शब्दावरून पुस्तक ओळखा - १

नंदन

मजकूर

हा जरा वेगळा प्रयत्न. भलतंच एक पुस्तक वाचताना एक माहितीची तुकडा हाती आला. त्यावरून मग जरा इतर शोधाशोध केली. त्या माहितीत एक शब्द सापडला, जो आधी एका निराळ्याच कथेत वाचला होता; पण अंदाजाने त्याचा अर्थ काही वेगळाच लावून पुढे गेलो होतो. आता ही माहिती मिळाल्यावर त्या शब्दाचा खरा अर्थ समजला.

शोधलेली माहिती अशी:
(दुवा)

परंपरेप्रमाणे सुन्नी मुसलमान पाच वेळा नमाज पढतात. दिवसातल्या वेळेप्रमाणे त्यांची नावं अशी आहेत. (उच्चारांच्या अचूकतेची खात्री नसल्यामुळे नावं रोमन लिपीतच ठेवली आहेत.)

१. पहाटे fajr
२. मध्यान्ही dhuhr
३. मध्यान्हानंतर asr
४. सूर्यास्तानंतर लगेच maghrib
५. रात्री isha'a

आता प्रश्न -
वरील माहितीतला एक शब्द एका प्रसिद्ध कथेत येतो. तो शब्द आणि ती कथा ओळखून व्यनिने उत्तर पाठवावे. संकेत देण्याची गरज भासू नये इतकी ती गोष्ट सर्वपरिचित आहे :)

संकेत १ - fajr (उच्चारी फज्जर) असा तो शब्द आहे.
संकेत २ - एका विनोदी कथेतलं पात्र 'काय सकाळपासून खोळंबा/परवड झाली आहे' या आशयाचे उद्गार काढताना हा शब्द वापरतं. कथेचे लेखक श्री.दा.पानवलकर, महादेव मोरे, व्यंकटेश माडगूळकर आणि राजन गवस यांच्यापैकी नाहीत. पण त्यांची सासुरवाडी ज्या भागात होती, तिथे मराठी भाषक मुसलमान समाज मोठ्या प्रमाणावर आहे.

अभिप्राय

सागर

सागर · Fri, 12 Nov 2010 - 08:42

नंदन, एक नवीनच योजना सुरु केली आहे तुम्ही.

पूर्ण लक्षात आल्यावर यात उडी घेईनच. पण नक्कीच उत्कंठा निर्माण करणारी ही एक वेगळी कन्सेप्ट आहे.
शब्द गेस नाही करता आला :(

तरी पण असर किंवा फज्र पैकी एक असावेसे वाटते आहे.

वल्ली

वल्ली · Fri, 12 Nov 2010 - 09:55

संकल्पना अवघड आहे. अधिक खुलाश्याची गरज आहे किंवा संकेताची गरज आहे.

सागर

सागर · Fri, 12 Nov 2010 - 10:11 · उत्तर

मला वाटते की नवीन असल्यामुळे अवघड वाटत असावी. एकदा ही पद्धत परिचयाची झाली की मग लक्षात येईल.
एका शब्दावरुन पुस्तक ओळखणे ही अतिशय आव्हानात्मक कल्पना आहे. त्यात मजाही जास्त येईल अशी अपेक्षा आहे
:)

सुरुवातीला कदाचित जास्त संकेत लागू शकतील

नंदन

नंदन · Fri, 12 Nov 2010 - 10:10

संकल्पना अवघड आहे. अधिक खुलाश्याची गरज आहे किंवा संकेताची गरज आहे.

--- ठीक, पहिला संकेत दिला आहे. तो अपुरा वाटल्यास उद्या दुसरा संकेत (लेखकाचं नाव किंवा कथेची पार्श्वभूमी) देईन.

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Fri, 12 Nov 2010 - 12:58

विकेट गेली. फज्जर हा शब्द अतपरिचयात धाटणीचा ठरला माझ्यासाठी तरी. माझ्या परिचयातील अनेक मु्स्लीमांसोबत बोलताना हा शब्द येऊन गेला आहेच, शिवाय वाचनातही येऊन गेला. उगाच बनगरवाडी आठवून गेली, पण कळलं की ते पुस्तक नव्हे हे. आता फज्जर असल्याने श्रीदांचे किंवा महादेव मोऱ्यांचे काही आहे का हे पहावे लागेल. पण एकूण अवघडच दिसतंय...

सागर

सागर · Fri, 12 Nov 2010 - 11:30

विरोपाने उत्तर पाठवले आहे. :)

ऋषिकेश

ऋषिकेश · Fri, 12 Nov 2010 - 12:39

आधीच एका परिच्छेदावरून पुस्तक ओळखताना नाकात दम यायचा.. हे एका शब्दावरून ओळखण तर मलातरी फारच कठीण जाईल (अशक्य आहे म्हणायचं नाहीये म्हणून कठीण म्हणतोय :) )
सगळ्यांना शुभेच्छा!

