- Log in to post comments
पुविवरच पुस्तकांबद्दल, पुस्तकांवर चर्चा करायचा शिरस्ता थोडासा बाजूला ठेवत, एका ब्लॉगपोस्टबद्दल चर्चा म्हणा, वाद म्हणा, नुकताच घडून आला. ब्लॉगवर मांडलेले विचार पटले नाहीत हे सांगता सांगता, ब्लॉगकर्तीवरही टीका झाली, काही जणांना वापरलेली भाषा आवडली नाही, काहींना लिखाणाचा सूर पटला नाही. काहींना असे लिखाण म्हणजे ब्लॉगकर्तीने टीका केलेल्या वर्गावर केलेली सांस्कृतीक टिप्पणी वाटली आणि त्याची 'खळ्ळ आणि खट्ट' शी तुलना करुन, हे योग्य नाही असा सूर आळवून झाला.. काहींना अवचट आणि तत्सम कार्यकर्त्यांचे सामाजिक कार्य ल़क्षात घेता, त्यांच्या त्या अनुभवांवर आधारित अशा लेखनावर टीका करणे, त्यत साहित्यिक मूल्ये शोधणे वा त्याबद्दल कोणतेही अनुदार उद्गार काढणे म्हणजे रौरव नरकाची पातळी गाठणे वाटले...
थोडक्यात ब्लॉगकर्तीला स्वतःचं व्यक्ती आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य असलं तरीही असं तिने लिहायला नकोच होतं असा काहीसा सूर जाणवला. म्हणजे इतरांना तिचं वा इतर कोणाचंही जितकं आणि जेवढं - रादर, सोयीपुरतं स्वातंत्र्य मान्य आहे - तितकंच आणि तसंच लिहायचं का? मग अभिव्यक्तीस्वातंत्र्याची व्याख्या काय? व्याप्ती किती? तुम्हांला काय वाटतं?
अभिप्राय
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Wed, 1 Dec 2010 - 06:00
हो. ब्लॉगकर्तीवर टीका झाली, होणार. त्या टीकेला तिने सामोरे गेले पाहिजे (म्हणजे काय हे पुढे एका वाक्यात येईल). अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ती किंमत आहे. काल मी तिथे जे लिहिले आहे, आज मी जे लिहितो आहे त्यावरून माझ्यावर टीका झाली तर ती मी ऐकून घेतलीच पाहिजे. जिथे आवश्यक तिथे तिचा प्रतिवाद केला पाहिजे आणि शक्य तिथे ती स्वीकारली पाहिजे (यालाच मी सामोरे जाणे म्हणतोय). कारण मीही व्यक्त होतो आहे ते अभिव्यक्तीस्वातंत्यामुळेच आणि त्याची ती किंमत आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध नाहीच. इतकाही नाही, की कुणी मला बदमाष म्हणावे. पण जो मला बदमाष म्हणेल, त्यानेही माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक केली पाहिजे. त्याला मी हलकट म्हणेन. चालू राहील हे. फारसा काही फरक पडत नाही.
काय झालंय, स्वातंत्र्य वगैरे संकल्पना आपल्याच चौकटीपुरत्या लावण्याचा एक उद्योग सुरू आहे, आणि हा उद्योग आजचा नाही. अभिव्यक्ती म्हणजे काय हेही नीट सांगता येत नाही. 'खळ्ळ आणि खट्ट'शी केलेली तुलना लगेच खटकते. पण शब्दांच्या माध्यमातून एखाद्याची अभिरुची कमअस्सल ठरवून त्याला केलेली दुखापत मात्र चालते, याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचे ही एक फॅशन झाली आहे.
कालच एकांशी चर्चा करत होतो. अरुंधती रॉयने काश्मीरसंबंधात काही विधाने केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला, त्या स्वातंत्र्याची ती किंमत आहे. तिने त्या गुन्ह्याला सामोरे गेले पाहिजे.
आजच्या फ्री मार्केट, लायसेझ फेअर वगैरेच्या जमान्यात, देअर इज नथिंग कॉल्ड अ फ्री मीलच्या "तत्वज्ञानात्मक" युगात हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही फुकटात हवे असते याचे समर्थन होताना पाहून हसावे की रडावे कळत नाही. अर्थात, एकूण क्रोनी कॅपिटलिझ्मच खरं, त्यामुळं ही स्वातंत्र्यासारखी मूल्ये फुकट हवीत, हेही खरेच. माणूसच. मातीच्याच पायांचा.
