- Log in to post comments
सध्या काय वाचताय? (भाग २) बराच मागे गेलाय. आणि मधल्या काळात सगळ्या मित्रांनी भरपूर खरेदीचे धागे टाकले. ( जळजळ दुसरे काय. ;)) त्यातले काय काय वाचून झाले हे जाणून घेण्यासाठी काढलेला हा धागा.
अशात ऑफिसमधे कामाचा व्याप वाढल्यामुळे वाचायला वेळ काढावा लागत आहे. तरी जसा वेळ मिळेल तसे काहीतरी वाचायचा प्रयत्न करत आहेच. मध्यंतरी अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते यांनी लिहिलेले गुलाम हे पुस्तक हातात पडले. अच्युत गोडबोलेंच्या इतर पुस्तकात जसा एखाद्या विषयाचा आढावा घेतलेला असतो तसा याही पुस्तकात गुलामगिरीचा सविस्तर आढावा घेतलेला आहे. अगदी सुरवातीला गुलामगिरीच्या सुरूवातीपासून ते अगदी नव्वदीच्या दशकात दक्षिण आफ्रिकेत चालु असलेल्या गुलामगिरीचा इतिहासच मांडलेला आहे. पुस्तकाचा बराचसा भाग हा अमेरिकेतली वर्णद्वेषातून अभारलेल्या गुलामगिरीचा आणि त्या अनुषंगाने अमेरिकेचा इतिहासच सांगतो. एकुणच पुस्तक एकदा वाचावे असे नक्कीच आहे.
अभिप्राय
आरागॉर्न
आरागॉर्न · Sat, 1 Jan 2011 - 18:38
व्हर्जिनिया वूल्फची मिसेस डॅलोवे सुरू केली आहे. कादंबरी छोटी असले तरी निवेदनशैली सोपी नाही त्यामुळे नेहेमीपेक्षा जास्त वेळ लागेल असे वाटते आहे.
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Sun, 2 Jan 2011 - 07:19
गेल्या महिन्याभरात बर्यापैकी वेळ गावला. त्याचे फलित -
१. गॉन विथ दी विंड (निव्वळ थोर)
२. अंतकाळाची बखर (इतिहासाकडे निराळ्या कोनातून पाहणारे, सर्वंकष, काहीसे जड, पकड घेणारे)
३. नायजेरियात धोंडे पाटील (माहितीपूर्ण)
४. लवासा (उद्वेगजनक)
५. सुनीताबाई (अपेक्षेप्रमाणे उत्तम, व्यक्तिपूजक नव्हे, गुणदोषांची चिकित्सा करणारे)
६. पिवळ्या छत्रीतली मुलगी (ताजेतवाने, उत्कट, विखारी)
७. शब्देविण संवादु (टिपिकल राणी दुर्वे)
ऋषिकेश
ऋषिकेश · Sun, 2 Jan 2011 - 08:39
गुलाम वाचले पाहिजे. विषय आवडीचा वाटतोय.
यावरून आठवलं भुजबळांनी ओबामांना दिलेले महात्मा फुल्यांचे "गुलामगिरी" कोणी वाचलंय का?
अवांतर: गुलाम म्हटले की माझे फार आवडते लिंकनचे वाक्य आठवते: "मला गुलामगिरी आवडत नाही म्हणूनच मी मालक व्हायचे नाकारतो".
बाकी नुकतेच "हेडहंटर" संपवले आणि "इंडीया आफ्टर गांधी" (एकदाचे) संपत आले आहे.. बहुदा वडावाला यांचेच "जल आक्रमिले" वाचायला घेईन
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Mon, 3 Jan 2011 - 06:19 · उत्तर
हेडहंटर कसे आहे???
मृत्युन्जय
मृत्युन्जय · Mon, 3 Jan 2011 - 12:55 · उत्तर
ओक्के ओक्के आहे. वाइट नक्की नाही. पुस्तकाची जेवढी जाहिरात केली आहे त्यामानाने पुस्तक लै भारी नाही. टिळकांचे अनुभव म्हणुन चांगले म्हणता येइल इतकेच. पण वाचले पुस्तक तर वाइट नाही वाटणार
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 3 Jan 2011 - 15:50 · उत्तर
ओक्के ओक्के आहे. विषय नवा असला तरी मांडणी तितकिशी आवडली नाही. गिरिश टिळकांच्या अनेक अनुभवांना (त्यातील काहि नेहमीचे तर काहि रोचक) एकापाठोपाठ मांडलेली शोकेस असे हे पुस्तक आहे. काहि अनुभव रोचक असले तरी शोकेसमधे ठरविक क्रमाने/पद्धतीने/रचनेत मांडल्यावरच मजा येते ती आली नाही :(
सागर
सागर · Sun, 2 Jan 2011 - 08:49
आजारपणामुळे सुटी घेतली त्यामुळे थोडा वेळ मिळाला व पुढील ३ पुस्तके वाचली
१. सत्तांतर - व्यंकटेश माडगूळकर ( निव्वळ अप्रतिम कादंबरी. एकही संवाद नसूनही प्रचंड परिणामकारक)
२. कॅसिनो रॉयल - इयान फ्लेमिंग - अनू; सुभाष जोशी ( बाँडपट कॅसिनो रॉयाल तंतोतंत डोळ्यांसमोर उभा राहिला. कादंबरीवाचन नक्कीच एक थरारक अनुभव होता)
३. सुशिंचे सॉरी सर (एक हलकी फुलकी कादंबरी)
टण्या
टण्या · Sun, 2 Jan 2011 - 16:39
Slavery हे महात्मा फुल्यांचे गुलामगिरी ह्या पुस्तकाचे भाषांतर मी वाचलेले आहे. अत्यंत महत्वाचा असा दस्तऐवज आहे तो. सरकारी मुद्रणसंस्थेने छापलेले हे भाषांतर गतसालच्या साहित्यसंमेलनात मिळाले होते.
