परीक्षण
झाडाझडती
आज वर विश्वास पाटलांची महानायक, संभाजी अशी पुस्तक वाचली होती. झाडाझडती वाचायचे खुप दिवसांपासुन मनात होते. शेवटी गेल्या आठवड्यात वाचुन पुर्ण झाले. पुस्तक येउन इतके दिवस झालेत, तसेच इतके पुरस्कार मिळवलेत, तर अशा पुस्तकाचा परिचय आपण काय लिहायचा? हा प्रश्न मनात आलाच. तरीही जे सुचेल ते येथे देत आहे. झाडाझडती ही कथा आहे महाराष्ट्रातल्या धरणाची. धरणामुळे भरडल्या गेलेल्या ग्रामीण भागातील समाजाचे सुन्न करणारे वर्णन या कादंबरीत आहे.
या कादंबरीच्या मलपृष्ठावर दिलेले पुढचे वाक्य पुस्तकाबद्दल बरेच काही सांगुन जाते. तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भीका मागायच्या. जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच.
पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या मधे असणारा आंबेगाव जिल्हा. तिथल्या वाघाठाणे तालुक्याची भौगोलीक परिस्थीती तशी विचित्रच. तालुकाच्या पश्चिमेला सह्याद्रिच्या डोंगररांगा. तिथे धो धो पाउस कोसळणार तर पुर्वेचा भाग दुष्काळी. तर अशा तालुक्यातली जांभळी धरणामुळे विस्थापित होणार्या धरणग्रस्तांची ही कथा. पण याला फक्त याच धरणग्रस्तांची कथा म्हणता येणार नाही, कमी अधिक प्रमाणात सगळीकडे हीच परिस्थीती आहे. असे असतानाही लेखकाला जिल्ह्याचे नाव काल्पनिक का घ्यावे लागते??? परदेशात डॅन ब्राउन सारख्या लेखकांचे वास्तव आणि कल्पकता यांची यशस्वी सरमिसळ करण्याचे उदाहरण आपल्या समोर आहेच. मग आपल्याकडे काल्पनिक जिल्हा का??? या साठी कोण जबाबदार?? आपल्याकडील शासन व्यवस्था?? राजकारणी का आपण वाचक लोक???
कथेमधे अनेक पात्रे आहेत... त्याचा आवाका सुद्धा खुप मोठा आहे. पण कथेतले पात्रे ही मुख्यत्वे जांभळी व आजुबाजुच्या गावात राहणारी. धरण होणार म्हणजेच जांभळई गाव बुडणार. हे गावातल्या सर्वांना माहीत असतेच. पुस्तकाला ठराविक काळ असा नाहीए पण धरणग्रस्तांच्या आयुष्याची व्यथा मांडलेली आहे. कथेची सुरवातच मुळी आंबेगावच्या आमदारांचे उपोषण आणि धरणाला विरोध करणार्या जांभळीच्या ग्रामस्थांना अटकेपासुन होते. कथेतले खैरमोडे गुरुजी, हैबती, त्याची आई आवडाबाई, गुणवंता, कुशाराजा असे अनेक पात्र मनात घर करुन जातात. या प्रत्येकाच्या आयुष्यात मुख्य प्रश्न धरणामुळे विस्थापन असले तरी प्रत्येकाला सोसाव्या लागणार्या गोष्टी नक्कीच वेगळ्या आहेत.
हैबती धरणग्रस्त म्हणुन याला नोकरी द्यायचे खासदार जाहीर करतात. त्यानुसार तो शिपाई म्हणुन त्याला नोकरी मिळतेसुद्धा. पण आपल्या भ्रष्ट व्यवस्थेतील लोक त्याचे नोकरीचे २४० दिवस पुर्ण न होता त्याला ब्रेक देतात. जांभळी गावाचे पुर्नवसन ठरल्यानंतर याचे आणि याच्या कुटुंबाचे होणारे हाल... बायकोचे दिवस भरत आलेले असतात. गावठाणसाठी मिळालेल्या जमीनी वर झोपडे बांधुन राहणे पावसामुळे शक्य नसतेच. खैरापुर-ज्या गावात पुर्नवसन होणार असते तिथल्या लोकांचे वागणे आपल्याला नक्कीच सुन्न करुन जाते. हैबतीला मिळालेले बाभळीचे रान... त्यातुन त्याने फुलवलेला सुंदर मळा... त्यावर परत मुळ जमीनीच्या मालकाची पोटदुखी... त्याच्यामागचे दुष्टचक्र काही केल्या संपू देत नाहीच. अशा सगळ्या प्रवासात गावकर्यांना आधार असतो तो खैरमोडे मास्तरांचा!!!!