आता मूळ प्रश्नांकडे वळू.
नाही. उलटा (आणि खरं तर तो सुलटाच) विचार करू थोडा. किंमत मोजण्याची (अर्थातच, इथे मी वास्तविक खळ्ळ-खट्ट म्हणत नाहीये; तर ही किंमतही त्याच पद्धतीने चुकवली जाईल, ज्या पद्धतीने टीका केली असेल) तयारी असेल, तर पोस्ट पाडा. आपली हरकत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य. पाडलेल्या पोस्टवर टीका होणार. टीका झाली की लगेच "अरे, ते माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे" हा आसरा नको. कारण टीकाकाराचेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच. आव घ्यायचा सॉक्रेटिसचा, पण विषाचा प्याला समोर आला की मग मात्र ते माझं स्वातंत्र्य? वा...
प्रतिसाद संपादित.
-
मदतनीस
व्याख्या? आता ती ज्याने-त्यानेच ठरवावी. आपल्याला किती किंमत परवडते त्या हिशेबात. व्याप्तीही तशीच ठरवावी. सोपं आहे. समजा, "मला सोसवत नाही 'क्ष' या व्यक्तीकडून माझ्यावर होणारी टीका". माझी अभिव्यक्ती ठरली. तशी टीका होणार नाही एवढाच मी अभिव्यक्त होणार. तीच व्याख्या आणि तीच व्याप्ती. मी जितका आणि जसा अभिव्यक्त होईन तसेच त्याचे मूल्यमापन आणि म्हणून स्तुती, कौतूक किंवा टीका होणार.
समाजशास्त्र ही केवळ पुस्तकी कल्पना आहे. समाज अशा शास्त्रानुसार चालत नसतो, कारण शास्त्राचे (हो, तेच ते विज्ञान वगैरे... पुराव्याने शाबीत होणारे) काटेकोर नियम तिथं लागू होत नसतात. असो. आता पुन्हा "समाज ही गुंतागुंतीची..." यावरून मी टीकेचा आणि खिल्लीचाही धनी होणार आहेच. पण तीच माझ्या अभिव्यक्तीची किंमत आहे.
(ही खिल्ली बसते का अभिव्यक्ती स्वातंत्र्यात? बसते, कारण ती भावनाही टीकेची आहे. पण मग त्या खिल्लीची मीही खिल्ली उडवली मस्तपैकी तर गलका नको)
तेव्हा, तारतम्य हेच खरं. पण कॉमनसेन्स हा जसा रेअर असतो असं म्हणतात, तसंच तारतम्य हेही दुर्मिळच.
(उद्या माझे यातले काही विचार बदलले तर आश्चर्य नको. कारण अभिव्यक्ती ही एक प्रक्रिया आहे.)
स्पिन डॉक्टर
स्पिन डॉक्टर · Tue, 30 Nov 2010 - 11:12 · उत्तर
मानसिक दुखापत हे ढोंग आहे. "मला तुमचे तोंड बघून मानसिक दुखापत होते" असे कोणी म्हटले तर समोरच्याने बुरखा घालावा का?
तुम्हाला अभिव्यक्तिस्वातंत्र्याची व्याख्याच समजलेली नाही. ज्ञानदा देशपांडे यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याची किंमत म्हणून "देशपांडे मूर्ख आहेत" हे वाक्य सहन करण्याची तयारी त्यांनी ठेवावी. "देशपांडे यांनी असे लिहिल्यास खळ्ळ आणि खट्ट सहन करण्याची तयारी ठेवावी" हे वाक्य मात्र अभिव्यक्तिस्वातंत्र्यविरोधी असल्यामुळे निंदनीय आहे. टीका करण्याच्या हक्काची किंमत 'टीका सहन करणे' ही आहे, 'खळ्ळ आणि खट्ट' नाही. साधे "देशपांडेंना सांस्कृतिक टीकेचा हक्क नाही" असे म्हटले तरी त्यात "...म्हणून वास्तविक तर त्यांना (शारिरीक) शिक्षा द्यायला हवी" असे अध्याहृत असतेच! अन्यथा 'हक्क' या शब्दाला अर्थ नाही. "हक्क नाही" हे विध्यर्थी/आज्ञार्थी वाक्य असते. "कखघ जमातीने चछज देशात रहावे, भारतात रहाण्याचा हक्क नाही" या विधानाला 'निव्वळ टीका' म्हणून माफ केले जात नाही. त्याला 'स्वातंत्र्यविरोधी वाक्य' असेच म्हटले जाते.
