे, 'हास्यचिंतामणी'च्या प्रस्तावनेतील चिं.विं.नी केलेले विनोदाचे विवेचन रोचक आहे. (आता माझ्या पूर्णपणे विस्मरणात गेलेले असले तरी.)

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 6 Jul 2010 - 21:22

वा! टग्यारावांच्या स्मरणशक्तीला सलाम! :)

बाकी उपक्रमावरून गायबलेले "टग्या" तुम्हीच का?
असाल/नसाल.. पुविवर स्वागत आहे.. आता वरच्या स्मरणशक्तीच्या प्रयोगानंतर तुमच्याकडूनही काहि छान पुस्तकांची माहिती /परिचय येईल ही अपेक्षा

चर्चा प्रकार