खैरमोडे मास्तर जांभळी गावातल्या शाळेतले शिक्षक आणि शिक्षकाच्या सोबतच जांभळी धरणग्रस्तांचा मुख्य आधार. धरणग्रस्तांचा नेता म्हणजे आजच्या काळातल्या राजकीय नेत्यांसारखा नक्कीच नाही तर गरज पडल्यास स्वतःच्या खिशाला खार लावुन गावकर्यांसाठी झटणारा. धरणग्रस्तांना योग्य तो मोबदला मिळावा, त्यांचे योग्य ठिकाणी पुर्नवसन व्हावे या साठी सरकार दरबारी खेट्या मारणारे मास्तरच. धरणग्रस्तांसाठी आपली नोकरी पणाला लावणारे मास्तर. नवीन जांभळी गावात स्मशानाला जागा मिळावी म्हणुन झटणारे मास्तर. हे पात्र अगदी डोक्यात फिट्ट बसते.
या सगळ्यात आपल्या इथल्या भ्रष्ट व्य्वस्थेचा फायदा घेणारे आणि आपल्याच इतर गावकर्यांचा पोटावर पाय देउन उभे राहणारे पात्र म्हणजेच दत्तु सरपंच, जांभळीचा सरपंचच मुळी हा मास्तरांचा आधाराने होतो पण पुढे पलटतो. आपल्या गावकर्यांचा विचार न करता जास्तीत जास्त स्वत:चा फायदा करुन घेत जातो. त्याच सोबत खासदार, त्यांचा मुलगा काही भ्रष्ट अधिकारी अशी एकापेक्षा एक पात्रांची रांगच आहे. जे वेळोवेळी केवळ स्वत:च्या स्वार्थापायी धरणग्रस्तांचे हाल वाढवत जातात. आजही आपली व्यवस्था भ्रष्ट नोकरदार, राजकारणी आणि त्यांना साथ देणारे नागरीक ह्यांनी अशीच पोखरुन काढलेली आहेच. पण अशा परिस्थितीला अपवाद असतातच. तसाच या ही कथेत चांगल्या जिल्हाधिकार्यांचे उदाहरण आहेच. यांचा काळातच धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागतील अशी आशा वाटतच असते. एखाद्या जिल्हाधिकार्याने राजकारण्यांना अडचणीची होणारे कामे असणारी मोहीम हाती घेतल्यानंतर सग़ळे राजकीय पक्ष संगनमताने त्याची उचलबांगडी करतात तेच ईथे सुद्धा होते.
या कादंबरी मधले काही प्रसंग मनाला फारच चटका लाऊन जातात. त्यातलाच एक म्हणजे सोपान मामाच्या मृत्यूनंतरचा प्रसंग. सुभानमामाच्या इच्छेनुसार त्याच्या शेवटच्या क्रिया झांजवाडीत व्हावयाच्या असतात. झांजवाडी हे धरणाच्या मधे येणारे गाव. त्यात गावापर्यंत जायचा एकच सोपा मार्ग म्हणजे धरणावर लाँच घेउन जाणे. नाहीतर मग धरणाच्या बाजुबाजूने १० कोस अतंर चालत जाणे. सुभान मामाचा मृतदेह तिथे पर्यंत नेताना होणारा त्रास... तरीही एकमेकांच्या मदतीला उभे राहणारे धरणग्रस्त... हे पाहून अंगावर खरेच काटा येतो.
या पुस्तकात कथानक घडते ते पुर्णतः ग्रामीण भागातच. त्यामुळे तसे संपुर्ण पुस्तकात ग्रामीण भाषाच वापरलेली आहे. मुळात लेखक हे स्वतः चांदोली धरण भागातले. त्यामुळे त्यांनी ग्रामीण भाषेचा बाज योग्यरीत्या सांभाळणे यात फारसे आश्चर्य नाहीच. यात त्यांना स्वतःला आलेले अनुभव सुद्धा त्यांनी मांडले असतीलच. खरेतर त्यांना तुम्हाला हे पात्रे कुठे भेटलीत का? असे विचारावे वाटते. त्याशिवाय विश्वास पाटील स्वतः प्रशासकीय सेवेत आहेत. त्यादरम्यानच्या काही अनुभवांचे येथे चित्रण झाल्याचे जाणवते. त्यांनी स्वतः जिल्हाधिकारी म्हणुन काम केलेले आहे. असे असतानाही त्यांनी आपल्या व्यवस्थेत असलेला भ्रष्टाचार लपवलेला नाही किंवा नोकरदारांच्या वागण्याचे कुठे समर्थन केलेले नाही. त्याचसोबत काही चांगले अधिकारी परिस्थिती कशी बदलु शकतात याचे उदाहरणही ते आपल्याला दाखवतातच. धरणग्रस्तांचे होणारे हाल वाचकाला पुस्तकाशी बांधुन ठेवतात त्याच वेळेस त्याच्या समोर अनेक प्रश्न सुद्धा निर्माण करुन जातात. हा धरणग्रस्तांना एवढे सोसण्याची ताकद कुठुन मिळत असेल?? एकीकडे आपण वर्ल्ड ईज फ्लॅट असे ओरडत आहोत त्याच वेळेस ही परिस्थिती अजुनही बदललेली नाहीए. ३०-४० वर्षापुर्वी झालेल्या धरणांच्यासाठी जमीनी दिलेली लोकांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत. समाजात खैरमोडेगुरुजी सारखे किती लोक असतात?? ह्या सगळ्यात आपण कुठे आहोत?? एकुणच इतकी वास्तवाचे दर्शन देणारी कादंबरी प्रत्येकाने एकदा वाचावेच असे वाटते.
