- Log in to post comments
काल मॅजेस्टिक ग्रंथप्रदर्शनात काय किंवा त्याआधी ठाण्याच्या सा.सं.च्या पुस्तकप्रदर्शनात काय.. पुस्तकं खरेदी करणारी नव्वद टक्के लोकं मध्यमवयीन. पंचविशीच्या आतला एकही तरुण मुलगा-मुलगी पुस्तक विकत घेतानाच काय, उचलून चाळत असलेलीही दिसले नाहीत. मराठी पुस्तकांच्या दुकानांमधेही अशी वयाने'तरुण' गर्दी कधीच दिसत नाही जशी ती लॅन्डमार्क, स्ट्रॅन्ड, क्रॉसवर्ड मधे दिसते.. इंग्रजी पुस्तकं खरेदी करताना. पण अर्थात 'तरुण' (वयाने) मराठी लेखकही तर दिसत नाहीत कधी मराठी पुस्तकांच्या जगात. हेही एक कारण आहे नक्कीच मराठी तरुण पुस्तकवाचनापासून दूरच रहाण्यामागचं.
इंग्रजीमधे मात्र असे वयाने 'तरुण' लेखक भरभरुन लिहितात, त्यांची पुस्तकं प्रकाशकही छापतात. ती चिक्कार खपतात. आय.आय.टी.मधे शिकणारे लिहितात, मॅनेजमेन्ट स्कूल्समधले लिहितात, अॅड्.एजन्सीत काम करणारे लिहितात, नापास झालेले लिहितात, परदेशात शिकायला गेलेलेही लिहितात. मराठीत हा ट्रेन्ड का रुजला नाही? एक कृष्णमेघ कुंटे आणि हल्लीच वाचलेलं सुमीत खाडीलकरचं 'वास्तव नावाचं झेंगट' नावाचं अप्रतिम पुस्तक सोडलं तर कोणतही वयाने, अनुभवाने 'तरुण' पुस्तक वाचनातच आलेलं नाही माझ्या. तुमच्या आलय?
अभिप्राय
सागर
सागर · Sun, 9 Jan 2011 - 12:54
शर्मिला,
हा मुद्दा खरेच छान आहे. आजच्या तरुण पिढीची (खास करुन युवक वर्गाची) मराठी भाषेकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती याला कारणीभूत आहे असे म्हणता येईल.
इंग्रजी ही आता जागतिक संपर्काची भाषा आहे आणि ती सर्वांना येणे आवश्यकही आहे. पण म्हणून आपण आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करणे हे कितपत योग्य आहे?
इंग्रजी भाषेबरोबरच इंग्रजी जीवनसरणी (लाईफस्टाईल) स्वीकारली गेली की मातृभाषेतील सौंदर्य दिसणे अवघडच होते. त्यातून तरुण पिढी इंटरनेट आणि मोबाईल यावर जेवढा वेळ घालवते त्यातून मराठी पुस्तके वाचन होणे हे अवघडच आहे. अर्थात यासाठी केवळ तरुण पिढीला दोष देणेही योग्य नाहिये. यासाठी आई-वडील दोघेही सारखेच जबाबदार ठरतात. वाचनाची आवड घरात असेल तर ती मुलांमध्ये सहसा उतरतेच.
मराठी भाषेच्या सन्मानासाठी सर्व क्षेत्रांतील मराठी नेतृत्त्व कुठेतरी कमी पडते असे वाटते.
मी इकडे बंगळूरात गेली ६-७ वर्षे आहे. इकडे सर्व शॉपिंग मॉल्स मध्ये (लँड्मार्क, सपना बुक हाऊस) अशा ठिकाणी चित्रपटांच्या व्हिसीडी व डिव्हीडी मिळतात. साऊथ इंडियातील सर्व भाषांतील या ध्वनि-चित्रफिती उपलब्ध असतातच पण उत्तरेकडील हिंदी, पंजाबी, बंगाली, गुजराथी, ओरिया या भाषांतीलही उपलब्ध असतात. मग मराठीसाठी स्वतंत्र का नसतो? कारण आपण मराठी लोक अॅडजस्ट करुन घेतो.
भाषाभिमान आपल्याला का नसावा? असलाच पाहिजे.
मी नियमितपणे फ्लिपकार्ट.कॉम वरुन मराठी पुस्तके घेतो. त्यांच्या सर्च ऑप्शनमध्ये मराठी (Marathi) असे टाईप करुन पुस्तके आधी दिसत नव्हती. त्यांना मी ईमेल पाठवली होती व मराठी पुस्तके उपलब्ध असतील तर मी नियमित पणे घेईन असेही लिहिले होते. अलिकडेच नवीन पर्याय फ्लिपकार्ट.कॉम या संकेतस्थळाने दिला आहे. मुख्य पानावरच रिजनल लँग्वेजेस मध्ये मराठी असे उपलब्ध करुन दिले आहे आणि आधीच्या तुलनेत ढिगाने मराठी पुस्तके उपलब्ध करुन दिली आहेत. त्यामुळे अर्थातच मी तेथून बरीच खरेदी करतो.
माफ करा थोडंसं विषयांतर झालं हे. पण हा मूळ मुद्दा आहे ज्यामुळे आज मराठी साहित्याला तरुण मराठी लेखक आणि तरुण मराठी वाचक दोन्हींचा तुटवडा आहे. आयटी मुळे मी एक सांगू शकतो की पुस्तकविश्व सारख्या संस्थळामुळे तरुण पिढीला अनेक सुंदर सुंदर मराठी पुस्तके व मराठी लेखक माहिती होत आहेत. पुस्तकविश्व हा समाजप्रबोधनाचा मी एक यज्ञच समजतो.
असे सर्वांनी प्रयत्न केले तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांग सुंदर अशा माय मराठीला पुन्हा सुगीचे दिवस येतील. किंबहुना अलिकडे जेवढ्या प्रमाणात पुस्तके प्रकाशित होत आहेत तो वेग आधीच्या काळाच्या तुलनेने चांगलाच आहे.
अलिकडे तरुण लेखक मराठी साहित्यात येत आहेत. इंग्रजी साहित्यात जशी पुस्तकप्रकाशने होतात तेवढ्या ताकदीने मराठी साहित्यात होत नाहीत ही वस्तुस्थिती असली तरी, मराठीत खूप सुंदर लेखन आतापर्यंत झाले आहे, होत आहे व यापुढेही होतच राहिन याची खात्री वाटते. :)
अजून एक मुद्दा सांगावासा वाटतो तो हा की, आपण मराठी पुस्तके विकत किती घेतो?
कोणताही व्यवसाय तेव्हाच चालतो जेव्हा खप होतो. तेव्हा आपल्याला अतिशय आवडलेली व अनेकदा वाचू शकत असलेली पुस्तके जर प्रत्येकाने विकत घेतलीत (अर्थात आर्थिक परिस्थिती सांभाळून) तर त्यामुळे नवोदित लेखकांना प्रोत्साहन का बरे मिळणार नाही? अर्थात प्रकाशकांनीही केवळ त्यांचे नफे न सांभाळता लेखकांनाही हे आर्थिक ग्लॅमर देण्याचा प्रयत्न करायला हवा. तरच हा व्यावहारिक समतोल साधला जाईल आणि लेखक तणावमुक्त वातावरणात अधिकाधिक सुंदर लेखन कलाकृती वाचकांना उपलब्ध करुन देतील.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Mon, 10 Jan 2011 - 05:06
जितका चांगला विषय शर्मिलाने मांडला आहे....तितकाच सागरचा उत्कृष्ट प्रतिसाद....दोघांनीही नेमक्या व्यथेवर बोट ठेवले आहे.
