चरित्र
अनिल अवचट (१९४४ – २७ जानेवारी २०२२) हे मराठी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतले आणि १९६८ मध्ये पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी मिळवली. पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्यासह त्यांनी पुण्यात 'मुक्तांगण' हे व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले आणि ते त्याचे संचालक होते. १९६९ मध्ये 'पूर्णिया' हे त्यांचे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले; त्यानंतर त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लेखन केले आणि त्यांची २२ पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली. 'मुक्तांगणची गोष्ट' आणि 'गर्द' ही पुस्तके मुक्तांगणच्या अनुभवांवर आहेत. 'सृष्टीत..गोष्टीत'ला २०१० मध्ये बालसाहित्याचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. व्यसनमुक्ती कार्यासाठी २०१३ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला.