पुण्यातील ग्रंथालयांची यादी

आरागॉर्न

मजकूर

पुण्यातील ग्रंथालयांची यादी/माहीती हवी आहे. मुख्यत: इंग्रजी (फिक्शन/नॉन फिक्शन) पुस्तकांसाठी, पण मराठीची यादीही मिळाली तर स्वागतच आहे. इंग्रजीसाठी ब्रिटिश लायब्ररीचा काही वर्षांपूर्वीचा अनुभव आहे. इथे मुख्य अडचण म्हणजे अमेरिकन प्रकाशकांची पुस्तके उपलब्ध नव्हती. आता चित्र वेगळे असल्यास कल्पना नाही.

अभिप्राय

चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतू · Wed, 17 Nov 2010 - 05:47

अजूनही इंग्रजी पुस्तकांसाठी ब्रिटिश लायब्ररीहून चांगला पर्याय नसावा. ब्रिटिश लायब्ररीचे पुस्तकं घेण्याचे निकष अजून तसेच असावेत (म्हणजे ब्रिटिश प्रकाशकांची प्रकाशनं, वगैरे) पण बहुधा अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी आता त्यांच्याकडे अनेक लोकप्रिय अमेरिकन पुस्तकंही सापडतात (अर्थात ब्रिटिश/भारतीय आवृत्त्यांमध्ये) उदा: टॉम फ्रीडमनची पुस्तकं, फ्रीकॉनॉमिक्स, वगैरे.

काही दिवसांपूर्वी वाचनालयांसाठीच एक धागा निघाला होता (ग्रंथालयांची सूची). त्यात मुख्यतः मराठी ग्रंथालयांची चर्चा झाली होती.

आरागॉर्न

आरागॉर्न · Wed, 17 Nov 2010 - 06:50 · उत्तर

प्रतिसादाबद्दल आभार.

पण बहुधा अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी आता त्यांच्याकडे अनेक लोकप्रिय अमेरिकन पुस्तकंही सापडतात (अर्थात ब्रिटिश/भारतीय आवृत्त्यांमध्ये) उदा: टॉम फ्रीडमनची पुस्तकं, फ्रीकॉनॉमिक्स, वगैरे.

अरे वा! असे असले तर चांगलेच आहे. ब्रिटीश लायब्ररी बर्‍याच वर्षांपूर्वी लावली होती. माझे निरीक्षण तेव्हाचे आहे. पण इतक्या वर्षांमध्ये मी आणि लायब्ररी दोघेही बरेच बदललेलो असणार त्यामुळे बघायला हरकत नाही. :)
सदस्यत्वासाठी सध्या कोणते निकष आहेत? माझ्या वेळी एका सदस्याचे शिफारसपत्र लागत असे.

मराठी यादीही रोचक आहे. अनेक आभार.

चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतू · Wed, 17 Nov 2010 - 09:23

ब्रिटिश लायब्ररी लोकाभिमुख झाल्याचे अनेक बरे-वाईट परिणाम झाले. चांगल्या परिणामांपैकी एक म्हणजे सभासदत्व मिळणं खूप सोपं झालं आहे. आता शिफारसपत्र लागत नाही. वयाचा दाखला, ओळखपत्र वगैरे गोष्टींवर भागतं; क्रेडिट कार्डानं सभासद शुल्क भरता येतं (तसं ते भरावं लागेल इतकं ते वाढलेलंही आहे!)

लोकाभिमुखतेचे इतर परिणाम म्हणजे मॅनेजमेंट, आय.टी. वगैरेंवरच्या पुस्तकांत वाढ झाली व साहित्यविश्व संकोचलं. अनेक जुनी पुस्तकं विकून टाकली आहेत. टाईम्स लिटररी सप्लिमेंट आता तिथं मिळत नाही. (पण लंडन बुक रिव्यू, ग्रांटा ठेवतात). लहान मुलांच्या पुस्तकांचा नवीन विभाग चालू झाला. डी.व्ही.डी. विभागही पुष्कळ वाढला (आणि तिथे पुष्कळ अमेरिकन चित्रपट आले). रविवारीही ग्रंथालय खुलं असतं.