सत्तांतर - व्यं. माडगूळकर - ह्या पुस्तकाबद्दल खूप ऐकले आहे. वाचायची इच्छा आहे पण अजून मिळाले नाहिये. ह्याच पुस्तकाबद्दल माडगुळकरांवर वाङ्मयचौर्याचा आरोप झाला होता ना?
विष्णु वडेर
विष्णु वडेर · Wed, 12 Jan 2011 - 16:05 · उत्तर
हॊय, माडगूळकरांनी `लंगूर्स आँफ अबू' या इंग्रजी पुस्तकाची सही सही चॊरी कॆली, हॆच नव्हॆ तर त्या पुस्तकांतील त्यांनी हुबॆहूब चित्रांची/ रॆखाटनांचीही चॊरी कॆली आहॆ, असाही त्यांच्यावर आरॊप हॊता. पण मला वाटतॆ तॊ आरॊप स्टँड झाला नाही, किंवा साहित्य अकादमीनॆही तॊ मान्य कॆला नाही. त्या पुस्तकाला साहित्य अकादमीचॆ पारितॊषिक मिळालॆ हॊतॆ, हॆ आपल्याला माहीत असॆलच!
सागर
सागर · Wed, 12 Jan 2011 - 18:07 · उत्तर
सत्तांतर मिळवण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले होते. शेवटी ते रिप्रिंट झाल्यामुळे मला मिळाले
एवढ्यातच वाचले. काय भन्नाट आहे हे पुस्तक. कॉपी आहे का नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण एकही संवाद नसलेली कादंबरी एवढ्या ताकदीची असू शकते हे माडगूळकरांचे सत्तांतर वाचले आणि पटले.
साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळण्याएवढी ही कादंबरी नक्कीच सुरेख आहे :)
आनंदयात्री
आनंदयात्री · Sun, 23 Jan 2011 - 19:47 · उत्तर
पुस्तक खरेच छान आहे. साधारण एक वर्षापुर्वी वाचले होते.
यावर साहित्यचौर्याचा आरोप झाला होता हे समजुन क्लेश झाले.
रंगासेठ
रंगासेठ · Tue, 22 Feb 2011 - 06:11 · उत्तर
सत्तांतर ही कादंबरी आत्ता उपलब्ध आहे काय? असल्यास कुणाकडे मिळेल?
>>> मॅजेस्टीक प्रकाशन यांनी प्रकाशीत केली आहे, पुण्यात रसिक यांच्याकडे आहे ही उपलब्ध.
सागर
सागर · Tue, 22 Feb 2011 - 09:04 · उत्तर
चार पाच महिन्यांपूर्वी आउट ऑफ प्रिंट होती.
अलिकडेच पुनर्मुद्रण झाली असल्यामुळे माडगूळकरांची सत्तांतर उपलब्ध आहे.
पुण्यात असाल तर रसिकसाहित्य मध्ये नक्की मिळेल.
मी त्यांच्याकडूनच बंगळूरात मागवून घेतली होती गेल्या महिन्यात
वल्ली
वल्ली · Mon, 3 Jan 2011 - 07:31
नेमाड्यांची 'हिंदू' कशीबशी संपवली, त्यापाठोपाठ 'धनंजय' दिवाळी अंक वाचून काढला. आता नुकतेच डॅन ब्राउनचे अनुवादित 'डिसेप्शन पॉइंट' वाचायला घेतलेय.
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Mon, 3 Jan 2011 - 09:15
या विकेंडला बर्या पैकी वाचायला वेळ मिळाला, त्यातच एस एल भैरप्पा यांच्या उमा कुलकर्णी यांनी अनुवादीत केलेल्या आवरण आणि वंशवृक्ष वाचुन संपवल्या. आवरण तर एका बसणीत संपवली. आपल्या कडे इतिहासावर संशोधन करुन त्यावर आधारित डॅन ब्राउन धाटणीचे पुस्तकं कमी असतात असे मागे मीच म्हणालो होतो हे पुस्तक वाचताना आठवुन गेले.