"मराठी वाचक पुस्तके विकत घेऊन का वाचीत नाही?" या आणि अशाच विषयांवर राज्यातील विविध जिल्ह्यातून प्रती मास चर्चा झडत असत आणि बहुतेक वेळा "मराठी पुस्तकांच्या किंमती परवडत नाही" अशा एक सर्वमान्य सूर निघायचा. पण गेल्या काही वर्षात हे चित्र बदलताना दिसत आहे. एका चौकोनी कुटुंबाची क्रयशक्ती वाढत असताना खरेदीच्या यादीत 'पुस्तके' येत आहेत हे चांगलेच लक्षण आहे. मुंबई-पुणेच नव्हे तर महाराष्ट्रात जवळपास सर्वत्रच 'अक्षरधारा', 'किताब कॉर्नेर', 'ग्रंथाली' या आणि तत्सम संस्थांकडून मोठाली अशी पुस्तक प्रदर्शने, अगदी योग्य त्या कमिशनसह, भरविली जात आहेत. आतापर्यंत फक्त 'साहित्य संमेलना'च्या निमित्ताने खरेदी व्हायची, पण ती आता स्थिती राहिलेली नाही. या आणि अशा प्रकारच्या प्रदर्शानातून विक्री जबरदस्त होत असणारच, त्याशिवाय अक्षरधारा प्रत्येक महिन्याला त्या शहरात येईलच कशासाठी?
आम्हालाही एक औत्स्युक्य होते, म्हणून मग....गेल्या दसर्याच्या सुमारास आम्ही चार मित्रांनी कोल्हापुरात 'अक्षरधारा' च्या प्रदर्शनसमयी तेथील व्यवस्थापकांच्या परवानगीने (जी त्यानी आनंदाने दिली) होत असलेल्या खरेदीची टिपणे काढली. [म्हणजे 'अ' खरेदीदार ज्यावेळी 'ब' कॅशिअरच्या समोर त्याने निवडलेली पुस्तके ठेवतो आणि इकडे कॅश मेमो होत असतानाच आमच्यातील एक त्या पुस्तकाचे नाव आणि लेखकाचे नाव एका छोट्या रजिस्टरमध्ये नोंदवित असे.....हे करत असताना ना त्या खरेदीदाराला कळत असे ना त्या कॅशिअरचे काम डिस्टर्ब होत असे]. एक आठवडा असा प्रकार आम्ही केला आणि खुद्द अक्षरधाराच्या प्रांगणातच त्याचा लसावी काढला, तो थोडक्यात क्रमवार असा :
(अ) कथा, कादंबरी, कविता आणि अन्य ललित लेखन
१. सर्वाधिक विक्री ~ पु. ल. देशपांडे
२. दुसरा तिसरा चौथा पाचवा, सहावा असे क्रमांक जरी फिक्स नसले तरीही ग्राहकाच्या खरेदी पिशवीत हमखास सापडलेले लेखक ~ व.पु.काळे, जयवंत दळवी, जी.ए.कुलकर्णी, अनिल अवचट, मिलिंद बोकिल, रत्नाकर मतकरी, सुहास शिरवळकर, विश्वास पाटील, शिवाजी सावंत, ए.पी.जे.अब्दुल कलाम, गौरी देशपांडे, कविता महाजन, मेघना पेठे, माधुरी पुरंदरे, उज्ज्वला दळवी, जयंत नारळीकर, भालचंद्र नेमाडे, व्यंकटेश माडगुळकर, मीना प्रभू.
(अत्रे, पेंडसे, विंदा, खांडेकर, चिं.वि.जोशी, मंगेश पाडगावकर, द.मा.मिरासदार, शिरवाडकर....या मान्यवरांचे एकही पुस्तक त्या सात दिवसातील खरेदीत सापडले नाही....हे एक आश्चर्यच....कवितेबाबतीत तर आनंदच होता, जी काही तीन कवितांची पुस्तके आली तीही सुरेश भटांचीच....म्हणजे घेणार्यांनी ती 'गाणी' म्हणूनच घेतली असणार हे नक्की.)
~ अनुवादात चेतन भगत प्रथम क्रमांक, रॉबिन शर्मा दुसर्या क्रमांकावर, सुधा मूर्ती, आणि अर्थातच विठ्ठल कामत आघाडीवर होते. कोल्हापुरात 'मेहता बुक्स' चा स्वतःचा असा बारा महिने पर्मनन्ट स्टॉल आहे आणि तिथे अगदी २५ ते ५० टक्के सवलतीने त्या प्रकाशनाची पुस्तके उपलब्ध असतात त्यामुळे असेल कदाचित, अक्षरधारा कोल्हापुरात मेहता पब्लिशिंगची पुस्तके ठेवीत नाहीत.
(ब) इतर :
१. पाककृती ~ या पुस्तकांनी तर पु.लं.च्या वर मात केलेली दिसून आले.