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Tue, 30 Nov 2010 - 12:14 · उत्तर
हे तुमचे मत आहे. माझे मत तसे नाही इतकेच. असहमती पुरेशी आहे इथं.
हाहाहाहा... तोंड आणि शब्दांचा मारा यात फरक करायचा नसेल तुम्हाला. नका करू. मी करणार.
हाहाहाहा. व्याख्या? ती काय असते? पण तरी हरकत नाही. मी अज्ञानी. आमच्या भाषेत सांगायचे तर "हो बाबा, तुझा बाप एसपी, माझा हवालदार."
एवढेच माझे म्हणणे आहे. आणि मुळात ज्ञानदा यांनी अशी वाक्यं "सहन" केली आहेत. ते त्यांच्या ब्लॉगवर दिसते. त्यासाठीच त्यांच्यावर मी अजून टीका करेन आणि त्या बदल्यात त्यांनी मला मूर्ख म्हटले तर तेही ऐकायची माझी तयारी आहे.
हाहाहाहा... विकृतीकरण. बाकी काही नाही.
आणि थोडे पुढे जाऊन सांगतो, तसे चुकूनही काही झाले तर तिथं ज्ञानदांच्या समर्थनार्थ मी असेनच. नुसती विचारजंती चर्चा करत बसणार नाही, कृती करेन. तेवढी धमक माझ्यात आहे.
समजते ना तुम्हाला? मग बास्स.
काल्पनिक साहित्य चांगले लिहू शकाल. शुभेच्छा.
बोळा तुंबला आहे. मोकळा करून घ्या. म्हणजे असले स्वप्नदोष होणार नाहीत...
संपादक, पुन्हा एकदा खळ्ळ आणि खट्टच्या संदर्भात विकृतीकरण (किंवा " 'स्पिन' " म्हणूया) झाले आहे. यांची दखल घ्या. हे गृहस्थ कोणत्या मोहीमेवर येथे आले आहेत याचा एकदा खुलासा झाला पाहिजे. येथे कसे वागायचे हे ठरवणे सोपे जाईल.
स्पिन डॉक्टर
स्पिन डॉक्टर · Tue, 30 Nov 2010 - 13:28 · उत्तर
माझा अजेंडा तुम्हाला समजला असेल असे मला वाटले होते.
इंद्रराज पवार यांनी माझ्या लेखनावर येथे टीका केली त्याला उत्तर देण्यासाठी मी येथे आलो. ज्ञानदा देशपांडे आणि माझ्या लिखाणावर त्यांनी एकाच प्रकारची टीका केलेली असल्यामुळे देशपांडे यांचे समर्थन करण्यात माझा स्वार्थही आहे.
'खळ्ळ आणि खट्ट' चा अ-विकृत अर्थ बनवून दाखवा.
लतिका विवेक
लतिका विवेक · Tue, 30 Nov 2010 - 14:33 · उत्तर
फारच सुन्दर विचार मान्डलात अभिव्यक्ती बद्दल.
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Tue, 30 Nov 2010 - 07:55
माझं मत मी आधीच मांडलं आहे.
तरीही यशोधराच्या धाग्याला अनुमोदन म्हणून इथे पुन्हा नोंद करते.
ब्लॉगलेखिकेशी मतभेद, तिच्या शैलीला विरोध, तिच्या सुराचा निषेध हे सगळं ग्राह्य आणि मान्य आहे. मात्र 'तिनी असं लिहिलंच कसं? आधी स्वतःची लायकी सिद्ध करून दाखव' प्रकारच्या प्रतिसादांना माझा विरोध आहे. लेखिकेने केलेल्या प्रकारचे हल्ले, प्रतिहल्ले, समर्थनं इत्यादि घुसळण व्हायला हवी. सुज्ञ वाचक त्याला जे हवं तेच घेईल. कदाचित मत बदलेल, कदाचित नाहीही. पण मत बदलण्याची शक्यताही गोठवून टाकता कामा नये.
बिपिन कार्यकर्ते
बिपिन कार्यकर्ते · Tue, 30 Nov 2010 - 14:07 · उत्तर
सहमत.
