ओळखा पाहू ही कविता कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ४६

वेदश्री

मजकूर

कोणाचे तरि पोर हे? दिसतहे आहे किती घामट!
त्याचे ते झबले!- इथे किळस हो, त्याची मला वाटत!
हा, हा, या झिपर्‍या भिकार उडती निर्बंध डोईवरी
त्यांना तेलफणी असे लवतरी माहीत जन्मांतरी?
ही बोटे चघळीत काय बसले!- रे राम रे - लाळ ही!!
काळी काय गळ्यातुनी जळमटे आहेत पन्नास ही!
शी शी! तोंड अती अमंगळ असे आधीच हे शेंबडे-
आणि काजळ ओघळे वरुनि हे! त्यातून ही हे रडे!!
तो जो कोण 'मुले फुलेच' म्हणतो, ओकारवाणी हवी-
त्याला दाखविण्या अशी तरी मुले! आहेच मीही कवी!!
तो ये धावुनि तेथ ऊत्सुक अशी बाई कुणी सत्वर
'माझं बाळ गं सोनुलं' म्हणत घे त्याचे मुके शंभर!
प्रेमाश्रुस्मितहर्षयुक्तहृदये आहेत आम्हासही-
आई! पोटि तुझ्या अमाप परि ही माया, न ती स्वर्गिही

ही कविता मस्त ठेक्याने म्हणता येतेय पण ओळीच्या शेवटच्या मात्रेबद्दल गोंधळ होतोय.. कारण काही ओळीतले शब्द गुरू आहेत तर काहीत लघु. हे कोणते वृत्त आहे सांगता आले कोणास तर क्या कहने!

अभिप्राय

वल्ली

वल्ली · Fri, 22 Oct 2010 - 06:05

कवी आचार्य अत्रे असावेत असे वाटतेय किंवा नारायण सुर्वेही. बहुधा सुर्वेच.

ऋषिकेश

ऋषिकेश · Fri, 22 Oct 2010 - 06:37

बहुदा शार्दुलविक्रीडीत आहे.. चाल कोणतीही प्रचलित चालेल.. मंगलाष्टकं ते "आजीच्या जवळी" वगैरे वगैरे काहिहि!
बाकी कविता अत्रे किंवा गडकर्‍यांची का?

ऋषिकेश

ऋषिकेश · Sat, 23 Oct 2010 - 05:56 · उत्तर

झेंडुची फुले? आहे का गं?
एखादं विडंबन वाटतंय म्हणून विचारतोय

रोचीन

रोचीन · Sat, 23 Oct 2010 - 07:12 · उत्तर

नकी नाही!!!! आणि हे विडंबन असेल असे वाटत नाही!!!!

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Fri, 22 Oct 2010 - 07:13

रस निष्पतीच्या दृष्टीने कवितेच्या रचनेकडे पाहिले गेल्यास नक्कीच 'बीभत्स' रसाचे हे एक चांगले उदाहरण आहे. तुकारामाच्या रचनेत या रसाची उदाहरणे सापडतात. मात्र वर दिलेल्या कवितेच्या जनकाशी कधी गाठभेट झालेली नाही.

"शिखरिणी" वृत्तातील रचना असावी असा कयास आहे....खात्री नाही.

इन्द्रा

दिगम्भा

दिगम्भा · Fri, 22 Oct 2010 - 08:18

कविता नि:संशय शार्दूलविक्रीडितातच आहे (= मंगलाष्टक)
(मासाजासतताग - मानावा समरा जनास समरा ताराप ताराप गा)
गंमत म्हणजे (शुद्ध लिहिला तर) शार्दूलविक्रीडित हा शब्द त्या वृत्तातील ओळीच्या शेवटी बरोब्बर फिट्ट बसतो -
गागागा ललगा लगाल ललगा शार्दूलविक्रीडित

"शिखरिणी" वेगळी -
तया वृत्ता देती सुबुध जन संज्ञा शिखरिणी |
जयामध्ये येई यमनसभलागा पदगणी ||

वरील अवांतर माहितीपलीकडे खुद्द कोड्याविषयी अज्ञानात आहे.
- दिगम्भा

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Fri, 22 Oct 2010 - 09:01 · उत्तर

१. व्वा....दिगम्भांनी छानच माहिती दिली आहे. मलाही खात्री नव्हती म्हणूनच 'शिखरिणी' चा उल्लेख करताना मुद्दाम 'कयास' आहे असे म्हटले.