असो. एकदा जाऊन बघू शकता. दूरध्वनी - २५६५ ४३५१/५२

आरागॉर्न

आरागॉर्न · Wed, 17 Nov 2010 - 15:06 · उत्तर

माहितीबद्दल आभारी आहे. एकदा जाऊन बघतो आणि ठरवतो.
साहित्यविश्व संकोचल्याची बाब दुर्दैवी आहे. आयटीची नवीन पुस्तके आली तर ते ठीक, पण त्यासाठी जुनी पुस्तके काढणे खेदजनक आहे.

आरागॉर्न

आरागॉर्न · Fri, 26 Nov 2010 - 20:01

बीसीएलमध्ये जाऊन आलो. पहिला सर्व मजला आयटी, मॅनेजमेंट. दुसरा अर्धा मजला सायन्स टेक्नॉलॉजी. इंग्रजी ललित साहित्याला जेमतेम दोन रॅक. अशी सर्व विभागणी पाहिल्यावर मेंबरशिप घ्यावीशी वाटत नाही. :(

चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतू · Mon, 29 Nov 2010 - 09:22 · उत्तर

इंग्रजी ललित साहित्याला जेमतेम दोन रॅक. अशी सर्व विभागणी पाहिल्यावर मेंबरशिप घ्यावीशी वाटत नाही. :-(

तुमच्या दु:खात सहभागी आहे. तरीही मला जाणवणारे काही फायदे:

  1. लंडन रिव्ह्यू ऑफ बुक्स, ग्रांटासारखी साहित्यविषयक नियतकालिकं वाचायला मिळतात. ती विकत घेऊन वाचणं महाग पडतं.
  2. नवीन पुस्तकं विकत घेण्याबाबत वाचनालय जागरूक आहे. बुकर, वगैरे पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेल्या आणि नव्यानं प्रकाशित झालेल्या उल्लेखनीय पुस्तकांची खरेदी केली जाते. हे सोयीचं जातं, कारण ही पुस्तकं अनेकदा भारतीय आवृत्तींत मिळत नाहीत त्यामुळे ती विकत घेऊन वाचणं महाग जातं. शिवाय वाचल्याशिवाय अशा पुस्तकांचा दर्जा कळत नाही त्यामुळे इतके पैसे खर्च करून विकत घेणं व्यक्तिशः जड जातं.
  3. अभिजात पुस्तकांच्या सटीप (अ‍ॅनोटेटेड) आवृत्त्या उपलब्ध आहेत. या आपल्याकडे सहसा उपलब्ध होत नाहीत आणि झाल्याच तर पुष्कळ महाग असतात.
  4. संदर्भ विभागात आणि साहित्य विभागातही साहित्यविषयक अनेक संदर्भग्रंथ आहेत. यांच्याही बाबतींत असं म्हणावं लागतं की मोफत आंतरजालानं अजून तरी ज्यांची गरज पूर्णपणे भागत नाही त्या अभ्यासकांसाठी ते उपयुक्त आहेत.
  5. एखादं पुस्तक पुण्याच्या शाखेत उपलब्ध नसेल पण भारतातल्या इतर शाखांत असेल तर ते मागवता येतं.

एकंदरीत मला असं वाटतं की ब्रिटिश लायब्ररीच्या स्वरूपात गेल्या काही वर्षांत जे खेदजनक बदल झालेले आहेत त्यांविषयीचे आक्षेप मान्य करूनही आज इंग्रजी साहित्याच्या गंभीर वाचकाच्या काही गरजा पार पाडण्यासाठी मला दुसरा कमी खर्चिक आणि याहून बरा पर्याय सापडत नाही.

आरागॉर्न

आरागॉर्न · Mon, 29 Nov 2010 - 15:03 · उत्तर

इंग्रजी वाचनासाठी दुसरा पर्याय नाही हे दुर्दैवाने खरे आहे. सटीप आवृत्त्या हा ही एक मोठा फायदा आहे.
बघूयात, विचार बदलला तर लावेनही कदाचित. :)