सहमत.
सहमत.
आर्ग्युमेंटच्या दोन्ही बाजूंना सारखाच अधिकार आहे. अर्थात, स्वातंत्र्याबरोबर जबाबदार्या असतात याचे भान असणे आवश्यक. विरोध व्यक्त होताना साधरणपणे सभ्य समजल्या जाणार्या मार्गांनी व्यक्त व्हावा अशी अपेक्षा.
सागर
सागर · Tue, 30 Nov 2010 - 14:12 · उत्तर
विरोध व्यक्त होताना साधरणपणे सभ्य समजल्या जाणार्या मार्गांनी व्यक्त व्हावा अशी अपेक्षा
असेच म्हणतो.
चिंतातुर जंतू
चिंतातुर जंतू · Tue, 30 Nov 2010 - 08:36
आपल्याकडे अभिव्यक्तीस्वातंत्र्याविषयीचे सुशिक्षित लोकांचे जे आचार-विचार आहेत ते मुळात जरा गमतीशीर आहेत असं वाटतं. ज्या गोष्टींनी लोकांच्या भावना दुखावतात असे दावे केले जातात त्यातल्या बहुतांश (कदाचित सगळ्याच!) फारच किरकोळ किंवा सौम्य असतात. शिवाय, बंदी घाला किंवा काटछाट करा असे जे दावे केले जातात (आणि ते सहन केले जातात) त्यांमधला सुशिक्षित वर्गाचा सहभाग किंवा त्या गोष्टींना असलेला त्यांचा पाठिंबा हाही गमतीशीर असतो. मी गमतीशीर अशा कारणासाठी म्हणतो की व्यक्तिगत आयुष्यात हा वर्ग आता खूपच सहिष्णू आहे. एखाद्या व्यक्तीवर/संस्थेवर प्रत्यक्ष हल्ला, मालमत्तेची नासधूस अशा (खळ्ळ/फटॅक) गोष्टींमध्ये या वर्गाचा सक्रीय सहभागही शून्य असतो. जाहीर ठिकाणी अशा गोष्टींच्या अभिव्यक्तीविरोधात भूमिका घेऊन मोर्चात सहभागी होणं, भाषणं देणं अशा लोकशाही (अहिंसक) अभिव्यक्तींतही त्यांचा सहभाग किरकोळ किंवा शून्य दिसतो. पण व्यक्तिगत चर्चांमध्ये किंवा आंतरजालावर मात्र ते हिरीरीनं आपली अभिव्यक्तीविरोधी मतं मांडतात. त्यामुळे मला एकंदरीत असं वाटतं की अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा त्यांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे मान्यच आहे. त्यांना पुरेशा गांभीर्यानं विचारलं किंवा त्याविषयी नीट युक्तिवाद केला तर ते आपल्याला न पटणाऱ्या (किंवा आक्षेपार्ह/किळसवाण्या वाटणाऱ्या अशाही) अभिव्यक्तीचा इतरांचा हक्क मान्य करतील/करतात.
थोडक्यात, ‘ज्याला जे हवं ते त्यानं म्हणावं; मी त्याला अहिंसक मार्गानं विरोध करेन किंवा त्याकडे दुर्लक्ष करेन’ ही लोकशाही त्यांना पटत असावी असंच त्यांचं वर्तन आहे.
स्पिन डॉक्टर
स्पिन डॉक्टर · Tue, 30 Nov 2010 - 10:56
इथेही व्याख्या? हा हा हा.
ब्लॉगवरील लिखाणावर झालेल्या (अनेक ठिकाणच्या) टीकांत पुढील मुद्दे सापडले.
ठीक, या आक्षेपाविषयी चर्चा करून उच्च साहित्य कोणते ते ठरविता येईल, ज्ञानदा देशपांडे यांनाही चर्चेत सहभागी होण्याची विनंती त्या ब्लॉगवर करता येईल.
हा अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरील हल्ला आहे.
मान्य.
परंतु, अवचट यांच्या भाषेतील दोष दाखविणे हा देशपांडे यांचा उद्देशच नव्हता, त्यांनी नोंदविलेली माहिती एकांगी आणि गुडी-गुडी असल्याचा आरोप होता असे वाटते.
त्याचप्रमाणे, येथील टीकाही बंग यांच्या भाषेवर नव्हतीच, मतांवरच होती.
