ओळखा पाहू कुणाचे ले़खन आहे????

चित्रा राजेन्द्र जोशी

मजकूर

"ज्या वेळी पहिल्या स्पर्शाचे संवेदन झाले त्याच वेळी आत्म्याचा जन्म झाला...
प्रत्येक कलावंत हा स्पर्शवादीच असतो...
वस्तूचा स्पर्श भोगल्याशिवाय मला तिचे पुरे आकलन होऊच शकत नाही...
मला काही बोलायचे असले की मी मित्रांच्या खांद्यावर हात टाकतो. मग शब्दांना आपली वाट सापडू शकते. नाही तर ते कुठे तरी जातात; भरकटत सुटतात; स्वत:भोवतीच घुमत बसतात, आकाशावर पाठ घासतात किंवा पाताळात दडी घेतात. ते पृथ्वीला भिडत नाहीत; अस्तित्वामध्ये भिजत नाहीत. पण खांद्यावर हात टाकला की सारे ठीक होते. त्या स्पर्शाच्या आधाराने शब्दांचे ओठ भावनेशी भिडू लागतात. माझी सुखदु:खे हि फक्त स्पर्शपल्लवी भाषाच बोलून शकतात...
स्पर्शांमध्ये अपार सामर्थ्य आहे. दोन जिवांनी परस्परांना स्पर्श केला की संस्कृतीने उभ्या केलेल्या भिंती धडाधड कोसळून पडतात. जिवाच्या मूलभूत अद्वैताचा साक्षात्कार होऊ लागतो. सहानुभूतीच्या संथ प्रवाहातून आपण आपल्या मुळाकडे वाहू लागतो...
भक्तीची किंवा प्रीतीची परिसीमा स्पर्शाशिवाय काही बोलू शकत नाही. स्पर्श हा शेवटचा शब्द असतो...
स्पर्शामधून समाधीपर्यंत पोहोचता येते; निदान कलावंताला ज्ञात असलेल्या समाधीपर्यंत तरी निश्चित पोहोचता येते...."

संकेत --- एका ले़खसंग्रहाच्या ले़खातून हे टिपले आहे.

अभिप्राय

सागर

सागर · Mon, 21 Feb 2011 - 14:40

चित्रा,

तुम्हीच सांगून टाका हे लेखक कोण आहेत ते.. इतके दिवस झाले तरी कोणी ओळखू शकले नाही :(
हरलो बुवा.

अगदी अंदाज बांधायचा म्हटले तरी डोळ्यांसमोर लेखक येत नाही.
लेखक कोणीतरी कलावंत असावा असे वाटते आहे.

तरी एक प्रयत्न म्हणून प्रभाकर पेंढारकर यांचे एका स्टुडिओचे आत्मचरित्र असावे असे वाटते.

बाकी मला चित्रपट क्षेत्रातील वाचनात फारशी गती नाही त्यामुळे इथेच थांबतो

तुम्हाला विनंती आहे की लेखक व पुस्तकाचे नाव जाहीर करावे :)

वल्ली

वल्ली · Mon, 21 Feb 2011 - 16:19 · उत्तर

अजून काही संकेत दिलेत तरी चालतील. मग कदाचित ओळखता येईल.

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Mon, 21 Feb 2011 - 17:07

सागर, उत्तरासाठी कुणाचाच प्रतिसाद न आल्याने मी संभ्रमात पडले की हे कुणी वाचले आहे किंवा नाही. काही समजेना, कारण पुवि वर नवीन आहे ना! त्यामुळे काही संकेतही दिले नाहीत. क्षमस्व!
ही वाक्ये गो. वि. करंदीकर (आपले विंदा) ह्यांच्या 'स्पर्शाची पालवी' ह्या लघुनिबंधातून घेतली आहेत.
'स्पर्शाची पालवी' (१९५८) आणि `आकाशाचा अर्थ' (१९६५) असे दोन संग्रह होते. त्यांचे एकत्रीकरण विजया राजाध्यक्ष ह्यांनी `करंदीकरांचे समग्र लघुनिबंध' ह्या पुस्तकात केले आहे. विजयाबाईंचे अभ्यासपूर्ण प्रास्ताविक (८३ पानी) हे ह्याचे वैशिष्ठ्य आहे.
साहित्याच्या अभ्यासकांस उपयुक्त.
एकूण ५१ निबंध ह्यात आहेत. ‘आतले आणि बाहेरचे’, ‘पहाटेचा कैफ’, ‘खोडलेले शब्द’, ‘चिंचा आणि आवळे’, ‘आम्रयोग’ ही काही शीर्षके.
आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित आणि विचारांना चालना देणारे....

सागर

सागर · Tue, 22 Feb 2011 - 08:14 · उत्तर

चित्रा,

यानिमित्ताने एका छान पुस्तकाची ओळख झाली. आणि ते उपलब्ध आहे हे ही कळाले :)

आकाशाचा अर्थ मी नाही वाचलेला. विंदांची जी मी मोजकी पुस्तके वाचली आहेत त्यापैकी स्पर्शाची पालवी एक आहे.
पण स्पर्शाची पालवी खूप वर्षे झाली वाचून आणि आता काही आठवत नाही त्यातले. पुन्हा वाचायला घेईन तेव्हा मात्र सगळे आठवत जाईन याची खात्री आहे.

स्पर्शाची पालवी पुन्हा आठवून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद :)

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Mon, 21 Feb 2011 - 17:22

वल्ली, माफ करा. थोडक्यात चुकामूक झाली. उत्तर टाईप करून टाकल्यानंतर तुमचे 'संकेत द्या' सांगणारे लि़खाण वाचले.
आता पुढच्या वेळी काळजी घेईन...........

यशोधरा

यशोधरा · Fri, 25 Feb 2011 - 09:59

करंदीकरांचे समग्र लघुनिबंध - मिळते का हे पुस्तक अजूनही चित्रा? प्रकाशक सांगाल?

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Fri, 25 Feb 2011 - 12:12 · उत्तर

होय यशोधरा,
पॉप्युलर प्रकाशनाचे हे पुस्तक उपलब्ध आहे.

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Fri, 25 Feb 2011 - 12:12 · उत्तर

होय यशोधरा,
पॉप्युलर प्रकाशनाचे हे पुस्तक उपलब्ध आहे.

आनंदयात्री

आनंदयात्री · गुरुवार, 3 Mar 2011 - 17:53

अहाहा. काय सुरेख वेचा आहे.
आमच्या सारख्या वाचकांना जरी या तुमच्या पुस्तककोड्यांच्या शर्यतीत दौडता येत नसले तरी सगळे वेचे आम्ही चवीने वाचतो. सर्व खेळाडूंचे आभार :)

चर्चा प्रकार