परीक्षण

गुरुदत्तः तीन अंकी शोकांतिका - एक अभिजात मराठी पुस्तक

परीक्षण मजकूर

वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर गुरुदत्त आवडलेले पुष्कळ लोक भेटतात. व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्तानं ‘टाईम’मासिकानं काही दिवसांपूर्वी जी रोमँटिक चित्रपटांची यादी जाहीर केली, तीत ‘प्यासा’चं नाव पाहून अनेक भारतीयांना आनंद झाला. तो आनंद ठीकच होता. पण त्यापुढे जाऊन ‘गुरुदत्तच्या चित्रपटांनी नक्की काय साध्य केलं?’, ‘भारतीय चित्रपटांत गुरुदत्तचं नक्की स्थान काय?’ आणि ‘गुरुदत्तच्या चित्रपटांत जागतिक आणि भारतीय कलाविचार कसे दृग्गोचर होतात?’ अशा काही मूलगामी प्रश्नांविषयीचे मूलगामी विचार मराठीमध्ये काही दशकांपूर्वी अतिशय प्रभावी विश्लेषणाच्या माध्यमातून अरुण खोपकर या चित्रपट दिग्दर्शक-शिक्षक-लेखकानं मांडले होते. आता मात्र त्या पुस्तकाचं विस्मरण झालेलं आहे की काय असं वाटावं, अशी परिस्थिती आहे. ‘प्यासा’विषयीच्या अभिमानप्रदर्शनाच्या या ताज्या निमित्तानं मराठीतल्या या अभिजात पुस्तकाची मराठी आंतरजालावर आठवण काढावी यासाठीचा हा धागा.

‘गुरुदत्त – तीन अंकी शोकांतिका’ या पुस्तकात खोपकर ‘प्यासा’, ‘कागज के फूल’ आणि ‘साहिब, बीबी और गुलाम’ या तीन रसिकप्रिय चित्रपटांविषयी विवेचन आणि विश्लेषण करतात. इतर समाजांप्रमाणे मराठी समाजातदेखील एका काळापर्यंत चित्रपट ही कमी दर्जाची कला समजली जायची. त्यामुळे अनेक प्रकारची हानी झाली. साहित्याचं गांभीर्यानं विश्लेषण करण्याची, म्हणजे समीक्षेची, जशी परंपरा अस्तित्वात होती, तशी चित्रपटाच्या समीक्षेची किंवा रसग्रहणाची परंपरा मराठीत त्यामुळे निर्माण झाली नाही. पण आपल्याला ते करायचं आहे, असं खोपकर प्रस्तावनेतच सांगतात आणि पुढे दाखवूनसुद्धा देतात. त्यांच्या विश्लेषणपद्धतीला मात्र एक जागतिक वळण आणि परंपरा आहे हेही ते कबूल करतात. सिनेमाविषयी सकस लिहिण्यासाठी मुळात इतर कला, राजकारण, इतिहास, तत्त्वज्ञान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्याशीच भिडावं लागतं हे ते सांगतात. ‘विश्लेषणाची थंडगार सुरी आणि ऐंद्रिय अनुभवाचं उबदार अखंडत्व यांच्या द्वंद्वातून सहृदय टीका निर्माण होते’ हा कळीचा विचार ते मांडतात.

प्रत्यक्ष विश्लेषण करताना खोपकर अनेकविध संकल्पना आणि परंपरांचा अगदी लीलया फेरफटका मारत या तीनही चित्रपटांची वेगवेगळी अंगं उलगडतात. त्यात ‘रोमँटिसिझम’ या युरोपिअन परंपरेत गुरुदत्त कसा बसतो याचं विवेचन आहे. पात्रं, प्रसंग यांच्याद्वारे चित्रपटांचं रसग्रहण आहे. त्या बरोबरच चित्रपट या माध्यमाची जाण आणि तीमधून गुरुदत्त या व्यक्तित्वाची उकलही केलेली आहे. त्यात ‘जिनिअस’ आणि समाज यांच्यातल्या द्वंद्वाची ‘प्यासा’ आणि ‘कागज के फूल’ मधली मांडणी आणि ‘साहिब, बीबी...’ मधली छोटी बहू यांचा संबंध कसा लागतो हेही दाखवलं आहे.