सागर
सागर · Mon, 3 Jan 2011 - 09:31 · उत्तर
अरे निखिल,
मी पण नुकतीच आवरण घेतली आहे. तुझा प्रतिसाद पाहून आवरण वाचण्याचा मोह आता आवरत नाहिये ;)
लवकरच वाचेन. इतिहासावर भैरप्पांनी खरेच छान संशोधन केले आहे. पर्व वाचून मला त्याचा प्रत्यय आलेलाच होता. आवरण वाचल्यावर त्या आदरात अजून भर पडेन :)
सुचिता
सुचिता · Mon, 3 Jan 2011 - 11:09
जगन्नाथ कुंटे यांची धुनी वाचत आहे.
वाचून झाल्यावर अभिप्राय लिहीन.
सागर
सागर · Mon, 3 Jan 2011 - 11:13 · उत्तर
सुचिता,
धुनी वर अभिप्राय नक्की लिहा. माझ्याकडे धुनी आहे पण अजून वाचली नाहिये.
जगन्नाथ कुंटेंची आधीची नर्मदे हर... साधनामस्त... आणि नित्य निरंजन वाचली आहेत.
कालिंदी आणि धुनी अजून वाचायची आहेत
मृत्युन्जय
मृत्युन्जय · Mon, 3 Jan 2011 - 12:56
कालच शाळा वाचुन संपवले. अक्षरशः एका दिवसात वाचले. लैच भारी आहे पुस्तक.
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Mon, 3 Jan 2011 - 13:18
मसासं मध्ये 'नांगरल्याविण भुई' घेतले होते. संगणकशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून अॅलन ट्युरिंगबद्दल आधीही इकडून तिकडून वाचलं होतंच. पण या पुस्तकात ते आणखी छान पद्धतीने मांडलेलं जाणवलं. 'कल्पना ही अद्भुताहूनि रम्य' म्हणतात. नंदा खरेंनी संगणकाची अद्भुत गोष्ट कल्पनेच्या माध्यमातून उत्कृष्टपणे रंगवलीय आणि तीत अॅलन ट्युरिंग, रामानुजन, न्यूमन, जे. आर.डी., होमी भाभा अशा सगळ्यांना गुंफलंय. सगळ्यात कडी म्हणजे हे कथानक भारतात घडतंय असं दाखवण्याचा तर्हेवाईकपणा* तर सॉल्लीड आवडला. खटकणारी बाब एकच. बर्याचदा पुस्तकात इंजिन, इंजिनियरिंग हे शब्द येतात. शेवटच्या चारदोन जागा सोडल्या तर ते सगळीकडे 'एंजिन’, ’एंजिनियरिंग’ असं लिहिलंय. भावना पोचत असल्या तरी हे शब्द असे पाहण्याची सवय नसल्याने कसंसंच होत होतं.. काही असो, नानावटींमुळे हे पुस्तक माहित झाले, त्यामुळे त्यांचे विशेष आभार.
तशीच आवरणही बसल्या बैठकीत संपवली. पुस्तक अशी पकड घेतं, की आता हे प्रकरण संपल्यावर खाली ठेवू असं म्हटलं तरी संपल्याशिवाय खाली ठेवलं जातच नाही. विषय संयतपणे नाही मांडला तर एका शब्दात प्रक्षोभक ठरण्यासारखा. तो जसा पुस्तकात हाताळला गेलाय, त्याला हॅट्स ऑफ!!! त्यांच्या संशोधनाचं, अभ्यासाचं फलित त्यांनी कुणावरही दोषारोप न करता तारतम्याने लिहिलंय आणि त्याचवेळी त्याला रंजकतेने पेशही केलंय.
हे त्यांचे विधान फक्त कादंबरीत मांडलेल्या आंतरधार्मिक संदर्भातच नाही, तर आंरतजातीय व इतर संदर्भातही लागू पडते. जर ते तसे प्रत्येकाने घेतले तर खरंच समाज खूप सुखी होईल. पण या वाक्याचा मतितार्थ नीट समजून घ्यायचा, तर त्यासाठी पुस्तक वाचावे लागेल.
पुस्तक वाचून होतं न होतं तोच लोकसत्तामध्ये त्यांची मुलाखतही वाचली. आणि आता 'मी भैरप्पा' हे त्यांचे पुस्तकही लवकरच वाचेन असं वाटतंय.
*- हा शब्द माझा नाही, तर खुद्द नंदा खरेंचाच.
रैना
रैना · Tue, 4 Jan 2011 - 12:20
पिवळ्याधम्मक छत्रीतील मुलगी आणि संकल्प (सामाजिक चळवळीतील तरुणांच्या जाणिवांचा शोध)- यांचे वाचन सुरू आहे. रॉकिंग आहेत दोन्ही.
