चरित्र
डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू (१६ नोव्हेंबर १९२७ – १७ डिसेंबर २०१९) हे मराठी आणि हिंदी नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म सातारा येथे आणि मृत्यू पुणे येथे झाला. भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतल्यावर त्यांनी कान-नाक-घसा शल्यचिकित्सक म्हणून पुणे आणि टांझानियात वैद्यकीय व्यवसाय केला. वैद्यकीय शिक्षण घेतानाच त्यांनी नाटकांत काम सुरू केले आणि भालबा केळकरांसारख्या स्नेह्यांसह पुरोगामी नाट्यसंस्था सुरू केली. कुसुमाग्रजांच्या 'नटसम्राट' नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली; 'सिंहासन', 'पिंजरा', 'मुक्ता' अशा अनेक चित्रपटांत काम केले. 'लमाण' हे त्यांचे आत्मचरित्र आहे. 'देवाला रिटायर करा' असे म्हणत त्यांनी तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला. त्यांना 'घरोंदा'साठी फिल्मफेअर (१९७८) आणि कालिदास सन्मान (१९९७) मिळाला.