अशी टीका वैचारिक लेखन (सुद्धा!) करणार्या कार्यकर्त्याकडून आली तर प्रामाणिक समजता येईल.
यशोधरा
यशोधरा · Wed, 1 Dec 2010 - 06:00
प्रत्येकाने आपापलं स्वातंत्र्य वापरलेलं दिसतय, खास करुन मोडक आणि स्पिडॉ यांनी तर अधिकच :-) मोडक आणि स्पिडॉ ह्यांचे गुद्देवजा मुद्दे वाचून, प्रत्येक चर्चेची वाट लागायला हवीच का असं वाटलं. असो.
मेधा, धन्यवाद. तुझी मतं अवचट,अभिरुची धाग्यावर वाचली होती. ह्याबाबातीत माझे स्वतःचे इतकेच म्हणणे आहे, प्रत्येकाला - स्वतंत्र लोकशाही देशात राहणार्याला, स्वतःला हवे ते लिहिण्या, बोलण्याचा हक्क आहेच. त्याचप्रमाणे त्या लेखनाकडे लक्ष द्यायचे, न द्यायचे वगैरे हक्क माझ्यासारखी वाचक बजावतेच. इतर अनेक सुजाण वाचक बजावत असतील. व्यक्तीशः मला कोणत्याच लेखनाची प्रतवारी करायला आवडत नाही, किंवा ठराविक विषय वा लेखक यांचे वाचन करणारी व्यक्ती अधिक उत्तम वाचक असते वा अधिक आकलनशक्ती असलेली असते, असेही मला वाटत नाही. माझ्यापुरते, मला तरी वाटते की जसजसा स्वत:च्या आकलनाचा, विचारांचा आवाका, त्याची व्याप्ती, रूंदी,खोली जे काय म्हणाल ते, बदलतो, त्याला अनुसरुन एखादे लेखन आपल्याला त्या त्या वेळी भावत जाते. लेखक आवडू वा नावडू लागतात. त्या विषयी मते बनतात. ती बदलू शकतात ना? की नाही? मुळात, कोणतेही लेखन बरे वाईट असायला हवेच का? शब्द आपुले केवळ वारा...
चिंज, तुमचे "ज्या गोष्टींनी लोकांच्या भावना दुखावतात असे दावे केले जातात त्यातल्या बहुतांश (कदाचित सगळ्याच!) फारच किरकोळ किंवा सौम्य असतात" हे वाक्य मला पटले, आणि पुढे जाऊन हे म्हणावेसे वाटते की अशा किरकोळ गोष्टी पद्धतशीरपणे अक्राळवि़क्राळ स्वरुपात मांडून, काट्याचा नायटा केला जातो. किती जणांना आज ते पोस्ट आठवते वा यापुढे आठवेल?
कोणी अवचट वा इतर कोणाला वा त्यांच्या लेखनाला बरे, वाईट म्हटल्याने काहीही फरक पडत नाही. कोणाला खरंच पडला का? ब्लॉग आणि ब्लॉगकर्तीवर एवढी राळ उडण्याचीही काय गरज होती, हा प्रश्न मला सतत राहून राहून पडला. त्यातून काय सिद्ध करायचे होते? काय सिद्ध झाले? काळ सोकावतो वगैरे बरेच काही मी टीकापर वाचले. अजून बालभारतीच्या पुस्तकात ब्लॉगकर्तीचे पोस्ट अभ्यासक्रमात अजून लावले गेले नाहीये ना? (हे वाक्य वैतागपूर्ण उपरोधाने लिहिलेय, नाहीतर त्यावरुन नवीन महाभारत सुरु व्हायचं) मग अश्या एवढ्या नाटकीय प्रतिक्रिया कशासाठी? मराठीमधले वाक्प्रचार माहीत आहेत आणि वापरता येतात म्हणून दर वेळी ते वापरुन बोलायलाच हवे की काय? न पटणार्या मतप्रवाहांवर चर्चा होऊच शकत नाहीत काय? कोणाची भिन्न अशी मते असूच नयेत काय? हे नक्कीच पटण्याजोगे नाही.
काही निरिक्षणे नोंदवते.
Totally unappreciated.
again, totally unappreciated. इथे कोण अशा चर्चा करत असं म्हणायचं आहे? हे जनरलायझेशन नाहीये का? हे कसे व का चालते?
