चरित्र
श्रीपाद महादेव माटे (२ सप्टेंबर १८८६ – २५ डिसेंबर १९५७) हे मराठी लेखक होते. त्यांचा जन्म विदर्भातील शिरपूर येथे झाला. एम.ए.पर्यंत शिक्षण घेतलेल्या माटे यांच्यावर लोकमान्य टिळक आणि संस्कृत पंडित वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांच्या विचारांचा प्रभाव होता. ते 'माटे मास्तर' म्हणून ओळखले जात. सातारा आणि पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापन केल्यावर ते पुण्याच्या स. प. कॉलेजात इंग्रजी आणि मराठीचे प्राध्यापक झाले. 'रोहिणी' मासिकाचे ते पहिले संपादक होते. 'केसरी प्रबोध' आणि 'महाराष्ट्र सांवत्सरिक' या ग्रंथांचे त्यांनी संपादन केले; 'विज्ञानबोध'ला त्यांनी लिहिलेली २०० पानी प्रस्तावना गाजली. आयुष्यभर त्यांनी अस्पृश्योद्धाराचे काम केले. 'माणुसकीचा गहिवर' आणि 'उपेक्षितांचे अंतरंग' ही त्यांची पुस्तके आहेत. १९४३ मध्ये सांगली येथील मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.