२. सौंदर्य प्रसाधने, मेंदी, घरगुती औषधे, कोडी
३. भविष्यकथन....यांचीही विक्री तडाखेबंद
४. धर्म आणि देवदेव तसेच बिरबल पंगतीतील [हॅरी पॉटर एकही नाही...कदाचित किंमतही जास्त हे कारण असेल]
५. क्रिडा आणि चित्रपटविषयक नगण्य....[मुळात या दोन विषयावरील पुस्तकेच प्रदर्शनात कमी होती]
वरील प्रकारात अमुकच एक लेखक असा 'प्रेफरन्स' दिसला नाही, तर पुस्तकाची मांडणी आणि चित्रे यावर खरेदी चालली होती.
~~ मात्र ललित आणि वरील (ब) सोडून सर्वाधिक खरेदी होत होती ती "स्पर्धात्मक परीक्षा" या गटातील पुस्तकांची. मी तर असे पाहिले की, अगदी ४ थी स्कॉलरशिप ते एमपीएससी, यूपीएससी परीक्षांसाठी लिहिलेल्या मार्गदर्शन पुस्तकांची स्टॉलवर रेलचेल होतीच शिवाय 'अमुक एक पुस्तक कसे नाही?' असा प्रश्न एखाद्या तरुण-तरुणीकडून आला तर अक्षरधाराचे स्वयंसेवक चटकन ते लिहून घेत असत.
आता इथे शर्मिला फडके यांचा 'तरुण लेखक' मुद्दा चर्चेला येतो :
खरेदीच्या कल कसा आहे यासाठी जर कोल्हापूर सारखे एक शहर 'स्पेसिमेन' ग्राह्य मानले तर होणार्या खरेदीत 'एकही तरुण लेखक' नाही ही बाब अधोरेखित होते. [आमचा विदा अगदी अचूक असेल असे नाही, पण जो आहे तो प्रत्यक्षातील असल्याने चुकीचा असणे शक्य नाही]. शर्मिलाने 'तरुण' म्हणून जी दोन नावे दिली आहेत त्यांच्या पंगतीत बसू शकणारा एकही लेखक वरील सर्व्हेमध्ये आढळला नाही. त्यातल्या त्यात 'मिलिंद बोकिल' हेच एक आश्वासक नाव.
असे का व्हावे ?
याला माझ्या दृष्टीने तर कारण असे आहे की, प्रकाशक 'रिस्क' घेण्यास तयार नाहीत. जे गलेलठ्ठ प्रकाशक आहेत त्यांचा 'धंदा' म्हणजे जुन्या शिलेदारांच्या तितक्याच जुन्या पुस्तकांच्या नवनवीन तंत्राने आकर्षक आणि गुळगुळीत आवृत्यावर आवृत्या काढायच्या आणि त्या विक्रेत्याला अगोदरच भरपूर कमिशन देऊन बांधून घ्यायचे, म्हणजे समजा एखाद्या महिन्यात आपले पुस्तक खरेदीचे बजेट एक हजार असले आणि प्रदर्शनात तुम्हाला हीच पुस्तके समोर आली (जी खरोखरीच यापूर्वी गाजलेली असतात) तर तुम्ही तीच घेणार ही खुबीची आणि ग्राहकाचा मानसिक कल यांची अटकळ त्यानी मांडलेली असतेच. ~ आम्हाला त्या ७ दिवसात 'अमुक एक पुस्तक आहे का?' असे विचारणारी एकही, होय एकही, व्यक्ती त्या मोठ्या हॉलमध्ये आढळली नाही. बायकामुलांसह यायचे अन् 'काहीतरी खरदी' केल्याचे समाधान मिळवायचे हेच प्रकर्षाने दिसून आले.
आज 'तरुण लेखक' का तयार होत नाही, मराठीत? [जसा चेतन भगत इंग्लिशमध्ये लिखाण करून टॉपर झाला आहे, सर्व भारतीय भाषांत...] तर याला कारण युवा पिढीसमोर असलेले 'ग्लॅमर' चे जग, जे २४x७ त्याच्या/तिच्यासमोर आदळत आहे. अत्यंत सुशिक्षित म्हटले जाणारे पालकदेखील त्यांच्या "बंटी"ने "मी लेखक होणार' असे उदगार काढले तर 'ह्याला काय येडबिड लागल्ये की काय?' असा आविर्भाव करताना दिसतात. आपला मुलगा स्पर्धात्मक परीक्षेतून पुढे जाऊन "घराण्याचे नाव काढेल" अशीच भावना मनी ठेऊन पुस्तकांची खरेदीही त्याच अनुषंगाने होत आहे असे दिसते.
त्यातही एखादा चांगला 'तरुण' लेखक ज्याने समाजजीवनाचा चांगला अभ्यास करून काही टिपणे काढली आणि जी आता पुस्तक रूपाने पुढे येण्याच हरकत नाही असे ज्यावेळी त्याला वाटू लागते, त्या वेळी प्रकाशक नावाची एक जात त्याच्या पायात असे काय खोडे घालते की त्या बिचार्याला 'कुठून झक मारली आणि लेखक होतो अशी दुर्बुद्धी सुचली' असे वाटत राहते. एक काळ दलित वाङ्मयाच्या माध्यमाने काही तरुण [अगदी पंचविशीतच] फार पुढे आले होते...पण जिथे 'दलित पँथर' च गायब झाली, तसे त्या प्रवाहातून पुढे येणारा तरुणदेखील संपला. [शर्मिलाने 'प्रकाशक' या विषयावर पूर्वी इथेच पुस्तकविश्ववर एक मोठी चर्चा झालेली आहे, ती वाचावी...वाचली नसल्यास !]
फार शोचनीय स्थिती आहे मराठी तरुणाची जो लेखक होऊ इच्छितो !
असो...हा प्रतिसाद जरी काहीसा निराशाच्या सुरातील असला तरी शर्मिला फडके यानी फार सुंदर धागा इथे चर्चेला आणल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते तसेच पुस्तकविश्वच्या सर्वच सदस्यांनी जाणीवपूर्वक इथे हा विषय पुढे न्यावा अशी विनंती.
इन्द्रा
वाचक
वाचक · Sun, 9 Jan 2011 - 23:03
'परंपरागत पुस्तक' ह्याशिवाय आजच्या तरुणाईला अनेक दुसरी माध्यमे उपलब्ध झाली आहेत (ब्लॉग, संस्थळे, ऑनलाईन मासिके आणि ई-मेल न्यूजलेटर्स) . ही इतर माध्यमे स्वस्त, जलद आणि लोकाभिमुख आहेत, त्वरित प्रकाशन आणि त्वरित 'फीड्बॅक' उपलब्ध होत आहे, शिवाय ह्या स्वरुपात केलेले लेखन गाजले तर त्याचे पुढे मागे पुस्तक काढता येतेच. (उदा: विनय देसाईंचे 'परदेसाई' )
त्याचप्रमाणे ह्या नव्या माध्यमांचा अधिक फायदा असा की त्यात 'इतर मल्टी-मिडिया' प्रकारांचाही वापर करता येतो (चित्रे, गाणी वगैरे). आता एवढे सगळे सोपे, जलद आणि स्वस्त उपलब्ध असताना 'तथाकथित' पुस्तके काढण्याच्या मागे तरुण जाईलच कशाला ?
मराठी (भारतीय) प्रकाशन व्यवसायाला सगळ्यात गरज कशाची आहे तर 'किंडल' सारख्या तंत्रज्ञानाची - आधी डिजीटल' आवृत्ती काढायची, चालली, खपली तर छापिल पुस्तक - कसा वाटतो शॉर्ट-कट ? :)
सागर
सागर · Mon, 10 Jan 2011 - 07:40 · उत्तर
'ब्र' आणि 'भिन्न' या पुस्तकांमुळे प्रख्यात झालेल्या आणि वाचकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत अशा लेखिका कविता
महाजन यांनी अलिकडेच"कूहू" ही डिजिटल आवृत्ती प्रकाशित केली आहे
http://kuhoo.in/ येथे पहावयास मिळेल.