क्षोभनाट्य (मेलोड्रामा) हा भारतीय चित्रपटांचा आत्मा आहे. भारतीय कलापरंपरेचा प्रवाह क्षोभनाट्याच्या आधारानं जातो. गुरुदत्तचे चित्रपट या पठडीतले असल्यामुळे सत्यजित रायसारख्या अधिक वास्तववादी दिग्दर्शकाच्या तुलनेत कधीकधी गुरुदत्तला कमअस्सल मानलं जातं. पण पारंपरिक मेलोड्रामा आणि गुरुदत्तचे चित्रपट यांत फरक काय आहे हे खोपकर विशद करतात. तसंच योगायोग, गाणी वगैरे आपल्या बाजारू चित्रपटांमध्ये वापरले जाणारे घटक गुरुदत्त कशा ताकदीनं वापरतो याचंही त्यात विश्लेषण केलेलं आहे.

काळोख आणि प्रकाश हा चित्रपटासारख्या दृश्यमाध्यमातला एक अतिशय प्रभावी घटक आहे. त्याचा प्रसंगानुरुप वापर आणि चित्रपटाच्या एकंदर रचनेशी असलेलं त्याचं नातं खोपकर उलगडून दाखवतात. अवकाशाचा चित्रपटीय वापर आणि त्यातून उभा राहणारा ऱ्हास यांचंही असंच विश्लेषण ते करतात.

असं सगळं उलगडून दाखवत असताना विवेचनातल्या प्रत्येक घटकाचा पाश्चिमात्य परंपरेतला वापर आणि गुरुदत्तनं केलेला वापर यांतली साम्यस्थळं खोपकर दाखवतात आणि त्याचं वेगळेपणसुद्धा दाखवतात. त्यामुळे वाचकाला आपोआप एक सखोल आणि व्यापक ज्ञान मिळत जातं.

र.कृ. जोशी यांचं रचित मुखपृष्ठ, मलपृष्ठ आणि एकंदर मांडणी ही देखणी आणि तरीही आशयाला साजेशी आहे. पानोपानी असणारी छायाचित्रं ही पुस्तकाचा आशय उलगडून दाखवण्यासाठी अतिशय उपयोगी पडतात. त्यामुळे १९८५ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची निर्मितीमूल्यं काळाच्या पुढची आहेत.

हे पुस्तक म्हणजे निव्वळ गुरुदत्तची स्तुती नाही. त्याला नीट न जमलेल्या गोष्टींचं विवेचनही त्यात आहे. त्याशिवाय अतिशय हृद्य वाटावी अशी एक तुलना त्यात आहे. ती ऋत्विक घटक यांच्याशी केलेली आहे. शोकनाट्य (ट्रॅजेडी) हा गुरुदत्तच्या तीनही चित्रपटांचा गुणविशेष आहे. तोच क्षोभनाट्याच्या घाटातून मांडणारे ऋत्विक घटक हे गुरुदत्तव्यतिरिक्त अजून एक भारतीय दिग्दर्शक आहेत. या दोघांची कलात्मक तुलना आणि आपापल्या कलाकृतीतून महाकाव्य (एपिक) साकारण्याचे दोघांचे प्रयत्न यांविषयीचं सखोल आणि महत्त्वपूर्ण विश्लेषण पुस्तकात आहे.