एका संस्थळावर, एका लेखनकर्त्याच्या लेखनावरुन, त्याच्या सततच्या एकाच प्रकारच्या लेखनविषयावरुन त्याची व त्याच्या लेखनप्रकाराची, आणि ते लेखन व लेखनाची शैली आवडणार्या लोकांची सातत्याने टिंगल उडवणे, त्यांच्याबद्दल सातत्याने तुच्छतादर्शक मते मांडणे, एवढेच नव्हे, तर अशा लेखनप्रकाराचे फालतू असे विडंबन करण्यात भाग घेणार्यांनी ब्लॉगकर्तीवर व तिच्या पोस्टवर - तिच्या अवचट आवडणार्या सर्वांबद्दल तुच्छतादर्शक लिहिण्याबद्दल गदारोळ करायचा, हा मोठा दुर्दैवी आणि अतिशय खिन्नपणे शब्द वापरत आहे - दांभिक आणि हास्यास्पद विरोधाभास नाही का? आहे, असे माझे मत. असो. पुविवरच्या माझ्याही वावरावर गदा यायची.
प्रतिसाद संपादित.
मदतनीस
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Wed, 1 Dec 2010 - 07:57 · उत्तर
एकूण संपूर्ण प्रतिसाद अपेक्षीत. विशेषतः,
हे अधिक अपेक्षीत होते (त्याचे कारण पुढे मीच लिहितो आहे. त्यावरून पुन्हा तर्क-वितर्क नकोत).
यातील माझ्या संदर्भापुरते बोलतो. मझा तो संपूर्ण प्रतिसाद अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच आविष्कार आहे. अनियंत्रीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अशे म्हणूया. त्यातील मुद्दे, गुद्दे वाटले ना? वाटणारच. कारण ते तसे वाटावेत यासाठीच लिहिले आहेत. म्हणूनच, प्रतिसादाचा हा भाग अगदी अपेक्षीत होता. हे असेच असते. स्वातंत्र्य वगैरे संकल्पना आपल्याला बोचत नाहीत तोवरच उत्तम असतात. आदर्श असतात. त्या आपल्याला बोचू लागल्या की मग मुद्याचे गुद्दे, खळ्ळ-खट्टचं विकृतीकरण सुरू होतं. चालायचंच. असे एकूण अनुभव काही आजचे नाहीत.
माझ्या त्या प्रतिसादातील काही भाग मदतनीस यांनी संपादित केला. तो भाग त्यांनी का संपादित केला याची, माझा मुद्दा आणि त्यावरचा प्रतिवाद अशा रीतीने, कारणमीमांसा येथे मांडावी अशी माझी त्यांना विनंती आहे. ही विनंती मी माझा प्रतिसाद संपादित झाला म्हणून करत नसून, एखादी गोष्ट संपादित करावीशी त्यांना का वाटली याची कारणं येथील चर्चेच्या अनुषंगाने मोलाची असल्याने करतो आहे हे उघड आहे (इथंही मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार करून संपादनाची आणखी एक संधी देता येते. ती मी देत नाही).
तरी बरं, एकूण प्रतिसादात मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे.
इतर काही -
खटकलं ना? नेमका तोच भाग संपादित झाला ना? हेच तर सांगतोय. पण भाषेच्या या स्वरूपाच्या वापराचे समर्थन अभिव्यक्ती स्वातंत्र्य या नावाखाली एकीकडे करायचं आणि त्यावरच त्याच पद्धतीनं टीका झाली की...? हे तेच आहे, आव सॉक्रेटिसचा...!
चर्चाच करतो आहोत अशी माझी समजूत आहे. म्हणून मी हे नोंदवलं आहे की ज्ञानदा यांनीच स्वतः त्यांच्या या मजकुरावरील टीका "सहन" केली आहे.
असलीच पाहिजेत. ती नसतील तर माझीच मते कायम राहतील आणि तो मोठा धोका असेल. पण तीच बाब दुसऱ्या बाजूनेही लागू होते.