त्यामुळे वाचक म्हणतात तसे डिजिटल आवृत्तीची प्रथा मराठी साहित्यात सुरु झालीच आहे :)
चिंतातुर जंतू
चिंतातुर जंतू · Wed, 19 Jan 2011 - 09:33
मराठीत तरुण लेखक हे गद्य लिखाणापेक्षा पद्य लिखाणात आज अधिक सापडतात असे वाटते. 'नव्वदोत्तरी कवी' असे संबोधन ज्यांच्याविषयी वापरले जाते असे अनेक (प्रामुख्याने नागरी) कवी आज आहेत. ग्रामीण कवीही पुष्कळ आहेत. काही नियतकालिकांमध्ये (उदा: अनुभव, 'लोकवाङ्मय'चे वाङ्मय विश्व, खेळ, मुक्त शब्द, 'पॉप्युलर'चे प्रिय रसिक) यांच्या कविता नियमित वाचायला मिळतात. 'अभिधानंतर'सारखी काही प्रकाशने त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित करतात.
गद्य लिखाणामध्ये उल्लेखनीय काही नावे:
मनस्विनी लता रवींद्र (नाटके)
धर्मकिर्ती यशवंत सुमंत (नाटके, ललित)
सचिन कुंडलकर (नाटके, कादंबरी, ललित)
मुक्तसुनीत
मुक्तसुनीत · Wed, 19 Jan 2011 - 17:11 · उत्तर
काही अन्य नवे लेखक :
समर खडस : "बकर्याची बॉडी" (कथासंग्रह)
रमेश इंगळे उत्रादकर : काव्य संग्रह , "निशाणी डावा अंगठा" कादंबरी
कृष्णात खोत : गेल्या ३-४ वर्षांमधले कथालेखन
आसाराम लोमटे : डिट्टो
निखिलेश चित्रे : भाषाविषयक आणि अन्य समीक्षकीय लिखाण. युरोप आणि लॅटीन अमेरिकेतल्या इंग्लिशेतर भाषांमधल्या साहित्याची उत्तम ओळख.
अलिकडे नव्याने प्रकाशात आलेले काही मध्यमवयीन लेखक :
सतीश तांबे : यांची २-३ पुस्तके अलिकडे आलीत. "लेखाजोखा" (व्यक्तिचित्रे) "माझी पूतना मावशी" , "रसातळाला ख.प.च." (कथा)
जी के ऐनापुरे : गिरणी कामगारांच्या एकंदर प्रश्नावर गेली सुमारे ३-४ वर्षे दिवाळी अंकातून केलेले लिखाण
जयंत पवार : हे नाटककार म्हणून प्रसिद्ध होतेच. ("अधांतर") आता त्यांचा नवा कथासंग्रह आला आहे. "फिनिक्स च्या राखेतून उठला मोर"
वंदना भागवत : "मिळून सार्याजणी" मधे काही वर्षे केलेले लिखाण. यंदा अचानक तीन दिवाळी अंकात प्रकाशित झालेले लिखाण.
विश्राम गुप्ते : या शतकातल्या मराठी साहित्यातले (माझ्या मते) एक महत्त्वाचे नाव. यांच्या नावावर २ कादंबर्या जमा आहेत. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे यांनी टाकलेला एकंदर साहित्यावरचा प्रकाशझोत.
वरील यादीतली मते माझी. तपशीलात चुका झाल्या असतील तर चूभूदेघे.
अडगळ
अडगळ · गुरुवार, 20 Jan 2011 - 20:52 · उत्तर
प्रवीण बांदेकर (कविता,कादंबरी) , श्रीधर तिळवे (कविता,कादंबरी) , संजीव खांडेकर (कविता,कादंबरी), दासू वैद्य (कविता), मंगेश काळे (कविता), सलील वाघ(कविता), हेमंत दिवटे (कविता), वर्जेश सोळंकी (कविता), संतोष पवार (कविता), नितीन रिंढे (कविता), नितीन कुलकर्णी(कविता), मोहन बोरसे (कविता), सचिन केतकर (कविता, समीक्षा ), रमेश इंगळे (कविता,कादंबरी) ही नावं अभिधानंतर मध्ये कायम दिसायची .
मुक्तसुनीत
मुक्तसुनीत · गुरुवार, 20 Jan 2011 - 21:10 · उत्तर
अरुण काळे (कविता)
भुजंग मेश्राम (कविता)