माझे शेल्फ
आपल्या पूर्वजांचे तंत्रज्ञान
विज्ञानाचा ऐतिहासिक ठेवा मानवी जीवनाशी निगडित असलेल्या विज्ञानाच्या अनेक क्षेत्रांचा परामर्श या पुस्तकात घेण्यात आला आहे. यामध्ये वैद्यकीय उपचार, सौंदर्यसाधना, शिवणकाम/फॅशन, उद्यानशास्त्र, प्राणिसंग्रहालये, खेळ यांसारख्या अनेक क्षेत्रांचा समावेशआहे. विज्ञानाचा हा जो इतिहास उलगडत गेला तो आर्किऑलॉजी (पुरातत्व) आणि पॉलिएंटॉलॉजीच्या (पुराजीवशास्त्र) अभ्यासकांनी केलेल्या उत्खननातून पुढे आलेलया पुराव्यांतून! सर्व जगभरात झालेल्या उत्खननातून हेच लक्षात येतं की एखाद्या कृतीमागचे वैज्ञानिक तत्त्व माहीत नसतानादेखील मानवाच्या पूर्वजांनी केलेली प्रगती आपल्याला थक्क करणारी आहे. पुस्तकातील सुरुवातीची प्रकरणे वैद्यक आणि मानवी आरोग्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये रुग्णांचे औषधोपचार, रुग्णालये, शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेची उपकरणे, प्राचीन औषधे, औषधांचे बाजार, कुटुंबनियोजन व कुटुंबनियोजनाची साधने यांसारख्या विषयांचा समावेश आहे. हजारो वर्षांपूर्वीदेखील वैद्यकशास्त्र किती प्रगत होते याची जाणीव आपल्याला ही प्रकरणे वाचत असताना होत जाते. प्लॅस्टिक सर्जरीतील ‘पेडिकल फ्लॅप’ या नावाने ओळखला जाणाऱ्या तंत्राच्या सूचना भारतीय वैद्यकशास्त्राचा जनक सुश्रुत याने आपल्या ग्रंथात त्यातील बारकाव्यांसह सांगितलेल्या आढळतात. प्राचीन भारतीय वैद्यकात ‘ऱ्हिनोप्लॅस्टी’ या आधुनिक तंत्राचा वापरही आढळतो. अगदी उत्तर अश्मयुगीन काळातही कवटी उघडून मेंदूवर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पार पाडल्यानंतर एक व्यक्ती जगल्याचा पुरावाही आहे. आजच्या शल्यशास्त्रज्ञांना हेवा वाटेल इतकी उत्कृष्ट वैद्यकीय हत्यारे त्या काळी वापरली जात. प्राचीन काळात अद्ययावत रुग्णालये तर होतीच, त्याचबरोबर कृत्रिम दात, कृत्रिम अवयव, कुटुंबनियोजन यांसारख्या विषयातील तज्ज्ञदेखील इ.स.पूर्व काळात कार्यरत होते. सौंदर्यसाधनेत, प्रसाधन करण्यात, विविध प्रकारचे केसांचे टोप वापरण्यात प्राचीन काळातील स्त्रिया–पुरुष वाकबगार होते. मेसापोटेमियात चार हजार वर्षांपूर्वी साबण वापरला जात होता असे पुरावे आहेत. त्याच सुमारास धातूच्या आरशांच्या जोडीलाच काचेचे आरसे करण्याची कला खूपच विकसित झाली होती. नखे वाढविणे, रंगविणे, चेहरा गोरा दिसण्यासाठी शिशाची संयुगे वापरणे स्त्रियांमध्ये प्रचलित होते. वैयक्तिक स्वच्छता आणि सौंदर्य याविषयी रोमन साम्राज्यातील सर्वसामान्य नागरिकसुद्धा खूप काळजी घेत. दागिने करणे व ते वापरणे याबाबतीत प्राचीन काळातील लोक चांगलेच पुढारलेले होते. मौल्यवान दागिन्यांची नक्कल करून नकली दागिने, नकली रत्ने सर्रास वापरली जात. एवढेच नाही तर त्या काळातील जवाहिर्यांना वेगवेगळ्या हलक्या धातूंवर सोन्याचा मुलामा कसा द्यावा, याचंही तंत्र ठाऊक होतं. याच काळात वस्त्र विणण्याची कलाही विकसित झाली होती. त्या त्या हवामानात योग्य असे वस्त्रांचे प्रकार मानवाने निर्माण केले. सुमारे बावीस हजार वर्षांपूर्वी माणूस नेढं असलेल्या सुया वापरत असे. तागापासून, कापसापासून कापड विणले जात असे. इ.स.पू. ३००० च्या आसपास रेशीम उत्पादनासाठी रेशीमकिडे पाळले जात असलयाचे पुरावे उपलब्ध आहेत. वस्त्रांच्या बरोबरच फॅशनचीही सुरुवात झाली. बिकिनीची फॅशन दोन हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होती यावर आपला आज विश्वास बसणार नाही. वनस्पतीशास्त्राचादेखील तेव्हा पद्धतशीर अभ्यास झाला होता. प्राचीन काळात उद्यानशास्त्र अतिशय प्रगत असल्याचे दाखले मिळतात. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी रोमचं वैभव तिथल्या विविध प्रकारच्या बगीच्यांमध्ये मोजलं जात होतं. या बागा अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्माण केल्या जात. ‘झाडे लावा, देश वाचवा’ ही घोषणाही प्राचीन काळातलीच! प्राणिसंग्रहालयेही प्राचीन काळापासून अस्तित्वात होती. प्राणी पाळले जात होते, तशीच प्राण्यांसाठी राखीव अरण्येही होती. विविध प्रकारचे खेळ, त्यांच्या स्पर्धा यांचा उगमही इ.स. पूर्व काळातीलच! चष्मे, छत्र्या, तंबाखू याही आपल्याला मिळालेल्या पुरातनकालीन देणग्याच आहेत. तर असा हा उत्खननशास्त्र आणि पुरातनशास्त्राच्या साहाय्याने सिद्ध झालेल्या उत्खननशास्त्र आणि पुरातनशास्त्राच्या साहाय्याने सिद्ध झालेल्या अतिशय रंजक आणि ज्ञानात भर घालणारा असा विज्ञानाचा इतिहास! इतिहास हा फक्त राजे, युद्ध, सनावळ्यांचा नसतो तर प्रत्येक विषयाच्या मागे पूर्वजांचे जे संशोधन व कर्तृत्व असते त्याचाही असतो. हा विज्ञानाचा इतिहास आपल्यापुढे या पुस्तकाद्वारे सहज उलगडत जातो. एरवी बऱ्याच जणंना कंटाळवाणा वाटणारा ‘इतिहास’ हा विषय अगदी वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातील प्रत्येक लेखाला दिलेली उत्तम चित्रांची आणि सुस्पष्ट रेखाटनांची जोड. उदा. सुश्रुताने वर्णन केलेलया नाकाच्या प्लॅस्टिक सर्जरीची रेखाचित्रे, आरशात बघून ओठ रंगविणाऱ्या इजिप्शियन युवतीचे रेखाचित्र.