ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे?...८३

वल्ली

मजकूर

एक तट्टू जाळाच्या कड्यांतून उड्या मारून पडद्यात जात आहे तोच तंबूच्या डोलकाठीजवळ 'हूप' असा कानठळ्या बसविणारा आवाज प्रे़क्षकांनी ऐकला. सगळ्यांचे डोळे वर लागले. एक मोठा वानर---वानर कसला तो ! इतका मोठा का कधी वानर असतो ? मनुष्यच असला पाहिजे तो, वानराचे सोंग घेतलेला. इराण्णाच असावा तो - तंबूच्या डोलकाठीजवळून आत शिरून तो एका झोपाळ्यावर बसला. झोका घेत घेत त्याने ऐंशी फूट अंतरावरील समोरच्या झोपाळ्यावर उडी घेतली. शेपटीने झोपाळा पकडून झोके घेतले. इराण्णाने शेपटीची ही नवीन युक्ती शोधली असली पाहिजे असे मॅनेजरला वाटले. झोपाळ्यावरून पन्नास फूट खाली जमिनीवर आणि उलट खालून एकदम तंबूच्या अग्रापर्यंत अशा प्रचंड उड्या त्या वानराने घेतल्या. स्वतःच्या अंगाभोवती गिरक्या घेणे, शेपटीने जिन्नस उचलून घेणे, खांबावर सरसर चढणे व डोके खाली करून उतरणे अशी अतर्क्य कामे इराण्णाने करून दाखविली. ही शक्तीची आणि वेगाची कामे केल्यानंतर त्याने कांगारूप्रमाणे शेपटी जमिनीस टेकून सर्व अंग उचलून दाखविले. हे खेळ होत असता टाळ्यांचा प्रचंड गजर होत होता.सर्व बडे लोक खूष झाले. युरोपियन सर्कशीत देखील असा प्रकारचे काम आपण कधी पाहिले नाही असा निर्वाळा गव्हर्नरसाहेबांनी दिला.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------
संकेत १: हा कथासंग्रह बहुतेकांना वाचलेला असावा.
संकेत २: हा एक विनोदी कथासंग्रह असून एका काल्पनिक गावातील कथांचे सुरस व चमत्कारीक वर्णन या संग्रहामध्ये आले आहे.
संकेत ३: या विनोदी लेखकाचा मानसपुत्र अतिशय लोकप्रिय असूनही हे पुस्तक मात्र त्या मानसपुत्रावर आधारीत नाही. तरी हे पुस्तक आजही तितकेच लोकप्रिय आहे.
संकेत ४: हे पुस्तक मुख्यतः लहान मुलांसाठी लिहीलेले असूनही मोठ्यांनाही निखळ विनोदाचा आनंद देते.
संकेत ५: एका गावातील खर्‍या अर्थाने जागृत असणार्‍या देवांच्या धमाल विनोदी कथा या संग्रहात आहेत.

वेच्याचे पहिले विजेते देवेंद्र प्रभुणे. पाठोपाठ सागरनेही लेखक व पुस्तक दोन्हीही ओळखले आहे. दोघांचेही अभिनंदन आता फक्त कथा ओळखा. अर्थात पुस्तक ओळखले हेच पुरेसे आहे.

पुस्तकः ओसाडवाडीचे देव
कथा: मानसशास्त्राचा चमत्कार
पान नं: ३४
लेखक: चिं. वि. जोशी

अभिप्राय

सागर

सागर · Tue, 5 Apr 2011 - 12:26

मित्रा,

हा कथासंग्रह बहुतेक वाचलेला नाहिये असे दिसते आहे. :(

पुढील संकेत मिळेपर्यंत तूर्तास पास.

माडगूळकरांचे सत्तांतर अलिकडेच वाचले असल्यामुळे मला वानर म्हटले की फक्त सत्तांतरचेच कथानक आवडते ;)

वल्ली

वल्ली · Tue, 5 Apr 2011 - 16:48

जास्तीचे संकेत वर दिले आहेत.

सागर

सागर · Tue, 5 Apr 2011 - 17:03 · उत्तर

शैलीवरुनच लेखक खुणावत होता. आता पुस्तक ओळखायचा प्रयत्न करतोय
बहुतेक उत्तर बरोबर आहे असा होरा आहे. :)

सागर

सागर · Tue, 5 Apr 2011 - 19:41

मित्रा,

कथा फक्त तीच व्यक्ती ओळखू शकेन ज्याच्या संग्रहात हे पुस्तक आहे किंवा ज्याने अलिकडेच वाचले आहे :)

या लेखकाची बाकीचीच पुस्तके इतकी भारी आहेत की हे पुस्तक सहजा सहजी आठवत नाही

वल्ली

वल्ली · Wed, 6 Apr 2011 - 03:16 · उत्तर

खरे आहे मित्रा तुझे. पण यातील एक कथा इतकी प्रसिद्ध आहे की ती आजदेखील मनावर तितकेच गारूड निर्माण करते.
ती कथा आहे 'वाई विरुद्ध सातारा' हाही एक संकेतच देतो आहे अजून.

