- Log in to post comments
मी सहावीत असताना मला एक पुस्तक बक्षीसादाखल मिळाले होते जे पुढे कितीतरी काळ माझे आवडते होते. त्या पुस्तकात मला वाटतं सहा-सात कथा होत्या. पुस्तक लहान मुलांकरता होते.
पहिली कथा साकुरा नावाच्या मुलाची होती आणि मला वाटते त्या पुस्तकाचं नाव सुद्धा त्याच्यावरुनच होतं. 'साकुराची मांजरं'.
साकुराला मांजरं रंगवण्याचा खूप नाद असतो आणि जिथे बसेल तिथल्या भिंती तो मांजरं चितारुन रंगवून टाकत असतो. जिभल्या चाटणारी, सयामी, मिशा फुर्र फुर्र करणारी ती मांजरं चित्रातही जिवंत वाटावी इतकी खरी वाटत. गावकरी ह्या प्रकाराला वैतागले होते. एकेदिवशी साकुरा देवळाची भिंतच चितारुन ठेवतो आणि गावकरयांच्या संतापाचा स्फोट होतो आणी ते साकुरा ला गावातून हाकलून लावतात. पण होतं काय, त्या रात्री गावावर खूप मोठ्या-मोठ्या उंदरांची धाड पडते आणि मग साकुराची मांजरं चित्रातून जिवंत होऊन त्या उंदरांचा नायनाट करतात. दुसरया दिवशी धाडीमुळे घाबरलेले गावकरी देवळात एकत्र जमतात आणि चित्रांतल्या मांजरींच्या दातांवर रक्त पाहून त्यांना काय झाले असावे याचा उलगडा होतो आणि मग गावकरी साकुराला गावात वाजतगाजत घेऊन येतात वगैरे.
दुसरी कथा एका छोट्याशा मुलीची होती.___चा बूट म्हणून. मुलीचे नाव आठवत नाही.
तिचे वडील राजासाठी प्रचंड मोठी घंटा तयार करण्याचे काम करत असतात. त्या घंटेसाठी खूप सारं पितळ, सोनं आणी चांदी वापरण्यात आलेली असते. घंटा सर्वात मोठी आणि तिचा आवाज कणीदार व्हावा ही राजाची इच्छा असते. __चे वडील त्यासाठी जिवाचे रान करत असतात पण प्रत्येक वेळी साचा फसतो. दोन वेळेस असं होतं आणी तिसरया वेळेस असं झालं तर देहांताची शिक्षा दिली जाईल असे राजा फर्मावतो. तिसरा साचा ओतला जाण्याच्या वेळेस ___ तिथे हजर असते. पण त्या द्रावणावरुन यावेळेसही साचा फसणार याची ___ला खात्री पटते आणि ती धावत जाऊन त्या उकळत्या द्रावणात उडी घेते. तिची दाई तिला धरायचा प्रयत्न करते पण तिच्या हातात ___चा बूट तेव्हढा राहतो. आणि काय आश्चर्य! साचा यावेळी फसत नाही. पण एव्हढ्या छोट्या मुलीचं बलिदान पाहून समस्त लोकांच्या तोंडून स्स्स्ss असे सुस्कारे निघतात. अजूनही कान देऊन ऐकलं तर त्या घंटेच्या दणदणीत तरी मंजुळ घंटानादानंतर हा सुस्कारा ऐकू येतो.
आणखी एक कथा होती ती एका राजाच्या उद्धट मुलीची. ती सेवकांना,दायांना उलट-सुलट कसेही बोलत असते. आणि ती अशी असते म्हणून तिच्या बागेतलं गुलाबाचं झाड बहरत नसतं. आपल्या मुलीच्या या वर्तनाने राजा चिंतेत असतो. मग काहीतरी घडतं आणि तिच्या स्वभावात आमूलाग्र बदल घडून येतो (अर्थातच!) आणि मग ते झाड भरभरून कळ्या द्यायला लागतं अशा आशयाची कथा होती.
मला इतर कथा आठवत नाहीत, या पुस्तकाचे लेखक माहीत नाहीत, प्रकाशन-गृह माहीत नाही, कथेच्या नावाबद्दलही मी साशंकच आहे. आठवतायेत त्या या तीन कथा आणि वेगवेगळी मांजरं रंगवलेलं मुखपृष्ठ. पुढे शिफ्टींग करताना ते गहाळ झालं.
आतापर्यंत जिथे जिथे प्रदर्शनं लागली, जिथे जिथे खरेदी केली तिथे तिथे मी या पुस्तकाची विचारणा केलेली आहे, एखादी जुनी प्रत असली तरी हरकत नाही असे सांगून ठेवलेले आहे पण आतापर्यंत कुठूनही प्रतिसाद नाही. पुस्तकविश्व वरील कोणाकडे हे पुस्तक असल्यास कृपया सांगा. हे पुस्तक कुठल्याही,कसल्याही रुपात संग्रही असावे अशी माझी इच्छा आहे.
