चरित्र
लक्ष्मीबाई टिळक (१८६८ – १९३६) या मराठी लेखिका होत्या. लग्नापूर्वी त्यांचे नाव मनकर्णिका गोखले होते. कवी नारायण वामन टिळक यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पतीनेच त्यांना लिहिण्या-वाचण्यापुरते प्राथमिक शिक्षण दिले. पतीने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याचा त्यांना मोठा धक्का बसला, परंतु कालांतराने त्याही ख्रिस्ती झाल्या. पतीच्या प्रोत्साहनाने त्यांनी कविताही रचल्या. 'स्मृतिचित्रे' या आत्मचरित्रासाठी त्या विशेष प्रसिद्ध आहेत; ते मराठी साहित्याचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. हे आत्मचरित्र १९३४ ते १९३६ या काळात चार भागांत प्रकाशित झाले आणि १९५० मध्ये 'I Follow After' या नावाने इंग्रजीत अनुवादित झाले. नारायण वामन टिळकांनी सुरू केलेले 'ख्रिस्तायन' हे महाकाव्य त्यांच्या निधनानंतर लक्ष्मीबाईंनी ६४ अध्याय लिहून पूर्ण केले. त्यांच्या नावाचा पुरस्कार महाराष्ट्र सरकारतर्फे आत्मकथनपर पुस्तकाला दिला जातो.