नर्मदा परिक्रमा: एक अंतर्यात्रा (भारती ठाकुर)
वाचनीय. अध्यात्मिक प्रवास आहेच पण तरीही बर्यापैकी वस्तुनिष्ठ पद्धतीने वर्णन आहे...त्यामुळेच believable वाटते. भारतीताई आणि त्यांच्या एका मैत्रिणीने नर्मदा परिक्रिमा केली त्याचे वर्णन आहे.
गोनीदांने केलेल्या चित्तथरारक परिक्रमेचे वर्णन आठवत होते. पण ही परिक्रमा मात्र बरीच शक्य व्हावी, अगदीच त्यांच्यासारखी चालत नाहीतरी निदान बसने.
आता त्यांनी वर्णिलेला किती भूभाग सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत पाण्याखाली गेला आहे कोण जाणे.
वाचल्यावर बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात, उद्भवतात ते एक असो. लेखनशैली ठिक, पण अनुभव म्हणून फार फार प्रभावी वाटले. त्यातला प्रांजळपणा आवडला.
धाकट्या नजरेतून : अलका गोडे
राजहंस प्रकाशन, 'माणूस' आणि माजगावकरांची/ पुरंदरेंची कौटुंबिक आणि व्यावसायिक गाथा अलकाताईंच्या नजरेतून. साधे. सोपे. प्रस्तावनाही छान. कसलाही बुद्धीवादी आव आणलेला नाही. खरमरीत, प्रखर, जीव खाऊन, अस्वस्थ करणारे काही नाही. अशी साधी पुस्तकं आणि अशी माणसं कुठे गेली? कित्ती तो सहज प्रामाणिक झेपेलसा लेखाजोखा. काहीसा भावूक मागोवा असला तरीही जमिनीवर आहे. मोजका आहे. तिथेच थांबण्यात हशील आहे.
आई समजून घेताना- उत्तम कांबळे
लेखन म्हणून ठिक. अनुभव म्हणून फार मोठे अर्थातच.
(अजून काही म्हणायचा मोह फार कष्टाने आवरते आहे. तरी मला उचकवू नये. कृपया. ;-))
सागर
सागर · Tue, 4 Jan 2011 - 12:51
आई समजून घेताना- उत्तम कांबळे
लेखन म्हणून ठिक. अनुभव म्हणून फार मोठे अर्थातच.
(अजून काही म्हणायचा मोह फार कष्टाने आवरते आहे. तरी मला उचकवू नये. कृपया. )
मला याबद्दल अधिक माहिती करुन घ्यायला आवडेल. उत्तम कांबळेंचे १ पुस्तक अलिकडेच मी मागवले आहे. अजून वाचले नाहिये पण तुझ्या कांबळेंच्या या पुस्तकावरच्या भाष्याने मला माझ्याकडचं पुस्तक वाचायचे बळ मिळेल हे नक्की :)
तेव्हा रैना बीती जाये नाsssss असे न करता लवकर टंक पाहू :)
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 10 Jan 2011 - 04:46
विकांत वाचनाच्या दृष्टीने झक्कास होता (शिवाय 'नो वन किल्ड जेसिका' पण आवडल्याने विकांत फर्मास गेला)
शनिवारी(पुन्हा एकदा) चिपर बाय द डझन वाचले! (याबद्दल काय लिहायचे!!सगळ्यांना माहित आहेच)
आणि काल "डोंगर म्हातारा झाला" (अनिल बर्वे) वाचले.. कथा छानच आहे.. 'कमराद' म्हातारा आणि मेजर कामा दोघेही डोक्यात फिट्ट रुतले आहेत. प्रतिसादात लिहिण्याइतका छोटा जीव असणारं पुस्तक नाहि हे! दोनेक दिवसांत सवड काढून वेगळा परिचय लिहितो
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Wed, 12 Jan 2011 - 11:13
गोनिदांचे हे पुस्तक आजच वाचलं. या आधी पडघवली, भ्रमणगाथा वाचली होती. हे पुस्तक त्यापेक्षा थोडं वेगळं, तरी तिन्ही पुस्तकांत एक समान सूत्रही जाणवलं. पडघवली गोदावहिनीचं विश्व चितारते, भ्रमणगाथा परिकम्मावासीच्या भावभावनांचं चित्रण करते तर माचीवरला बुधा, बुधाचचं साधंभोळं मावळ रूप मांडते.
मुंबईत लहानाचा मोठ्या झालेल्या बुधाला आयुष्याच्या उतरत्या काळात गावपांढरीचे वेध लागतात. त्याचं गांव आहे ते राजमाचीजवळचं. मुलाच्या-शेजारच्यांच्या विरोधाला न जुमानता तो एकटा वडिलार्जित जागेत येतो. एक झोपडं उभारतो, शेत पिकवतो, अगदी पोटच्या लेकराला जपावं, तशी आवळी, उंबर, खारीचं कुटुंब, चिमण्या, कुत्रा आणि झाडाझुडपांना माया लावतो... आणि त्या माचीकडे पाहत पाहत जगतानाच त्याचा अंतकाळ ओढवतो.