आरागॉर्न

आरागॉर्न · Fri, 12 Nov 2010 - 12:49

आम्ही या स्पर्धेत भाग घेणे म्हणजे मकरंद साळसकरने (सलग दोन वर्षे भोकरवाडी किंग्ज इलेव्हनचा क्याप्टन) भारतातर्फे खेळणे.
त्यापेक्षा आम्ही बाउंडरीवर बसून सचिन-सहवागची ब्याटिंग बघतो. पाणी वगैरे लागले तर सांगा. :)

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Fri, 12 Nov 2010 - 12:56

पुस्तककोड्यासाठी ही नवीनतम कल्पना ठरू शकेल....मात्र मेंदूला झिणझिण्या आणण्यासारखा हा प्रकार आहे हे निश्चित. "फज्जर" हा शब्द तर इथे कोल्हापुरात फारच परिचित असा आहे. सहज बोलताना एखादा ईसाभाई वैतागून बोलून जातो, "फटा मूं दिखाया फज्जराफज्जर? अबी बोंबल्या मेरा काम !" [सकाळीसकाळी मोडकं तोंड दाखविलंस? आता बोंबलत गेलं माझं काम !"]

व्यवहारी बोलीत "धुअर, असर, ईशा" यांचा वापर 'फज्जर' आणि 'मघरिब' यांच्या तुलनेत अत्यल्प (वा जवळजवळ नाहीच) होतो. 'मघरिब' हा सरसकट रात्रीची वेळ दाखविण्यासाठी केला जातो. उदा. "देखो जी, मघरिब हुई सलमा अभी भी घर आयी नही, क्या करेंगे अब इस छोरी का?"

मराठी साहित्यात अशी मुस्लिम नामे वापरली गेली ती श्री.दा.पानवलकर, महादेव मोरे, व्यंकटेश माडगूळकर आणि अलिकडील राजन गवस यांच्याकडून त्या त्या साहित्य प्रकारात. आता इथे श्री.नंदन प्रेमळ धमकी देतात की, "संकेत देण्याची गरज भासू नये इतकी ती गोष्ट सर्वपरिचित आहे..." ~~ तेव्हा इतकी सर्वपरिचित असेल तर ती श्री.दां.चीच असण्याची दाट शक्यता आहे....पण या क्षणाला त्यांच्या ज्या काही कथा नजरेसमोर येत आहेत तीत 'फज्जर' ला जागा नाही. त्यामुळे पुढील संकेताची वाट पाहतो.

इन्द्रा

नंदन

नंदन · Sat, 13 Nov 2010 - 07:26

प्रथम कोड्याची रचना थोडी चुकीचीच झाली हे कबूल करतो. ह्या शब्दाचा अर्थ मी जेव्हा प्रथम वाचला तेव्हा तो शब्द केवळ मला अपेक्षित असणार्‍या कथेतच आला असावा अशी मी (चुकीची) समजूत करून घेतली. पण आता श्रामो आणि इंद्रा यांच्या प्रतिक्रिया वाचून त्याचा वापर मराठीत अन्यत्रही झाला आहे याची खात्री पटली. तेव्हा अजून एक संकेत वर देतो आहे.

वल्ली

वल्ली · Sat, 13 Nov 2010 - 08:10

मराठी भाषक मुसलमान समाज म्हणजेच कोकणातली सासुरवाडी असावी. पण कुणाची हा एक प्रश्नच. अर्थात विनोदी कथा म्हणजेच पु.ल. आणि त्यांची सासुरवाडी म्हणजेच सुनिताबाईंचे माहेर हे कोकणातलेच. लेखक तर पु.ल.च असावेत.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Sat, 13 Nov 2010 - 09:41

".....अर्थात विनोदी कथा म्हणजेच पु.ल. आणि त्यांची सासुरवाडी म्हणजेच सुनिताबाईंचे माहेर हे कोकणातलेच....

~ असे असणार नाही. कारण श्री.नंदन यानी 'कथा' या प्रकारात 'फज्जर' शब्द वापरला आहे असे लिहिले आहे, आणि पु.ल.देशपांडे यांच्या विपुल आणि विविध साहित्यात "कथा' हा प्रकार येत नाही....जरी त्यांची सासुरवाडी कोकणातील असली तरी.

जयवंत दळवींच्या 'सारे प्रवासी घडीचे' मध्ये इब्राहिम नामक एका खाटक्याचे पात्र आहे....त्याच्या तोंडी असे काही उदगार आहेत का हे पाहण्यासाठी पुस्तकाला हात घातला, त्यावेळी लक्षात आले की 'अरेच्या ती तर छोटेखानी कादंबरी आहे..' परत थांबलोय.

इन्द्रा

नंदन

नंदन · Sat, 13 Nov 2010 - 10:01 · उत्तर

इन्द्रा, कथा हा शब्द कदाचित तितकासा बरोबर नसेल. मात्र लेखन पुलंचंच आहे. (दस्तुरखुद्द पुलंही या लेखाचं अभिवाचन करताना ही ..... कथा/गोष्ट आहे अशीच सुरुवात करतात, हा अजून एक संकेत ;))

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Sat, 13 Nov 2010 - 10:42

ठीक आहे...... ज्या अर्थी तुम्ही त्यासाठी "प्रसिद्ध" अभिनाम वापरले आहे, त्या अर्थी ती कथा "तीच" असणार. [व्य.नि. त कथेचे नाव दिले आहे.]

इन्द्रा

नंदन

नंदन · Sat, 13 Nov 2010 - 10:52 · उत्तर

इन्द्रा, उत्तर बरोबर आहे! ह्या पहिल्या कोड्याचा विजेता इन्द्रराज पवार.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Sat, 13 Nov 2010 - 10:58

हुश्श्श !!!!! ओळखली पण, घाम फोडला नंदनच्या 'फज्जर' ने !

इन्द्रा

सागर

सागर · Sat, 13 Nov 2010 - 11:34 · उत्तर

'म्हैस' कडे दुर्लक्ष केले आणि खोगीरभरतीतच रमलो होतो ;)

चर्चा प्रकार