निरिक्षणे -
समजू शकतो. हरकत किंवा आक्षेपही नाही. कारण खळ्ळ-खट्टविषयी या स्पिन डॉक्टरना विनंती आहे - यापुढे या संदर्भात या बाबीचा उल्लेख कराल तेव्हा मूळ प्रतिसादाचा दुवा देत चला. म्हणजे जागोजागी मला त्यावरून विकृतीकरण म्हणण्याची वेळ येणार नाही. राहता राहिला विषय मोहीमेचा - ते त्याच गृहस्थानी ऑपरेशन सक्सेसफुल असे लिहिले आहे, त्याचा दुवा मी दिला आहे. हे ऑपरेशन काय आहे हे विचारण्याचा अधिकार मला आहे. त्यापुढे, मी इथे कसे वागायचे हे ठरवण्याचाही मला अधिकार आहे. स्वातंत्र्य म्हणूया हवे तर. अर्थात, स्वातंत्र्य ही संकल्पना मान्य असेल तरच...
इथं कोणी अशी चर्चा करते आहे असे मी म्हटलेले नाही, म्हणत नाही. ते माझ्यापुरते विधान आहे. इतरांनी काय करावे किंवा नाही हे त्यांचे स्वातंत्र्य आहे. पुढचे प्रश्न गैरलागू.
स्पष्टीकरण - माझ्या विरोधात व्यक्तीस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य यासंदर्भात केलेल्या औपपत्तीक मांडणीशी मी तत्वतः पूर्ण सहमत आहे. वास्तविक व व्यावहारीक जीवन आणि औपपत्तीक जीवन यात एक अंतर असतं आणि त्यावर भर देऊनच मी लिहित असतो. म्हणूनच "समाज नावाची गुंतागुंतीची चीज" हे ध्यानी घ्यावे आणि त्या चौकटीत माझ्या लेखनाचा विचार करावा.
एकूण या चर्चेची उंची माझ्या क्षमतेपेक्षा अधिक असल्याने यापुढे या विषयावर लिहिणार नाही.
यशोधरा
यशोधरा · Wed, 1 Dec 2010 - 08:28 · उत्तर
:) हरकत नाही. पुविवरच्या चर्चांविषयी भ्रमनिरास झालेला आहेच. असो.
अशी वाक्ये फेकणार्यांनी ब्लॉगपोस्टबद्दल बोलावे? आम्ही श्रेष्ठ हीच वा तत्सम मानसिकता औपरोधिकरीत्या व्यक्त केल्याने बरोबर ठरली का? की ती कोणी व्यक्त केली, ह्यावर त्याचे मूल्यमापन करावयाचे? जर हे योग्य, तर ब्लॉगपोस्टवर व्यक्त झालेली मते वा त्याचा सूर चुकीचा कसा? आता यावर मी इतरांबद्दल बोललेलो नाही, मी माझी असमर्थतता व्यक्त केली आहे, आणि पुन्हा हे माझे स्वातंत्र्य आहे वगैरे म्हणता येईलच, पण त्याला खरंच अर्थ नाही. मुद्दा समजावूनच घ्यायची अनिच्छा असल्याने इथेच थांबते.
नीधप
नीधप · Wed, 1 Dec 2010 - 05:52
सगळीकडच्या चर्चा वाचताना मला मुळात हा प्रश्न पडतोय की जनरलायझेशन चूक हे काही प्रमाणात खरे पण आपण अश्या चाळण्या आपल्या रोजच्या आयुष्यात लावत नाही का?
पॅकेज वाईट नाही प्रेडिक्टेबल आहे यामधले जनरलायझेशन ही केवळ एक चाळणी आहे.
असो तरी अनेकांना ते खटकलं. बर ठीक पण ज्यांनी त्यावर टिका केली ते कधीच कुठलंच जनरलायझेशन करत नाहीत का?
पातळी सोडून केलेल्या टिकेला काय अर्थ?
वैयक्तिक रित्या ज्ञानदा तिच्या आयुष्यात काय विचार करते नाही करत हे सांगण्याचा अधिकार जगाला कोणी दिला?
मला सगळ्या तलवारी जरा अतिच पाजळल्या गेल्या असं वाटलं.
चिंतातुर जंतू
चिंतातुर जंतू · Wed, 1 Dec 2010 - 06:55
अगदीच सहमत. सर्व काही सापेक्ष आहे आणि प्रतवारी करायचीच नाही असं केलं तर मग कुंदेरा/मार्केझ आणि (उदा.) मिल्स अँड बूनचं साहित्य हे तुल्यबळ आहेत असं म्हणावं लागेल का? त्याला तर काही अर्थ नाही. मिल्स अँड बूनचंही गांभीर्यानं पृथक्करण करता येतं/यावं यासाठी आधुनिकोत्तर विचारांत सर्व गोष्टींना किमान प्रतिष्ठा दिली गेली. पण तो मुद्दा नीट न पोचल्यामुळे की काय, त्याचे भलते अर्थ घेतले गेले असं वाटतं. मी मूळ धाग्यात ज्या सुजाण/समंजसपणाविषयी बोलत होतो त्यानंही गोंधळ झाले/होतात.