कथानक साधंच, पण ते रानाच्या वर्णनाने आणि बुधाच्या रांगड्या संवादांनी छान खुलवलंय. त्याला वाटणारी माया तो सगळ्यांना वाटत फिरतो आणि स्वकीयांपासून दूर आपलं एक दुसरंच जग माचीच्या सान्निध्यात उभारतो हे खरंच वाचनीय आहे.
मणिकर्णिका
मणिकर्णिका · गुरुवार, 13 Jan 2011 - 00:35
मंद्र वाचून काढलं. 'सं प व लं ' म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल.
भैरप्पांची 'आवरण' किमान थोडीतरी आवडली होती, तिने विचार करायला भाग पाडले होते. पण मंद्र इतकी सुमार आहे , इतकी सुमार आहे की खूपच सुमार आहे.
आपण कादंबरीला 'मंद्र' नाव का दिलंय? हे वारंवार विसरल्याने भैरप्पा अधून मधून ट्रॅकवर येण्याकरता 'मंद्र' असलेलं एखादं वाक्य घुसडून देतात. नावाला जागलो म्हणून भैरप्पा खूष आणि "चला!काहीतरी क्लू लागतोय" म्हणून आपण खूष.
'दाटु' मात्र आवडलं. सगळ्या जाती-पोटजाती समजून घेताना खूप त्रास झाला. राष्ट्रीय स्तरावरच्या जातीभेद-अस्पृशता या समस्यांना हात घालण्याचे धाडस दाखवल्याने त्यांना ’साहित्य अकादमीचा’ पुरस्कार मिळाला असावा. समस्या राष्ट्रीय असेल तर त्याची उकल राष्ट्रीय पातळीवरच झाली पाहिजे (असं अर्थात मला वाटतं).पण या कादंबरीतील लढे, समस्या, उकल यांना प्रादेशिक बंधनं आहेत.
थोडक्यात,
'दाटु' संग्रही ठेवण्याकरता विकत घेण्यास हरकत नाही, 'मंद्र'चुकूनही उचलू नका. ५७२ पानांचा ठोकळा आहे. किंमत चारशे रुपये. पुस्तक संपेपर्यंत "या चारशे रुपयांमध्ये आपण दोन चांगली पुस्तकं उचलली असती तर बरं" असं वाटत राहिलं.
ऋषिकेश
ऋषिकेश · गुरुवार, 13 Jan 2011 - 04:46
कालच हाती आलेल्या पुस्तकातील "मराठी भाषेचे मुळ" वाचतो आहे. ह्या माहितीप्रधान पुस्तकातील पहिल्या काहि पानांतच उत्सुकता वाढली आहे.. सांगतो कसं वाटलं ते!
याच बरोबर.. चवीचवीने "बरेच काहि उगवून आलेले" मनात रिचवतो आहे!.. एकेक कविता म्हणजे रत्न आहे!
मिहिर
मिहिर · गुरुवार, 13 Jan 2011 - 11:34
ना. सं. इनामदारांचे 'मंत्रावेगळा' नुकतेच वाचून संपवले. सध्या 'राऊ' वाचतोय.
मोहन आपटेंचे 'कालगणना' वाचले. अगदी मस्त आहे. विज्ञानाच्या वेगवेगळ्या भागांवर सोप्या भाषेत मराठीत लिहिण्याची त्यांची कला वाखाणण्याजोगी आहे.
प्रशु
प्रशु · गुरुवार, 13 Jan 2011 - 12:04 · उत्तर
मंत्रावेगळा, झेप आणि झुंज एका मागोमाग वाचा. मराठेशाहिच्या पडत्या काळचे सलग दर्शन होईल.
शमिश
शमिश · Sun, 23 Jan 2011 - 11:25
'ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी' वाचतोय. लेखिका: प्रतिभा रानडे, प्रकाशकः राजहंस प्रकाशन.
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 24 Jan 2011 - 05:16
पार्टनर वाचतोय..
शिवाय 'बरेच काही उगवून आलेले'चा मधेच चवीने भुरका घेतोय :)
आरागॉर्न
आरागॉर्न · Mon, 24 Jan 2011 - 06:24
कोरियन लेखक चो से हुई यांची कादंबरी, द ड्वार्फ.
अ फ ला तू न.
मिहिर
मिहिर · Tue, 25 Jan 2011 - 13:08
य. दि. फडकेंचे 'आगरकर' वाचतोय. महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाने छापलेले 'वैज्ञानिक तत्त्वज्ञानाचा उदय' हे अनुवादित पुस्तक वाचतोय.
