- Log in to post comments
आता मात्र मास्तरांनी दम खाल्ला नाही. उलटे असूनही ते सरळ चालत आले. हातात छडी घेउन आले आणि दातीखाती येउन त्यांनी सपासप छड्या ओढल्या. अंगावर जसे वळ उमटू लागले तसा मी केकाटू लागलो. जागच्या जागीच नाचू लागलो...डोके किंचित उतरले. ठणकणारी पाठ आणि हात दाबून धरीत 'अग आई ग' करून मी पळालो आणि सगळ्या वर्गातनं पळत सुटलो. मी कुठे पळतो आहे ते माझे मलाच कळत नव्हते. त्यामुळे तिघाचौघांच्या पाट्यांवर पाय देउन त्या निकामी केल्या. एकदोन दौती सांडल्या आणि काहींचे कपडे रंगीत केले. काही जणांना पालथे पाडले आणि काहींना त्यांच्या उरावर बसवले. मास्तरही माझ्या पाठीमागे पळत होते. त्यांच्या पायांमधून दोनदा पळालो आणि एकदा त्यांनाच खोडा घातला. शेवटी धबेलदिशी फळ्यावर जाउन आदळलो आणि सापडलो. नाकातला पातळ प्रकार फड्यावर जिकडेतिकडे झाला. डोके मात्र एकदम सणकले. थोडेसे नीट दिसू लागले.
मास्तरांनी बकोटीला धरून मला उभे केले. त्याबरोबर मी एक गुच्ची त्यांना अशी ठेवून दिली की ते एकदम किंचाळले. मग तोंड लालभडक करून त्यांनी खनदिशी अशी थोबाडीत लगावली की, तशा अंधारातही माझ्या डोळ्यांसमोर एकदम तारे चमकले. मग एकामागून एक त्यांनी अशा कानसुलात लगावल्या की यंव ! मी एकदम ठिकाणावर आलो.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
संकेत देण्याची आवश्यकता वाटत नाही इतकी ही कथा सुपरिचीत आहे. अर्थात गरज भासल्यास देईनच.
इतरांसाठी संकेत १: हा एक विनोदी कथासंग्रह असून मला कथेचे नाव अपेक्षित आहे. हीच कथा किमान २ ते ३ वेगवेगळ्या कथासंग्रहात प्रसिद्ध झाली आहे त्यामुळे कुठल्याही एका संग्रहाचे नाव चालेल.
संकेत २. या लेखकाचे नाव घेतल्यावर ज्या काही कथा पटकन डोळ्यांसमोर येतात, त्यात ही कथा असतेच असते.
संकेत ३: लेखकांचा ग्रामीण जीवनावर विनोदी कथा लिहिण्याचा हातखंडा आहे. ग्रामीण विनोद पण ग्राम्य नसलेला हे त्यांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. लेखकाने कथाकथनाचे कार्यक्रम पण बरेच केलेले आहेत.
संकेत ४. नकळत गांजा खाउन आलेल्या विद्यार्थ्याने वर्गात घातलेला गोंधळ व नंतर तोच गांजा नकळतच पोटात गेल्याने मास्तरांच्या उडालेल्या गोंधळाचे खुमासदार चित्रीकरण यात केलेले आहे.
मृत्युंजय आणि स्पिन डॉक्टर यांचे अभिनंदन. संकेत न देताही त्यांनी पुस्तक व कथा अचूक ओळखली आहे. पाठोपाठ देवेंद्र प्रभुणे यांनी पण उत्तर अचूक ओळखले आहे. सागरचेही अभिनंदन. त्याने चिकाटीने वेच्याचा पाठपुरावा करून उत्तर शोधण्यात यश मिळवले. :)
वेच्याचे उत्तर आता जाहीर करत आहे.
पुस्तक -मिरासदारी (यात मिरासदारांच्या गाजलेल्या निवडक कथांचे संकलन आहे.)
कथा: माझ्या बापाची पेंड
लेखक - द. मा. मिरासदार
प्रकाशक-कॉन्टीनेंटल प्रकाशन
वेच्याचे पुस्तकातील स्थान - पान. नं २७३
मूळ पुस्तकः माझ्या बापाची पेंड (मौज प्रकाशन)
आता हेच पुस्तक परत मेहतांकडूनही प्रकाशित झाले आहे.
अभिप्राय
वल्ली
वल्ली · Wed, 23 Mar 2011 - 04:16
इतरांसाठी संकेत वर दिलेले आहेतच. त्यावरून तरी पुस्तक ओळखणे फारसे अवघड जाउ नये.
सागर
सागर · Wed, 23 Mar 2011 - 08:06
कथासंग्रह माझा अशक्त प्रांत आहे :(
त्यातही विनोदी लेखन करणारे मोजकेच लोक आहेत. वाचले असले तरी आठवत नाही तेव्हा माझा पास
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Wed, 23 Mar 2011 - 08:09
विनोदी कथासंग्रह...........
नाही ब्वा!!!!!
माझाही पासच..............
वल्ली
वल्ली · Wed, 23 Mar 2011 - 08:24
जास्तीचे संकेत आता दिलेले आहेत. यावरून तरी कथेचे नाव सुचायला हरकत नाही.
अजून एक संकेत येथेच देतो- ही बहुधा लेखकाची पहिली कथा आहे. व मूळ कथासंग्रहाचे नावही कथेवरूनच आहे.
माझ्याकडे असलेल्या कथासंग्रहाचे नाव मात्र वेगळे आहे.
वल्ली
वल्ली · Wed, 23 Mar 2011 - 08:51
मिरासदारांची ही एक अत्यंत गाजलेली विनोदी कथा. पेंड्या खायची सवय असलेला विद्यार्थी खिशात पेंड्या भरून चघळत चघळत शाळेत जातो. पोलीसांपासून लपवण्यासाठी त्या पेंड्यांमध्येच गांजा लपवलेला आहे हे ठाउक नसल्याने त्यामुळे झिंगलेल्या विद्यार्थ्याने शाळेत घातलेल्या गोंधळाचे व मास्तरांनी त्या विद्यार्थ्याला पकडून त्याच्या खिशातील पेंड्या जप्त करून त्या आवडीने स्वत:ही चघळल्यामुळे पुढे भर वर्गात उडालेल्या गोंधळाचे अती खुमासदार वर्णन या मिरासदारांच्या कथेत आले आहे.
सागर
सागर · Wed, 23 Mar 2011 - 13:25 · उत्तर
कधीही वाचावे असे नितांतसुंदर पुस्तक.
लेखनशैलीवरुन लेखक मी लगेच ओळखला होता. पण मिरासदारी मी वाचून अनेक दिवस झाले होते, त्यामुळे काही आठवत नव्हते. त्यामुळे पुस्तक ओळखले तरी कथा ओळखायला बराच वेळ लागला.
शेवटी कोड्याचे उत्तर जाहीर होण्याच्या अगोदर उत्तर ओळखता आले याचाच आनंद :)