गुरुदत्तच्या व्यक्तिगत आयुष्याचा लेखाजोखा घेणं पुस्तकात अभिप्रेत नाही. पण त्याची कला आणि त्याची जीवनदृष्टी यांचं नातं सांगता सांगता गुरुदत्तचा करुण अंत टळण्यासाठी काय व्हायला हवं होतं याचाही थोडा अंदाज खोपकर देतात. आत्मनाशाच्या प्रेरणेविषयी फ्रॉईडनं जे मनोविश्लेषणात्मक विवेचन केलं आहे त्याचाही आधार ते घेतात, आणि आपल्या अंतर्मनाला गुरुदत्त का स्पर्श करू शकतो हेही सांगतात.

सरतेशेवटी हेही नोंदलं पाहिजे की निव्वळ गुरुदत्तचे सिनेमे कळण्यासाठी पुस्तक उपयोगी नाही तर त्याचं मूल्य त्याहून खूप अधिक आहे. आंतरजालावर आणि बाहेरही आज अनेक जण चित्रपट किंवा पुस्तक यांचं रसग्रहण करणारे लेख लिहीत असतात. त्यांना पुष्कळ स्तुतीही अनुभवायला मिळते. पण तीमुळे अर्ध्या हळकुंडानं पिवळं होण्याऐवजी ज्यांना सखोल आणि सघन रसग्रहणात्मक लिखाण कसं करावं याचे धडे हवे असतील, त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे एक वस्तुपाठ आहे. असं लिखाण करण्यासाठी जो चौफेर अभ्यास लागतो तो कसा हवा, हेसुद्धा त्यात दिसेल. निव्वळ 'टाईमपास' करण्यासाठी पुष्कळ चित्रपट/पुस्तकं जगात असताना गंभीर चित्रपट/पुस्तकं यांच्याकडे का वळावं, याचंही उत्तर कदाचित त्यात मिळू शकेल.

पुन्हापुन्हा वाचावंसं वाटणारं, प्रत्येक वाचनात एखादा सुहृद भेटल्याचा अनुभव देणारं आणि काहीतरी नवीनही उलगडून दाखवणारं हे पुस्तक अभिजात मराठी पुस्तकांच्या यादीत समाविष्ट करण्याला मला तरी काही पर्याय दिसत नाही.

अभिप्राय

सागर

सागर · Tue, 22 Feb 2011 - 15:11

जंतु महोदय,

काय सुंदर ओळख करुन दिली आहेत या पुस्तकाची तुम्ही... मान गये...
मला चित्रपट विषयात फारशी गती नाही. म्हणजे चित्रपट बघायला खूप आवडतात पण पडद्याआडचे कलावंतांचे जीवन मला फारसे परिचित नाही. पण तुमच्या या परिचयामुळे मात्र मला या पुस्तकाकडे वळायला भाग पाडले आहे.
एका सुरेख परिचयाबद्दल मनापासून धन्यवाद :)

गुरुदत्त म्हटले की मला एवढेच आठवते

हर एक जिस्म घायल...
हर एक रुह प्यासी...

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Tue, 22 Feb 2011 - 18:08

चिंतातुर जंतु,
आपल्याला जे मनापासून आवडतं ते इतरांना सांगितलंच पाहिजे आणि आपला आनंद बहुगुणित केला पाहिजे ही ओढ सच्च्या पुस्तकप्रेमी्कडून असे छान लेख लिहून घेते.

आरागॉर्न

आरागॉर्न · Tue, 22 Feb 2011 - 18:49

सुरेख परिचय. पुस्तकाविषयी उत्सुकता वाटते आहे.

‘विश्लेषणाची थंडगार सुरी आणि ऐंद्रिय अनुभवाचं उबदार अखंडत्व यांच्या द्वंद्वातून सहृदय टीका निर्माण होते’ हा कळीचा विचार ते मांडतात.

हा विचार अधिक सोप्या शब्दात मांडता आला असता असे वाटून गेले.