३_१४ अदिती
३_१४ अदिती · Wed, 26 Jan 2011 - 08:34
सध्या मंगला आठलेकरांचे 'महापुरूषांच्या नजरेतून स्त्री' वाचते आहे. प्रस्तावनाच वाचून झाली आहे, पण त्यांची लिहीण्याची शैली आवडली. विषय म्हटलं तर जुना पण तरीही विचारप्रवृत्त करणारा आहेच.
अलिकडेच 'डॅडी लाँगलेग्ज' नावाची १९१२ सालची भाषांतरीत कादंबरी वाचली. कादंबरीतली गोष्ट अगदी परीकथा टाईपची आहे (आणि त्यावर पिक्चरही निघाले आहेत, अगदी मल्याळममधेही!), पण केंद्रस्थानी असणार्या मुलीचे विचार कसे बदलत जातात हे वाचण्यालायक आहे. गोष्ट थोडक्यात अशी की (अमेरिकेत) अनाथालयात वाढलेल्या एका मुलीला तिची इंग्लिशमधली प्रगती पाहून अनाथालयाचेच एक विश्वस्त कॉलेजात पाठवतात. तिला हातखर्चासाठीही पैसे पाठवतात. अट एकच, तिने 'श्री. जॉन स्मिथ' या आपल्या मानसवडलांना पत्र लिहायची. त्यांचं खरं नाव हिला कळणार नाही, ते तिला उत्तरंही देणार नाहीत. तिची पत्रं म्हणजे ही कादंबरी.
शिवाय 'कोसला', '१८५७चं स्वातंत्र्यसमर' आणि 'कस्तुरबा' ग्रंथालयातून घेतली आहेत.
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Wed, 26 Jan 2011 - 09:03
गेल्या काही काळात थोडा खंड, थोडी सलगता असं करत काहीबाही वाचून झालं. त्यात द स्लीपवॉकर्स, डार्कनेस अॅट नून, थीव्ह्ज इन द नाईट झाली.
इम्पिरियल लाईफ इन एमेराल्ड सिटी हे झालं. इराक युद्ध संपल्यानंतरच्या घडामोडी. एकूण अमेरिकेनं तिथं बट्ट्याबोळ कसा केला याचा धावता आढावा.
त्यानंतर आत्ताच 'आवरण' झाली. आता Gideon's Spies चालू आहे. मोस्सादचा थोडा अन्वेषणवजा इतिहास. या पुस्तकाच्या नावातील पहिल्या शब्दाचा नेमका उच्चार कोणी सांगेल काय?
यानंतर 'एका स्टुडिओचे आत्मवृत्त'.
रोचीन
रोचीन · गुरुवार, 27 Jan 2011 - 05:07 · उत्तर
चा उच्चार माझ्या माहितीनुसार गिडिअन आहे.
नंदन
नंदन · गुरुवार, 27 Jan 2011 - 06:50 · उत्तर
सहमत आहे.
अवांतर - श्रामो, कोस्लरच्या पुस्तकांबद्दल तुमचं मत/परीक्षण वाचायला आवडेल.
श्रावण मोडक
श्रावण मोडक · गुरुवार, 27 Jan 2011 - 07:34 · उत्तर
धन्यवाद रोचीन आणि नंदन. मी हा उच्चार गिड्यॉन असा करायचो. खऱ्या उच्चाराशी तुलनेनं बराच जवळ आहे म्हणायचं.
कोस्लरच्या पुस्तकाविषयी लिहायचं म्हणजे मुश्कील काम राव. बऱ्याच गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. पॅलेस्टीन-इस्रायल समस्येविषयी वाचनाची ही फक्त सुरवात आहे. त्यामुळं तर हे काम अधिकच अवघड. कोस्लर आधी किबुत्झवाला, नंतर बदललेला. तेही सारं त्या काळात झालं होतं. ते का आणि कसं याचा विचार करणं मला खूप कठीण जातंय. पुन्हा कोस्लरविषयीच्या इतर गोष्टी - त्याचं एकूणच वादग्रस्त जीवन. समजू शकशील.
तुलनेनं स्लीपवॉकर्सविषयी लिहिणं सोपं, पण सध्या वाचन मूडमध्ये आहे. त्यामुळं तेही अवघड दिसतंय. :(
नंदन
नंदन · गुरुवार, 27 Jan 2011 - 06:56
हे हावर्ड झिनचं पुस्तक वाचतो आहे. कोलंबस ते क्लिंटन ह्या आधुनिक अमेरिकेच्या इतिहासाचा जेत्यांच्या नव्हे तर शोषितांच्या (अमेरिकन इंडियन्स, कृष्णवर्णीय, स्त्रिया, स्थलांतरित कामगार) दृष्टिकोनातून घेतलेला आढावा, असं एका वाक्यात याचं वर्णन करता येईल.
