- Log in to post comments
अरुण काळे कधीमधी इथेतिथे कविसंमेलनात भेटायचा... ती चतकोर भेट असायची. कविसंमेलन संपल्यावर रेंगाळणार्यांत थांबले तर ती अर्धी भेट. पूर्ण भेट कवितेतच व्हायची. कधीतरी निवांत भेटूया म्हणता म्हणता अरुण अचानक वारला. भुजंगच्या पाठोपाठ. "अक्षर सुधारावं म्हणून कुणी कविता नाही लिहीत..." हे मधूनच मनात घुमत राहतं कॉम्प्युटरवर कविता टाइप करताना. दोघे एका टपरीवर कटींग चाय पित होतो... "सही द्या" म्हणत एक चाहता आला. माझ्याकडे पेनचा पत्ता नाही. अरुणचं काळ्याभोर शाईचं पेन त्यानं प्रेमानं ( आणि नाइलाजानं :-).) दिलं. सही देऊन त्या चाहत्याला म्हटलं," हे अरुण काळे......" त्यानं कोर्या चेहर्यानं पाहिलं आणि थँक्स म्हणत निघून गेला. अरुण उदास हसून म्हणाला,"कादंबरीकारानं कवीनं पेनानं केलेली सही... कवीला कोण ओळखतो..." जयंत पवारची 'छ्टाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र' ही कथा अरुणनं वाचली असती तर म्हणाला असता की कवीला ओळखणारा असा एकजण भेटला तरी खूप झालं. त्याची एक अफलातून "प्रेमकविता" गेले काही दिवस अकारण आठवतेय :
"प्रेताची विल्हेवाट लावणं कठीण"
कपड्यांची क्वालिटी काय आहे
आणि दागिने खरे की खोटे
हे मुद्दे गौणच ठरतात प्रेमात पडल्यावर
ओढ आणि ओढच लागून राहते.
मग तो जर कोपर्यावर दोन-दोन तास उभा
आणि तिच्या इकडून तिकडे चकरा
ती चांगली दिसण्यासाठी
मैत्रिणींच्या साड्याबिड्या घालून येते
हे त्याला कुठे असते आधी माहीत?
अंतर कमी होऊन आणाभाका झाल्यावर
एकांताच्या संधीत मिलनाची वेळ आल्यावर
ती हमसून हमसून रडू लागते
जंग जंग पछाडल्यावर म्हणते,
मी फार गरीब आहे
मला आतली चड्डीपण नाही.
सालं खून करण्यापेक्षा
प्रेताची विल्हेवाट लावणंच कठीण.
अभिप्राय
वल्ली
वल्ली · Sat, 26 Mar 2011 - 16:54
खरोखरच अस्वस्थ करणारा अनुभव आहे आहे कविताताई.
तसेही मुळात कवी हे फारसे लाईमलाईट मध्ये नसल्यामुळे लोकांना कवी जरी माहित असला तरी कवीमागचा चेहरा माहिती असण्याची शक्यता कमीच.
कविता अर्थातच आवडली.
सागर
सागर · गुरुवार, 31 Mar 2011 - 16:07
कविताजी,
कविता आधी वाचली होती या धाग्यावर. पण काही वैयक्तिक कारणाने मन जोडू शकलो नव्हतो.
आज थोडा स्थिरावलो आणि पहिली ही कविता पूर्ण मन जागेवर ठेवून झरझर वाचून काढली.
दोन वेळा वाचली. आणि बस्स डोळ्यांतून पाणीच यायचे बाकी राहिले होते...
हेलावणारी कविता आहे. अशा कविता एकतर मला जास्त भावतात. सुरेश भटांचा एल्गार हा संग्रह पण त्याच पठडीतला आहे जरासा.
तुमचे असे अनुभव अजून माहिती करुन घ्यायची इच्छा आहे. कृपया असेच तुमचे अनुभव शेअर करत रहा.
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · गुरुवार, 31 Mar 2011 - 18:02
कविता,
सेम सागरसारखीच अवस्था.........
बस्स डोळ्यांतून पाणीच यायचे बाकी राहिले होते...