वल्ली

वल्ली · Wed, 6 Apr 2011 - 11:37

चिंविंच्या ओसाडवाडीचे देव पुस्तकातील ही एक कथा. वाई नजीकच्या ओसाडवाडी गावात असलेल्या जागृत देवतांच्या कथांचा हा विनोदी कथासंग्रह. इथले देव कमाळीचे जागरूक. भक्तांना प्रेमळपणाने मदत करणारे. दुष्टांना अद्दल घडवणारे, काही साधेभोळे देव काही अतिहुशार, तर काही प्रत्यक्ष वाई विरुद्ध सातारा या कथेत क्रिकेट सामन्यात भाग घेणारे तर काही पुण्याची सफर करून येणारे.
प्रस्तुत कथेत इराण्णा नामक एका निरनिराळ्या प्राण्यांचे वेषांतर करून अंगविक्षेप करून सर्कशीत कसरती दाखवणार्‍या एका कसरतपटूची. त्याची ख्याती चोहीकडे पसरलेली. वाईला इराण्णाची सर्कस येते, खासे गव्हर्नरसाहेब सर्कस पाहायला येतात पण इराण्णा नेमका आजारी पडल्यामुळे त्याला काम करणे अशक्य होउन जाते. इकडे सर्कस मॅनेजरकडून नोकरीवर काढून टाकण्याच्या धमकीमुळे कचाट्यात पडलेली इराण्णाची बायको इराव्वा ओसाडवाडीच्या मारूतीला शरण जाते. तीचे रडणे पाहून पाघळलेले हनुमान सर्कशीत स्वतः वानराचे काम करून विविध खुमासदार कसरती करून दाखवतात. ह्या अद्भूत कसरती पाहून सर्व इराण्णावर खुष होतात. अर्थात हनुमंताची आपले नाव सांगायचे नाही ही अट असल्याने इराण्णाला खरे काय ते कुणालाच सांगता येत नाही व लोक मात्र हा आजारी असल्याने मानसशास्त्राचा चमत्कारच मानतात.

तेव्हा 'ओसाडवाडीचे देव' नक्कीच विकत घेउन वाचा. या आणि इतर अनेक खुमासदार विनोदी कथांसाठी. पुस्तकही अगदी स्वस्त. फक्त २५ रू. शिवाय उपलब्धही. ;)

सागर

सागर · Wed, 6 Apr 2011 - 11:50 · उत्तर

फक्त २५ रुपये ?

मग तर हे पुस्तक हवेच संग्रहात :)

वल्ली

वल्ली · Wed, 6 Apr 2011 - 11:53 · उत्तर

तुझ्या संग्रहात हे पुस्तक नव्हते हेच नवल. ;)
नवीन आवृत्तीची किंमत कदाचित वाढलेली असेल. पुविवर ४० रू. किंमत नोंदलेली आहे.
पण पुस्तक घेउनच टाक.
तुझ्याबरोबर तुझ्या मुलालाही वाचायला मिळेल. :)

सागर

सागर · Wed, 6 Apr 2011 - 14:49 · उत्तर

हे पुस्तक नव्हते संग्रहात.

चिविंची बाकीची बर्‍यापैकी पुस्तके आहेत माझ्याकडे
हास्यचिंतामणी, चिमणरावांचे चर्‍हाट .... वगैरे...
हे नव्हते.
घेईन आता नक्की.

यशोधरा

यशोधरा · Wed, 6 Apr 2011 - 13:20 · उत्तर

ओसाडवाडीचे देव. :) मस्त पुस्तक आहे.

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Wed, 6 Apr 2011 - 17:27

चिं. वि. जोशी म्हणजे फक्त चिमणराव-गुंड्याभाऊ-काऊ-मोरू-मैना..... बस्स! एवढीच माहिती आणि तीदेखील दूरदर्शनमुळे झालेली.
ह्यापलिकडे त्यांच्या लिखाणाची ओळख `ओसाडवाडीचे देव' ह्या पुस्तकाच्या निमित्ताने झाली.....

मिहिर

मिहिर · गुरुवार, 7 Apr 2011 - 14:01

एकदम मस्त पुस्तक आहे. मी चिवींचे फक्त हेच वाचलय आणि खूप वेळा वाचलंय.

चर्चा प्रकार