मणिकर्णिका

मणिकर्णिका · Wed, 23 Feb 2011 - 02:38 · उत्तर

आरागॉर्नला अनुमोदन!
वाक्य वाचल्याक्षणी कळावीत यासारखं सुख नाही. वाक्य वाचून मेंदूत त्यावर पुन्हा प्रोसेसिंग करायला लागणं ही नाही म्हटली तरी डोकेदुखीच! पण गुरुदत्त हा विषयच असा आहे की चमच्याने भरवल्यासारखा कळत नाही त्यामुळे भाषाही आडवळणाची झाली तर त्यात आश्चर्य ते काय!

ऋषिकेश

ऋषिकेश · Wed, 23 Feb 2011 - 05:00

छान पुस्तक परिचय! आरागॉर्नशीही सहमत. भाषा सोपी करता आली असती.
बाकी, वेगळ्या विषयावरील पुस्तक असले तरी मुळात मला गुरूदत्त फारसा (खरंतर जराही) आवडत नाही. त्यामुळे पुस्तक परिचय छान असूनही (आणि एक क्षण वाचुन बघुया का? असे मनात येऊनही) हे पुस्तक वाचेनसं वाटत नाही :(

असो, पुढल्या पुस्तक परिचयासाठी शुभेच्छा

चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतू · Wed, 23 Feb 2011 - 05:19

>>‘विश्लेषणाची थंडगार सुरी आणि ऐंद्रिय अनुभवाचं उबदार अखंडत्व यांच्या द्वंद्वातून सहृदय टीका निर्माण होते’ हा कळीचा विचार ते मांडतात.<<

हा विचार अधिक सोप्या शब्दात मांडता आला असता असे वाटून गेले.

मला वाटतं हा थोडा सवयीचा भाग आहे आणि थोडा व्यक्तिगत आवडीनिवडीचा आहे. पुस्तक वाचताना या वाक्यापाशी मी थबकलो. पण ते वाक्य कळलं नाही म्हणून नव्हे, तर उलट अशासाठी की त्यांनी आधी विस्तारानं मांडलेल्या मुद्द्याचा हा अतिशय चपखल आणि सुरेख सारांश होता म्हणून मी थक्क होऊन ते पुन्हा एकदा वाचलं. खोपकरांना जे म्हणायचं आहे ते त्यांना फार चांगल्या पद्धतीनं मांडता आलेलं आहे हे माझ्या मते पुस्तकाचं एक मोठं यश आहे. अनेक लेखकांच्या बाबतीत असं वाटतं की त्यांच्याकडे एक तर विश्लेषणाची थंडगार सुरी असते नाही तर उबदार अखंड ऐंद्रिय अनुभव असतो. म्हणूनच माझ्यासाठी त्यांचं लिखाण नको तितकं टीकात्मक तरी असतं किंवा नको तितकं सहृदय असतं. खोपकर याचा इतका सुरेख समतोल साधतात हे माझ्या लेखी ते पुस्तक अभिजात ठरण्याचं एक कारण आहे.

आता प्रश्न येतो तो मेंदूला चालना देण्याचा. जी वाचताना डोक्याला व्यायाम होतो अशी (पण सहृदय!) पुस्तकं यांना माझी पसंती नेहमीच असते. हा व्यक्तिगत आवडीचा भागही म्हणता येईल कदाचित, पण माझ्या मते तो स्वतःला जिवंत ठेवण्यासाठीचा एक आवश्यक घटक आहे.

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Wed, 23 Feb 2011 - 07:00 · उत्तर

जंतोबा,
‘विश्लेषणाची थंडगार सुरी आणि ऐंद्रिय अनुभवाचं उबदार अखंडत्व यांच्या द्वंद्वातून सहृदय टीका निर्माण होते’.....
ह्या अवघड वाक्याचे विश्लेषण छान केले आहेत. ते वाचल्यावर वाक्याचा उलगडा झाला....
अरुण खोपकर ह्यांचे लि़खाण वाचावेसे वाटू लागले. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी!