अभिप्राय
मस्त कलंदर
मस्त कलंदर · गुरुवार, 3 Jun 2010 - 18:37
पुस्तक आताशाच वाचायला सुरूवात केली आहे.. पूर्ण झाले की प्रतिसाद देतेच. तोवर जागा राखून ठेवत आहे..
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 4 Jun 2010 - 08:08
हे पुस्तक वाचल्यानंतर खूप दिवस पूर्णपणे रिकामं वाटत होतं.. डोक्यात काहितरी चालु होतं असंही नाहि.. पूर्ण ब्लँक
छान पुस्तकाचं छान वर्णन..
समांतर अवांतर: अंदमानला जारवा जमातीच्या आरक्षित प्रदेशातून आता गेलेला ट्रंक रोड बघून का कोण जाणे झाडाक्जडती आठवलं होतं (खरंतर अर्थाअर्थी विषेश संबंध अनहि)
आनंदयात्री
आनंदयात्री · Sun, 6 Jun 2010 - 18:50
क्या बात् है निखिल ! अजुन एक सुंदर ओळख.
बाकी विश्वास पाटील या लेखकाबद्दल काय वाटते हे ही जाणुन घ्यायला आवडेल.
नामा म्हणे
नामा म्हणे · Wed, 9 Jun 2010 - 12:33
खुपच छान परीचय निखिल. मी हे पुस्तक तीन वेळा वाचले आहे.
हैबती च्या मामाच्या मृत्यूचा प्रसंग खरच डोळ्याच्या कडा ओलावून जातो.
मामाचे नाव "सुभानजी" वाचल्याचे वाटते.
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · गुरुवार, 10 Jun 2010 - 09:57 · उत्तर
हो मामाचे नाव सुभानजीच आहे, परत एकदा पुस्तकात तपासले. योग्य तो बदल केला आहे. आपण सांगीतलेल्या बदलाबद्दल धन्यवाद
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Wed, 23 Jun 2010 - 21:12
झाडाझडती वाचलं... झोप येत नव्हती म्हणून हातात घेतलं.. नि रात्र तशीच गेली.. टक्क डोळ्यांनी पुस्तक वाचत आणि अस्वस्थ होत..
या आधी धरणग्रस्तांवरचा चित्रपट पाहिला होता: पांढर. त्यातही गावातला एक पुढारी आणि एक शेतकरी यांच्यातलाच संघर्ष अधिक दाखवला होता. वास्तववादी असला तरी अपरिहार्यपणे येणारी नाट्यमयता आणि शेवटी मेधाबाईंचे भलेथोरले भाषण होते.. पण झाडाझडती वाचलं आणि वाटलं, एकूण प्रकरणाचं गांभिर्य चित्रपट पुस्तकाच्या १ टक्काही देत नाही..
ऋ म्हणतो तसे पुस्तक संपल्यावर रितेपण आलंच.. आणि रागही आला.. राजकारणाचा.. लोकांच्या स्वार्थीपणाचा आणि एकूण व्यवस्थेचाही.. त्याचवेळेला तिकडे भोपाळ प्रकरणाचा निकाल लागला.. मोडकांच्या नवीन नोंदी वाचल्या.. नि वाटलं.. की परिस्थितीत काही फरक नाही.. फक्त कारण वेगळं.. ठिकाण वेगळं.. व्याप्ती थोडीफार वेगळी... पण बाकी राजकारण, सामान्य माणूस भरडलं जाणं, आणि सरकारी मूर्ख अडेलतट्टूपणा यात काssही फरक नाही.. कादंबरी वास्तवात चालू होते, वास्तवात घडते नि वास्तवातच संपते... धरणग्रस्तांची झाडाझडती चालूच राहाते.. त्यामुळे पुस्तक संपेस्तोवर शासनव्यवस्थेवर येणारा सततचा राग किती वाझोंटा आहे हे जाणवून निराशही व्हायला होत होतं..
अवांतरः मुंबईचे झोपडपट्टी पुनर्वसन मात्र झोपडपट्टी वासियांच्या कसे पथ्यावर पडते नि ते याच यंत्रणेचा कसा फायदा घेतात हे उगाचच आठवून गेले...