टण्या

टण्या · Tue, 30 Nov 2010 - 06:17

मला देखील बीसीएलचे रूप पाहून फार दु:ख झाले. माझ्यासारख्या 'साहित्य' वाचणार्‍या वाचकाला हा संकुचित झालेला विभाग अस्वस्थ करतो. मॅनेजमेंट/आयटी वरची पुस्तके कुठेही मिळतातच. मुख्य भूक असते ती विविध लेखकांच्या कलाकृती वाचण्याची. बीसीएल केवळ ब्रिटिशच नव्हे तर कॉमनवेल्थ राष्ट्रांतील लेखकांची पुस्तके मुख्यत्वेकरुन ठेवत असे असा माझा अनुभव होता (मी हैद्राबाद बीसीएलचा तीन वर्षे नियमित सभासद होतो - हा तिथला अनुभव आहे, पुण्याचा नव्हे. पुणे बीसीएलचा फारसा अनुभव नाही). तुम्हाला नायपॉल, कोएट्झी, गार्डिनर, भारतीय इंग्लिश साहित्यदेखील विपुल प्रमाणात उपलब्ध होत असे. तसेच भाषांतरीत पुस्तकेही अनेक असत (मार्क्वेझ, काम्यु, पामुक इत्यादी).
त्याच अपेक्षेने ग्रंथसंग्रहदेखील न बघता पुणे बीसीएलचा सभासद झालो आणि वर जाउन पाहतो तो हाय!
चिंतातूर जंतूंनी म्हटल्याप्रमाणे अनेक फायदे आहेत पण ते संदर्भग्रंथ, अभिजात (classics) साहित्य, साहित्यिक नियतकालिके वाचणार्‍यांना. माझ्यासारख्याला वाईटच वाटत राहते. असो.

चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतू · Tue, 30 Nov 2010 - 07:11

नायपॉल, कोएट्झी, गार्डिनर, भारतीय इंग्लिश साहित्यदेखील विपुल प्रमाणात उपलब्ध होत असे. तसेच भाषांतरीत पुस्तकेही अनेक असत (मार्क्वेझ, काम्यु, पामुक इत्यादी).

नायपॉल, कूट्झी आणि भारतीय इंग्रजी साहित्य वगैरे पुण्यात अद्यापही बर्‍यापैकी आहे. मार्केझ, पामुक, सारामागो, कुंदेरा वगैरे त्यांच्या अधिकृत धोरणात बसत नाहीत, तरीही दोन-तीन पुस्तकांपुरते आहेत.

टण्या

टण्या · Tue, 30 Nov 2010 - 15:11 · उत्तर

नाय हो.. दुर्दैवानी अगदीच कमी आहे.. कोएट्झीची अगदी नेहेमीची पुस्तके पण नाही सापडली.. कदाचित असतील पण.. मी एकदाच गेलोय आणि कॅटलॉगपण एकदाच चाळलाय.. ऑगस्टमध्ये मेंबरशिप घेतली पण लगेचच भारताबाहेर पडायला लागल्याने कार्ड मित्राला दिले आहे..

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Wed, 1 Dec 2010 - 11:58

(धागा पुण्यातल्या ग्रंथालयांसाठी आहे. पण माहितीकरता या धाग्यावर नोंदवून ठेवते. अयोग्य वाटल्यास हलवले तरी चालेल.)
ठाण्यातली ग्रंथालये:

मराठी ग्रंथ संग्रहालय, तलावपाळीजवळ, स्टेशन रोड - उत्तम आणि सतत ताजा ठेवला जाणारा ग्रंथसंग्रह. संदर्भविभाग विशेष समृद्ध. पुस्तके नवीन असतानाच मिळवलीत, तर चांगल्या अवस्थेतली. स्टाफ (ओळख झाल्यावर) उत्तम सहकार्य (क्वचित लाड!) करणारा. मुख्यत्वे मराठी पुस्तके.
नगर वाचन मंदिर, टेंबी नाका - मोठा संग्रह. पण संदर्भाचा अनुभव नाही. पुस्तके आणि स्टाफ वरीलप्रमाणे.
प्रशांत लायब्ररी - विशेष करून बेस्टसेलर्स. पण पुस्तकांची अवस्था उत्तम. मुख्य ठाण्यातच दोन शाखा मला माहीत आहेत. अजूनही असतील. इंग्रजी पुस्तके बर्‍यापैकी आहेत, पण अर्थात बेस्टसेलर्स.

इतर शहरातल्या इतर (फुटकळ असली तरीही चालतील. कधी कधी वेळेला केळं पुरतं. :)) ग्रंथालयांबद्दलही लिहा.

चर्चा प्रकार