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Wed, 23 Feb 2011 - 07:00 · उत्तर

जंतोबा,
‘विश्लेषणाची थंडगार सुरी आणि ऐंद्रिय अनुभवाचं उबदार अखंडत्व यांच्या द्वंद्वातून सहृदय टीका निर्माण होते’.....
ह्या अवघड वाक्याचे विश्लेषण छान केले आहेत. ते वाचल्यावर वाक्याचा उलगडा झाला....
अरुण खोपकर ह्यांचे लि़खाण वाचावेसे वाटू लागले. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी!

दिगम्भा

दिगम्भा · Wed, 23 Feb 2011 - 07:11

वाचताक्षणी

‘विश्लेषणाची थंडगार सुरी आणि ऐंद्रिय अनुभवाचं उबदार अखंडत्व यांच्या द्वंद्वातून सहृदय टीका "

हे खरं तर चिंजं यांच्याच लिखाणाचे वर्णन वाटले. (आणि दुर्बोध तर मुळीच वाटले नाही.)

जंतुमोशाय, तुमच्या फॅनक्लबमध्ये माझाही नंबर पहिल्यापासून आहे, आज औपचारिक नाव नोंदवतो आहे एवढेच. आम्हाला सुखद चांदणे देणार्‍या आंतरजालीय नक्षत्रांमध्ये मी तुमची गणती करतो.

असेच लिहीत रहा, एवढ्या उशीरा का लिहू लागलात इतकीच तक्रार.
- दिगम्भा

चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतू · Wed, 23 Feb 2011 - 07:55

वरच्या प्रतिसादात एक गोष्ट नमूद करायची राहिलीच. जर खोपकर अवघड वाटत असतील तर हेही लक्षात घ्यायला पाहिजे की खरं तर ते ज्या वाटेवर जात आहेत ती वाट 'डायलेक्टिक'ची आहे. उदा: हे पहा.

ही वाट फारच कठीण आणि मेंदूचा भुगा करणारी आहे. संज्ञांचं फार अवडंबर न माजवता खोपकर खरं तर खूप साध्या शब्दांत ते मांडत आहेत! :-)

देवेन्द्र प्रभुणे

देवेन्द्र प्रभुणे · Wed, 23 Feb 2011 - 14:21

फारच सुन्दर,मित्रा!
कडक परिचय!
आता हे पुस्तक मी गेल्या १५ वर्षापासुन शोधतो आहे.
मिळालेच नाही.
आपण कसे मिळवले?
पत्ता द्याल तर फारच उत्तम!
अन्यथा xerox copy द्याल का?
फार आनन्द होईल.
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ.

देवेन्द्र प्रभुणे

देवेन्द्र प्रभुणे · Wed, 23 Feb 2011 - 17:22

DEAR CHINTATUR<
CAN"T CALL YOU JANTU!
see,i am pursuing my ph.d in english literature and topic
thereof is literary perceptions in indian cinema:with special reference to tragedies".
also,independantaly,i am working on cinema of gurudutt and likes.
hence,i require this book most.
even after searching for so many year,i have not found that.
if you give me copy,it will be blessings!
honourarium+actual costof book/copy+postage will be paid alongwith line of credit in thesis.
hope,you will co-operate.
thanks,
-devendra s.prabhune

चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतू · गुरुवार, 24 Feb 2011 - 05:50

प्रतिक्रियांसाठी सर्वांचे आभार. पुस्तक कुठे मिळेल अशी विचारणा काही लोकांनी केली आहे. पुस्तक बाजारात उपलब्ध नाही. पण ग्रंथालय.ऑर्ग वर शोधलं तर असं दिसलं की काही सार्वजनिक वाचनालयांमध्ये पुस्तक उपलब्ध आहे.

http://granthalaya.org/cgi-bin/koha/opac-search.pl?idx=au&q=%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%B0+%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3

त्यांच्याशी पत्रव्यवहार केला तर प्रत उपलब्ध होऊ शकेल किंवा प्रत्यक्ष तिथे जाऊन वाचण्याची मुभा मिळू शकेल.