एखाद्या गोष्टीबद्दल कमालीच्या टोकाची (अतिशयोक्त) विधानं करणं याला एक साहित्यिक मूल्य असतं. याचाही विसर पडतो आहे असंही मला वाटतं. उदा: ठणठणपाळ (म्हणजे जयवंत दळवी) यांचं लिखाण तसं होतं. (हे मूल्य मान्य केलं तर मग विशिष्ट अतिशयोक्त विधानांविषयी मतभेद व्यक्त करण्यासाठी अवकाश शिल्लक उरतो, हे अर्थातच गृहित आहे.)
यशोधरा
यशोधरा · Wed, 1 Dec 2010 - 07:07 · उत्तर
असेल चि़जं, तुमचे मुद्दे मला न समजले असण्याची शक्यता अधिक असावी, आपण वेगळ्या प्रतलांवरुन विचार करत असू. अर्थात कुंदेरा/मार्केझ आणि (उदा.) मिल्स अँड बून हे तुल्यबळ ठरवणे हे सायबाच्या भाषेत सफरचंदे आणि संत्री ह्यांची तुलना करणे झाले, असे चालेल का?
३_१४ अदिती
३_१४ अदिती · Wed, 1 Dec 2010 - 08:25 · उत्तर
चिंजं यांचा प्रतिसाद संपूर्ण समजला असं म्हणत नाही. पण कधीमधी सरसकटीकरण, योग्य तारतम्य वापरून, आवश्यक असतं असं म्हणावंसं वाटत आहे. अमुक एका रोगाची लक्षणं, औषधोपचार ठरवताना, एका प्रकारच्या वाहनांचा अभ्यास करताना, इ.इ. उदाहरणं त्यासाठी देता येतील. योग्य* सरसकटीकरणामुळे अभ्यास करणं सोपं जातं.
*योग्य सरसकटीकरण कोणतं आणि कसं याची व्याख्या सांगण्याएवढे माझे विचार अजूनतरी स्पष्ट नाहीत.
दिगम्भा
दिगम्भा · Wed, 1 Dec 2010 - 07:39
प्रतिसाद संपादित.
-
मदतनीस
मदतनिसाची इतकी गरज पडणे काही बरे नव्हे.
चिंतातुर जंतू
चिंतातुर जंतू · Wed, 1 Dec 2010 - 07:55
मला म्हणायचं आहे ते काहीसं असं आहे: साहित्यिक मूल्य अशी एक काहीतरी चौकट (तात्पुरती, अगदी सोईनुसारही) आखून घेतली असं समजा. तर कुंदेरा/मार्केझ आणि मिल्स अँड बून यांची त्या चौकटीत तुलना करता येईल कदाचित, पण निष्कर्ष 'ते तुल्यबळ आहेत' असा *बहुधा* नसेल. अशा कदाचित इतरही अनेक चौकटी असतील उदा. आधुनिकोत्तरता, हलकटपणा (यात कुंदेरा बाजी मारेल *बहुधा* ;-)), रंजनमूल्य, स्त्रीवादी परिप्रेक्ष्य, वगैरे वगैरे.
थोडक्यात: सगळं काही सापेक्ष असतं असं मान्य करूनही अशा (पृथक्करण करता यावं यासाठी कदाचित काहीशा कृत्रिमतेनं आखलेल्या) चौकटींत या दोन गोष्टींची तुलना करता येईल. सापेक्षतावाद मान्य करणं म्हणजे प्रतवारी करूच नये असं नव्हे.
नीधप
नीधप · Wed, 1 Dec 2010 - 10:15 · उत्तर
सहमत.
दिगम्भा
दिगम्भा · Wed, 1 Dec 2010 - 11:20 · उत्तर
असेच म्हणू इच्छितो.
रैना
रैना · Wed, 1 Dec 2010 - 10:46
चिंज आणि मेघनाला अनुमोदन.