त्याआधी फ्रेडरिक फोरसिथचं 'द अफगाण' म्हणून पुस्तक वाचलं. ठीकठाक आहे - त्याच्या आधीच्या पुस्तकांएवढी मजा आली नाही.
श्रावण मोडक
श्रावण मोडक · गुरुवार, 27 Jan 2011 - 07:35 · उत्तर
खरेदीच्या यादीत हे पुस्तक घेतलं आहे. येताना आणशील काय?
आरागॉर्न
आरागॉर्न · गुरुवार, 27 Jan 2011 - 17:12
आर्थर सी क्लार्कचे शेवटचे पुस्तक - द लास्ट थेरम.
आणि ग्लॅडवेलचे ब्लिंक.
दोन्ही जबरदस्त आहेत.
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 28 Jan 2011 - 04:44
पार्टनर वाचून झालं. विषेश कनेक्ट होऊ शकलो नाहि. कथा ज्या काळात घडतेय तो काळ छान चितारला आहे मात्र सध्याची परिस्थिती आयुष्याचा वेग, गरजा, माध्यमं आणि समजाचे विचार सारंच इतकं बदललं आहे की जराही साधर्म नसल्याने ती कथा त्रयस्थासारखी वाचली जाते. एक काळचा सामाजिक स्नॅपशॉट म्हणून मात्र कादंबरी तपशीलवार आहे.
सागर
सागर · Fri, 28 Jan 2011 - 08:58 · उत्तर
असो ऋ,
अजून काही वर्षांनी पार्टनर पुन्हा वाच मग नक्की जवळचा वाटेन.
काही गोष्टी अनुभवाव्याच लागतात.
एखादे गाणे आपल्याला लहानपणापासून का आवडत असते?
त्याचे खरे कारण ते गाणे खूप सुंदर असते हे कारण नसते तर
त्या गाण्याशी निगडीत आपल्या काही आठवणी जोडलेल्या असतात. त्यामुळे जास्त आवडते.
असो.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ऋ.
पण कालौघात नक्की पार्टनर तुला भावेल याची खात्री आहे. कारण नात्यांमधील अनुभव हे कालातीत असतात आणि वपुंनी हेच नेमकं पार्टनर मध्ये चितारलेलं आहे
रश्मि
रश्मि · Fri, 28 Jan 2011 - 09:09
मि हल्लिच "मनातल आभाळ" हे पुस्तक वाचत आहे,
सागर
सागर · Fri, 28 Jan 2011 - 09:12
येता जाता वाचण्यासाठी मी
सिडने शेल्डनचे 'अदर साईड ऑफ मिडनाईट' हे इंग्रजीतून घेतलं आहे
आणि
वल्लीने शाळा बद्दल माझ्या मनात असलेली शंका दूर केल्यामुळे
मिलिंद बोकिलांचे शाळा घेतलं आहे.
सागर
सागर · Mon, 14 Feb 2011 - 17:49
तीनचार वेळा प्रयत्न करुनही शेवटी आज एकदाचा मुहूर्त लागला
नातिचरामि घेतले आहे वाचायला.
पहिली ४ पाने खूप कष्टाने वाचली जातात.
खास करुन पान क्र.३ वरचे वाक्य 'सुखाच्या आठवणी दु:ख देऊन जातातच. पण दुखल्याच्या आठब्णींनीही असं कडू कडू का व्हावं मन?' ह्यातील पहिले वाक्य अगदी प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर एकदम फालतू वाटले. (*** हे माझे वैयक्तिक मत आहे *** )
सुखाच्या आठवणी दु:ख देऊन गेलेल्या मी आजपर्यंत तरी कधी अनुभवले नाही. उलट नकळत त्या आठवणींनी ओठांवर आपसूक हसू उमटते हा माझा अनुभव आहे.
पण पुढे काही पाने वाचल्यावर लेखिकेची भूमिका थोडीफार स्पष्ट होते. त्या दृष्टीकोनातून कदाचित ते वाक्य बरोबरही असू शकेन. पण तसे असले तरीदेखील साहित्य कलाकृतीच्या दृष्टीने हे वाक्य चुकीच्या ठिकाणी लेखिकेने घातले आहे असे मला वाटते. अर्थात अजून बरीच मजल गाठायची आहे. पण आज मला नातिचरामि वाचण्याचा सूर सापडला म्हणून इथे लिहितो आहे. आता नातिचरामि नक्की वाचून होईन माझी :)
बोकीलांच्या 'शाळे'त जायची मनाची तयारी नव्हती, कारण बोकिलांची शाळा वाचताना मला मनसोक्त त्यात डुंबायचं आहे, भान हरपून जायचं आहे. नातिचरामिचा सूर सापडला म्हणून ती वाचून पूर्ण करणार आहे एवढंच.
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 15 Feb 2011 - 07:26
एकीकडे "आहे मनोहर तरी" कितव्यांदा तरी निवांतपणे वाचतोय. शिवाय आज लायब्ररीतून अमर्त्य सेन यांचे Identity and violence हे पुस्तक आणले व लगेच वाचायला सुरूवात केली आहे.