२. श्री.रोचीन यांनी उल्लेख केलेले पुस्तक मला माहित आहे. तीत आहे ही कविता? असेल तर वेदश्रीला हेच पुस्तक अपेक्षित असणार....!! राईट ?
“सुगम मराठी व्याकरण लेखन” लेखक: कै. मो. रा. वाळींबे

(प्रकाशक आठवत नाहीत तितकेसे.... कॉन्टिनेंटल किंवा नितीन असावेत... बहुधा नितीनच कारण मराठी भाषाशास्त्र आणि शुद्धलेखन, व्याकरण यात हे प्रकाशन विशेष रूची दाखविते.)

इन्द्रा

ऋषिकेश

ऋषिकेश · Sat, 23 Oct 2010 - 05:57 · उत्तर

माहित नाहि.. मला प्राथमिक किंवा नेहमीदिसणार्या वृत्तांची ओळख बर्‍यापैकी आहे आणि त्यासाठी शासकीय व्याकरणाची पुस्तके अजूनही माझ्या संग्रही आहेत आणि मी तीच वापरतो.. अतिशय चांगली व सुगम पुस्तके आहेत

रोचीन

रोचीन · Fri, 22 Oct 2010 - 08:26

आहेत का कवी?? हि कविता वाळींब्यांच्या व्याकरणाच्या पुस्तकात वाचलेली आठवतेय!!

सागर

सागर · Fri, 22 Oct 2010 - 14:13

गूगलबाबाने अवकृपा दाखवल्यामुळे पास.

माझे कविता वाचन मर्यादितच आहे. कुसुमाग्रज, सुरेश भट जास्त परिचित आहेत.
माहिती नव्हते म्हणून आणि हा माझा प्रांत नव्हता म्हणूनही एक प्रयत्न करुन गूगलबाबाला साकडे घातले. तर त्याने अवकृपा केली. मग पर्याय नसल्याने पास्स्स्स्स्स.... ;)

सागर

सागर · Tue, 26 Oct 2010 - 20:43

शोधून शोधून थकलो...
वेदश्री वेच्याचे उत्तर दे की. उत्सुकता लागून राहिली आहे की ही छान कविता कशातली आहे ते.

वेदश्री

वेदश्री · Fri, 29 Oct 2010 - 06:44

माफ करा पुविकर.. मला या कोड्याचे उत्तर निश्चित काय आहे ते सांगता येत नाहीये. माझ्या पाठांतराचा एक भाग ही कविता माझ्या माहितीनुसार नित्य परिपाठ (गडद हिरव्या रंगाचे कव्हर आणि पांढर्‍या अक्षरातले नाव) या पुस्तकातली आहे पण आईने सांगितल्याप्रमाणे हे पुस्तक आमच्या संग्रहातून गायब आहे त्यामुळे मला उत्तराची निश्चिती करता येत नाहीये. उत्तराची पक्की खात्री असल्याशिवाय मी इथे मुळात कोडेच टाकायला नको होते पण तसे ते टाकले ही माझी मोठीच चूक झाली. सर्व प्रकाराबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व!

रोचीन

रोचीन · Fri, 29 Oct 2010 - 06:55

काय झालं?? होतं असं कधीकधी! :)
मी बघते वाळींब्यांच्या पुस्तकात मिळते का? मला ही आता ते शोधायला हवं!!

चर्चा प्रकार