अभिप्राय
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Fri, 25 Feb 2011 - 11:19
मणिकर्णिका,
ह्या तिन्ही गोष्टी छान आहेत, आवडल्या. त्यामुळे हे पुस्तक आपल्याही संग्रही हवे असा मोह झाला.
माझ्या लहानपणी मी रशियन कथांची अनुवादित पुस्तके खूप आवडीने वाचली होती. भारतात रादुगा प्रकाशन ती काढत असे. अलिकडे त्यापैकी एक पुस्तक मला त्याच मु़खपृष्ठाचे (माझ्या आठवणीत असलेल्या) ऊर्जा प्रकाशनने (पुणे, श्रीनिवास पंडित - १५९१, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०. संपर्कः०२० २४३३१९८५) काढलेले मिळाले. `डेनिसच्या गोष्टी' ह्या सुंदर रशियन कथांचे दोन भाग त्यांचेच आहे.
तू ऊर्जा प्रकाशनकडे माहिती विचार ह्या तुझ्या `साकुरा' बद्दल. कदाचित तिथे तुला मिळण्याची शक्यता आहे.
जे काही समजेल ते मलाही सांगशील, नक्की! त्याची काही उपयुक्त माहिती मिळाली तर ते पुस्तक मलाही घ्यायला आवडेल.
आणि...........
आणि जर का ते खर्रंच तिथे मिळाले, तर तू माझ्यासाठी एक प्रत आठवणीने घेशील......
(काय हा हावरेपणा................!)
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Fri, 25 Feb 2011 - 04:28
मणिकर्णिका,
क्षमस्व, मी चुकून यशोधरा लिहिले.
`पुवि'वर पावले अडखळताहेत .................
माहिती देण्याची इतकी घाई झाली की ती कुणाच्या नावे द्यावी ह्याचे भान सुटले.
आता ह्यापुढे काळजी घेईन.
धांदरटपणा न करण्याच्या प्रयत्नात....
चित्रा
वल्ली
वल्ली · Fri, 25 Feb 2011 - 04:36 · उत्तर
चित्राजी, तुम्ही प्रतिक्रिया संपादित करून बदल घडवून आणू शकता. :)
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 28 Feb 2011 - 05:38
हे पुस्तक अजूनही उपलब्ध आहे. ऐकून किती आनंद झाला आहे हे सांगूनही पटणार नाही :)
चित्रातै, माहिती बद्दल आभार!
रोचीन
रोचीन · Mon, 28 Feb 2011 - 09:15 · उत्तर
पुस्तक अजुनही उपलब्ध आहे रे पण पुर्वीच्या पुस्तकाची सर नाही त्याला!!
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Mon, 28 Feb 2011 - 13:40
रोचीन,
गोष्टी तर त्याच आहेत ना! मला तर दोन्ही पुस्तके खूप आवडली. चित्रे देखील मस्त आहेत.
नवीन पुस्तकात काय कमतरता आहे कुणास ठाऊक?
माझ्या लेकीबरोबर वाचताना तर जाम धम्माल आली. ती इंग्रजी-कन्या! त्यामुळे मराठी पुस्तके पहिल्यांदा मी तिला वाचून दाखवायची असा आमच्यात अलिखित करारच झालेला आहे. त्यामुळे पहिले वाचन मी करते आणि मग ती त्याचा स्वतंत्र आस्वाद घेते.
रोचीन
रोचीन · Tue, 1 Mar 2011 - 05:26 · उत्तर
>>गोष्टी तर त्याच आहेत ना!
हो, चित्राताई, गोष्टी त्याच आहेत. पण जुनं पुस्तक जर बघितलं असेल तर त्या पुस्तकाचा कागद, बांधणी, रंगीत चित्रं यांची तुलना नव्या पुस्तकाशी होऊ शकत नाही!! ते पुस्तक माझ्या आयुष्यात अशा वेळेस आलं की त्याची मोहिनी उतरण शक्य नाही. त्यामुळे नवीन पुस्तक वाचतांना नकळत त्याची जुन्याशी तुलना होत रहाते!!
अर्थात हे माझं वैयक्तीक मत आहे त्यामुळे त्यावर वाद नसावा!!! :)
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 1 Mar 2011 - 07:11 · उत्तर
+१ ह्या पुस्तकाची मोहीनी खरोखरच उतरणं शक्य नाही
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Tue, 1 Mar 2011 - 08:52
रोचीन,
खरंच आहे. आयुष्यात वेळेचं महत्त्व असतंच. आपल्याला अवचितपणे एखादी गोष्ट मिळते आणि ती मिळाल्यानंतर लक्षात येतं की ते आपल्याला कित्ती हवं होतं. आणि अशा गोष्टींची मोहिनी उतरणे कधीच शक्य होत नाही.
मी ती जुनी पुस्तके बघितलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्या तुझ्या मनातील प्रतिमेविषयी मी काहीच अंदाज बांधू शकत नाही.
पण तुझ्या भावनेशी मात्र मी संपूर्ण सहमत आहे.