मिहिर
मिहिर · Fri, 18 Feb 2011 - 13:43
विश्वास पाटलांचे 'पानिपत' झाले.
आता अजेय झणकरांचे बारभाईंच्या कारस्थानावरचे 'द्रोहपर्व' वाचतोय.
मणिकर्णिका
मणिकर्णिका · Wed, 23 Feb 2011 - 06:07 · उत्तर
गेल्या आठवड्यात अरविंद अडीगाचे 'द व्हाईट टायगर' आणि चेतन भगतचे 'टू स्टेट्स' वाचले.
बलराम हलवाई नामक मूळच्या गयेच्या अठराविश्वे दारिद्रयात वाढलेल्या पण आता बंगलुरुमध्ये 'entrepruener' असलेल्या माणसाने चीनचे पंतप्रधान वेन जिओबाओ यांना सात रात्रीत लिहीलेली सात पत्रं आहेत. मालकाची इमानाने चाकरी करणं हेच इतिकर्तव्य मानणारा, पिढ्यानुपिढ्या रक्तात भिनत गेलेली लाचारी पहिल्यांदा विनातक्रार स्वीकारणारा बलराम नंतर ही जोखडं झुगारुन देताना दिसतो. एका कोळसासम्राटाचा ड्रायवर कम बेअरा कम हरकाम्या ते एक सुसंपन्न उद्योजक हया त्याच्या प्रवासातल्या त्याच्या विचारांतली स्थित्यंतरं, इप्सित गाठताना त्याला किती जणांच्या डोक्यावर पाय ठेवून जावे लागते, या प्रवासात किती जणांचा बळी जाणं अपरिहार्य आहे याची कहाणी म्हणजे 'द व्हाईट टायगर'.
भगतचे '5 point someone' हाच त्याचा मास्टरपीस आहे या माझ्या मतावर शिक्कामोर्तब. पण मेलोड्रामा आवडणारया लोकांना आवडेल.
मणिकर्णिका
मणिकर्णिका · Wed, 23 Feb 2011 - 06:09 · उत्तर
गेल्या आठवड्यात अरविंद अडीगाचे 'द व्हाईट टायगर' आणि चेतन भगतचे 'टू स्टेट्स' वाचले.
बलराम हलवाई नामक मूळच्या गयेच्या अठराविश्वे दारिद्रयात वाढलेल्या पण आता बंगलुरुमध्ये 'entrepruener' असलेल्या माणसाने चीनचे पंतप्रधान वेन जिओबाओ यांना सात रात्रीत लिहीलेली सात पत्रं आहेत. मालकाची इमानाने चाकरी करणं हेच इतिकर्तव्य मानणारा, पिढ्यानुपिढ्या रक्तात भिनत गेलेली लाचारी पहिल्यांदा विनातक्रार स्वीकारणारा बलराम नंतर ही जोखडं झुगारुन देताना दिसतो. एका कोळसासम्राटाचा ड्रायवर कम बेअरा कम हरकाम्या ते एक सुसंपन्न उद्योजक हया त्याच्या प्रवासातल्या त्याच्या विचारांतली स्थित्यंतरं, इप्सित गाठताना त्याला किती जणांच्या डोक्यावर पाय ठेवून जावे लागते, या प्रवासात किती जणांचा बळी जाणं अपरिहार्य आहे याची कहाणी म्हणजे 'द व्हाईट टायगर'.
भगतचे '5 point someone' हाच त्याचा मास्टरपीस आहे या माझ्या मतावर शिक्कामोर्तब. पण मेलोड्रामा आवडणारया लोकांना आवडेल.
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 28 Feb 2011 - 05:29
आहे मनोहर तरी पुन्हा एकदा वाचून झालं. Identity and violence वाचन चालु आहे. खूप आरामात वाचवं लागतंय पुस्तक. भाषा (माझ्यासाठी) काहिशी क्लिष्ट असली तरी विचार, त्यासाठी दिलेली उदाहरणे आणि त्या विचारांचा प्रवास सुंदर आहे.
याशिवाय सुमेध वडावाला यांचे शब्दांकन असलेले रुपाली रेपाळे हिच्या विविध जलपराक्रमांवरचे 'जल आक्रमिले' वाचतो आहे. अत्यंत गरीबी असूनही मुलीला विश्वपराक्रम करायला लावण्याची वडिलांची दुर्दम्य इच्छाशक्ती (प्रसंगी हेकटपणा)स्तिमित करते हेच खरे
अप्डेटः आक्रमिले वाचून झाले. शेवटचे प्रकरण विनाकारण घातले आहे असे वाटले. बाकी पुस्तक विकत घेतले नाहि तरी चालेल. मात्र मिळाले तर सोडू नये असे आहे.